इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
लक्षवेधी डिफआॕलिम्पीक्स
– जगदीश देवरे (pavilionsmailbox@rediffmail.com)
जागतिक स्तरावर होणारे सुदृढ खेळाडूंचे ऑलिम्पिक आपण नेहमीच ऐकतो, वाचतो बघतो, त्यावर चर्चाही करतो. परंतु जागतिक स्तरावर, ज्या खेळाडूंच्या सशक्त कानाची ऐकण्याची क्षमता कमीतकमी ५५ डेसीबल इतकी लोप पावली आहे, अशा खेळाडूंसाठी सुध्दा ऑलिम्पिक्सचे आयोजन केले जाते. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता असून दर चार वर्षांनी ही स्पर्धा होत असते. १९२४ ते १९६५ या कालावधीत ही स्पर्धा इंटरनॅशनल गेम्स फाॕर द डिफ या नावाने ओळखली जायची, त्यानंतर १९६९ ते १९९९ या कालावधीत ही स्पर्धा वल्ड गेम्स फाॕर द डिफ या नावाने खेळली जात होती. परंतु २००१ पासून प्रथमतः या स्पर्धेचे नामकरण डीफऑलिम्पिक्स करण्यात आले.
यंदा ही स्पर्धा ब्राझीलच्या Caxios do sul सिटीतील Festa da vva main pavilion प्रांगणात खेळविण्यात आली.
या स्पर्धेत ७२ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते, ज्यात २२६७ इतक्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शूटिंग स्विमिंग टेनिस बॅडमिंटन बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, बोलींग, रोड सायकलिंग, फुटबॉल, कुस्ती, हॉलीबॉल, गोल्फ, माऊन्टन बाईक आणि कराटे इ.वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या स्पर्धेत सामने रंगले.
ही स्पर्धा २०२१ च्या डिसेंबरमध्येच होणार होती. परंतु, कोरोनामुळे लांबलेली ही स्पर्धा १ ते १५ मे २०२२ या कालावधीत पार पडते आहे . या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंनी ११ खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून १६ पदकांची यशस्वी कामगिरी करुन दाखवली. यात ८ सुवर्ण, १ रौप्य आणि ७ ब्राॕन्झ पदाकांचा समावेश आहे . भारतीय चमूतील धनुष श्रीकांत, शौर्य सैनिक, वेदिका शर्मा, अभिनव देशवाल, प्रियेशा देशमुख, जरलिन, अभिनव शर्मा, दिक्षा दागर, पृथ्वी शेखर, धनंजय दुबे, जॕफरीन शैक, विरेंद्र सिंग, आमित क्रिशन, सुमित दहिया याखेरीज भारतीय बॕडमिंटन संघ यांनी ही पदके जिंकली. या स्पर्धेत भारतीय बॕडमिंटन खेळाडूंनी अंतिम फेरीत जपानचा ३-१ असा पराभव करुन सुवर्ण पदक जिंकले.