दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीची पहिली उपनदी अशी किकवीची ओळख आहे. याच किकवीच्या खोऱ्यात अत्यंत मौलिक अशी जैविक विविधता आहे. त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत…
ब्रह्मगिरी आणि हरिहर गडाच्या मध्ये मेटघर किल्ल्याखाली आपल्याला एक सुंदर जलाशय दिसतो. तो किकवी नदीवर आहे. किकवी नदीचा उगम ब्रह्मगिरी आणि हरिहर गडाच्या डोंगर रांगेतून झाला आहे. ब्रह्मगिरी पर्वताचा टॉप व्ह्यू जर आपण बघितला तर हा पर्वत किती अक्राळविक्राळ पसरला आहे ते दिसून येईल. शेजारील आकृतीत दाखवल्या प्रमाणे ब्रह्मगिरी पर्वताच्या रांगा एखाद्या ‘अमिबा’ सारख्या पसरलेल्या आहेत.
पूर्वेकडील सोंड नवरा नवरी च्या किल्ला कडे तर दक्षिणेकडील सोंडा भिलमिल गाव आणि धाडोशी गावाकडे पश्चिमेला गौतम ऋषी मंदिर ते हरिहरकडे आणि उत्तरेला दुर्ग भांडार किल्लाकडे ह्या पर्वताच्या रांगा जातात. संपूर्ण परिसर फिरायला अतिशय वेधक आणि बेलाग दऱ्यांनी भरलेला आहे.अगदी स्वातंत्र्य मिळे पर्यंत त्रिम्बकेश्वरला जायला महिरावणी पासून पायवाट होती. ब्रह्मगिरी पर्वताच्या चारही बाजूने दाट झाडी पसरलेली होती. निवृत्तीनाथ ह्याच जंगलात भरकटले होते तेव्हा गहिनींनाथांनी त्यांना दिक्षा दिली असा इतिहास आहे.
तर अश्या या ब्रह्मगिरी पर्वतातुन तीन नद्यांचा उगम झालेला आहे. पूर्व वाहिनी गोदावरी आणि दक्षिण वाहिनी वैतरणा नद्या प्रसिद्ध आहेत.पण उत्तरेकडे वाहणारी किकवी नदी फारशी प्रसिद्ध नाही. अगदी नदीच्या उगमानंतर लगेचच तळेगाव- काचुरली येथे छोटे धरण नजीकच्या काळात बांधले आहे. त्या नंतर ही नदी जव्हारच्या रस्ता ओलांडून ब्राम्हणवाडे शिवारात जाते.
अतिशय छोट्या छोट्या वळणांनी ह्या नदीने तिचे पात्र तयार केले आहे, शिवाय छोट्या टेकड्यांमधून वाहत असल्याने तिचे पात्र अरुंद आणि काही ठिकाणी खोलगट पण आहे. ब्राह्मणवाडे शिवारातून पुढे जाऊन ही नदी खूप सारी वळणे घेत घेत चक्रतीर्थ,बेजे गावच्या आधी गोदावरीस मिळते. एवढा छोटासा प्रवास,पण गोदावरीची पहिली उपनदी होण्याचे भाग्य लाभले या नदीला.सदैव खळखळणारे पाणी आणि उतारामुळे पाणी सतत वाहत असते. तळेगाव-काचुरली धरणामुळे आता ह्या नदीत बारामहिने पाणी दिसते. पूर्वी उन्हाळ्यात ही नदी कोरडी व्हायची. संगमपासून ते उगमापर्यंत चांगले पदभ्रमण होऊ शकते आणि जैवविविधतेचा अभ्यास होऊ शकतो.
अशाच नवनवीन जैवविविधतेच्या जागांचा अभ्यास किकवी च्या खोऱ्यात करण्याचे आम्ही ठरवले आणि कामाला लागलो. माझे मित्र संदीप रणदिवे यांनी वारंवार या भागात जाऊन परीक्षणे केली. आणि काय गम्मत, आपल्या भागात कधी नव्हे रेकॉर्ड झालेला अमुर फाल्कन (Amur Falcon) हा पक्षी काळमुस्ते परिसरात 10 नोव्हेंबर 2019 साली दिसला. आणि एक प्रकारे हे सिद्ध झाले की हा पक्षी आपल्या भागातून सुद्धा स्थलांतर करतो.
थोडे अमुर फाल्कन या पक्ष्याविषयी. फाल्कन म्हणजे ससाणा. अमुर फाल्कन हा छोटा ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.हा पक्षी आकाराने कबुतरापेक्षा लहान, नराचे अंगवर्ण राखी.पाय नारंगी तांबड्या रंगाचे असतात. मादी: शेपटीसह वरील अंगाचा वर्ण राखी असतो. त्यावर काळ्या रेषा असतात. माथा गर्द राखी असतो. छातीवर काळे उभे ठिपके असतात.
छातीवर व कुशीवर लांब पट्टे असतात. किंबहुना हा पक्षी,शिकारी पक्ष्यांमध्ये आकाराने सर्वात लहान ठरावा. ह्याची लांबी 11 इंच असेल. पूर्व दक्षिण चीन ह्या प्रांतातून निघून दरवर्षी हा पक्षी दक्षिण आफ्रिके पर्यंत स्थलांतर करतो आणि भारतातून जाताना त्याचा प्रवास नागालँड पासून सुरू होऊन थेट महाराष्ट्रातून अरबी समुद्रामार्गे दक्षिण आफ्रिकेत जातो. हा पक्षी स्थलांतर करताना थव्याने करतो असे जाणकारांचे मत आहे,पण आपल्याला हा एकटाच पक्षी त्यावेळेस दिसून आला. परत दुसऱ्या वर्षी पण लागोलाग हा पक्षी डिसेंम्बर महिन्यात काळमुस्ते परिसरात दिसून आला. आपल्या नाशिकचे हे भाग्य म्हणावे लागेल की एवढा क्वचित दिसणारा पक्षी आपल्या भागातून स्थलांतर करतो. अजून जास्त परिक्षणांची गरज आहे.
आता आम्हाला सापडलेल्या तिबोटी किंगफिशर ह्या पक्ष्याविषयी. तिबोटी किंग फिशर म्हणजेच Oriental Dwarf Kingfisher(ODKF) हा मूळचा श्रीलंका,दक्षिण भारतातील आहे.आणि जून जुलै महिन्यात तो प्रजननासाठी महाराष्ट्रात,प्रामुख्याने कोकणात दिसतो. चिपळूण,बोरिवली ह्या भागात त्याचे दर वर्षी सायटिंग होते. म्हणून आम्ही आपल्या ब्राह्मणवाडे परिसरातील किकवी च्या खोऱ्यात पाळत ठेवली असता ह्या पक्ष्याचे दर्शन झाले. रेकॉर्ड शॉट नोंदवले पण गेले.
गावातल्या काही लोकांना विचारले असता त्यांनी पण हा पक्षी येथे दिसतो असा दुजोरा दिला. पण मनाचे समाधान अजून झाले नाही. किकवी नदीचे पात्र हा ह्या पक्ष्याचा तंतोतंत अधिवास शोभतो. अगदी कोकणातला फील येतो.
आता थोडे तिबोटी खंड्या किंवा किंगफिशर विषयी. किंगफिशर प्रजातीतील सर्वात छोटा हा तिबोटी खंड्या होय. दिसायला सर्वात आकर्षक असा हा खंड्या आहे. तिबोटी म्हणण्या मागे कारणकी, या पक्ष्याला तीनच बोटे प्रत्येक पायाला असतात. हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
लालभडक लांब चोच आणि पाय,पिवळे जर्द अंगकाठी आणि जांभळ्या रंगाची चकचकीत पाठ,नारिंगी रंगाचे डोके आणि शेपूट. असा रंगीबेरंगी पक्षी लगेच आपले लक्ष वेधून घेतो.तेवढाच शांत आणि भुर्रकन उडून जातो. हा पक्षी प्रामुख्याने खेकडे,बेडूक,सरडे,सापसुरली ,नाकतोडे खातो. नाव जरी किंगफिशर असले तरी याला मासे आवडत नसावेत. जंगलातून उथळ वाहणारे पानी,छोटी डबकी हा अधिवास याला प्रिय. पाण्याच्या शेजारील जमिनीच्या उंच भीतीवर बिळे पोखरून आत घरटे करतो.
तर मित्रांनो ह्या कमी प्रसिद्ध असलेल्या किकवी नदीने आतापर्यंत आपल्या भागत न दिसणारे पाहुणे,दुर्मिळ पक्षी आपल्याला दाखवले त्या बद्दल त्रिंबक तालुक्यातील ह्या भौगोलिक रचनेचे ,निसर्गाचे आभार. असेच नवनवीन अधिवास शोधून निसर्गातील जैवविविधतेची समृध्द माहिती गोळा करणे हा खरा निसर्ग योग आहे.