इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलियन
सलामीची फलंदाजी एक अवघड डोकेदुखी
– जगदीश देवरे (इ मेल – pavilionsmailbox@rediffmail.com)
क्रिकेट लोकप्रिय होण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे या खेळात कोणत्याच फलंदाजाला त्याच्या कामगिरीत सातत्य राखता येत नाही. सचिन असो की लारा, प्रत्येकाच्या कारकिर्दीला अधूनमधून अपयश नावाच्या मधमाशीने डंक मारल्याशिवाय त्यांच्या कारकिर्दीतून गोड मधाचं पोळ निघालेलचं नाही, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आकडेवारी सांगते. हा आजार वैश्वीक आजार आहे. कधी एखाद्या संघाच्या मधल्या फळीचे अपयश ही त्या संघाची पोटदुखी ठरते तर कधी दुस-या एखाद्या संघाचे सलामीचे फलदांज त्या संघाची डोकेदुखी ठरतात. भारतीय क्रिकेट संघही यातून सुटू शकलेला नाहीच.
परंतु जेव्हा नव्या दमाचे काही खेळाडू एखाद्या विशीष्ट नंबरवर फलंदाजीला येवून दमदार फलंदाजी करतात, तेव्हा संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या अपेक्षा उंचावणे नैसर्गिक आहे. नुकत्याच, श्रीलंकेविरूध्द झालेल्या कसोटी मालिकेत ५ व्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंतने आणि ६ व्या क्रमाकांवर श्रेयस अय्यरने केलेल्या अशाच दमदार फलंदाजीनंतर “मन मे लड्डू फुटा…”असे भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटू लागले आहे.
यामागची कारणंही तशीच आहेत. एकतर कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणे यांचा बॅडपॅच इतका वाढला की त्यांना परत प्राथमिक शाळेत जावून स्वतःला सिध्द करण्याची वेळ आली. विराट कोहली सारख्या मुख्य फलंदाजाचा फाॅर्म बघितला तर त्याच्याविरूध्द लवकरच अविश्वास ठराव दाखल होतो की काय, अशी परिस्थीती आहे. कर्णधार म्हणून रोहीत शर्माच्या हातात मावणार नाहीत इतक्या ट्राॅफीज त्याने अल्पावधीत जिंकून आणल्या हे जरी एकीकडे खरं असलं तरी याच दरम्यान त्याच्या वैयक्तीक कामगिरीत नेहमीसारखा बोलकेपणा दिसून आलेला नाही. या सगळया परिस्थितीत रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे मधल्या फळीतले तरूण योध्दे लक्ष वेधून घेताहेत हा एक शुभशकून मानावा लागेल.
श्रीलंकेविरूध्द रिषभ मालिकावीर ठरला तर अखेरच्या कसोटीत श्रेयस सामनावीर ठरला. ‘धोनी नंतर रिषभ पंत’ असे दबक्या आवाजात का होईना, म्हणण्याइतपत चांगली कामगिरी रिषभकडून सुरू झाली आहे. त्यातले सातत्य टिकले तर चाहत्यांनी जेव्हढा धोनीला डोक्यावर घेतला तेव्हढाच भविष्यात रिषभलाही घेतील यात वाद नाही. रिषभकडे एक किलर इन्स्टीक्ट आहे, फलंदाजीला उतरल्यानंतर समोरच्यावर तुटून पडायची त्याला आवड आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याच्याकडे यष्टीरक्षणाचे कौशल्य आहे.
लंकेविरूध्द रिषभच्या ३ डावात १८५ धावा आणि स्ट्राईक रेट बघा… १२०.१३ ! कसोटीत असे आकडे म्हणजे श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या फ्रीस्टाईल फाईटींगचे सीन टाकल्यासारखे वाटतात. कपीलदेवने ४० वर्षापुर्वी ३० चेंडूत ५० धावा करून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकले होते. रिषभने दोन चेंडू कमी घेवून हा विक्रम मोडतांना श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पीसं काढली. या कसोटीत वापरलेला चेंडू गुलाबी होता. परंतु, या भल्या बहाद्दराने किमान रंगाचा देखील विचार केला नाही. ३० कसोटी सामने खेळल्यानंतर त्याच्या यष्टीरक्षणात देखील कमालीची सुधारणा तो करतो आहे याची कर्णधार रोहीतने देखील बोलतांना दखल घेतली.
श्रेयस अय्यर बद्दल बोलायचे झाले तर फलंदाजीत असलेला भक्कम तांत्रीकपणा ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. गरज असेल तर समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजासारखा संयम त्याच्याकडे आहे आणि त्याचवेळेला गिअर बदलून फटकेबाजी करण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे. परंतु, श्रेयसवर दाव लाण्यापुर्वी त्याला अवघ्या ४ कसोटीत संधी मिळाली आहे याकडेही लक्ष द्यावे लागेल. खरंतर रिषभ आणि श्रेयस ही टी२० च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर उदयास आले ते २०१७ साली. श्रेयसला पुढे वन-डेत येण्याची संधी त्याच वर्षी मिळाली. परंतु “विकेटकिपर” हा एक्स्ट्राॅ फॅक्टर जवळ असल्यामुळे रिषभला २०१८ सालीच पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळाली परंतु त्यासाठी श्रेयसला मात्र २०२१ पर्यन्त वाट पहावी लागली. श्रेयसला स्वतःला सिध्द करण्याची वेळ अजूनही संपलेली नाही कारण, ४ कसोटीतल्या ७ इनिंग्ज त्याला भारतीय खेळपट्टीवर खेळायला मिळाल्या आहेत. अजुन परदेशी खेळपट्टयांवर त्याचा कस लागायचाय.
इथे दोघांची तुलना करण्याचे कारण नाही, कदाचित त्याची आवश्यकता देखील नाही. परंतु भविष्यात हे दोन्ही फलंदाज भारतीय संघासाठी किती मोठी अॕसेट होवू शकतात? याचेच विवेचन करण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय. रिषभ २४ वर्षाचा डावखुरा फलंदाज आहे तर श्रेयस २७ वर्षाचा आणि उजवा. त्यामुळे कसोटी काय किंवा वन-डे काय, भविष्यात दोन्ही फाॅर्मटमध्ये जर मधल्या फळीत या दाेघांचे संगनमत एकमेकांशी जुळले ना, तर प्रेक्षकांना फलंदाजीची एक अफलातून जुगलबंदी नक्कीच बघायला मिळेल.
रिषभची एक अडचण आहे आणि ती म्हणजे बेजबाबदारपणाचा शाॅट खेळणं. बेजबाबदारपणा हा शब्द कदाचित इथे योग्य होणार नाही कारण त्याला जबाबदारीची जाणिव असण्याइतपत तो प्रगल्भ आहे. परंतु कसोटीत ४ शतकं नावावर असलेला रिषभ, पाच वेळेला मात्र नर्व्हस नाईन्टीजचा शिकार ठरलाय. नैसर्गिक खेळ खेळतांना हे भान रिषभला जपावेच लागेल. भविष्यात रिषभ – श्रेयस हे भरभक्कम भागिदारीचा इतिहास रचण्याइतपत सक्षम आहेत. वेळ, मैदान आणि प्रतिस्पर्धी तुर्त गुलदस्त्यात आहेत असे निदान म्हणायला तरी हरकत नाही.