इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
सूर्यकुमार यादव नावाचे भारूड
सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
संत एकनाथांचे हे भारूड तुम्ही कधीतरी नक्की ऐकलं असेल. भारूड हे विनोदाच्या माध्यमातून केलं जाणारं समाजप्रबोधनाचं त्या त्या काळातलं एक सकस माध्यम. संतांनी आपापल्या परीने विविध माध्यमातून जसे भजन, कीर्तन करून कधी प्रेमाने तर कधी कठोर शब्दात त्या त्या वेळी समाजाचे प्रबोधन करण्याचे मौलाचे कार्य केलेले आहे. त्यातीलच एक माध्यम म्हणजेच “भारूड” हे होय. भारतीय क्रिकेट संघातला सुर्यकूमार यादव हा धडाकेबाज फलंदाज ट्वेन्टी-ट्वेन्टी फाॅर्मटमधील विश्वचषकाच्या मोठ्या स्पर्धेआधी आपल्या
प्रतिस्पर्धी संघाला सध्या ही असलीच काहीशी मजेदार आणि धडाकेबाज भारूडं आपल्या फलंदाजीतून ऐकवतोय. यासंदर्भात लिहीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
सुर्यकूमारच्या या भारूडात शब्द नसले तरी उंचच उंच हाणले जाणारे षटकार आहेत, क्षेत्ररक्षकाच्या कानाजवळून डी.जे. वाजवत जाणारे सणसणीत चौकार आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मॅच जिंकण्यासाठी कमी चेंडूत धावांचा डोंगर कसा उभारायचा आणि विरूध्द संघाला कसं आडवं पाडायचं, याचे धडे देखील आहेत. २०२२ या कॅलेण्डर वर्षात आत्तापावेतो ट्वेन्टी-ट्वेन्टीत भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा सुर्यकूमार यादव या बहाद्दराने ज्या वेळेला आयसीसी टी२० जागतिक रॅन्कींगमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले, त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बहाद्दराचं षटकारावरचं प्रेम अनोखं आहे. २०२२ या वर्षात त्याने ४५ षटकार खेचून मोहम्मद रिझवानचा २०२१ चा ४२ षटकारांचा विक्रम मोडलाय. परंतु, सुर्य असाच तळपत राहीला तर अजून २०२२ संपेपर्यंन्त ही आकडेवारी कुठे जाईल, हे सांगता येणार नाही.
३२ वर्षीय सुर्यकूमार भारतीय संघाला गवसलाय तो मुंबई इंडियन्सच्या छावणीतून. ट्वेन्टी-ट्वेन्टी राष्ट्रीय संघात येवून त्याला जेमतेम दीड वर्ष पुर्ण झालय. या काळात द. अफ्रिकेविरूध्द पहिला सामना खेळेपर्यन्त त्याच्या नावावर अवघ्या ३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. परंतु, इतका कमी अनुभव पॉकेटमध्ये असलेल्या सुर्यकूमारकडे सगळेच आशेने बघत आहेत. अर्थात, याची कारणं तितकीच मजबूत आहेत.
ट्वेन्टी-ट्वेन्टी हे अशा प्रकारचे क्रिकेट आहे ज्यात फलंदाजाला धावा ‘जमवतांना’ किंवा धावसंख्या ‘गाठतांना’ वेगाचे सूत्र देखील सांभाळावे
लागते. सुर्यकूमारने हे सूत्र चांगले आत्मसात केले आहे. ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या मालिकेत याचा प्रत्यय आला. पहिल्या सामन्यात २५ चेंडूत ४६ धावा ही त्याची खेळी वाया गेल्यानंतर हैद्राबादमध्ये झालेला शेवटचा, तिसरा आणि निर्णायक सामना मात्र या पठ्ठ्याने अवघ्या ३६ चेंडूत ६९ धावा करून एकहाती खेचून आणला. नंतर दक्षिण अफ्रिकेविरूध्द पहिल्या सामन्यातल्या ३३ चेंडूत नाबाद ५० धावा देखील सनसनाटी ठरल्या. संघात राेहीत शर्मा आणि विराट कोहली सारखी ‘दादा’ माणसं असतांना देखील सध्या माध्यमातून सुर्यकूमारचा ‘उदो उदो’ होताेय तो याचमुळे.
या विश्वचषकात भारतीय संघ विजयी ठरेल की नाही यावर बोलायला क्रिकेटमधले रथी महारथी सध्या चांगलेच घाबरत आहेत. आयपीएल नावाचा ट्वेन्टी-ट्वेन्टीमधील ‘महायज्ञ’ ज्या भारतात दरवर्षी पेटवला जातो. भारतीय संघावर खुल्या दिलाने बोली लावायला कुणी तयार नाही. वर दिलेल्या संत एकनाथांच्या भारूडात पुढे आणखी काही मजेशीर ओळी आहेत.
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा..
तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर, पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
भारतीय क्रिकेट संघाला या ओळी सध्या चपखल लागू पडतात.
काही दिवसापुर्वी दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत आमचा संघ पोहोचला तेव्हाच परतीच्या विमानात आमच्या टीमसोबत आशिया चषक देखील असेल, अशी स्वप्न आम्ही बघून ठेवली होती. पाकिस्तानला तर धो-धो धुणार, श्रीलंकेचा संघाची कामगिरी आधीच ‘मंदावलीय’ आणि बाकीचे संघ तर काय, एकदम चिल्लर…मग विजेते पदाचा दावेदार म्हणून उरतो कोण? … आम्हीच. परंतु, ठरवल्याप्रमाणे यातलं काहीही झालं नाही. आमच्या बंद्या रूपयांची चिल्लर केव्हा झाली आणि हा रूपया कसा पडला हे समजायच्या आत, संघ रिकाम्या हाताने मायदेशी परतला. या कामगिरीनंतर खरेतर येत्या १७ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सो कॉल्ड संभाव्य विजेतेपदाच्या भारतीय संघाच्या आशा गुंडाळून ठेवण्याची प्रोसेस सुरू झाली होती. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी यशस्वी झाला आणि या प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा जीव ओतला गेलाय. यासाठी भारतीय संघातले जे काही मोजके खेळाडू कारणीभूत ठरले आहेत त्यात सुर्यकूमार यादव याचे नाव टॉपवर आहे.
सुर्यकूमार यादव (Suryakumar Yadav) या इंग्रजी नावावरून कुणीतरी त्याच्या नावाचा शाॅर्टफाॅर्म SKY (स्काय) असा केलाय. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘स्काय हॅज नो लिमीट’. आता सुर्यकूमार अनुभवल्यानंतर त्याच्याकडून विश्वचषकात अपेक्षा ठेवतांना जर कुणी लिमीट बाळगणार नसेल, तर त्यात काय नवलच!” एकटा सुर्यकूमार विश्वचषक जिंकून देवू शकत नाही” हे वाक्य जरी क्रिकेटच्या व्याकरणातले शुध्द वाक्य असले तरी “सुर्यकूमार भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देवू शकतो” हे भोळ्याभाबड्या क्रिकेट चाहत्याच्या दिलातल्या वाक्याला देखील तितकाच सन्मान द्यावा लागेल.
संत एकनाथाच्या भारूडात नमूद केल्याप्रमाणे, आशिया चषक स्पर्धेतल्या पराभवामुळे जर भारतीय संघासाठी गर्वाने फुगलेल्या छातीच्या फुग्याला पिन टोचून कुणी त्यातली थोडीशी हवा कमी केली असेल, तर मग तव्दतच विश्वचषकाआधी तेजाळलेला हा सुर्य संघाच्या भवितव्यावर प्रकाश पाडणारा आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाला आडवा पाडणारा भरवशाचा फिनीशर ठरावा हीच प्रार्थना.
Column Pavilion Cricketer Suryakumar Yadav by Jagdish Deore
Sports