इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलिअन
कोटीच्या कोटी उड्डाणांमध्ये क्रिकेटची लागली वाट
इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या लिलावांमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. त्यामुळे सध्या त्याची जगभरात चर्चा होत आहे. आयपीएलने क्रिकेट विश्वाला नवा आयाम दिला आहे का, असे कुणी विचारले तर नक्कीच दिला आहे. मात्र, या साऱ्या झगमग आणि पैशांच्या खेळात खरे क्रिकेट मात्र पार बदलून गेले आहे, असेच म्हणावे लागेल. याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा लेखक व समीक्षक जगदीश देवरे…
मुळचे आणि खरे क्रिकेट हे कसोटी सामन्यामध्येच बघायला मिळायचे. कालांतराने या क्रिकेटचे दोन भाग झाले. दुसरा भाग म्हणजे वन-डे क्रिकेट. ५०-५० षटकांचा मर्यादित एक दिवसाचा सामना लोकांन आवडायला लागला. ५ दिवस क्रिकेट सहन करणे शक्य म्हणून झटपट क्रिकेटचा झालेला हा जन्म यशस्वी आणि लोकप्रिय ठरला खरा परंतु कालांतराने पुन्हा पुढे जावून एक दिवसाचे क्रिकेट देखील चाहत्यांना मोठे वाटायला लागल्याने त्याला आणखी मायक्रो करतांना २०-२० षटकांच्या क्रिकेटची संकल्पना पुढे आली. ती एक दिवसाच्या क्रिकेटपेक्षा देखील जास्त लोकप्रिय ठरली. २००३ मध्ये पहिल्यांदा २०-२० सामन्यांचा प्रयोग झाला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००७ साली २०-२० चा विश्वचषक जिंकला अशा क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात त्यानंतर वर्षभरात आयपीएल सारख्या लीग स्पर्धा सुरू झाल्या. क्रिकेट खेळणा-या निवडक काही देशात नंतर त्याची कॉपीही झाली. कसोटी क्रिकेटपासून सुरू झालेला हा प्रवास लोकप्रिय ठरला खरा परंतु या प्रवासात ख-या क्रिकेटची पुरती वाट लागली हे नक्की.
विषय आहे आयपीएल लिलावाचा. आयपीएल सुरू झाल्यापासूनचा हा पाचवा लिलाव. आपण ज्यांना आपण क्रिकेटचे हिरो मानतो अशा खेळाडूंच्या बाबतीत खरेतर लिलाव हा शब्द इथे वापरायला देखील जड वाटतो. लिलाव म्हणजे काय, तर एक सार्वजनिक आणि जाहीर विक्री. ज्यात सर्वात जास्त किंमत देणा-यास वस्तू देण्याची एक पारंपारीक पध्दत वापरली जाते परंतु आयपीएल सारख्या क्रिकेटने जिथे क्रिकेट बदलून टाकले तिथे लिलाव या शब्दाची काय बिशाद. शनिवार, रविवार असे दोन दिवस खेळाडूंचा हा जाहीर लिलाव आपण अनुभवतोच आहोत. राउंड टेबलवर सुटाबूटात बसलेले बोली लावणारे खरेदीदार मालक आणि त्याचेही लाईव्ह प्रक्षेपण. आयपीएल मध्ये व्यावसायिकता इतकी खच्चून भरली आहे की त्यांच्या या लिलावाला देखील एक लोकप्रिय इव्हेन्ट म्हणून लेबल लागल्याचे बघायला मिळाले.
१० संघ, ६०० खेळाडू आणि २१७ स्लॉटस अशा या लिलावात उलाढाल होती ती अब्जावधी रूपयांची. एकूण २५ खेळाडूंच्या संघात फक्त ८ परदेशी खेळाडू विकत घेण्याची प्रत्येक संघाला परवानगी होती. फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू अशा तिन प्रकारात ६०० खेळाडूंची सलग दोन दिवस बोली लागली. कोण, कुठल्या संघात, काय किमतीत, समाविष्ट झाला याच्या डिटेल्स इथे देण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु फलंदाजांसाठी ओळखल्या जाणा-या या खेळात १० पैकी ५ संघांनी निव्वळ गोलंदाजांवर सर्वाधिक खर्च करून त्यांना संघात आणले आहे हे विशेष. लखनौ सुपर जायण्टस आणि गुजरात टायटन्स या दोन्ही नव्या संघांनी अनुक्रमे आवेश खान आणि लॉकी फर्ग्युसन या दोन गोलंदाजांना प्रत्येकी १० कोटीची बोली लावून संघात घेतले आहे तर चेन्नई सुपर किंग्जने दिपक चहरवर या सिझनची सर्वाधीक दुसरी मोठी म्हणजे १४ कोटीची बोली लावली. सरतेशेवटी शार्दूल ठाकूरसाठी दिल्ली कॅपीटल्सने १०.७५ कोटी खर्च केले परंतु त्याला हातचा जावू दिला नाही हे विशेष. निव्वळ गोलंदाज असलेल्या खेळाडूंना २०-२० फॉर्मट मध्ये फारसे महत्व दिले जात नाही हे जरी खरे असले तरी ही आकडेवारी वेगळे काही तरी सांगून जाते.
यंदाच्याच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे तो मुंबई इंडीयन्सचा यष्टीरक्षक ईशान किशन. मुंबईने त्याला रिटेन न करण्याची चूक केल्याने त्याच्या नावाचा समावेश लिलावात करण्यात आला होता. त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर मुंबईने ईशान किशनला १५ कोटी २५ लाख खर्च करून पुन्हा आपल्या संघात सहभागी करून घेतलं. सनरायझर्स हैद्राबाद हा संघ आयपीएल मधला फारसा दमदार संघ राहीलेला नाही, परंतु यंदा निकोलस पुरन सारख्या यष्टीरक्षक खेळाडूवर त्यांनी १०.७५ कोटींची सर्वाधिक बोली लावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अष्टपैलू खेळाडूतर या क्रिकेटची जान आहे. पंजाब किंग्ज इलेव्हनने लिंव्हीगस्टोनला तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने वानिंदू हसरंगा आणि हर्शल पटेल या दोन अष्टपैलू खेळाडूंना सर्वाधिक पैसे खर्च करून आपल्या ताफयात आणले आहे हे विशेष.
मुळात ही कोटीच्या कोटी उड्डाने याचसाठी आहेत की २०२२ च्या टाटा आयपीएल विजेतेपदाचा सन्मान प्रत्येकालाच जिंकण्याची अभिलाषा आहे. आत्तापर्यन्त ख-या अर्थाने मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघाचाच दबदबा या विजेतेपदाच्या शर्यतीत दिसून आला आहे. परंतु अनेक वेळेला रॉयल चॅलेजंर्स बंगलोर, दिल्ली कॅपीटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यासाठी ही शर्यत अवघ्या काही मीटर्सने कमी पडली असे म्हणता येईल. यावर्षीचाही मुंबई इंडीयन्स आणि चेन्नईचा संघ चांगला आहेच यात वाद नाही. परंतु प्लेईंग इलेव्हन नंतर या संघांची जी यादी आपण बघतो आहोत त्यात भरवसा दाखविता येईल अशी नावे आढळत नाही. लांबलचक स्पर्धा, खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस हे मुद्दे या दोन्ही संघांसाठी २०२२ ला जर कळीचे ठरले, तर आयपीएलचा यंदाचा विजेता कुणी तिसराच असेल हे नक्की.