इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
थोरो आणि वॉलडन
आजपर्यंत आपण निसर्गातील पंचमहाभूतांचा आदर करणाऱ्या तसेच निसर्ग संवर्धनासाठी आयुष्य वेचणाऱ्या अनेक महान व्यक्तींचा परिचय निसर्गयात्री या सदराद्वारे जाणून घेतला.परंतु आज निसर्गाशी एकरूप होऊन सुखी आयुष्याची गुरुकिल्ली शोधताना वॉलडन नदीच्या काठी स्वतःच्या हाताने एक झोपडी बांधून सव्वा दोन वर्ष आत्मशोध घेणाऱ्या हेन्री डेव्हिड थोरो या खऱ्याखुऱ्या निसर्गयात्रीच्या निसर्गयात्रेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
थोरो म्हणतात,” मी रानात राहायला गेलो ते अशासाठी की जीवन हेतुपुरस्सर जगावं. जीवनाच्या मूलभूत तत्वांना सामोरं जावं. जे इतरांना शिकवायचं ते आपल्याला स्वतःला शिकता येतं की नाही ते पाहावं. मरतेवेळी आपण जगलोच नाही ही खंत राहू नये. जे खरं जीवन नव्हे ते जगण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती .जगणं किती किमती आहे याचा मला माझ्यासाठी अगदी खोलवर अभ्यास करायचा होता.” हेनरी डेव्हिड थोरो हा एकोणिसाव्या शतकातला प्रसिद्ध अमेरिकन लेखक परंतु आजही 200 वर्षानंतरदेखील त्याच्या वॉल्डन या ग्रंथामुळे तसेच त्यांच्या इतर प्रभावी लेखनामुळे जगातला अभिजात लेखक ठरला.
वॉलडन हे अमेरिकेतल्या पहिल्या आठ श्रेष्ठ ग्रंथांपैकी एक आहे .1948 मध्ये दुर्गाबाई भागवत यांनी वॉलडन या पुस्तकाचा ‘वॉलडनकाठी विचारविहार’ हा मराठी अनुवाद केला आणि त्यामुळे थोरो मराठी जनसामान्यांपर्यंत पोचला. अल्पावधीतच त्याच्या प्रभावी लेखणीने त्याचे असंख्य वाचक चाहते झाले. थोरो म्हणजे निसर्ग. थोरो म्हणजेच वॉल्डन. थोरो म्हणजे क्रांती, थोरो म्हणजे कविता आणि थोरो म्हणजे विजनवास. महात्मा गांधी,मार्टिन ल्युथर किंग, टॉल्स्टॉय, मार्क्स यासारख्या जागतिक नेत्यांवर आणि साहित्यिकांवर थोरोचा प्रभाव होता. त्याच्या रोजच्या जगण्यासंबंधित त्याने केलेले विविध प्रयोग आणि इतर अनेक गोष्टी ऐकताना, वाचताना या माणसाबद्दल कुतूहल वाढत जाते. 45 वर्षांच्या आयुष्यात त्याने निसर्ग या विषयावर विपुल लेखन केलं.
हेन्री डेव्हिड थोरो याचा जन्म 12 जुलै 1817 मध्ये अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स येथील कॉनकोर्ड येथे झाला. त्याचे कुटुंब गरीब जरी असले तरी अत्यंत प्रेमळ होते. त्याचे वडील आणि थोरल्या बहिणीने काबाडकष्ट करत हेन्रीला हॉवर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी घातले. हेन्री स्वतःही अतिशय बुद्धिमान व प्रगल्भ विद्यार्थी होता. लॅटिन, ग्रीक, फ्रेंच या भाषा आणि गणित या विषयात पदवी त्यांनी मिळवली . इमर्सन या तत्त्वज्ञानी विचारवंताचा प्रभाव त्याच्यावर होता. म्हणून तर शाळेत शिक्षकाची असलेली नोकरी सोडून त्यानी इमर्सनच्या घरी ‘कारभारी’ म्हणून नोकरीही केली.आत्मशोधासाठी निसर्गाला जाणून घेणे त्याला महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून थोरोने घरातून बाहेर पडत एकट्याने रानात राहायला जायचं ठरवलं.
मनमुराद भटकंती, पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग ,चरितार्थाचे ठराविक मार्ग, फक्त निसर्ग निरीक्षण, ऋतुचक्राचं अवलोकन,चिंतन-मनन आणि लेखन हाच आपला व्यवसाय हाच एक हेतू मनाशी ठरवून एका घनदाट जंगलात ‘वॉल्डन’नदीकाठी त्याने स्वतः झोपडी बांधली. आणि कंदमुळे खाऊन सव्वादोन वर्षे तो तिथे मुक्तपणे राहिला. निसर्गाचं, तिथल्या पशुपक्ष्यांचं, झाडाझुडपांचं निरीक्षण आणि अभ्यास करत राहिला. हा थोर विचारवंत कट्टर निसर्गवादी होता. त्याचं स्वतःचं असं खास तत्त्वज्ञान होतं.
थोरो म्हणतो,” सूर्य, वायू ,पर्जन्य आणि निसर्गाने कुठलीही अपेक्षा न करता दाखवलेला उदारपणा यामुळे आज आपण आनंदी आहोत. आपली प्रकृती उत्तम आहे आणि हे औदार्य आपल्याला जन्मभर उपभोगायला मिळणार आहे. निसर्गाच्या मनात मानवाबद्दल एवढी अनुकंपा,एवढं प्रेम भरलेले आहे की मानवाला जरा जरी दुःख झालं तरी सूर्य देखील दुःखाने झाकोळून जाईल. वायू मानवाप्रमाणे उसासे टाकेल.पर्जन्य अश्रू ढाळेल.जंगलाची पानगळ होईल. जगात असं कुठलं औषध आहे का की ज्याने मानवजात खरंच शांत आणि समाधानी जीवन जगू शकेल. असं औषध ना तुमच्याकडे आहे ना तुमच्या पूर्वजांकडे. ते औषध आहे फक्त निसर्ग देवतेकडे.”
निसर्गाशी तादात्म्य पावणारं समाजजीवनच खऱ्या अर्थाने मनुष्याला सुखीसंपन्न बनवू शकतं. ज्याची माणसाला नितांत गरज आहे,अशी थोरो ची भूमिका. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ असं न करता स्वानुभवातून जे शहाणपण त्यांना मिळत गेलं ते त्यांनी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. गरज आणि हव्यास यातली धुसर सीमारेषा थोरोला या वास्तव्यात प्रकर्षाने जाणवली. स्वतः निसर्गस्नेही जीवनशैली अवलंबून साधेपणाने राहण्याचा प्रयोग केल्यानंतर त्याने दुसऱ्यांना साधेपणाने राहण्याचा उपदेश केला.त्याला जे योग्य वाटलं ते त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. निसर्गाच्या सानिध्यात राहताना आयुष्य किती विलक्षण आनंददायी आहे याचा अनुभव प्रत्यक्ष घेऊन त्यानंतर त्याने त्याच्या पुस्तकाद्वारे तो आनंद लोकांपर्यंत पोहोचवला. खरंतर कोणाला काही शिकवण्यासाठी तो जंगलात फिरायला गेलाच नव्हता परंतु त्याच्या आत्मशोधाच्या प्रवासात त्याला निसर्गाच्या विविध चमत्कारांची अनुभूती येत गेली.
थोरो म्हणतो,” निसर्गाला प्रतिसाद देत जगायला हवे. तिथल्या नैसर्गिक चमत्कृती न्याहाळता आल्या पाहिजे तरच तुम्ही त्या निसर्गाचा भाग बनू शकाल. निसर्गावर श्रद्धा ठेवा. तुमच्यासमोर घडणारे निसर्ग अविष्कार तुम्हाला सतत तुमच्या आयुष्याची जाण देत राहतात. मानव हा स्वतःला अति सामर्थ्यवान समजतो परंतु वस्तुतः तोही चराचर व्यापून टाकणाऱ्या निसर्गाचा एक छोटासा भाग आहे .पक्षी, प्राणी, सारे सजीव, समुद्र ,नद्या, पर्वत हे जसे निसर्गाचे घटक आहेत तसाच मानव हा एक शुल्लक घटक आहे. या विश्वात शूद्र किडा-मुंगी पासून ते अजस्त्र प्राण्यांपर्यंत प्रत्येक घटका प्रमाणे मानव हा सुद्धा निसर्ग आधीन आहे.”
माणसाने केलेली प्रगती, विकास माणसाला निसर्गापासून दूर नेतोय. स्वतःच्या बौद्धिक सामर्थ्याचा बडेजाव मिरवणारा माणूस निसर्गावर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु वेळ आल्यावर निसर्ग त्याची महानता दाखवून देत असतो. निसर्गाचा आदर ठेवत नैसर्गिक जीवनशैली अंगीकारत तंत्रज्ञानाची जोड देऊन मानवाला प्रगती करणं शक्य झालं तर यासारखं सुंदर आयुष्य नसेल.आपण निसर्गाचा एक भाग आहो,त्यापासून वेगळे कसे होऊ शकतो.