इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलियन
रोहितवर सगळीच जबाबदारी कशासाठी?
शेवटी रोहित शर्माच्याच नावाची भारताचा कसोटी कर्णधार म्हणून घोषणा झाली. किंबहूना प्राप्त परिस्थितीत निवड समिती समोर दुसरा पर्याय उपलब्ध नव्हताच, त्यामुळे ही निवड करावीच लागली असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. टी२०, वनडे आणि आता कसोटी या तिनही प्रकारच्या सामन्यात रोहित आता भारतीय संघाला लीड करणार आहे. विराट कोहलीने दिलेल्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर या पदाची खांदेपालट अपेक्षीत होतीच, परंतु मर्यादित षटकांचे क्रिकेट [टी२० आणि वनडे] आणि कसोटी क्रिकेट यांच्यासाठी स्वतंत्र कर्णधार नेमले जातील अशी शक्यता वाटत होती, ती या घोषणेने माञ फोल ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेट खेळणारे जे मुख्य देश आहेत त्यांच्यापैकी अनेकांनी या दोनही प्रकारच्या क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार नेमण्याची पध्दत अवलंबिली आहे. त्याला इंग्रजीत स्प्लीट कॅप्टन्सी असे असे म्हणतात. अगदी सोदाहरण बघायचं झालं तर, जो श्रीलंकेचा संघ भारत दौ-यावर आलाय त्यांच्या ताफयात मर्यादित क्रिकेटच्या श्रेणीसाठी दिमुथ करूणारत्ने तर कसोटीसाठी दासून शानाका हा कर्णधार असणार आहे. नुकताच वेस्ट इंडीजचा संघ भारतात टी२० खेळून गेला. त्यांचा कर्णधार कायरन पोलार्ड होता परंतु कसोटीत हेच काम वेस्ट इंडीजसाठी क्रेग बेथवेट बघतो. याखेरीज, इंग्लड संघासाठी ज्यो रूट आणि इऑन मार्गन तर ऑस्टेलियासाठी पॅट कमीन्स आणि एरॉन फिन्च हे दोन वेगवेगळे कर्णधार अनुक्रमे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सध्या सांभाळतात. दक्षिण आफ्रीका आणि बांग्लादेश संघानी देखील हीच पध्दत अंमलात आणली आहे. या पॉलीसीला पाकिस्तान आणि न्युझीलंड हे दोन संघ मात्र अपवाद आहेत. बाबर आझम पाकिस्तानसाठी आणि केन विल्यीयम्स न्युझीलंडसाठी ऑल इन वन कर्णधार आहेत. ऑस्ट्रेलियाकडे तर मार्क टेलर-स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टींग-स्टीव्ह वॉ आणि दक्षिण आफ्रीकेकडे एबी डिवीलियर्स-फाफ डूप्लेसीस असा स्प्लीट कॅप्टन्सीचा उज्वल इतिहास आहे.
“एक कर्णधार” ही पध्दती वाईट आहे असा विषय अजिबातच नाही. आपण इतरांची कॉपी का करत नाही असे म्हणण्याचा देखील येथे उद्देश नाही. मुद्दा हा आहे की विराट कोहली प्रकरणानंतर आपण काही शिकणार आहोत की नाही ? विराट कोहलीवर भारताचा मुख्य फलंदाज म्हणून असलेली जबाबदारी आजही कायम आहे. त्याच्याकडे असेच बहुआयामी कर्णधारपद होते. मात्र त्याचा बॅडपॅच सुरू झाल्यानंतर, वयाच्या उतरणीला लागलेल्या एखाद्या सशक्त माणसाला एकामागून एक व्याधी सुरू व्हाव्यात तशी भारतीय संघाची अवस्था सुरू झाली होती. कर्णधाराला जर त्याच्या वैयक्तीक कामगिरीचा बेन्च मार्क गाठता आला नाही तर पराभवाचे खापर कर्णधारावर सर्वप्रथम फुटणार हा वैश्वीक नियम आहे. कोहलीच्या बाबतीत तो आपण सर्वांनीच लावला. त्याचमुळे त्याला एका पाठोपाठ एक अशा सगळया प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद एकतर सोडावे तरी लागले किंवा त्याच्याकडून काढून तरी घेतले गेले.
कोहलीनंतर रोहित हा दुस-या क्रमांकाचा महत्वाचा खेळाडू आहे. अशा परिस्थीतीत, कोहलीच्या उदाहरणातून भारतीय क्रिकेटची कर्ती-धर्ती असलेली मंडळी काही बोध घेणारच नसेल, तर भविष्यात हेच रोहितला बाबतीत घडू शकते अशी भिती व्यक्त करण्यात गैर काहीच वाटत नाही. कसोटी कर्णधारपद रोहितकडे देण्याइतपत तो सक्षम आहेच. परंतु, एकदा टी२० आणि वन-डे क्रिकेट त्याच्या ताब्यात दिल्यानंतर किमान कसोटी क्रिकेट दुस-याच्या ताब्यात दिले जाईल आणि स्लीट कॅप्टन्सी नावाचा पॅटर्न आपल्याकडे देखील राबविला जाईल अशी जी काही शक्यता वाटत होती ती फोल ठरली आहे. अंजिक्य रहाणे संघातले स्वतःचे स्थान गमावून बसल्याने आणि चेतेश्वर पुजारालाही त्याच्या बॅडपॅचचा फटका बसल्याने रोहित शिवाय निवडसमितीपुढे कोणताच पर्याय नसावा. परंतु ही बाब भारतीय क्रिकेटसाठी ही आणखीनच धक्कादायक होवून जाते. एकीकडे ३३ वर्षाच्या विराट कोहलीने वैयक्तीक कामगिरी सुधारण्यासाठी घेतलेली भुमिका डोळयासमोर असतांना त्याच्याजागेवर ३४ वर्षीय रोहित शर्माची नेमणूक होणे ही बाब बरेच काही सांगून जाते.
मुळात रोहितकडे कर्णधारपद आले ते त्याच्या आयपीएल मधील कर्णधारपदाच्या यशामुळे. त्याच्या नेत़त्वाखाली मुंबई इंडीयन्स पाच वेळेला विजेते ठरले. या आधारावर त्याला टी२० आणि वन-डे कर्णधारपदाचा मानकरी ठरवणे स्वागतार्हच होते. परंतु, आता कसोटीची जबाबदारी देखील त्याच्यावर सोपविणे म्हणजे गोड लागतोय म्हणून ऊस मुळासकट खाण्याचा प्रकार तर होत नाहीये ना, याकडे खबरदारीने बघणे आवश्यक आहे. अगदी चाळीशीपर्यन्त खेळण्याची शक्ती विराट, रोहित यांच्याकडे आहे असा जरी कयास लावला तरी या दोघांच्या समोर आता फार मोठे असे क्रिकेट राहीलेले नाही. भारतात विजयासाठी संघावर दबाव असतो आणि तो इतका असतो की हा संघ एखादी मालिका देखील पराभूत झाला तर क्रिकेटची बाराखडी माहिती नसलेले न्युज चॅनेल्स कांगावा करतात. अशा परिस्थीतीत रोहितवर टाकलेले जबाबदारीचे ओझे जर जड झाले, तर भारतीय क्रिकेटचे किती नुकसान होईल याचा देखील विचार व्हायला हवा. भारतीय निवड समितीसमोर कर्णधारपदासाठी, किमान कसोटीसाठी तरी अतिशय कमी विकल्प आहेत हे मान्य. परंतु, विकल्प शोधावेच लागतील.
वर उल्लेख केल्याप्रमाणे केएल राहूलचा पत्ता कट झाला. चेतेश्वर पुजाराला तर रणजीत खेळण्याची वेळ आली. जाडेजावर विश्वास टाकावा असं काही नाही. आर अश्वीनवर विश्वास टाकावा तर त्याच्याकडे मोठा कालावधी शिल्लक राहीलेला नाही. बुमराचे नाव पुढे आले होते परंतु त्यात रिस्क आहे. श्रेयस आणि रिषभ यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर…. “दिल तो बच्चा है जी”. त्यामुळे इतके सारे विकल्प तपासल्यानंतर केवळ कुणी उरलेच नाही म्हणून जर का ही निवड केली गेली असेल तर त्याचा फटका बसणार आहे हे निश्चीत आहे. कदाचित ही वेळ मारून नेली जाईल, परंतु पुढे काय ? हे प्रश्नचिन्ह भेडसावणारे असेल. आता आयपीएल, त्यानंतर विश्वचषकाची तयारी, त्याआधी आता श्रीलंकेचा भारत दौरा, नंतर दक्षिण आफ्रीकेसोबत प्रथम मायदेशात आणि नंतर त्यांच्या मैदानावर होणारा मुकाबला आणि मग पुढे बरेच काही…. ! रोहित फॉर्मात आहे आणि त्याच्या या सातत्याला कुठेतरी खीळ बसू नये यासाठी बीसीसीआयच्या निवडसमितीने विकल्प शोधायलाच हवे. जे विराटच्या बाबतीत घडलं, ते रोहितच्या बाबतीत घडू नये एव्हढीच अपेक्षा आहे.
- जगदीश देवरे