इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
आयपीएलची ही एक बाजू माहिती आहे का?
– जगदीश देवरे (इ मेल – [email protected])
आयपीएल सुरू झाल्यानंतर या स्पर्धेला नावे ठेवणा-यांची कमतरता नाही. क्रिकेटचा बाजार असा उल्लेख नेहमीच होतो.भारतात दरवर्षी खेळली जाणारी ही स्पर्धा काहींच्या मते बिनकामाची असून, काहींच्या मते मात्र मनोरंजनाचा विषय ठरते. परंतु, ही स्पर्धा बिनकामाची आहे की मनोरंजन करणारी आहे या पलीकडे जाऊन या स्पर्धेचा जर बारकाईने आपण विचार केला तर एक गोष्ट नक्कीच महत्त्वाची ठरते आणि ती म्हणजे ही स्पर्धा खूप लोकांसाठी करीअरचे, रोजगाराचे, त्यांच्या व्यवसायाचे इतकेच नव्हे तर चांगला नफा कमावण्याचे एक माध्यम ठरते आहे.
आपण सुरुवात करु खेळाडूंपासून. आयपीएलचा एक महत्वाचा फायदा होतोय तो म्हणजे भारतातल्या अतिशय तरुण खेळाडूंना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट खेळण्याची संधी या निमित्ताने मिळते आहे. क्रिकेट हा श्रीमंत कुटुंबातील मुलांनी खेळावा अशीच एक धारणा या आधी अस्तित्वात होती. क्रिकेटचे कीट, क्रिकेटचे प्रशिक्षण आणि त्यावर होणारा खर्च हा सर्वसामान्य कुटुंबाला खरोखरच परवडेल अशातला नसतो. परंतु तरीही आयपीएलने मात्र अशा अनेक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. आर्थिक दृष्ट्या फारशा सक्षम नसलेल्या कुटुंबातून आयपीएल मध्ये आलेल्या काही खेळाडूंचा प्रवास थक्क करणारा आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास हैदराबाद संघातर्फे खेळणाऱ्या मोहम्मद सिराजचे घेता येईल. त्याचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते सहा बाय सहा च्या रूम मध्ये राहणाऱ्या कुटूंबातून आलेला सिराज २०१७ साली २.६ करोडच्या बोलीवर राजस्थान रॉयल संघात आला. त्यानंतर यशस्वी जयस्वालची वाटचाल खरोखर ‘यशस्वी’ आहे असेच म्हणावे लागेल.
२०१८ पर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर पाणी पुरी विकणारा यशस्वी जयस्वाल हा मागच्या सीझनमध्ये थेट राजस्थान रॉयल्स संघात येऊ शकला ते केवळ आयपीएल मुळे. कधीकाळी कुटुंबासमवेत फुटपाथवर रात्र काढणा-या यशस्वी जयस्वालकडे आता मुंबईत राहायला घर आहे. रिंकू सिंग हे आणखी एक ननाव. गॅस सिलिंडरचे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा हा मुलगा. त्याचे कुटूंब गॅस सिलेंडरच्या गोडाऊन मध्येच राहायचे. चार जणांच्या या कुटुंबातला रिंकू सिंग केकेआरने २०१८ च्या सिझनमध्ये अवघ्या ८० लाखाच्या बोलीवर घेतला आणि पुढे मग त्याचे भाग्य बदललायला वेळ लागला नाही. याच श्रेणीत आणखी एका खेळाडूचे नाव घेता येईल आणि ते म्हणजे चेतन सकारियाचे. त्याचे वडील रिक्षा चालवायचे परंतु आजारपणामुळे त्यांना पुढे ते शक्य होईना.
शेवटी चेतनने आपल्या काकांच्या दुकानात काम करून पैसे कमवायला सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सने २०२१ च्या आयपीएलमध्ये आपल्या वाॕलेटमधले १.२ करोड खर्च करुन संघात घेतले. पुढे त्याची भारतीय संघातदेखील निवड झाली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ देखील असे खेळाडू घडवण्यात मागे नाही. त्यांच्या संघातल्या टी नटराजन चा प्रवास अशाच एका कमी उत्पन्न गटातल्या कुटुंबातून झालेला आहे. २०१७ ला हा खेळाडू आयपीएल मध्ये आला. त्याच्या नावावर आता दोन फ्लॅट आहेत. आयपीएल मधला सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान होण्याइतपत ज्या रवींद्र जडेजाने मजल मारली त्या रवींद्र जडेजाचे उदाहरण या श्रेणीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाईल. त्याच्या लहानपणीचे दिवस अतिशय वाईट होते. त्याची आई लवकर गेली. त्याचे वडील हे सिक्युरिटी गार्ड होते. कधीकाळी आख्ख्या दिवसभराचा खर्च करण्यासाठी त्याच्या खिशात अवघे दहा रुपये असायचे परंतु २००८ ला १९ वर्षाखालील संघात त्याची निवड झाली आणि त्याच वेळेला राजस्थान रॉयल्स तर्फे अवघ्या बारा लाख इतक्या रकमेवर तो आयपीएल मध्ये आला. आता आज याच रवींद्र जडेजा चे उत्पन्न किती असेल हे मात्र विचारू नका.
आयपीएलचे गुणगान गाण्याच्या शर्यतीत हे झालं खेळाडूंच्या बाबतीतलं उदाहरण. परंतु या खेरीज आयापीएल भारतातल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना किती मदतीचे ठरते आहे ते बघणे देखील मनोरंजकच आहे. आयपीएल सुरु असतांना खास करून काही हॉटेल्समध्ये एका मोठ्या स्क्रीनवर आयपीएल बघण्याची व्यवस्था केली जाते. आयपीएलची मॅच बघता बघता जेवण करता येईल म्हणून हॉटेलमध्ये गर्दी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. याखेरीज स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यवसायिकांना देखील या काळात खूप मोठा फायदा होतो आणि त्या निमित्ताने डिलिव्हरी बॉईजना देखील एक चांगला रोजगार मिळतोय असे आढळून आले आहे. घरात बसून आयपीएल बघणार्यांना बाहेरचं खाण्याची हौस झाल्यानंतर या काळात या फूड डिलिव्हरी व्यावसायिकांचा धंदा वाढतो असेही अनुमान आहेत.
आयपीएल म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रॕण्डस् साठी तर चांदीच मानली जाते. आयपीएलचे प्रायोजकत्व मिळावे, आयपीएल च्या मैदानावर स्वतःच्या ब्रॕण्डचा कुठेतरी लोगो असावा यासाठी मोठे मोठे काॕर्पोरेट मालक धडपड करीत असतात आणि याही पेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या काळात एखाद्या नवीन ब्रँड किंवा नवीन उत्पादन बाजारात लाॕन्च करण्याचा मुहूर्त साधण्यासाठी कुणीही संधी सोडत नाही.
आयपीएल सुरू असताना मॕचेस बघणार्यांची संख्या कमी नाही आणि टीव्ही वरचे वाढते व्ह्युअर्स लक्षात घेऊन या काळात जाहिरात क्षेत्राला कमालीचा फायदा होतो. खास आयपीएल साठी म्हणून जाहिराती तयार केल्या जातात आणि आयपीएल संपल्यानंतर त्या जाहिराती बंद होतात. त्यामुळे हा काळ जाहिरात क्षेत्रासाठी सुगीचा मानला जातो.
आयपीएल वर अनधिकृतपणे सट्टा कसा चालतो, याविषयी इथे बोलण्याची गरज नाही. परंतु ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अनेक कंपन्या सध्या अनेक क्रिकेट रसिकांसाठी “फायदा-तोट्याच्या” ठरत आहेत. क्रिकेट चाहत्यांकडे असलेले क्रिकेटचे जुजबी ज्ञान, खेळाडूंची माहिती, संघाची माहिती या आधारे आॕनलाईन गेमिंगमध्ये टीम बनवणे, खेळाडू निवडणे, संभाव्य मॕन ऑफ द मॅच, जास्तीत जास्त धावा करणारे संभाव्य फलंदाज आणि जास्तीत जास्त विकेटस् घेणारा गोलंदाज यांच्या बाबतीत भाकित करणे अशा विविध प्रकारातून ऑनलाइन पैसा लावून गेम खेळणाऱ्यांची वाढती संख्या याकडे दोन्ही दृष्टीने बघावे लागेल.
जसं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की ‘धूम्रपान करणे शरीराला हानिकारक आहे’ तसेच हे फॕन्टसी गेमिंग मोबाईल ॲप्स देखील एक प्रिकॉशन म्हणून जाहीरात करतांना एक सल्ला देतात की या खेळाची तुम्हाला सवय लागू शकते, यात जोखीम आहे वगैरे लगैरे. परंतु तरीही असले गेम्स खेळणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि त्याचेच कारण हे आहे की पूर्वी एक दोन कंपन्यांचे असलेले ॲप्स आता कमीत कमी दोन आकडी संख्येत वाढलेले आहेत.
असो, थोडक्यात काय तर आयपीएल हा एक पैशाचा बाजार जरी वाटत असला तरी त्यात जसे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजन आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे गरजूंसाठी त्यांच्या व्यवसायाचे, रोजगाराचे एक अनोखे साधन देखील आहे. आयपीएलमध्ये अर्थव्यवस्थेचा एक भाग खंगाळून काढण्याइतपत ताकद आहे आणि त्यात ऐश्वर्य ओतण्याइतपत ताकद आहे हे निश्चित.