वेल डन वीनू मांकड!
– जगदीश देवरे (ज्येष्ठ क्रीडा समिक्षक. ई मेल – pavilionsmailbox@rediffmail.com)
आपल्यातल्या दहापैकी आठ जणांना गल्लीतले क्रिकेट खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे. आपण नेहमी बघतो की जेव्हा गोलंदाज बोलींग करण्यासाठी क्रीझकडे धावत येत असतो त्यावेळी नॉन स्ट्राईकर एण्डला उभा असलेला फलंदाज चांगला फुटभर बाहेर निघून आधीच धाव घेण्यासाठी तयार असतो. मग अशा वेळी चेंडू न टाकता गोलंदाजाने नॉन स्ट्राईकर एण्डच्या यष्टी चेंडू लावून उडवल्या तर सहाजिकच क्रीझच्या बाहेर असल्याने फलंदाज बाद ठरतो. आपण गल्लीत याला रडीचा डाव म्हणतो. रडक्या म्हणत अशा गोलंदाजाची खिल्ली उडवतो. परंतु, क्रिकेटच्या तमात चाहत्यांनो, आता इथून पुढे, क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत आणि एखादया फलंदाजाला असे बाद करणे हे रडीचा डाव नसून किंवा अखिलाडू प्रवृत्तीचे दर्शन नसून अशा फलंदाजला अधिकृत रित्या धावबाद म्हणून घोषीत करावा लागणार आहे. एमसीसीला यात अखिलाडू वृत्ती वगैरे काहीही दिसून आली नाही, उलट क्रिकेटमध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी आणि खिलाडू वृत्तीच्या गोंडस नावाखाली नियमांचा गैरफायदा घेणाऱ्यांना चांगलीच चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीनुसार फलंदालाला असे बाद करणे याआधी कलम ४१ नुसार ‘अखिलाडू’ मानले जायचे आणि त्यामुळे अनेक गोलंदाज ऊगाच आपल्यावर असा ठपका नको म्हणून अशा प्रकारे फलंदाजांना बाद करीत नव्हते. परंतु आता या नियमपुस्तीकेच्या कलम ३८ नुसार अशा फलंदाजाला धावबाद म्हणून घोषीत केले जाईल. आता हा नियम आल्यानंतर प्रत्येकाने आपआपल्या सोयीने या नियमाची समीक्षा करायला सुरूवात केली आहे. अशा पध्दतीने खेळाडू बाद करण्याच्या प्रक्रियेला ‘मांकडींग’ असा शब्द प्रचलीत होता. वीनू मांकड हे भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक नाव. ४६ कसोटी सामन्यात मांकड यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. कसोटीत सर्वात जलद १००० धावा आणि १०० बळी हा पहिला विक्रम मांकड यांच्या नावावर नोंदला गेला. १९५२ ला मांकड यांनी लॉर्डस मैदानावर कसोटीतल्या दोन्ही डावात ७२ आणि १८४ धावाच केल्या आणि ५ बळी सुध्दा घेतले. या असल्या पराक्रमाचा पाहिला मान जातो तो देखील मांकड यांनाच. पुढे १९५६ ला न्युझीलंडविरूध्द मांकड यांनी २३१ धावा काढल्या. सुनील गावस्करने हा विक्रम मोडण्यापुर्वी कसोटीत सर्वोच्च वैयक्तीक धावसंध्या नोंदविण्याचा हा विक्रम वीनू मांकड यांच्या नावावरच होता. इतकेच नव्हे तर त्यांनी सलामीला पंकज राॕय सोबत केलेला ४१३ धावांच्या भागीदारीचा महापराक्रम ५२ वर्ष अबाधित राहीला होता.
परंतु याच खेळाडूचे नाव किक्रेटमधल्या एका वादग्रस्त घटनेविषयी नोंदविले गेले ते १९४८ साली. मांकड गोलंदाजी करीत असतांना ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक बिल ब्राउन हा नॉन स्ट्राईकर एण्डला उभा होता. चेंडू पडण्यापुर्वी तो सारखा क्रीझ सोडून पुढे जायचा. मांकड यांनी त्याला एकदा सुचनाही दिली. असाच जर पुढे गेलास तर मला तुला रन आउट करावे लागेल अशी ताकीदही दिली. पंरतु, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हे अखिलाडू खेळासाठी जगप्रसिध्द आहेत. ब्राउनने मांकड यांची ताकीद जुमानली नाही आणि मग मांकड सारख्या भल्या बहाद्दराने त्याला चेंडू टाकण्यापुर्वीच त्याच्या यष्टी उडवल्या. यष्टीवरच्या बेल्स उडाल्या त्यावेळी फलंदाज क्रिझच्या बाहेर असल्याने अंपायरने नियमानुसार ब्राउनला बाद घोषीत केलं. पुढे मग या विषयावर भरपूर चर्चा झाली. आजही ज्यावेळी सुनील गावस्करसारखा अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाच्या आधारावर शेन वॉर्नच्या मृत्यूमागे त्याच्या काही सवयीच कारणीभूत आहे असे सांगतो, आणि त्यावर ऑस्ट्रेलियन मिडीयात भंयकर टीका होते त्याच ऑस्ट्रेलियन मिडीयात त्यावेळी देखील चर्चा झाली, टीका झाली. बाद करण्याच्या या पध्दतीला अखिलाडू वृत्तीचा टॅगही जोडण्यात आला आणि आपण कॅच आउट, एल.बी.डब्यू., क्लिन बोल्ड वगैरे म्हणतो त्याप्रमाणे फंलंदाज बाद करण्याच्या या प्रक्रियेला “मांकडींग” असे आंतरराष्ट्रीय लेबल चिकटविण्यात आले. या शब्दाला भारतीयांनी जोरदार आक्षेप घेतला, एक प्रकारे वीनू मांकड यांचा तो अपमान आहे असे निक्षून सांगण्यात आले परंतू, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पुढे मग वीनू मांकड यांचा मुलगा राहुल याने देखील आयसीसी आणि एमसीसी यांच्याकडे वांरवार पाठपुरावा करुन या शब्दाला आक्षेप नोंदवला.
परंतु, त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर ऊगाच आपली पण अशी मानहानी नको व्हायला, म्हणून फार मोजक्या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजांना अशा प्रकारे बाद करण्याची हिम्मत दाखविली. २०१९ च्या आय.पी.एल.मध्ये जेव्हा आर अश्वीनने जॉस बटलरला बाद केले तेव्हाही टिकेचा असाच धुमाकूळ माजला. ता माञ या नव्या नियमानंतर सहाजिकच काही बदल घडतांना आपल्याला बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. क्रिकेटला अधिक लोकप्रीय करायचे असेल तर फलंदाज आणि गोलंदाज यांना समान ॲडव्हान्टेज मिळायला हवे या एकमेव उद्देशातून या नियमाचा जन्म झाला असावा. या नियमावर अनेक प्रतिक्रीया येवू लागल्या आहेत. परंतु त्यातल्या दोनच प्रतिक्रीया अतिशय विचार करण्याजोग्या आहेत. गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने या नियमाला विरोध दर्शवितांना अशी बाजू मांडली आहे की, फलंदाजाला असे बाद करणे चुकीचे होईल कारण यात गोलंदाज स्वतःचे कोणतेच स्कील वापरत नाही. ब्रॉडची ही प्रतिक्रीया क्षणभरासाठी योग्य मानली तरी असा फलंदाज रनआउट ठरविला जाणार आहे आणि रन आउटचे श्रेय गोलंदाजाच्या खात्यात जमा होत नाही हे ब्रॉडला कुणीतरी समजावून सांगावे लागेल.
दुसरी प्रतिक्रीया आहे भारताचा माजी खेळाडू मुरली कार्तीकची. ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्याने या निर्णयाचे समर्थन करतांना एका म्हणीचा वापर केला आहे. तो म्हणतो या निर्णयाला विरोध करणे म्हणजे थोडक्यात Pot calling cattle Black असे आहे. चेंडू पडण्यापुर्वीच क्रिझ सोडून फलंदाज पुढे जात असेल आणि त्याचा फायदा घेवून पहिली धावा लवकर पुर्ण करीत असेल तर अखिलाडू फलंदाजाला म्हणावे लागेल, गोलंदाजाला नाही. फायदा फलंदाजाने घ्यायचा आणि नाव गोलंदाजाला ठेवायचं, यात काय अर्थ आहे? कार्तिकच्या या युक्तीवादात दम आहे. टेक्नॉलॉजीचा पुरेसा वापर करून अगदी सेकंदाच्या काही भागाने फलंदाज क्रिझबाहेर राहीला म्हणून हल्ली रनआउटचे निर्णय दिले जातात. मग अशा या जमान्यात चेंडू पडण्यापुर्वीच हातभर क्रीझ बाहेर पुढे जाणाऱ्या फलंदाजाला नियमांचे संरक्षण देण्यात काय उपयोग आहे ? याचा विचार कार्तिकने ज्या पध्दतीने केलाय तो इतरांनी मात्र त्यांच्या त्यांच्या सोयीने केलेला नाही.
आता धावबाद होण्याची संख्या वाढेल अशीही एक भिती निर्माण केली जाते आहे. ज्या फलदांजाना अशा सवयी आहेत त्यांना या नियमांचा आधार घेवून टार्गेट केले जाईल असेही सागितले जातेय. पण मग अशा फलंदाजांना आपल्या चुकीच्या सवयी बदलण्याची संधी या नियमामूळे मिळणार आहे आणि तसे झाल्यानंतर खेळात संतूलन बघायला मिळेल हे या नियमाचे यशच मानावे लागेल. केवळ वीनू मांकड हे भारताचे खेळाडू आहेत व त्यांनी अशा प्रकारे खेळाडूला बाद करण्याची हिम्मत पहिल्यांदा दाखविली म्हणून या नियमाचे समर्थन करण्याचा इथे इरादा नाही. परंतु १९४८ साली त्यांनी दाखविलेल्या धाडसाला २०२२ मध्ये का होईना, पंरतु मान्यता मिळणार असेल किंबहुना इतक्या मोठ्या खेळाडूच्या मृत्यूपश्चात का होईना, या नियमांला राजाश्रय मिळणार असेल तर त्याचे समर्थन करावेच लागेल आणि म्हणावेच लागेल ….
वेल डन वीनु मांकड! वेल डन!