इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
आशिष नेहराजी…तुस्सी ग्रेट हो!
– जगदीश देवरे (Pavilionsmailbox@rediffmail.com)
आशिष दिवानसिंग नेहरा…! भारतीय संघातला माजी मध्यमगती गोलंदाज. याला बॅटर म्हणायची हिंमत कोणीही करणार नाही. १७ कसोटी सामने १२० वन-डे मॅचेस आणि फक्त २७ टी ट्वेंटी मॅचेस इतकीच काय ती आशिष नेहराची कारकीर्द. हे झालं स्टॅटिस्टिक याच्यात फार वेगळे काही बघायला मिळत नाही. म्हणजे कसोटीत ४४ बळी, १२० वन-डे सामन्यात १५७ बळी आणि २७ टी२० सामन्यात ३४ बळी. म्हणजे हा सगळा परफॉर्मन्स बघितला तर भारतीय संघात खुप काही यशस्वी न ठरलेला एक खेळाडू म्हणूनच अशिष नेहरा कडे बघितले जाईल.
२०१७ मध्ये सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर हे नेहराजी उतरले ते थेट समालोचनाच्या क्षेत्रात आणि हळूहळू क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत. तुमच्यात धमक असेल आणि तुमच्यात कष्ट करायची ताकद असेल तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात यशस्वी होऊन जाल, याबद्दल कोणालाही, कधीही, काहीही सांगता येत नाही. अशिष नेहरा च्या बाबतीत तेच घडलं. २०२२ च्या आयपीएल मध्ये गुजरात टायटन्स संघाने विजेतेपद पटकावलं आणि त्या विजेतेपदाचे श्रेय संपुर्ण संघाबरोबरच मुख्य प्रशिक्षक असलेल्या अशिष नेहराला देखील दिले गेले.
किंबहुना ते श्रेय घेण्याइतपत आशिष नेहरा हा एक योग्य प्रशिक्षक आहे असं जुन्याजाणत्या क्रिकेटपटूंचे मत पडले. आयपीएलला आता थोडा नव्हे तर तब्बल १४ वर्षांचा इतिहास लाभलाआहे. आयपीएल ही सर्वस्वी भारताची स्पर्धा असली तरी आज पर्यंत जे यश कुणालाही मिळालेलं नाही ते नेहराजींना मिळाले आहे. आयपीएलच्या इतिहासात आता विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा पहिला भारतीय प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा यांच्या नावाची नोंद, इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहे.
खरंतर गुजरात टायटन्स या संघाचा आयपीएल मध्ये प्रवेश झाला तो याच वर्षी. त्यामुळे सहाजिकच स्पर्धा सुरू होण्याआधी या संघाकडे कुणीही ‘संभाव्य विजेता’ म्हणून कुणीही बघितलं नव्हतं. सगळ्यांच्या नजरा होत्या त्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडे आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स कडे. परंतु पटलावरचे फासे असे काही पलटले गेले की चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांना साखळीतच पॅकअप करावं लागलं.
अंतिम सामन्यात सगळ्यात प्रथम जाऊन पोहोचणारा संघ ठरला, तो म्हणजे गुजरात टायटन्स. सहाजिक आहे ज्या वेळेला संघ जिंकतो तेव्हा त्याचे श्रेय एकतर कर्णधाराला दिले जाते किंवा कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांनाही दिले जाते. आयपीएल २०२२ च्या विजेतेपदाचे श्रेय कर्णधार म्हणून जसे हार्दिक पांड्याला मिळाले तसेच ते सोशल मीडियावरच्या असंख्य चाहत्यांनी अशिष नेहराला सुद्धा दिले.
खेळाडू म्हणून खेळताना तुमच्याकडे कला असावी लागते, गुणवत्ता असावी लागते आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करताना तुमच्याकडे विचार असावे लागतात, कल्पकता असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे संघाला प्रेरित करण्याची शक्ती असावी लागते. सध्याचे युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीच्या या युगाचा क्रिकेटमध्येही उपयोग करून घेतला जातो. सामना सुरू असताना डगआऊट मध्ये बसलेला प्रशिक्षक आणि त्याच्यासमोर ठेवलेला लॅपटॉप यातील डेटाच्या आधारे संघाची काहीतरी व्युहरचना आखतो आहे असे चित्र टेलिव्हिजनवर मॅच बघताना आपण नेहमीच पाहतो. अनिल कुंबळे हा माजी भारतीय लेग स्पिनर प्रथमपासूनच टेक्नोसॅव्ही असल्यामुळे तो या आधुनिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतो. त्यात गैर असं काहीच नाही.
आशिष नेहरा मात्र ज्या ज्या वेळेला प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला त्यावेळेला त्याच्यासमोर लॅपटॉप कधीही दिसला नाही. याउलट डोक्यावर उलटी टोपी घालून डगआऊट च्या अवती भोवती फिरणार्या आशिष नेहराला नेहमी काहीतरी विचार करतांना, कर्णधाराला किंवा गोलंदाजाला, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला काहीतरी सल्ला देतानाच प्रेक्षकांनी बघितलं. हे असले प्रकार आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेहमीच बघायला मिळतात.
क्रिकेटमध्ये हे असंल काही होत नाही. प्रशिक्षक अतिशय शांतपणे एका वेगळ्याच अविर्भावात लॅपटॉप समोर बसून काहीतरी विचारात मग्न झालेला नेहमीच दिसतो. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि गुजरात टायटन्स संघाच्या फलंदाजीचा प्रशिक्षक गॕरी क्रिस्टन याने मात्र अशिष नेहरा बद्दल सांगितलेलं एक वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. तो म्हणतो की, कायम खेळाबद्दलच विचार मनात असलेला एक प्रशिक्षक म्हणून मी नेहराकडे बघतो.
यंदाच्या आयपीएलचा सीझन हा इतर सीझन पेक्षा खूप वेगळा होता. यंदा प्रथमच १० संघ खेळत असल्यामुळे अगदी चांगल्या चांगल्या संघांची वाट, ही लिलाव प्रक्रियेपासूनच लागलेली बघायला मिळाली. प्रत्येक सामन्यासाठी वेगवेगळे डावपेच आखावे लागले. त्यात फक्त मुंबईत सामने खेळवले गेल्यामुळे प्रत्येक संघाला दरवर्षी मिळत असलेले स्थानिक पोषक वातावरण यावर्षी अजिबात मिळाले नाही.
गुजरात टायटन्सच्या विजयाकडे जर पहिल्यापासून बघितलं तर एक गोष्ट प्रामाणिकपणे जाणवते, आणि ती म्हणजे या प्रत्येक विजयासाठी कुठलाही गेमप्लॅन किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी आधीपासून आखण्यात आली होती, असे त्यांच्या खेळातून अजिबात जाणवत नाही. पहिलीच स्पर्धा असल्यामुळे विजयाचे कुठलेही दडपण नसलेल्या संघावर प्रशिक्षकाने किंवा कर्णधाराने देखील कुठलेही अतिरिक्त दडपण आणण्याचा प्रयत्न कधीही न केल्यामुळे संघ सरसकट यशस्वी ठरत गेला. या विजयानंतर आता सोशल मीडियावर आशिष नेहराला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय.
आशिष नेहरा ज्या वेळेला भारतीय संघात खेळायचा ज्यावेळेला त्याच्यावर बॅट घेऊन फलंदाजीसाठी मैदानात उतरायची वेळ आली की भारतीय चाहते हे मॅच बंद करून निवांत बसायचे, कारण आशिष नेहरा पर्यंत बॅटिंग आली म्हणजे आपण मॅच सपशेल हरलो आहोत अशी एक भावना त्या काळात तयार झाली होती. क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये अशिष नेहरा नावाच्या फलंदाजांची सरासरी अवघी ५-६ धावा आहे, हे यामागचे सगळ्यात मोठे कारण. सहाजिकच लोकप्रियतेचं कुठलंही वलय नसलेला हा प्रशिक्षक चाहत्यांच्या मनावर का राज्य करतोय? याचे कारणही तितकेच मोठे आहे.
प्रशिक्षक म्हणून काम करतांना नेहराजींचे दोन फोटो व्हायरल झालेत. त्यातला पहिला फोटो म्हणजे, मैदानावर नारळ पाणी पिणारा आशिष नेहरा आणि दुसरा फोटो म्हणजे एका पायरीवर बसून हातातल्या एका कागदाच्या चिठोरीवर लिहिलेल्या नोट्स वाचणारा प्रशिक्षक आशिष नेहरा. इतक्या साध्याभोळ्या पद्धतीने संघाची संघाचे डावपेच आखून आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळणार असेल तर त्या प्रशिक्षकाला एव्हढेच म्हणावे लागेल….
नेहराजी, तुस्सी ग्रेट हो.