इंडिया दर्पण विशेष – पॅव्हेलिअन
आयपीएलमधील सुमार अंपायरिंगची पोलखोल
जगदीश देवरे
एकूण १४ आयपीएल स्पर्धांपैकी ९ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघानीच जिंकल्या आहेत. परंतु, यंदा २०२२ ला हेच दोन्ही संघ, अंतिम चार संघात तरी स्थान मिळवू शकतात की नाही यावरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. हा एक मोठा चर्चेचा विषय असतांना, यंदा चर्चा रंगतेय ती मात्र आयपीएलमधल्या सुमार अंपायरींगची. प्रत्येक सामन्यात होत असलेल्या ऑनफिल्ड अंपायरींगच्या छोट्या-मोठ्या चुका सध्या सोशल मिडीयावर नेटक-यांकडून चांगल्याच धुवून काढल्या जात आहेत. हा मामला समजावून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन प्रसंग समजावून घ्यावे लागतील.
प्रसंग पहिला
रॉयल चॅलेंजर्स विरूध्द लखनौ या सामन्यातल्या १९ व्या षटकात लखनौ संघाचा मार्कस स्टॉयनीस बॅटींग करीत असतांना जोश हेझलवूडने पहिला चेंडू खुप बाहेर टाकला. तो चेंडू नुसत्या डोळयांनाही स्पष्ट दिसले इतका वाईड होता परंतु स्टॉयनीसने तो वाईड मागून सुध्दा दिला गेला नाही. या चुकीचा परिणाम दुस-या चेंडूवर बघायला मिळाला. दुसराही चेंडू तसाच बाहेर जातो आहे आणि वाईड मिळणार नाही असा हेतू मनात ठेवून स्टॉयनीसने तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जावून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तो क्लीन बोल्ड झाला.
प्रसंग दुसरा
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपीटल्स या दोन संघादरम्यानचा सामना. सामन्याच्या अंतीम षटकात दिल्ली कॅपीटल्सला शेवटच्या ३ चेंडूंवर १८ धावांची गरज होती. दिल्ली कॅपीटल्सचा रोव्हमन पॉवेल फलंदाजी करीत होता आणि त्याने राजस्थानच्या ओबेद मॅकॉयला पहिल्या ३ चेंडूवर ३ उंच षटकार खेचले. यातला शेवटचा चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर टाकलेला फुलटॉस असल्याने तो नोबॉल देण्याची गरज होती. परंतु, ऑनफिल्ड असलेल्या दोन्ही अंपायर्सना तो नोबॉल वाटला नाही. दिल्ली कॅपीटल्सचा कर्णधार वृषभ पंत हा नोबॉल आहे यावर ठाम होता. त्याचे दोन्ही फलंदाज तशी मागणी करीत होते. इतकेच नाही तर कॉमेन्टरी करणा-यांना देखील तो नोबॉल दिला गेला पाहिजे असे खात्रीने वाटत होते. पुढे मग यावर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. खेळ थांबवला गेला, पंतने त्याच्या दोन्ही फलंदाजांना परत बोलावून घेतलं. दिल्लीचा सह प्रशिक्षक असलेल्या प्रविण आमरेने मैदानात जावून अंपायर्सशी बोलून बघितलं, पण उपयोग झाला नाही. नोबॉल न देण्याचा निर्णय कायम राहीला आणि मग ब्रेक के बाद पुन्हा सुरू झालेल्या सामन्यात उर्वरीत ३ चेंडूत १८ धावा दिल्लीला जमवता आल्या नाही आणि राजस्थान रॉयल्स विजयी ठरले.
बॅक टू बॅक घडलेले हे दोन्ही प्रसंग, प्रत्येक सामन्याच्या अंतीम निर्णयाच्या दृष्टीने, किती परिणामकारक किंवा किती गंभीर ठरू शकतात याचे मुर्तींमंत उदाहरण मानल्या जातील.
यातल्या पहिल्या प्रसंगानंतर “अतिशय केविलवाणी अंपायरींग” अशा शब्दात के.श्रीकांतने त्या निर्णयाचे वर्णन केले आणि या अंपायर्सच्या जागेवर कुणी तरी चांगली माणसं आणून उभी करा, अशी जाहीर मागणी देखील त्याने केली. यातल्या दुस-या प्रसंगानंतर सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्यासारख्या दिग्गजांनी सुध्दा अंपायर्सचा हा निर्णय चुकीचाच असल्याचे प्रांजळ मत व्यक्त केले आहे परंतु त्याचबरोबर, या प्रकरणात पंत आणि प्रविण आमरे यांची वागण्याची पध्दत देखील चुकीचीच आहे, हे देखील सांगायला ते विसरलेले नाहीत.
एक तर आयपीएलच्या मॅचेस रोज खेळल्या जातात आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेची जडणघडण अशी आहे की, कधीकधी एका घरात तुम्हाला प्रत्येक मेंबर हा वेगवेगळया टीमचा चाहता असल्याचे दिसून येते. अशा वेळेला सदेाष अंपायरींग शिव्या खाणार हे नक्की मानलं जातं. अर्थात, आयपीएलमध्ये हे पहिल्यांदा होतंय अश्यातला भाग नाही. अनेक सिझन असे आहेत ज्या सिझनमध्ये आयपीएल अंपायर्संनी सुमार कामगिरी केली असल्याची उदाहरणे देता येतील. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर २०१८ च्या सिझनमध्ये तर धमाल झाली होती. बुमराहच्या एका चेंडूवर उमेश यादव कॅचआऊट आहे की नाही हे ठरवण्याआधी ऑनफिल्ड अंपायरला नोबॉल चेक करायचा होता. तो वादग्रस्त निर्णय थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आला. पण घडलं असं की, त्या अंपायरला एका वेगळयाच डिलीव्हरीचे फुटेज रेफर करण्यात आले ज्यात उमेश यादव नॉन स्ट़ायकर एंण्डला उभा असल्याचे स्पष्ट दिसत होते. ही नुसती चुक नव्हती तर घोडचुक होती असेच म्हणावे लागेल.
पुढे मग याच सिझनमध्ये चेन्नई वि. हैद्राबाद सामन्यात विल्यमसनला कमरेच्या वर टाकलेला चेंडू नोबॉल दिला गेला नाही. त्यानंतर २०१९ ला मुंबई आणि आरसीबी यांच्यातल्या सामन्यात विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करतांना आरसीबीला अवघ्या ६ धावा कमी पडल्या होत्या. यात शेवटचा चेंडू टाकतांना लसिथ मलींगाचा पाय क्रिझबाहेर गेलेला असूनही तो पंचाना दिसला नाही. जर तो बघितला गेला असता तर एक नोबॉल, मग फ्री हीट …. कदाचित सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता. अशाच एका वादग्रस्त निर्णयानंतर २०२० च्या सिझनमध्ये कॅप्टन कुल समजल्या जाणा-या महेंद्रसिंग धोनीचा हंगामा तर आयपीएलमध्ये प्रसिध्द मानला जातो. वर नमुद केलेल्या “प्रसंग पहिला” याच्याशी तो थोडा मिळता जुळता आहे. दुस-या डावातल्या १९ व्या ओव्हरचा दुसरा चेंडू, गोलंदाज होता शार्दूल ठाकूर. चेंडू वाईड होता आणि तो वाईड देण्यासाठी अंपायर्सनी आपले दोन्ही हात बाहेर देखील काढले होते. पण त्याचक्षणी विकेटकिंपीग करणा-या धोनीची रिॲक्शन बघून अंपायरने हात पुन्हा खाली आणले आणि वाईड असलेला चेंडू धोनीच्या दबावाखाली फेअर डिलीव्हरी ठरला. २०२० च्या याच सिझनमध्ये दिल्ली वि पंजाब सामन्यात तर चक्क सुपर ओव्हरमध्ये सदोष अंपायरींग बघायला मिळाली आणि त्या निर्णयामुळे सामन्याचा निर्णय पालटला गेला.
मयंक अग्रवालने पळून काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव ”शॉर्ट रन“ म्हणून दिली गेली नाही आणि टी.व्ही. चे फुटेज तर मयंकने ती धाव पुर्ण केल्याचे स्पष्ट दाखवत होते. त्यावेळेला सेहवागने त्या अंपायरला ”मॅन ऑफ द मॅच“ चा किताब देण्याची सुचना केली होती. अशा पध्दतीने सदोष अंपायरींग आणि आयपीएलचे एक दृढ असे नाते आहे आणि २०२२ च्या या सिझनमध्ये ते अधिक घट्ट होते आहे.
क्रिकेटमध्ये एलबीडब्ल्यू, कॅच आउट, रन आऊट हे असे काही निर्णय असतात ज्यात निर्णय देतांना मानवी चुक होवू शकते. अगदी सेकंदाच्या काही भागाने या घटना इतक्या वेगवान पध्दतीने घडून जातात की त्या अंपायरच्या डोळयांना सहज चकवा देवू शकतात. म्हणूनच यासाठी थर्ड अंपायरची निर्मीती करण्यात आली. परंतु या दोन घटना त्या परिघापलिकडच्या आहेत. यात अंपायरने चुका केल्याने खेळाडू बाद वगैरे झालेला नाही, त्यामुळे त्या चुकांना छोटया चुका म्हणायचं की मोठया, हा खरा मुद्दा आहे आणि शेवटी या चुका सामन्याच्या निकालावर परिणाम कारक ठरू शकतील इतक्या मोठया असल्याने, सहाजिकपणे आता तिथेही थर्ड अंपायरचे अधिकार वाढवून देण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.
चांगले अंपायरींग हा सुदृढ क्रिकेटचा आत्मा मानला जातो. जगभरात क्रिकेटवर सर्वाधिक पैसा हा आयपीएलमध्ये खर्च केला जात असतांना तिथे जर इतके सुमार दर्जाचे अंपायरींग होणार असेल तर त्यावर प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. अती क्रिकेटमूळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो याची अनेक उदाहरणे आंतरराष्टीय क्रिकेटने अनुभवली आहेत परंतु आता हेच सुत्र अंपायरींगला देखील लागू होते आहे का? याची एखादी लिटमस टेस्ट होणे देखील गरजेचे आहे.









