कोल्हापूरचा १८ वर्षाचा पैलवान
पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी’
– जगदीश देवरे
“आधीच हौस त्यात पडला पाऊस” या उक्तीप्रमाणे गेली दोन वर्ष कोवीडमुळे होऊ न शकलेली कुस्तीची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा यंदा ऐन रंगात आलेली असतानांच अवकाळी पाऊस पडल्याने स्पर्धेसाठी बनवलेल्या आखाड्यांची वाट लागली होती. त्यानंतर ही स्पर्धा पुढे होणार की नाही, अशी शंका निर्माण झालेली असतानांच साताऱ्याच्या आयोजकांनी मात्र कंबर कसून सगळं आलबेल करुन दाखवलं, पुर्ववत केलं आणि ही स्पर्धा घेतली.
कोल्हापूरच्या अवघ्या १८ वर्ष वयाच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा ५-४ अशा फरकाने पराभव करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उंचावली. गादीवरच्या या कुस्तीत पहिल्या फेरीअखेर खरेतर पृथ्वीराज ४-१ अशा फरकाने पिछाडीवर होता. परंतु दुसऱ्या डावात आक्रमक होत पृथ्वीराज ने विशाल बनकर चा दोन वेळेला दुहेरी पट काढून चार गुणांची कमाई केली आणि या निर्णायक डावात ही कुस्ती जिंकली.यापैकी शेवटचे दोन गुण हे फक्त लढत संपण्यासाठी ४५ सेकंद बाकी असताना आले हे विशेष. या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती. “काहीही झाले तरी महाराष्ट्र केसरी विजेतेपदाची आपण गदा जिंकायचीच असा ‘पण’ मी केला होता. ही कुस्ती आपण जिंकणारचं असा सुरूवातीपासूनच मला विश्वास होता आणि त्यासाठी मी पूर्वीपासून तयारीही केली होती. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमक व्हायचे असे माझे धोरण होते. कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली व गुणाधिक्यावर मी विजेता ठरलो.” . विजेतेपद पटकावल्यानंतर सध्या भारतीय सैन्यदलात नोकरीला असलेल्या पैलवान पृथ्वीराज पाटीलची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
कोल्हापूरच्या संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केलेला पृथ्वीराज पाटील याआधी ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पृथ्वीराज याच्या घरातच कुस्ती आहे. पैलवान असलेले संग्राम पाटील आणि धनाजी पाटील अशा सगळ्या कुस्तीगीर काकांकडून त्याला कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले आहे. तर उपविजेता ठरलेला विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावात १९८७ रोजी विशाल बनकरचा जन्म झाला. तो गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात असून ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशालने सुवर्णपदक पटकावले होते. अंतीम लढतीची फेरी गाठण्या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.
कोल्हापूरला खरंतर कुस्तीचं पंढरपुर म्हटलं जातं परंतु ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी कोल्हापूरला २२ वर्ष वाट पहावी लागली. याआधी सन २००० मध्ये कोल्हापूरच्या विनोद चौगुलेने हा किताब पटकावला होता.
स्पर्धेचा इतिहास
वैयक्तीक खेळात भारताला ऑलिम्पीक मध्ये पहिले पदक (बाॅन्झ) मिळवून देण्याचा मान खाशाबा दादासाहेब यांना जातो. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पीक स्पर्धेत त्यांनी हा मान पटकावला होता. ही माहिती आपल्या प्रत्येकालाच बहुतेक तोंडपाठ असेल कारण स्पर्धा परिक्षेत हमखास मार्कस मिळवून देणारी ही माहिती आहे. परंतु याच कुस्तीचा गजर १९६१ सालापासून “महाराष्ट्र केसरी” स्पर्धेच्या रूपाने महाराष्ट्रात अव्याहतपणे सूरू आहे. अपवाद फक्त कोरोनाचा. पुर्वी ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेतर्फे घेतली जात होती परंतु १९८३ साली झालेल्या २८ व्या कुस्तीगिर परिषदेत या स्पर्धेला या खेळासाठी सर्वस्व वाहिलेला प्रायोजक मिळाला आणि तेव्हापासून या स्पर्धेचा चेहरा मोहराच बदलला आहे. कुस्ती महर्षी कै.मामासाहेब मोहाेळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटूंबियांतर्फे या स्पर्धेसाठी लागणारी गदा आणि बक्षिसे दिली जातात. कुस्ती महर्षी कै.मामासाहेब मोहाेळ यांचे सुपूत्र श्री अशाेक (अण्णा)मोहाेळ हे या स्पर्धेच्या बक्षिसांची जबाबदारी उचलतात. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून या स्पर्धेसाठी येणा-या कुस्तीगिरांमध्ये या स्पर्धेचे एक अनन्यसाधारण आणि ऐतिहासीक असे महत्व आहे. सातारा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत यंदा सुमारे ११०० मल्लांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जाते.
या स्पर्धेचे हे ६४ वे पर्व होते. यंदा जवळपास ६० वर्षांनी प्रथमच ही स्पर्धा सातारा येथे भरवली गेली आणि तिथल्या अायोजकांनी ती यशस्वीपणे पार देखील पाडली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रिडा संकूलात पार पडलेल्या या स्पर्धेच्या निमीत्ताने खास आखाडे तयार करण्यात आले होेते. जवळपास ५५ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. आखाडे तयार करण्यासाठी १० ट्रक माती वापरली गेल्याचे सांगण्यात येते. ही माती पुर्णपणे चाळलेली असते व त्यात हळद, दूध, दही, तूप, लिंबू आणि कापूर यांचे मिश्रण टाकले जाते.
मानाची गदा
या स्पर्धेच्या विजेत्यांना दिल्या जाणा-या ज्या चांदींच्या गदा असतात त्याचेही एक वेगळे वैशिष्टय आहे. विजेत्यांना सर्वसाधारणपणे १० ते १२ किलो चांदीची गदा दिली जाते. या गदेत आतल्या बाजुला सागवानी लाकडाचा उपयोग करण्यात आलेला असतो व त्यावर ३२ गेजच्या चांदीच्या पत्र्यावर सुंदर असे नक्षीकाम केले जाते. एका बाजुला श्री हनुमानाचे व दुस-या बाजूला कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमा असतात. विशेष म्हणजे, पेशव्यांच्या दरबारात भांडयावर नक्षीकाम करणारे आणि मानपत्र तयार करणारे पुण्यातील पानघंटी कुटूंबाकडून या गदा तयार करून घेतल्या जातात