इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
विश्वविजेतेपदाचा थरार अंतिम टप्प्यात
फुटबॉल विश्वचषकाचा थरार अतिशय रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. आतापर्यंत अनेक आश्चर्यजनक निकाल लागले आहेत. आता या आठवड्यात काय होणार याचा कुणालाच अंदाज करता येणार नाही. यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….
यंदाच्या फिफा वर्ल्ड कप या कतार इथल्या फुटबॉलच्या महामेळाव्यात १८ डिसेंबर (रविवार) २०२२ रोजी ‘विश्वविजेता’ निश्चित होणार आहे. आता हा क्षण अवघ्या तीन पावलांवर येऊन ठेपला आहे. अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्स आणि मोरोक्को हे चार संघ सेमी फायनल मध्ये पोहोचले असून यापैकी जे दोन संघ या आठवडाभरातल्या दोन वेगवेगळ्या सामन्यात विजयी होतील, ते संघ विश्वविजेतेपदासाठी फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे रहातील. जगभरातील करोडो फुटबॉल चाहत्यांच्या दिलाची धडकन आता शिगेला पोहोचली असून या स्पर्धेचे हे अंतिम पर्व आणखी काय काय उलटफेअर करते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा रोनाल्डो मैदानात उतरला होता तो आपल्या एकट्याच्या बळावर पोर्तुगालला विश्वचषक जिंकून देण्यासाठी. पाच विश्वचषक खेळण्याचा अनुभव असलेल्या रोनाल्डोला हे स्वप्न मात्र अर्धवट सोडावे लागले. मोरक्को या एका आफ्रिकन टीमने पोर्तुगालवर १-० विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. खरंतर या सामन्यात पोर्तुगालची कामगिरी अतिशय सुमारच झाली आणि त्याचाच फायदा मोरोक्कोला मिळाला. त्यातच त्यांनी ५ डिफेंडर मैदानात उतरवून रोनाल्डोची नाकेबंदी करून टाकली होती. सुरुवातीलाच रोनाल्डोला मैदानावर न उतरण्याची खेळी पोर्तुगालला महागात पडली. सामन्याच्या सुरुवातीला रोनाल्डोला राखून ठेवत ५० व्या मिनिटाला त्यांनी मैदानात उतरवलं आणि त्यानंतर रोनाल्डो कडून गोल करण्याची एक संधी हुकली. परंतु मैदानावर रोनाल्डोला जर अधिक वेळ मिळाला असता तर कदाचित या सामन्याचे चित्र वेगळे दिसू शकले असते. जवळपास १४ विदेशी खेळाडू संघात घेऊन खेळणारा मोरक्को पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचतोय आणि या संघाची कामगिरी पाहता पुढचे निकाल अतिशय आश्चर्यजनक लागतील अशी भेदक शंका आता वाटायला लागली आहे.
आणखी एक महत्त्वाचा उलटफेअर ठरला तो ब्राझीलच्या बाबतीत. पाच वेळेचा विश्वविजेता ब्राझील यंदा क्रोएशियाकडून पेनल्टी शूटआउट मध्ये पराभूत झाला. ब्राझीलचा हा पराभव विश्वचषकातल्या भूकंपासारखा ठरला आहे. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर हा सामना पेनल्टी शूटआउट मध्ये गेला आणि तिथून क्रोएशियाने स्वतःसाठी पुढच्या फेरीचे दरवाजे उघडले. हा पराभव ब्राझीलसाठी संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरवणारा ठरला असला तरी क्रोएशियाला चार वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार होण्याची संधी मिळवून देणारा ठरणार आहे. चार वर्षांपूर्वी क्रोएशिया संघ फ्रान्सकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.
तिकडे ‘हेड ऑफ गाॕड’ समजला जाणारा लिओनेल मेसीचा अर्जेन्टिना आणि इंग्लंडला पराभूत करून पुढे आलेला फ्रान्स या दोन बलाढ्य टीम देखील सेमी फायनल मध्ये पोहोचल्या आहेत. फुटबॉलचा इतिहास असे सांगतो की, गतविजेत्या संघाला पुढच्या विश्वचषकात फारशी चांगली कामगिरी करता येत नाही. परंतु गत विश्वचषक विजेता फ्रान्स हा मात्र या परांपरेला अपवाद ठरला असून किमान उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरलाय. या स्पर्धेतल्या आणखी दोन मोठ्या विजयानंतर विश्वचषकाच्या इतिहासात लागोपाठ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची नामी संधी आता फ्रान्स जवळ आहे.
MOROCCO ARE HEADING TO THE SEMI-FINALS! ??@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
Column Pavillion FIFA Football Worldcup by Jagdish Deore