इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलिअन
क्रिकेटपटू मिथाली राजची निवृत्ती
भारतात तुम्ही कोणत्याही गावात जा असे म्हणण्यापेक्षा, मी असे म्हणेन की कोणत्याही गल्लीत जा आणि फक्त सांगा “क्रिकेट खेळायचंय, येता का रे?”. काही मिनिटात तुमच्यामागे इतकी पोरं गोळा होतील की तुम्हाला कमीतकमी त्यांच्या दोन टीम तयार करून मॅच खेळवता येईल. पण हेच महिला क्रिकेटच्या बाबतीत होईल का? उत्त्तर – नाही. मिथाली राज ही जेव्हा १९९७ साली, म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत निवडली गेली होती त्याच्याआधीही हीच परिस्थिती होती आणि आजही इतक्या वर्षानंतर जेव्हा मिथालीने क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतल्याची घोषणा केली आहे, तेव्हाही हीच शोकांतिका कायम आहे.
मुळात मिथाली राजची चित्तरकथा जर महिला क्रिकेटसाठी भारतात एक रोल मॉडेल म्हणून समोर ठेवली तर सर्वात महत्वाचा भाग सुरू होतो तो मिथालीच्या क्रिकेटमध्ये येण्यापासून. अगदी सर्वसामान्य भारतीय मुलींप्रमाणे लहानपणी तिला क्रिकेटमध्ये येण्यात येण्यात कधीही रस नव्हता आणि तसा विचारही कधी पुढे आला नव्हता. लहानपणी भरतनाट्यम हीच तिची आवड होती आणि अगदी क्रिकेटच्या मैदानावर येण्याअगोदन पर्यन्त ती भरतनाट्यम शिकतही होती. तिची अंथरूणातून उशिरा बाहेर येण्याची सवय मोडायची म्हणून तिचे
वडील तिला तिच्या भावाबरोबर पहाटे पहाटे मैदानावर न्यायला लागले. सिकंदराबाद मधल्या सेन्ट जॉन्स अॅकेडमीत तिचा भाउ क्रिकेटचे धडे गिरवत होता.
सिमारेषेबाहेर पुस्तक चाळत बसलेल्या मिथालीकडे जेव्हा चेंडू यायचा तेव्हा ती तो चेंडू उचलून अचूकपणे मैदानात थ्रो करायची. मुलांचे प्रॅक्टीस सेशन संपल्यानंतर ही मैदानात जावून दोन चार चेंडू खेळून काढायची. त्या मैदानावर ज्योथीप्रसाद नावाचे एक कोच, जे मिथालीच्या वडीलांचेही चांगले मित्र होते, त्यांनी मिथालीला बघितलं आणि क्रिकेट शिकणार का, म्हणून विचारलं. सुरूवात झाली. तिला बेसिक्स शिकवत असतांना तिच्यातले टॅलेन्ट कोचच्या लक्षात आले आणि त्यांनी मग तिच्या वडीलांना सल्ला दिला. ‘तुम्ही तुमचा मुलगा मिथून याच्याऐवजी क्रिकेटमध्ये हिचं करीअर करायला का सांगत नाही?नाहीतरी जेन्टस क्रिकेटमध्ये खुप स्पर्धा आहे, विचार करा’. विचार पक्का झाला. पण अडथळा होता तो भरतनाट्यम निवडायचं की क्रिकेट, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. शेवटी करीअर म्हणून मिथालीने क्रिकेट निवडलं आणि मग मागे वळून बघण्याची वेळ तिच्यावर कधी आलीच नाही.
बरं, हे जे काही घडलं ते वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी. त्यानंतर टॅलेन्टच्या जोरावर ती १४ व्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची सदस्य बनली. वयामुळे तिला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही तो भाग अलाहिदा, पण मनात राहीलेली ही सल
वयाच्या १६ वर्षी तिने आर्यंलंड विरूध्द पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळतांना आपल्या खेळातून व्यक्त केली. तेव्हापासून अगदी
कालपरवापर्यंन्त म्हणजे निवृत्ती जाहीर करण्याअगोदर पर्यन्त मिथालीने कधीही मागे वळून बघितलेले नाही. १२ कसोटी सामने, २३२ वन-डे आणि ८९ टी२० सामने इतके मोठे आणि लांबलचक करीअर मिथालीला लाभले.
https://twitter.com/M_Raj03/status/1534454266324205568?s=20&t=xcE-BRIN9Je2XWBWpRegwQ
एखाद्याचे टॅलेन्ट चाणाक्ष डोळ्यांनी वेळेवर हेरले गेले तर करीअरचे सोने करण्याची नामी संधी मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणून मिथाली राजकडे बघता येईल. १६ व्या वर्षी पदार्पणातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकल्यानंतर २३२ वन-डे सामने खेळण्याचा विश्वविक्रम असो की वयाच्या २२ व्या वर्षीच भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद भुषविण्याचा विश्वविक्रमी क्षण असो मिथाली राजने तिच्या संपुर्ण कारकिर्दीत कधीही मागे वळून बघितलेले नाही. २००१-०२ या हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती पहिला कसोटी सामना खेळली. आणि वयाच्या १९ व्या वर्षी, तिने तिसर्या कसोटीत कॅरेन रोल्टनचा जगातील सर्वोच्च कसोटी स्कोअर नाबाद २०९ धावांचा विक्रम मोडला.
मिथालीला मिळालेल्या पुरस्कारांची यादी भरपूर मोठी आहे. परंतु भारतातले जे मोठे अवार्डस् आहेत त्यापैकी २००३ ला अर्जुन पुरस्कार, २०१५ ला पद्मश्री आणि २०२१ ला खेलरत्न पुरस्कार यांचा नामोल्लेख या ठिकाणी निश्चीतपणे करावा लागेल. मिथालीवर एक बायोपिकसुध्दा लवकरच, म्हणजे येत्या १५ जुलैला भारतात प्रदर्शित होतो आहे. “शाबाश मिट्ठू” या चित्रपटात तापसी पन्नूने मिथालीची भुमिका साकारली आहे.
हे करीअर घडवित असतांना प्रॅक्टीससाठी तिला अनेकदा मुलांसोबत क्रिकेटखेळावं लागलं कारण मुलींचा संघ तिला उपलब्धच व्हायचा नाही. सहाजिकपणे रूढ परंपरावादी समजाचे टोमणे देखील तिला खावे लागले. आजही मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी हीच व्यथा सहन करावी लागते. भारतात पुरूष संघाची आयपीएल स्पर्धा ३० दिवस चालते तर महिला क्रिकेटपटूंसाठींची आयपीएल स्पर्धा अवघ्या ५ ते ६ दिवसात संपून जाते यापेक्षा आणखी कोणते मोठे उदाहरण ही विषमता निदर्शनास आणून देण्यासाठी द्यावी हे समजत नाही. परंतु तरीही अशा परिस्थितीत मिथालीने ख-या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटवर “राज” केले असे अभिमानाने म्हणता येईल.
https://twitter.com/sachin_rt/status/1534766716948951040?s=20&t=xcE-BRIN9Je2XWBWpRegwQ