इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
क्रिकेट स्टार विराट कोहली
– जगदीश देवरे (ज्येष्ठ क्रीडा समिक्षक)
विराट कोहली…. हा खेळाडू तसा नेहमीच चर्चेत असतो. परंतु, याआधी स्वतःच्या कामकिरीमुळे चर्चेत असलेला विराट सध्या त्याच्या खराब फाॅर्ममुळे चर्चेत असल्याने विराटचे चाहते नाराज होणे स्वाभाविक आहे. अगदीच थाेडक्यात सांगायचे झाले तर कोरोना आणि विराटचा बॅडपॅच हे दोन्ही, जवळ जवळ एकाच वेळेला सुरू झाले आहेत.
लॉकडाऊन नंतर जेव्हा क्रिकेट सुरू झाले त्यावेळी विराटच्या फाॅर्मबद्दल बोलतांना, विराटने लॉकडाऊन मध्ये क्रिकेटचा सराव केला की नाही? याचा उलगडा करतांना विराट-अनुष्काचा संदर्भ देवून सुनिल गावस्करने त्याच्या समालोचनात काय “तोंडसुख” घेतले होते, हे चाहत्यांना आठवत असेलच. तेव्हापासून विराटचा फॅार्म अधांतरीच आहे. विराट कोहली हा आजही भारतीय क्रिकेट फलंदाजीचा मुख्य कणा आहे ही बाब जितकी सत्य आहे तितकीच ही गोष्ट देखील सत्य आहे की, कुठल्याही खेळाडूच्या कारकिर्दीत आला नसेल इतका मोठा बॅडपॅच सध्या विराटच्या कारकिर्दीत दिसून येतोय.
हे सगळं आता थाेडं आकडेवारीत वेगळया पध्दतीने आपण बोलून बघू, म्हणजे मुद्दा आणखी स्पष्ट होईल. कसोटी क्रिकेट हा विराट कोहलीचा जीव की प्राण. २०१९ पर्यन्त विराट कोहलीची कसोटीमध्ये धावांची सरासरी होती ५४.९७. परंतु लॉकडाऊन नंतर खेळल्या गेलेल्या १८ सामन्यात विराटची सरासरी आहे २७.२५. निम्याच्या जवळपास ही सरासरी आली आहे यावरून कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी किती खालावली आहे याचा प्रत्यय येईल. या काळात ६ अर्धशतकं असली तरी एकही शतक नाही, हा या आकडेवारीचा महत्वाचा भाग.
वन-डे सामन्यातली परिस्थीती देखील फारशी वेगळी नाही. लाॅकडाऊन आधी म्हणजे २०१९ पर्यन्त ज्या विराटची फलंदाजीतली सरासरी ५९.८४ होती त्या विराटने नंतर खेळल्या गेलेल्या १८ वन-डे सामन्यात फक्त ३९.०० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. इथेही शतक नाही, मात्र ९ अर्धशतकं आहेत हे विशेष. ही आकडेवारी फारशी वाईट नसली तरी ती विराट कोहलीच्या नावासमोर अजिबात शोभत नाही यात कुणी दूमत करणार नाही.
नाही म्हणायला टी२० तल्या कामगिरीने या काळात विराटला थाेडाफार दिलासा नक्कीच दिला आहे. विराट २०१९ पर्यन्त ७५ टी२० मॅचेस खेळला होता. त्यात त्याची सरासरी होती ५२.६६. टी२० क्रिकेटमध्ये अगदी दृष्ट लागावी अशी ही आकडेवारी आहे. पण लॉकडाऊन नंतर विराटच्या बॅटला काय झालयं कुणास ठाउक…. त्यानंतर खेळल्या गेलेल्या २४ सामन्यात विराटच्या धावांची सरासरी ४२.१८ पर्यन्त खाली घसरली आहे.
आता या तिन्ही प्रकारच्या क्रिेकेटमध्ये विराटची गेल्या काही दिवसातली आकडेवारी बघितली तर एकच बाब स्पष्ट होते आणि ती म्हणजेे विराट सध्या पुर्णपणे आऊट ऑफ फाॅर्म आहे. तो सध्या संघात आहे ते केवळ त्याच्या नावावर, त्याने आत्तापर्यन्त मिळवलेल्या लौकीकावर आणि भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानावर. ही आकडेवारी जर एखाद्या नवख्या खेळाडूची असती तर तो इतके दिवस संघात राहीलाच नसता हे वेगळं सांगायची गरज नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भुमिका ही मोठ्या आणि नामवंत खेळाडूंच्या बाबतीत नेहमीच भेदभाव करणारी राहीली आहे. चेतेश्वर पुजारा हा काही दिवसांपुर्वी पुर्णपणे आऊट ऑफ फाॅर्म गेला हाेता. त्यावेळी सौरभ गांगुलीने बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून त्याला या सुचना केल्या होत्या काही चेतेश्वरने भारतात होणा-या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळून (म्हणजे रणजी वगैरे… ) स्वतःला सिध्द करावे आणि पुन्हा संघात यावे. पुजाराने ही प्रक्रिया पुर्ण केली. पंरतु, विराटला मात्र नेमकी याउलट वागणूक मिळते आहे. फाॅर्ममध्ये नाही म्हणून संघातून वगळण्याऐवजी विराटला “विश्रांती” या गोंडस नावाखाली सामन्यातून वगळले जाते आहे. ज्या अधिकारवाणीने चेतेश्वर पुजाराला सल्ला दिला गेला तसा विराटला दिला जात नाही, याकडे मात्र कुणीही बघायला तयार नाही.
आय.सी.सी. टी२० विश्वचषक स्पर्धेचा बिगुल ऑस्ट्रेलियात या वर्षी २३ ऑक्टोबरला वाजणार आहे. आय.पी.एल. मोठया उत्साहाने भरविण्या-या भारतीय क्रिकेटमध्ये टी२० क्रिकेटचे टॅलेन्ट किती आहे हे सिध्द करायचे असेल तर हा विश्वचषक भारताला जिंकावाच लागेल. ज्या ग्रुप मध्ये भारतीय संघ आहे त्यात पाकीस्तान बरोबरच द.आफ्रीका आणि बांग्लादेश हे तितकेच तुल्यबळ संघ देखील असल्याने सर्वप्रथम साखळीत या भारतीय संघाला आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे. परंतु, त्यादृष्टीने तयारी काय तर? असे जर कुणी विचारले तर आगामी वेस्ट इंडीजच्या दौ-यात विराटला विश्रांती, रोहीतला विश्रांती, कर्णधार पदावर शिखर धवन आणि नवख्यांना संधी इतकेच या मोहीमेचे वर्णन करावे लागेल. विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्यांवर खेळली जाणार आहे. त्याआधी विंडीचचा दौरा म्हणजे परदेशातल्या वेगवान खेळपट्टीवर खेळली जाणारी टी२० ची शेवटची मालिका ठरणार आहे. सबब, या दौ-यात संघाची घडी नीट बसवून घेण्याऐवजी विश्रांतीचा लक्झरी पर्याय का निवडला गेला? हे अनाकलनीय कोडे आहे.
फाॅर्म एकट्या विराटचा बॅडपॅचमध्ये सापडलेला असला तरी त्यामुळे सद्यस्थितीत संपुर्ण भारतीय संघ दावणीला बांधला गेला आहे हे विसरून चालणार नाही. सुनील गावस्करने या प्रकरणावर केलेली टीका असेल, कपिलदेवने त्यावर केलेली मल्लीनाथी असेल किंवा कुटूंबप्रमुख म्हणून रोहीत शर्माने संघाची बाजू सावरण्याचा केलेला प्रयत्न असेल…. यातून सध्या तरी काहीच साध्य होणार नाही, कारण आता सावरण्याइतका वेळ संघाजवळ उरलेला नाही. अनुकूल नसलेल्या परिस्थितीतून संघाला टी२० च्या विश्वचषकाची मोहिम यशस्वी करायची असेल तर विराट कोहलीचे “कमबॅक” त्यासाठी नक्कीच महत्वाचे ठरेल.