इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलियन
आयपीएलच्या विजेतेपदाचा दावेदार बदलतोयॽ
– जगदीश देवरे (pavilionsmailbox@rediffmail.com)
टाटा आयपीएल….२०२२. यावर्षी १५ व्या आव़त्तीमध्ये विजेता बदलेला का? असा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. आयपीएल विजेतेपदाचा दावेदार म्हटला की आपसूकपणे अनेकांच्या ओठांवर चेन्नई सुपर किंग्जचे नाव आल्या शिवाय रहात नाही. त्या खालोखाल ज्या मुंबई इंडीयन्सचा प्रत्येक सिझनमध्ये नेहमी दबदबा राहीलेला आहे त्या संघाचे नाव घेतले जाते. पण २०२२ चा सिझन या सगळयापेक्षा जरा हटके शाबीत होवू शकतो का? यंदा विजेतेपदावर काही उलटफेर होवू शकतो का ? अशी शक्यता आणि आणि असे वातावरण तयार व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे.
यावर्षी आयपीएलच्या विजेतेपदावर उलटफेर बघायला मिळू शकतात हे म्हणण्यामागे काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे, एकतर यावर्षी स्पर्धेत गुजराथ टायटन्स आणि लखनौ सुपर जायण्टस असे दोन नवे संघ मैदानात आले आणि सहाजिकच स्पर्धेचा पॅटर्न थोडा का होईना, बदलला गेला. दुसरा एक बदल, म्हणजे कोवीडमुळे भारतात पहिल्यांदाच मुंबई-पुण्याखेरीज या स्पर्धेचा एकही सामना बाहेर कुठेही खेळला जाणार नाही. तिसरा बदल म्हणजे जो काही लिलाव झाला तिथे काही मुख्य संघव्यवस्थापनाकडून काही घोडचुका झालेल्या आहेत, सहाजिकच त्याचे फटके त्या संघाना बसू शकतात आणि सर्वात शेवटचा आणि परिणामकारक घटक म्हणजे वाढलेला कडक उन्हाळा, जो मुंबईत नेहमीच असतो परंतु यावर्षी काकणभर जास्त असल्याने संध्याकाळच्या सामन्यातील दुस-या सञात पडणा-या दवामुळे ओला होणारा चेंडू……
हा लेख लिहून होईपर्यन्त स्पर्धेतील १० संघाचे प्रत्येकी किमान २ सामने साखळी सामने खेळून झालेले आहेत. खरंतर प्रत्येक संघाला किमान १४ सामने खेळायचे आहेत त्यामुळे ही सुरूवात असली तरी एखादया इलेक्शननंतर मतमोजणीच्या सुरूवातीला असलेला कल जसा कधीकधी शेवटपर्यन्त कायम रहातो तसा हा सुरूवातीचा कल कायम राहीला तर वर नमुद केलेली कारणं ही परिणामकारक ठरू शकतात ही बाब नाकारून चालणार नाही.
सध्याच्या टेबलमध्ये टॉपला आहे तो २०२१ च्या पॉईन्टस टेबलमध्ये शेवटून दुसरा आलेला राजस्थान रॉयल्स, दुसरा आहे तो कोलकाता नाईट रायडर्स आणि तिसरा आहे तो या सिझनमध्ये जन्माला आलेला नवजात गुजराथ टायटन्स. मुंबई कुठे तर म्हणजे ९ व्या क्रमांकावर आणि धोनीची सीएसके कुठे तर, ८ व्या क्रमांकावर. हा टेबल असाच्या असा रहाणार नाही हे निश्चीत आहे. “तकदीर बदलते देर नही लगती” हे आयपीएलने अनेकदा अनुभवल्यानेच यास्पर्धेची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतेच आहे. पण, त्याच वेळेला “क्रिकेट हा अनिश्चीततेचा खेळ आहे“ या वाक्यातले शब्द खरे ठरण्याची हीच का ती वेळ, अशी शंकेची पाल चुकचूकल्याशिवाय रहात नाही.
मुळात आयपीएलच्या सामन्याचे रिझल्ट आणि त्यांची आकडेवारी जर आपण बघितली तर जिंकण्यासाठी कष्ट आणि गुडलक दोन्ही तुमच्याकडे असावे लागतात अशी आकडेवारी सांगतात. गुडलक म्हणजे काय तर, टॉसचा निर्णय. २०१६ ते २०२१ या सिझनच्या आकडेवारीचा इतिहास असे सांगतो की या ६ वर्षातल्या एकूण ३६४ सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या संघांनी फक्त १५० सामने जिंकले आहेत तर धावांचा पाठलाग करण्यासाठी दुस-या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या संघांनी २१४ सामने जिंकले आहेत. टॉस जिंकायला लागणारा गुडलक फॅक्टर जसा धावांचे टारगेट समोर ठेवून जिंकण्यासाठी उपयोगी पडतोय तसाच यंदा तो दुस-या डावात ८ वाजेनंतर गवतावर पडणा-या दवामुळे ओलसर होणा-या चेंडूवर देखील पडतोय. यंदाच्या सिझनमध्ये जास्तीत जास्त मॅचेस या मुंबईत असल्याने हा घटक आणखी जास्त प्रभावशील ठरतोय त्यामुळे ज्या संघाकडे विजयासाठी परिश्रम करण्याची जास्तीत जास्त क्षमता आणि त्याचबरोबर तितकेच चांगले गुडलक देखील आहे तो संघ बाजी मारणार यात वाद नाही.
मुंबई संघाची अवस्था ही प्रत्येक सिझनमध्ये सुरूवातीला, विमानात पहिल्यांदाच बसलेल्या प्रवाशासारखी असते. कमरेचा बेल्ट पक्का बांधला गेलाय की नाही हे चेक करता करताच रन-वे वरचा टेक ऑफ त्याला अनुभवायला मिळत नाही. मुंबई इंडीयन्संच तसचं आहे. पॉइन्टस टेबलमध्ये आधी तळाला जायचं आणि मग पहिल्या चारमध्ये येण्यासाठी संघर्ष करायचा. याचाच अनुभव मुंबई या सिझनमध्ये देखील घेते आहे पण सीएसकेचे कायॽ या संघाचा कर्णधार धोनी नाही तर जडेजा आहे यावर जसा अनेक चाहत्यांचा विश्वास अजूनही बसलेला नाही, अगदी त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेच्या विजेतेपदाचे मुख्य दावेदार आहोत यावर या संघाचा देखील विश्वास नसल्यासारखी कामगिरी त्यांच्याकडून सुरू आहे.
थोडक्यात काय तर टॉपच्या संघामध्ये आणि नवख्या संघामध्ये चढाओढ असली तरी ती प्रत्यक्षात अजून तरी रंगात आलेली नाही. कदाचित प्रत्येक संघाचे किमान ५ सामने खेळून झाल्यानंतर कुठल्या संघावर दाव लावावा हे सुस्पष्ट होत जाईल. परतु तोपर्यन्त तरी या विषयावरची हवा गरमच रहाणार आहे आणि ती म्हणजे यंदाच्या टाटा आयपीएल विजेतेपदाचा दावेदार बदलतोय का … ॽ