इंडिया दर्पण विशेष लेखमाला
पॅव्हेलिअन
‘जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा’
येत्या २८ ऑगस्टला दुबईतल्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे दोन क्रिकेटचे संघ आशिया चषक टी२० साखळी सामन्यात समोरासमोर येणार असून या सामन्यातला विजेतेपदाचा थरार अनुभवताना “जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा” हा नारा लावण्याची जोरदार संधी भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना खुप दिवसांनी उपलब्ध होणार आहे. भारत-पाक क्रिकेटला अफाट लोकप्रियता असून देखील या दोन्ही संघांमध्ये अतिशय कमी सामने खेळले जातात हे सत्य आहे. आजवरच्या या पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि टश्शन होणाऱ्या दोन्ही संघांच्या इतिहासावज नजर टाकत आहेत ज्येष्ठ क्रीडा समिक्षक जगदीश देवरे…
आता हेच बघा ना, भारतीय संघाने १७४ तर पाकिस्तानने एकूण १९० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले असले तरी या दोन्ही संघादरम्यान मात्र आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अवघे ९ टी२० सामने खेळले गेले आहेत. त्यातले भारताने जिंकले आहेत ६ आणि पाकिस्तानने अवघे २. एक सामना अनिर्णित राहीला आहे हे वेगळे सांगायला नको.
दोन्ही परंपरागत प्रतिस्पर्ध्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे असे मानले जाते. त्याचमूळे पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात कदाचित रोहित शर्मा सोबत विराट कोहलीला सलामीला पाठवले जाईल असा अंदाज बांधला जातोय. तसे झालेच तर विराट कोहलीला मिळणारी ही एक नामी संधी आहे असे म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून विराट त्याचा स्वतःचा फॉर्म हरवून बसलाय. या सामन्यात पाकिस्तान सारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यासोबत खेळतांना मोठी धावसंख्या विराटकडून उभारली गेली आणि ती मॕचविनर खेळी ठरली, तर त्याच्यासाठी तो सिंहस्थातल्या एका शाहीस्नानासारखा योग असेल आणि आत्तापर्यंतच्या त्याच्या बॕडपॕचमध्ये जे काही अपयश त्याच्या खात्यावर जमा झाले आहे, ते या एका खेळीने झटक्यासरशी धुतले जाईल. सध्या जे फलंदाज संघात आहेत त्यांच्यापैकी एकट्या विराटची आकडेवारी ही पाकिस्तान विरुद्ध नेहमीच चांगली राहिली आहे. वन-डे सामन्यात विराटने पाकिस्तान विरुद्ध २ शतकं, २ अर्धशतकं आणि टी२० मध्ये ३ अर्धशतकं ठोकून इतर कुठल्याही फलंदाजाला जमलेला नाही असा विक्रम विराटने याआधीच नोंदवून ठेवला आहे.
या सामन्यात जसे विराटच्या कामगिरीवर लक्ष राहील तसेच ते कर्णधार रोहित शर्मा वर देखील राहील, मधल्या फळीतल्या सूर्यकुमार वर राहील, जो कसोटी क्रिकेटमध्ये देखील टी२० सामन्यासारखी फलंदाजी करतो अशा यष्टीरक्षक वृषभ पंत कडेही सगळ्यांचे लक्ष राहील, ज्याला बघितल्यानंतर कपिल देव ची आठवण येते अशा हार्दिक पांड्याकडे देखील भारतीय चाहत्यांच्या नजरा लागून राहतील इतकेच नव्हे तर दिनेश कार्तिक रवींद्र जडेजा यांच्यावर यदा कदाचित फलंदाजीची वेळ आलीच तर किमान त्यांनी तरी चमत्कार करावा म्हणून त्यांच्याकडे चाहते डोळे लावून बसतील.
या आधी दोन्ही संघांमध्ये २४ ऑक्टोबर २०२१ ला टी२० च्या आयसीसी आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत दुबईतल्या मैदानावर जो सामना झाला होता, तो पाकिस्तान संघाने जिंकला होता हे विसरून चालणार नाही. या सामन्यात विराट आणि वृषभ पंतचा अपवाद जर सोडला आणि दिनेश कार्तिकची अनुपस्थिती जर सोडली, तर वर उल्लेख केलेले सगळे खेळाडू सपशेल अपयशी ठरले होते हे आकडेवारी सांगते. आता जी काही लढत होणार आहे ती दुबईतच आहे.
पाकिस्तानची गोलंदाजी ही भारतीय गोलंदाजी पेक्षा उजवी मानली जाते. लेफ्ट आर्म शाईन आफ्रिदी, राईट आर्म नसीम शाह आणि राईट आर्म हॕरीस रौफ या तीन जलदगती गोलंदाजांवर तसेच शहानवाज दहानी, मोहम्मद वासिम या मध्यमगती गोलंदाजांवर पाकिस्तानची भिस्त राहील. त्यांच्या भात्यात लेग स्पिनर उस्मान कादिर आहे. याशिवाय अष्टपैलू खेळांडूवर पाकिस्तान संघ नेहमीच दाव खेळत असतो. मोहम्मद नवाज, खुशदिल खान, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासिम आणि शादाब खान यापैकी जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू मैदानावर उतरविण्याचा कर्णधार बाबर आझमचा प्लॅन राहील
जसप्रीत बुमराह हा अंकित असल्याने भारतीय संघात नाही ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार सोबत दीपक चहर, रवि बिश्नोई आणि आवेश खान यांच्यापैकी कुणाला प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याची संधी मिळते यावर भारतासाठी बरेच काही अवलंबून राहील. फिरकी गोलंदाजीची धुरा रविचंद्रन अश्विन याच्यावर जरी असली तरी प्रत्यक्ष मैदानावर यजुर्वेंद्र चहल किंवा अर्शदीप सिंग यांच्यापैकी ज्याला संधी मिळेल त्या गोलंदाजाची कामगिरी ही या सामन्यात मॅच विनर ठरू शकते.
यजुर्वेंद्र चहलला खेळून काढणं पाकिस्तानी फलंदाजांना कितपत झेपेल? हा थोडा महत्त्वाचा मुद्दा राहील. भुवनेश्वर कुमारने पाकिस्तान विरुद्ध नेहमीच करामती केलेल्या आहेत. तो भारतीय संघातला असा गोलंदाज आहे जो सन २०१२ पासून पाकिस्तान विरुद्ध खेळतोय एक दिवसीय सामने आणि टी२० सामने मिळून १४ सामने खेळलेल्या भुवनेश्वरने पाकिस्तानचे १९ बळी घेतलेले आहेत हे या सामन्यात नजर अंदाज करून चालणार नाही.
बाबर आजम हा फलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजीचे बलस्थान मानला जातो. सलामीला त्याच्याबरोबर येणारा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान आणि त्यानंतर येणारा फखर जमान यांच्या खेरीज असिफ अली, हैदर अली ही मधल्या फळीतली फलंदाजांची नावे संघाला मजबुती देणारी वाटत असली तरी ती तितकीच बेभरवशाची आहेत हे लक्षात घेऊन भारतीय कर्णधाराला गोलंदाजीत ‘प्लॅन’ आखावे लागतील
आगामी टी२० वर्ल्ड कप स्पर्धा आता दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. खरं तर आशिया चषक ही स्पर्धा होणार होती श्रीलंकेला. परंतु श्रीलंकेची आर्थिक आणीबाणी लक्षात घेऊन तिथे ही स्पर्धा शक्य नसल्याने यांनी श्रीलंका बोर्डातर्फेच ही स्पर्धा शारजा आणि दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया चषक स्पर्धेचा किताब भारताने ७ वेळेला, श्रीलंकेने ५ वेळेला तर पाकिस्तानने अवघ्या २ वेळेस जिंकला आहे. ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तान या दोन संघा व्यतिरिक्त आणखी एक संघ असेल हा तिसरा संघ हाँगकाँग, सिंगापूर यांच्यापैकी क्वालिफायर ठरलेला संघ निवडला जाईल. ‘ब’ गटात श्रीलंके बरोबर बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आपले नशीब आजमावतील. आशिया चषक स्पर्धेतील इतर सहभागी संघ आणि त्यांची कामगिरी लक्षात घेता, एक शक्यता अशीही वर्तवली जाते आहे की या स्पर्धेचा अंतिम सामना देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होऊ शकतो. तसे झाल्यास जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी तो एक डबल धमाकाच ठरेल.
भारत पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेटचा सामना हा कागदावरच्या गुणवत्तेपेक्षा मैदानावरच्या टेन्शन वर जास्त खेळला जातो. या टेन्शनचा प्रभाव सामन्यांच्या निकालावर नेहमीच दिसून येतो. त्यामुळे सध्या तरी दोन्ही संघातील कागदावरची गुणवत्ता मोजण्यात फारसा अर्थ दिसत नाही. सामना ‘टी२०’ फाॕरमॕटचा असला तरी यात खेळाडूंच्या आत्मविश्वासाची ‘कसोटी’ लागणार आहे आणि जो संघ या कसोटीवर खरा उतरेल तोच संघ विजयी होईल हे नक्की.
सरते शेवटी एक मनोरंजक आकडेवारी देखील द्यावीशी वाटते ती अशी की टी२० फॉर्मेट मध्ये आत्तापर्यंत पाकिस्तानचा जो सक्सेस रेट आहे तो आहे ६४.०५ टक्के तर भारताचा सक्सेस रेट आहे ६५.०८ टक्के. आता इतके तोडीस तोड आणि तुल्यबळ असलेले दोन संघ आणि त्यातल्या त्यात परंपरागत प्रतिस्पर्धी ……मग अशा परिस्थितीत येत्या २८ ऑगस्ट रोजीचा सामना किती रोमहर्षक होईल, याचा वेगळा अंदाज बांधण्याची गरज नाही.
Column Pavellion India Vs Pakistan Match by Jagdish Deore
Asia Cup 2022 Cricket