इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलियन
पाकिस्तान आणि वादग्रस्त अम्पायरिंग
– जगदीश देवरे
पाकिस्तानमध्ये एकतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला कुणी जात नाही आणि समजा अशी एखादी दुसरी मालिका झालीच, तरी त्यात वादग्रस्त घडल्याशिवाय त्या पुर्ण होत नाहीत. हे समीकरण अजूनही कायम आहे आणि, काल परवा लाहोरच्या गद्दाफी स्टेडीअमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या तिस-या कसोटीत ते अनुभवायला देखील मिळालं.
ही कसोटी क्र.३ म्हणजेच मालिकेतली शेवटची आणि निर्णायक कसोटी होती. पहिल्या दोन्ही कसोटी अनिर्णित राहील्यानंतर सहाजिकच पाकिस्तान या सामन्यात खरेतर विजयाचीच अपेक्षा ठेवून उतरला होता परंतू ते शक्य होत नाही म्हटल्यावर निदान ही कसोटी देखील अनिर्णित राखता आली तरी चालेल असेच त्यांचे प्रयत्न होते. डेव्हीड वॉर्नर या कसोटीत चवथ्या दिवशी सलामीला उस्मान ख्वाजा सोबत फलंदाजी करीत होता. दोघेही दमदार फलंदाजी करीत असतांना, पाचव्या दिवशी पाकिस्तानी फंलंदाजांना फलंदाजी करावी लागणार असल्याने अंपायल अलीम डार आणि अहसान रझा या दोन अंपायर्सनी वॉर्नरच्या क्रिझ सोडून बाहेर खेळण्यावरच आक्षेप घेतला. असे करून तो डेंजर झाेन मध्ये पळत येतोय असा अपांयर्सचा आक्षेप होता. त्यांना खेळपट्टीची काळजी होती का संघाची ? याचं उत्तर वेगळं सांगायला नकोच. मग नेहमी होते तशी बाचाबाची झाली ‘मी क्रिझमध्येच उभे राहून क्रिझच्या आतंच खेळावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?’ या वॉर्नरच्या प्रश्नाला ‘हो’ असे आश्चर्यकारक उत्तर आल्यानंतर वॉर्नरने ‘रूल बूक दाखवा’ असं सांगितलं आणि तोपर्यन्त मी पुढे खेळणार नाही अशी धमकीही देवून टाकली. या खेळपट्टीवर शेवटचा डाव आपल्या फंलदाजांना खेळावा लागणार असल्याने आपल्या फलंदाजांसाठी अंपायर्संनी आपल्याला चुकीची वॉर्निंग दिली, असा वॉर्नरचा आरोप होता. शेवटी अंपायर्सनी रूल बूक मागवलं नाही आणि वॉर्नरने खेळ पुढे सूरू केला तो भाग वेगळा, पण या निमीत्ताने पाकिस्तानची अंपायरींग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे हे विशेष.
शेवटी जे व्हायचं तेच झालं. पाचव्या दिवशी आॕस्ट्रेलियाने त्यांना पराभूत करुन त्यांची भिती खरी ठरवली. परंतु, या निमित्ताने पाकिस्तानची अंपायरींग हा सुध्दा नेहमी वादाचाच भाग राहीली आहे हे देखील खरं ठरलं. पाकिस्तानच्या अंपायर्संना खराेखर निर्णय देता येत नाही की ते मुद्दाम चुक करतात हा देखील नेहमीच शोधाचा विषय राहीलेला आहे. पण जर आपण इतिहास बघितला तर तो हेच सांगतो की पाकिस्तानी अपांयर्स हे कधीही तटस्थपणे निर्णय देत नाहीत, तर त्यांच्या कामगिरीत कुठेतरी पाकिस्तानी संघाला मदतीचा ठरेल असाच हेतू असतो.
फार दुर कशाला जायचं, याच मालिकेतल्या दुस-या टेस्टमध्ये अंपायर अहसान रझाने ऑफ स्टम्पच्याभरपूर बाहेर जाणा-या चेंडूवर पाकिस्तानचा मधल्या फळीतला फलंदाज मोहम्मद रिझवानला एल.बी.डब्ल्यू. आउट दिला होता. अखेर डी.आर.एस.मध्ये हा निर्णय फिरला तो भाग निराळा, पण महत्वाची बाब म्हणजे या निर्णयाचा व्हीडीओ ज्यांनी कुणी बघितला त्या प्रत्येकाने त्याला ट्रोल करण्याइतका बाळबोधपणा या अंपायरने ऑनफिल्ड दाखवला.
३ नोव्हेंबर १९७८…… पाकिस्तानच्या सहीवालमध्ये भारताचा पाकिस्तान विरूध्द वन-डे सामना होता. १-१ बरोबरी असल्याने तिसरा आणि अंतिम सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक होता. सुरींदर अमरनाथने ६२ धावा केल्यानंतर गुंडप्पा विश्वनाथ सह अंशुमन गायकवाड ही जोडी मैदानात होती. इम्रान खान ३९ वी ओव्हर टाकत होता. इम्रानने पहिला चेंडू बाउन्सर टाकला. तो अंशुमनच्या बॕटच्या कक्षेबाहेर होता आणि थेट वासीम बारीच्या हातात जावून थांबला. अंशुमनसाठी तो नक्कीच वाईड होता. पण अंपायरने तो दिला नाही. एव्हढयावर पुढचा एपिसोड थांबला नाही, एका मागोमाग वाईड पडत गेले आणि अंपायरने मात्र ते वाईड दिलेच नाही. शेवटी परिस्थिती अशी आली की कर्णधार बिशनसिंग बेदीने हा सामना पाकिस्तानला अक्षरशः देवून टाकला. आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं पण त्यामागे पाकिस्तानी अंपायर्स हाच फॅक्टर होता. आजही या सामन्याचा निकाल जर आपण बघितला तर काही ठिकाणी Pakistan Awarded the match (opposition conceded) असा उल्लेख या सामन्याच्या ‘निकाल’ या सदरात आढळतो. हे घडलं तेव्हा जिंकण्यासाठी आवश्यक असलेले सगळे फॅक्टर्स भारताकडे होते. ८ विकेट शिल्लक होत्या आणि १४ चेंडून २३ धावा करायच्या होत्या…!
१९७८ साली मोहींदर अमरनाथला शकुर राणा या वादग्रस्त अंपायरने खेळपट्टीच्या डेंजर झाेनमध्ये पळू नये म्हणून ताकीद दिली हाेती. कर्णधार सुनील गावस्करने मग इम्रान खान आणि सर्फराझ नवाझ हे दोेघे गोलंदाजी करतांना ओव्हरस्टेपींग करत असल्याची बाब लक्षात आणून दिल्यावर मालिकेत वाद वाढला होता. १९८२-८३ साली या घटनेबद्दल संदर्भ काढून बोलतांना रवि शास्त्रीने समालोचनात हा किस्सा एैकवला होता आणि त्यावेळी सर्फराझ-इम्रान हे दोघेच नव्हे तर दोन्ही अंपायर्ससह चार गोलंदाज त्यावेळी पाकिस्तानसाठी गोलंदाजी करताहेत असा आम्हाला भास होत होता असे सांगितले होते.
१९८४ ला न्युझीलंडविरूध्द जावेद मियाॅंदाद बॅटींग करीत असतांना त्याच्याविरूध्द झालेले एल.बी.डब्ल्यू. चे योग्य अपील शकुर राणाने फेटाळल्यानंतर कर्णधार जेरेमी कोनीने तर ‘आम्ही पुढे ही मॅच खेळणारच नाही’ अशी धमकी दिली होती.
शकुर राणा आणि माईक गॅटींग याचा किस्सा तर या कडीतला सर्वोच्च किस्सा आहे. ७ डिसेंंबर १९८७, पाकिस्तान इंग्लंड विरूध्द ५ बाद १०६ अशा बिकट अवस्थेत फलंदाजी करीत असतांना एडी हेमींग्ज गोलंदाजी करीत होता. त्यावेळेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणा-या डेव्हीड कॅपेलला गॅटींगने थाेडं आत बोलावून घेतलं. गॅटींगचे म्हणणं असं होतं की चेंडू टाकण्यापुर्वी त्याने क्षेत्ररक्षणात हा बदल करीत असल्याची जाणिव फलंदाज सलीम मलीकला करून दिली होती. परंतु स्केअर लेगला अंपायरींग करत उभ्या असलेल्या शकुर राणाला मात्र ही बाब काही रूचली नाही. बोलाचाली झाली. शिवीगाळ झाली. गॅटींगने शकुरचा असा काही पाणउतारा केला होता की ‘असा वाईट पाणउतारा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेकांची हत्या झाली आहे, गॅटींगचे नशिब मी त्याला मारले नाही’ अशी शकुर राणाची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आणि गॅटींगने माफी मागावी यावर घाेडं अडलं. या गदारोळात आख्खी टेस्टमॅच दिवसभर थांबून राहीली होती. पुढे माफीनामा झाला वगैरे वगैरे…. तो भाग अलाहिदा. पण मुद्दा हाच आहे की, पाकिस्तान क्रिकेटला आवडीचा वाटणारा अंपायर नावाचा वादग्रस्त पैलू इतिहासातही कायम होता आणि आजही कायम आहे. क्रिकेट असो किंवा आणखी कुठले क्षेत्र, चिडखोरपणा आणि अखिलाडू प्रवृत्ती पाकिस्तानच्या नसानसात भिनलीय यात वाद नाहीच. फक्त क्रिकेटचा एक माजी कर्णधार देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर देखील यात फरक पडलेला नाही याचीच किव येते.