इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलियन
नवा कसोटी कर्णधार कुणासारखा असेल?
सौरभ, धोनी आणि कोहली या कर्णधारांनी भारतीय कसोटी क्रिकेटच्या यशाचा इतिहास रचून ठेवलाय. आता नवा कर्णधार यापैकी कुणासारखा असेल?
– जगदीश देवरे
विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा माध्यमांसाठी टीआरपी वाढवणारा विषय ठरलाच नाही. हल्ली अवकाळी वादळ येवून गेल्यानंतर नुकसान झाल्याचे दु:ख वाटते, पण आश्चर्य वाटतं नाही, कारण वेधशाळेने आधीच अंदाज वर्तवलेला असतो. विराटचा राजीनामा काहीसा असाच होता. आता सध्या चर्चा आहे ती नव्या कसोटी कर्णधार निवडीची. नवा कर्णधार कसा असावा यावर अनेक मते आणि मतांतरे आहेत. कुणाला वाटतंय तो रोहीत शर्मा असावा, कुणाला वाटतंय रोहीत मर्यादित षटकांसाठी चांगला आहे म्हणून त्याच्याएैवजी के.एल.राहूल असावा तर अनेक सुपीक डोक्यातून बुमराह ते पंत यांची नावे निघाली आहेत. सन २००० पासून ज्या दिग्गजांनी हे पद सांभाळले त्या सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी गेल्या २०-२२ वर्षात कसोटी क्रिकेटला एक निश्चीत अशी उंची प्राप्त करून दिली आहे. जो कुणी नवा कर्णधार व्हायचा तो होईल, पण हा मुकूट धारण करणा-याला या तीन दिग्गजांमधून आपला एक गुरू निवडायचा की स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची, हे आधी निश्चीत करावे लागेल.
फार लांब नकोच जायला. आपण इ.स. २००० पासूनचे भारतीय कसोटी कर्णधार यांच्या बाबतीतच बोलू. सन २००० आधीच्या कर्णधारांना इथे कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. परंतु हाच कालावधी यासाठी की या काळात भारतीय कसोटी क्रिकेटने एक नवे वळण घेतले आहे, जे आजही बहुतांशी कायम आहे. सन २००० ते २००५ हा सौरभ गागुलीच्या कर्णधारपदाचा काळ. मॅच फिक्सींगच्या वादळानंतर म्हणण्यापेक्षा अझरुदीनच्या नंतर सौरव गांगुली कर्णधार झाला आणि भारतीय क्रिकेटची दशा आणि दिशा दोन्ही बदलल्या.
सौरवने संघाला विजयाची नशा लावली. त्याच्या आधी अझर, कपिल, गावस्कर किंवा अगदी पतोडी काळापर्यन्त जरी तुम्ही गेलात तरी भारतीय संघाचा कसोटीतला विजय म्हणजे एखादया रोजंदारीवरच्या कामगाराला मालकाने दिवाळीत घसघशीत बोनस दिल्यासारखा वाटायचा. सौरभने कसोटीत विजय खेचून आणायची नवी भाषा संघाला शिकवली. त्याच्या कर्णधारपदाची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. ४९ कसोटीत त्याने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भुषविले आणि त्यापैकी २१ कसोटीत विजय संपादन केला. त्याच्या या आकडेवारीचा ठळकपणा असा होता की यापैकी ११ विजय हे परदेशात मिळालेले होते. कसोटीत विजय आणि तो ही परदेशी खेळपटयांवर हे म्हणजे जादूच्या यशस्वी प्रयोगासारखं होतं पण ते सौरभने करून दाखवलं.
नंतर आले ते एक दोन कसोटीत विरेंद्र सेहवाग, २५ कसोटीत राहूल द्रविड आणि यांच्या नंतर अनिल कुंबळे. या सर्वांनी कुठेतरी भारतीय संघाचे सेनापती पद निभावले हे जरी खरी असले तरी त्यांचे कौशल्य सिध्द करण्याइतपत त्यांना संधी मिळालेली नाही त्यामुळे सरस कर्णधार ठरवितांना त्यांचा विचार करणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल.
त्यानंतर, म्हणजे २००८ च्या सुमारास महेद्रंसिंग धोनी नावाच्या “कॅप्टन कुल” चे साम्राज्य सुरू झाले. डोक्यात बर्फाची फॅक्टरी असावी हा कर्णधार. सौरभची देहबोली वाचता यायची. त्याचा राग त्याचा आनंद दोन्ही समजुन यायचा. धोनी म्हणजे सहजपणे न वाचता येणारी बोलीभाषा होती. कर्णधार हा एक यशस्वी खेळाडूच असावा असा एक परंपरागत समज त्याने पुसून तर टाकलाच परंतु कर्णधाराकडे डावपेच असायलाच हवेत असा एक नवा निकष त्याने त्याच्या काळात पुढे आणला. ६० कसोटीत २७ विषय ही विजयाची एक चांगली सरासरी त्याच्या कारकिर्दीत पुढे आली. आय.सी.सी. रॅकींगमध्ये पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाला पहिला नंबर मिळाला तो धोनीच्याच काळात.
नंतर आला तो विराट कोहली. फलंदाजीच्या वैभवाची कवचकुंडले असलेला खेळाडू. सचिन तेंडूलकर या नावानंतर ज्याचे नाव लिहावे अशी ताकद असलेला खेळाडू. तो कर्णधार झाला आणि संघाला लढण्याची नवी उर्मी मिळाली. ६८ कसोटीत ४० विजय. व्वा, क्या बात है. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून त्याचे नाव कोरले गेले. सौरभच्या यशाची टक्केवारी होती ४३ टक्के, धोनीने ती ४५ पर्यन्त वाढवली होती तर विराटने ती ५९ पर्यन्त नेवून ठेवतांना आपला विराटपणा शाबित केला. ही आकडेवारी आहे. आकडेवारी ही कधीकधी फसवी असते असे म्हणतात. परंतु, नव्या कर्णधाराला एक गोल निश्चीत करण्यासाठी ही आकडेवारी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
सौरभकडे दमदार वैयक्तीक कामगिरी असलेल्या दिग्गजांचा संघ होता. हे एक एक दिग्गज जेव्हा रिटायर्ड व्हायला लागले तेव्हा धोनीने संघाची पडझड होवू दिली नाही. त्याने नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि त्यांच्याकडून कामगिरी करवून घेत विजय मिळवले. पुढे आलेल्या विराट कोहलीला याचा फायदा होणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. सौरभकडे दरारा होता, त्याची आगपाखड मैदानावर दिसायची परंतू त्याचबरोबर अंगभूत असलेला राजबिंडेपणा सहकारी खेळांडूसाठी उपयोगी ठरायचा. धोनीने पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर खेळाडूंसाठी काही विशेष क्लासेस घेतले असतील परंतु मैदानावर असतांना त्याच्या चेह-यावर कधीच विजयाचा गर्व आणि पराभवाची खंत दिसली नाही.
विराट या दोघांपेक्षा नेमका वेगळा होता. त्याची रिअॅक्शन बोलकी आणि वेगवान असायची. गेल्या दोन दशकात भारतीय चाहत्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये असे हे तीन दिग्गज कर्णधार अनुभवल्यानंतर आता नवा कर्णधार कसा असावा? याचा अंदाज तुम्हाला येवू शकेल. विजयाची टक्केवारी तर नव्या कर्णधाराला राखावी लागेलच. परंतु त्याचबरोबर संघ घडविण्याचे कौशल्य, त्या संघाच्या कामगिरीत सातत्य राखण्याची कर्तबगारी ही नव्या कर्णधारासमोरची मोठी आव्हाने असतील. द.आफ्रीकेविरूध्द आधीच कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव घेवून भारतीय संघ आला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कर्णधारासमोरची ही आव्हाने आणखी खडतर होणार नसतील तरच नवल.