इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलियन –
क्रिकेटची प्राथमिक शाळा भारतात दोन वर्षानंतर सुरू
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठी संस्था समजली जाते. मात्र, दूरदृष्टीअभावी मंडळाचे कामकाज प्रभावित झाले आहे. ज्या क्रिकेटमधून भारतीय संघाची पुढची पिढी घडत असते, त्या क्रिकेटमध्ये काही वेगळे पर्याय वापरून असे क्रिकेट जिवंत ठेवता येईल का? यावर कष्ट देखील घेतले गेले नाहीत. म्हणूनच तब्बल दोन वर्षांनी रणजी सामन्यांचा बिगुल वाजला आहे. आगामी काळात भारतीय क्रिकेट विश्वाला याची किंमत मोजावी लागेल, हे नक्की. याविषयी परखड भाष्य करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….
गेल्या दोन अडीच वर्षात कोवीडचा फटका सगळ्यांनाच बसला आहे. त्यातून जसं कुणी सुटलेलं नाही तसंच क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये करिअर करू पहाणारे नवे खेळाडू देखील सुटलेले नाहीत. अगदी कडक लॉकडाऊन वगैरे जेव्हा अस्तित्वात होते त्यावेळचा काळ थोडाफार सोडला, तर राष्ट्रीय संघातून खेळणा-या सिनीअर क्रिकेटपटूंचे फारसे काही बिघडलेले नाही. बायो-बबल नावाचे सुरक्षाकवच त्यांना मिळाले. दोन-चार परदेश दौरे झाले. आयपीएल भारतात नको म्हणून उलट दुबई-शारजा सारख्या ठिकाणाची कुटूंबासोबत (… बायको किंवा गर्लफ्रेंण्ड) सफर झाली. इतक्या सगळ्या मिष्टान्नासोबत चवीला लोणचे हवेच, म्हणून मग काही ब्रॅण्डच्या जाहिराती त्यांना मिळाल्या. हे सगळं मिळालं ते सिनीअर क्रिकेटर्सना. नव्या पोरांना, ज्यांना या क्षेत्रात पाय रोवायचे आहेत त्यांना मात्र खेळायला मैदान सुद्धा मिळाले नाही किंवा भारतात प्रथमश्रेणी दर्जाचे जे काही क्रिकेट खेळले जाते त्याचे सामनेही खेळायला मिळाले नाही. बीसीसीआयने त्याकडे सोयीने कानाडोळाच केला आणि अगदी कोविड संसर्गाचे आणि लॉकडाऊन नियमावलीचे कारण पुढे करीत ते सामने बंद ठेवले. मात्र ज्या क्रिकेटमधून भारतीय संघाची पुढची पिढी घडत असते, त्या क्रिकेटमध्ये काही वेगळे पर्याय वापरून असे क्रिकेट जिवंत ठेवता येईल का? यावर कष्ट देखील घेतले गेले नाहीत. पर्यायाने भारतात रणजी ट्रॉफीचा पुन्हा एकदा बिगुल वाजविण्यासाठी सुमारे दोन वर्षाच्या मोठ्या कालखंडाची वाट बघावी लागली.
१६ फेब्रुवारी ते ५ मार्च या छोटया कालावधीत रणजी स्पर्धेचा पहिला टप्पा खेळला जातो आहे. त्यानंतर एप्रील २०२२ मध्ये बीसीसीआयची दुभती गाय असलेल्या आयपीएलचा हंगाम असल्याने भारतातील क्रिकेटची ही प्राथमिक शाळा त्याकालावधीत पुन्हा बंद केली जाईल आणि त्यानंतर सगळं काही आलबेल असेल तर, मे २०२२ ही शाळा पुन्हा उघडून रणजीचे दुसरे सञ खेळवले जाईल, असा बीसीसीआयने आखलेला कार्यक्रम आहे. कोरोना काळात भारतात नियमावलीच्या पायघडया पसरवून सगळं काही चालू होतं पण शिक्षणाचे दरवाजे माञ बंद होते. तव्दतच, आयपीएल, आंतरराष्ट्रीय दौरे, वन-डे, टी20 सिरीज यासारखे इतर सगळे कार्यक्रम खास योजना अंमलात आणून जोरदारपणे चालू असतांना दुसरीकडे ज्या रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी किंवा विजय हजारे ट्रॉफी सारख्या स्पर्धांमधून भारतीय संघात येण्यासाठी खेळाडूंना प्राथमिक क्रिकेटचे धडे दिले जातात त्या शिक्षणाचे दरवाजे बीसीसीआयने बंद ठेवले होते.
रणजी ट्रॉफीला एक इतिहास आहे. १९३४-३५ पासून सुरू झालेली ही स्पर्धा भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विविध संघात खेळविली जाते आणि त्यातून एक संघ विजेता ठरतो. इथे हार आणि जीतचा प्रश्न गौण असतो. मुळ मुद्दा असतो तो, भारतीय क्रिकेटसाठी या स्पर्धेतून खेळाडू गवसण्याचा. चमकदार कामगिरी करणा-या खेळाडूंना भारतीय संघात सहभागाची यातून संधी मिळते. तुम्ही कुठलाही मोठा खेळाडू निवडला तर त्याच्या खात्यावर रणजी सामन्यांचा इतिहास लिहीलेला तुम्हाला बघायला मिळेल. अशा पध्दतीने भारतीय क्रिकेटचा कणा ठरलेली ही स्पर्धा दोन वर्ष खेळलीच गेलेली नाही आणि त्याचा फटका सहाजिकच येत्या काही दिवसात भारतीय क्रिकेटला बसलेला असल्याचे आपल्याला बघायला मिळेल यात शंका नाही. २०१८-१९ च्या सिझनमध्ये साधारणपणे फेब्रुवारी २०१९ च्या सुमारास विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा संघ रणजी विजेता ठरला होता. सौराष्ट्र संघाविरूध्दची ही मॅच रणजीची जवळपास शेवटची मॅच होती. त्यानंतर कोवीड आला आणि वर उल्लेख प्रमाणे ही शाळा बंद पडली.
अर्थात, आता सगळं जग नव्याने भरारी घेवू पहात असतांना क्रिकेटच्या या प्राथमिक शाळेने मागे राहू नये एव्हढीच अपेक्षा आहे. मध्यंतरी सौरभ गागुंलीने चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणे या दोन दिग्गजांना रणजीत सामन्यात खेळून मग पुन्हा भारतीय संघाकडे वळण्याचा सल्ला दिला होता. अर्थात, या क्रिकेटचे ब्रॅण्डींग करण्याचा तो एक चांगला प्रयत्न आहे असे म्हणता येईल. या काळात कसोटी क्रिकेटचा कार्यक्रम नसल्याने आणि असे सिनीअर खेळाडू णजीत खेळलेच तर प्राथमिक क्रिकेटमध्ये नवी उमेद आणता येईल असा दुहेरी हेतू ठेवून सौरभने व्यक्त केलेले मत स्वागतार्ह मानावे लागेल. परंतु, इथे एव्हढयावर समस्या सुटत नाही. काही नामवंत खेळाडू अशा छोटया स्पर्धा विश्रांतीच्या नावाखाली टाळतात असा आजवरचा अनुभव आहे. हल्लीतर आयपीएल मध्ये मिळणारा रग्गड पैसा रणजीसारख्या स्पर्धांसाठी कोण सोडायला तयार होईल?
सुनील गावस्करने नुकतेच एक मत व्यक्त केले आहे की, आयपीएलमध्ये जागा मिळावी म्हणून जखमी होउ नये, अनफीट होवू नये यासाठी हल्ली अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील काही खेळाडू जास्त मेहनत घेत नाहीत. गावस्करच्या या विधानात तथ्य आहेच. कारण फीट नसल्यास नफा तोटा बघणारे आयपीएलचे फ्रॅंचायझी अशा खेळांडूवर कशाला फुकट पैसे लावतील? परंतु, अगदी सुनील गावस्करने केलेल्या वक्तव्याच्या पुढे जावून सांगायचे झाले तर, सुरक्षीत रहाण्यासाठी नामांकित खेळाडू प्राथमीक दर्जाच्या क्रिकेटला टाळण्याचा देखील सेफ गेम फार कधीपासून खेळतात आणि त्यावर देखील काहीतरी उपाययोजना शोधण्याची बीसीसीआयला गरज आहे. कसोटी क्रिकेट ही क्रिकेटची खरी जान आहे. लाल चेंडूच्या या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय मैदानांवर पाच दिवस उभे राहून मैदान मारणारे खेळाडू जर का भविष्यासाठी तयार करायचे असतील तर भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा असलेल्या बीसीसीआयला रणजी नावाची प्राथमिक शाळा आधुनिक पध्दतीने बांधून घ्यावीच लागेल, यात कुणाचेही दुमत असू नये. पांढ-या चेंडूवर खेळल्या जाणा-या क्रिकेटची लोकप्रियता अफाट आहे. त्यात पैसा आहे, धमाल आहे आणि मनोरंजन देखील आहे. या झटपट क्रिकेटसाठी भारतीय खेळाडू तयार करायला आयपीएलसारखी मोठी फॅक्टरी तयार आहे. परंतु गरज आहे ती कसोटी क्रिकेटसाठीचे खेळाडू तयार करण्याची. यासाठी रणजी स्पर्धेशिवाय कालही वेगळा पर्याय भारतात उपलब्ध नव्हता आणि आजही नाही.