इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
मनमाडच्या व्यवहारे भगिनींची भारदस्त कामगिरी
– जगदीश देवरे (pavilionsmailbox@rediffmail.com)
भारतात गीता फोगट आणि बबिता फोगट या दोन कुस्तीपटू भगिनींची कथा आपण अनेकांनी आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून अनुभवली आहे. ज्या खेळात करिअर करायला महिला पुढे येत नाहीत, समाज महिलांना पुढे येऊ देत नाही त्या खेळात या दोघींच्या वडिलांनी दोघींना हात धरून कसे पुढे आणले? ही कथा आपण सर्वांनीच बघितली आहे.
एकाच खेळात किंवा एकाच क्रीडा प्रकारात दोन सख्ख्या बहिणींनी स्वतःची कारकीर्द घडविण्याची उदाहरणे भारतात तशी फार कमी आहेत. परंतु, आता या यादीत मनमाडच्या ‘व्यवहारे भगिनी’ आपले नाव वेटलिफ्टिंगच्या माध्यमातून जोडू पहात असल्याचे आशादायक चित्र सध्या निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच आपण एक बातमी वाचली असेल ती म्हणजे लिओन सिटी, मेक्सिको येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे या १५ वर्ष वयाच्या मुलीने ५९ किलो स्नॕच व ६८ किलो क्लिन जर्क आसे एकूण १२७ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत तिची सुवर्णपदकाची कामगिरी अवघ्या एका किलोने हुकली. त्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या अंतराने दुसरी एक बातमी आली आणि ती म्हणजे हिमाचल प्रदेशातील नागरोटा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया महिला रँकिंग वेटलिफ्टिंग स्पर्धेत दिया किशोर व्यवहारे हिने ४५ किलो वजन गटात १३१ किलो वजन उचलून ज्युनिअर विभागात कास्यपदक आणि आठ हजार रुपये रोख पारितोषिक पटकावले. सीनियर विभागात दियाचा पाचवा क्रमांक आला.
दिया आणि आकांक्षा या दोघी सख्या भगिनी. मनमाडच्या आयुडीपी विभागात त्या रहातात. सौ.हेमा आणि किशोर व्यवहारे या दाम्पत्यांच्या या दोघी कन्या. वडील किशोर व्यवहारे हे मनमाड नगरपालिकेत नोकरीला आहेत. या दोघींमध्ये दिया ही मोठी मुलगी, १८ वर्षाची आणि आकांक्षा आहे १५ वर्षाची. दिया सध्या मनमाड महाविद्यालयातून तिचे शिक्षण पुर्ण करते आहे तर आंकाक्षा गुरु गोविंदसिंग हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
मनमाड हे हळूहळू वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारातले एक सर्वात महत्त्वाचे असे केंद्र बनू पाहते आहे आणि आणि त्याचे सर्व श्रेय या दोघी भगिनींचे काका, मनमाडच्या छत्रे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे यांना द्यावे लागेल. मनमाडला एक जय भवानी व्यायाम शाळा आहे. त्यामध्ये वेटलिफ्टिंग साठी एक स्वतंत्र हाॕल आहे. श्री.जयरामबाबा सानप यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या व्यायामशाळेची देखभाल सध्या मोहन गायकवाड आणि आणि प्रा. दत्ता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गेल्या २५ वर्षापासून प्रवीण व्यवहारे मनमाड मधील मुला-मुलींना वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण अगदी मोफत देत असतात.
ज्यांना या खेळात खरोखर करिअर करायची इच्छा आहे त्यांच्याकडून जय भवानी व्यायाम शाळा काय किंवा प्रवीण व्यवहारे काय? हे प्रशिक्षण देतांना कोणतेही शुल्क आकारत नाहीत. त्यांच्या या कार्यातून गेल्या २५ वर्षात साधारणपणे ४० ते ५० मुली आणि ५० ते ६० मुले वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात तरबेज झाले असून त्यांच्यापैकी काहींनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा देखील उमटवला आहे. साधारणपणे २ वर्षांपूर्वी लहान मुलांना वेटलिफ्टिंग शिकायला सोपे जावे म्हणून फायबरच्या प्लेट्स मार्केटमध्ये आल्या होत्या. त्याची उपयुक्तता ओळखून जय भवानी व्यायाम शाळेने कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा या फायबर प्लेट खरेदी केल्या. सुरुवातीला पाईप किंवा काठी यावर सुरुवातीला १० किलो, १५ किलो असे वजन लावून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते.
येथे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देतांना आलेल्या खेळाडूंकडून सुरुवातीला आवश्यक व खेळासाठी पूरक असा व्यायामही करून घेतला जातो. खांदे, पाठ, मांडी हे शरीराचे भाग या खेळात अतिशय महत्त्वाचे मानले जातात. नेमके हे भाग मजबूत करण्यासाठी जो पुरक व्यायाम आहे, तो इथे शिकवला जातो. त्याचबरोबर या खेळाच्या दृष्टीने पूरक आहार कोणता आहे, याचे देखील मार्गदर्शन केले जाते.
दिया आणि आकांक्षा व्यवहारे यांच्यातला खेळाडू घडविण्यासाठी सुरुवातीला तिच्या प्रशिक्षकांनी त्यांना योगाभ्यास शिकवला. प्रसिद्ध योगशिक्षक सुनील ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली योगविद्या शिकत असताना दियाला वयाच्या बाराव्या वर्षी आणि आकांक्षाला वयाच्या सर्वसाधारणपणे दहाव्या वर्षी वेटलिफ्टिंगचे देखील प्रशिक्षण देण्याचे काम काम सुरू करण्यात आले. वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण हे जरी घरातलेच असले तरी या खेळाकडे सकारात्मक पद्धतीने बघून प्रत्यक्ष मेहनत घेण्याचे काम या दोघी भगिनी करत आल्यामुळेच इतक्या कमी वयात या दोघींना एक मोठे यश संपादन करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या दोघीही अभ्यासात सुद्धा चांगल्या आहेत. हल्ली मुलांचे अभ्यासाचे नुकसान होईल या कारणाखाली काही पालक मुला-मुलींना खेळाकडे पाठवत नाही अशी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची खंत आहे. अशा मुलांसाठी आकांक्षा आणि दिया व्यवहारे आणि या दोघी भगिनींचे यश हे निश्चितपणे प्रेरणादायी ठरू शकते.
दियाला भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाला आणि औरंगाबाद यांची शिष्यवृत्ती लाभली असून त्या योजनेअंतर्गत ती आता पुढचे प्रशिक्षण घेते आहे तर आकांक्षा च्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०२४ साली पॅरिस येथे होऊ घातलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतात आधीपासूनच खेळाडूंची तयारी करायला सुरुवात झाली असून वेटलिफ्टिंग मध्ये संपूर्ण भारतातून २० उत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यांना ‘टारगेट ऑलिंपिक पोडियम’ या स्कीम अंतर्गत शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिले जात असून महत्त्वाची बाब म्हणजे या २० खेळाडूंमध्ये मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिचा देखील समावेश आहे
या दोघींच्या घरातच खेळाविषयी सुरुवातीपासून प्रेम आणि आवड असल्याचे आपल्याला दिसून येईल. दिया आणि आकांक्षांचे आजोबा श्री. राजाराम व्यवहारे हे एसटी महामंडळाच्या नियंत्रक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना कबड्डी आणि व्हाॕलीबॉल या खेळाची खूप आवड होती आणि त्यांच्या जमान्यात ते हा खेळ अतिशय उत्तम खेळत होते. पुढे त्यांचा मोठा मुलगा प्रवीण व्यवहारे यांनी नाशिक जिल्हा स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवल्या आणि त्यानंतर ते वेटलिफ्टिंगकडे वळाले. या खेळात त्यांनी विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. या दोघींचे वडील किशोर व्यवहारे हे देखील खेळाचे चाहते असून त्यांनी काही स्पर्धांमधून सहभाग नोंदवलेला आहे.
इतकेच नव्हे तर राजारामजी व्यवहारे यांच्या तिन्ही मुली देखील खो-खो खेळायच्या आणि त्या तालुका स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. अशा या संपुर्ण क्रीडाप्रेमी कुटुंबातून पुढे आलेल्या दिया आणि आकांक्षा व्यवहारे या भगिनी वेटलिफ्टिंग मध्ये मनमाडचे, पर्यायाने नाशिक जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर रोशन करण्याच्या दृष्टीने आता कामाला लागल्या असून त्यांची मेहनत आणि त्यांची धडपड यातून एक दिवस त्या मोठी कामगिरी साध्य करून दाखवतील हे नक्की.