इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
जलतज्ज्ञ परिणीता दांडेकर
देशात ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या नद्या आहेत त्या त्या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. काही वर्षापूर्वीच नाशिकला कुंभमेळा झाला आणि देशविदेशातील लोक लांबून लांबून आपल्या गोदावरी मध्ये स्नान करण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी या काळात नाशिक मध्ये दाखल झाले .पण, गोदावरीमध्ये शाहीस्नान करण्यासाठी गोदावरीच्या पात्रात पाणी होतं कुठे? ज्या स्नानाला अमृतस्नानाची उपमा दिली गेली होती ते स्नानाचं पाणी मात्र दुर्दैवाने नदीमध्ये टँकरद्वारे सोडलं गेलं होतं. म्हणजेच काय ? तर हीआपली स्वतःची आणि आपल्या भावनांची शुद्ध फसवणूकच नाही का? त्यावेळी लांब लांब पर्यंत फक्त गाड्यांचे पार्किंग दिसत होते आणि नदी मात्र थोडीशी कुठेतरी दिसत होती. ही व्यथा मांडली आहे मूळच्या नाशिकच्या पण, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नदी अभ्यासक, जलतज्ञ परिणीता दांडेकर यांनी.
परिणीता दांडेकर ह्या भारतातील नद्यांचे आणि त्यांच्याशी संबंधित पर्यावरण ह्यांसाठी भारतभर काम करत असतात. त्या साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अॅण्ड पीपल ह्या संस्थेच्या सहयोगी समन्वयक देखील आहेत. त्या नद्यांशी संबंधित समस्यांविषयी संशोधन करायचं आणि त्याचा अहवाल तयार करून शासनस्तरावर पाठपुरावा करायचा हे त्यांचे कार्य अखंड चालू असते. त्यांची कळकळ असते की या समस्यांची सर्वसामान्य जनतेत जागृती निर्माण झाली पाहिजे. मुक्तवाहिनी म्हणजेच ज्यांचा प्रवाह धरणाच्या अडथळ्याविना वाहतो अशा नद्यांना वाचवण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
नदी म्हणजे नाद करणारी ‘ती’. नदी, जिच्या नावातच प्रवाह आहे. नदी म्हणजे वाहणे. भारतीय संस्कृतीत नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नदीला माई, माता, मैया, माई अशा नावाने हाक मारली जाते. म्हणजेच, तिला आपण मातृस्थानी मानले आहे. आदीमकाळात मानव जगणं सुसह्य व्हावं याउद्देशाने नद्यांच्या किनाऱ्यावर स्थायिक झाला. नद्या होत्या म्हणून मानवाच्या वस्त्या उभ्या राहिल्या. माणसाने मग मागे वळून पाहिलं नाही. मानवी वस्त्या इतक्या अफाट वाढत गेल्या की नदीचे अस्तित्व मात्र हळूहळू पुसलं गेलं. हा मानवाचा कृतघ्नपणा. पण, नदीतज्ञ मार्क एंजेलो म्हणतात ‘‘कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे कधीच गेलेली नसते.’’ 2022 सालच्या जागतिक जल दिनाचे ब्रीदवाक्य आहे,’ अदृश्य भूजल दृश्यमान करणे’. समाजाचं आणि शासनकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अगदी योग्य ब्रीदवाक्य.
परिणिता दांडेकर यांनी जगभरातील नद्यांचा अभ्यास केला आहे. नद्यांचा उगम, त्यांच्या नावांची कहाणी म्हणजे नद्यांची नावे त्यांना कशावरून पडतात याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्या म्हणतात,” नदीचे स्वरूप कसं आहे? चंचल आहे, संथ आहे, नागमोडी आहे, ती कोणत्या प्रदेशातली आहे यावरून नद्यांची नावं ठेवली जातात. गंगेची, नर्मदेची हजार नावे आहेत. तापीची, भीमेची, गोदावरीचीदेखील नदीमाहात्म्यांमध्ये शेकडो नावे आहेत. गंगा उगम पावताना भागीरथी, मग अलकनंदेला मिळाल्यावर गंगा, बांगलादेशात पद्मा, ब्रह्मपुत्रेला मिळाल्यावर मेघना होते. बांगलादेशातील, बंगालमधील नद्यांची नावे तर इतकी मधुर की ऐकत राहावे. अंजना, मोधुमती, कर्णफुली, कपोताक्षी. त्यात ‘शुद्धीकरण आणि पुण्यप्राप्ती’वर भर अधिक असतो जसं,अघनाशिनी, पापनाशिनी, लोकपावनी, अमृतवाहिनी, पयस्विनी इत्यादी.”
परिणीता यांना प्रत्येक नागरिकाने नद्यांबद्दल संवेदनशील असावं असं कळकळीने वाटतं. जरी प्रत्येक नागरिक नद्यांसाठी रस्त्यावर येऊ शकत नसेल तरी लोकसहभागातून अनेक नद्या पूर्ववत होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास आहे. मोठे बदल घडवून आणायचे असतील तर मोठा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्या म्हणतात ज्याप्रमाणे 5० वर्षांपूर्वी अभ्यासकांना वाटले होते की टेक्सासला महाकाय पाणी प्रकल्पांवाचून पर्याय नाही; पण आज त्यांची गरज नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील १८ विद्यापीठे पाणीप्रश्नावर वर्षांनुवर्षे काम करताहेत. असे महाराष्ट्रात घडले तर अनेक विद्यार्थ्यांना कित्येक नव्या संधी मिळू शकतील. एल पासोसारख्या वाळवंटात वसलेल्या शहरात तर ‘ग्रे पाणी’ काही तासांत प्रक्रिया करून परत वापरात येत आहे. फिनिक्ससारख्या रखरखीत शहरात लोकसंख्या ६२ वर्षांत सातपटीने वाढूनदेखील पाणीवापर तेव्हापेक्षा कमी केला आहे. जे शहर साठ वर्षांपूर्वी ७० टक्के भूजलावर अवलंबून होते त्याने आपला भूजलवापर ४० टक्केवर आणला आणि तब्बल तीन टक्के पाण्याचा ते पुनर्वापर करत आहेत. परिणिता त्यांच्या अभ्यासात म्हणतात, भारतात नद्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे फक्त नद्या चकाचक करणे नव्हे.
नमामी चंद्रभागा, नमामि गंगा सारखे प्रकल्प राबवले जातात परंतु, लोकसहभाग मात्र अत्यल्प दिसून येतो. परिणिता नेहमी याबाबतीत परदेशातील नद्यांचे उदाहरण देतात.1972 मध्ये ‘क्लीन वॉटर अॅक्ट’ मंजूर झाला आणि त्याच्या काटेकोर अंमलबजावणीने काहीच वर्षांत प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे अमेरिकेतील नद्यांचे चित्र पालटले. युरोपमध्ये २००० साली सर्व सभासद देशांना मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देणारा पाणी-वॉटर फ्रेमवर्क डिरेक्टिव्ह कायदा पारित झाला. आज युरोपात या फ्रेमवर्कसाठी हजारो प्रकल्प सुरू आहेत, हजारो हात कार्यरत आहेत. विद्यापीठे आणि सरकारने एकत्र येऊन शेकडो वर्षांपूर्वी जमिनीत पुरलेल्या बीव्र नदीचा काही भाग खोदून काढला आणि वाहता केला. न्यूयॉर्कमधली ब्रॉन्क्स ही नदी अत्यंत गजबजलेली, प्रदूषित, दुर्लक्षित होती. या नदीला उघडे गटार म्हणत. पण, नदीलगत सलग रिव्हर पार्क तयार झाले, तिथे राहणारे लोक स्वखुशीने दुसरीकडे गेले, कारण त्यांना चोख मोबदला मिळाला आणि नदीचा पूर्ण कायापालट झाला. अमेरिकेतली डेलावेअर नदी एका उघडय़ा गटारापासून आज जगातील सगळ्यात स्वच्छ नद्यांपैकी एक आहे.
आपल्याकडेदेखील जिथे खऱ्या लोकसहभागाद्वारे नदी खरोखर पुनरुज्जीवित झाली आणि या कामांना खर्चदेखील नगण्य आला अशी नदी म्हणजे राजस्थानमधील अरवरी नदी. परिणिता यांचा देश-विदेशातील नद्यांचा अभ्यास पाहिला की आपल्यासमोर देश-विदेशातील नद्यांचं पूर्ण चरित्र खुलं होतं. नदीसंवर्धन क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिलेलं असूनही, त्यांना अजूनही बरेच काम नद्यांसाठी करायचे आहे. त्यांना “किर्लोस्कर वसुंधरा मित्र”या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. लोकसहभागाशिवाय आपल्या पवित्र नद्या आपल्याला पुन्हा पूर्वरूपात मिळू शकत नाहीत. नदी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. जिथल्या नद्या दुथडी भरून वाहतात ,त्या भागाला निसर्गसौंदर्याची देणगी असते. नदी म्हणजे फक्त जलाशय नव्हे. नदी असतो एका संस्कृतीचा प्रवाह. अवघ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा आधार. नदी संस्कृतीचे प्रतीक असते.ज्या देशातल्या नद्या लोप पावल्या, त्या देशात संस्कृती लयाला गेली. हा इतिहास आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांसाठी आपली संस्कृती टिकवायची असेल तर, आजच्या पिढीने नदी संवर्धन, नदी पुनरूज्जीवन यात संवेदनशीलतेने आपला सहभाग दाखवला पाहिजे. कदाचित शाहीस्नानापेक्षाही नक्कीच कणभर जास्त पुण्य आपल्याला यातून मिळेल. चला पुण्य कमवू या!