इंडिया दर्पण विशेष लेखमाला
निसर्गयात्री
दुर्गभ्रमंतीकार प्रा. प्र. के. घाणेकर
“प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा”
कवी गोविंदाग्रज यांच्या या ओळी. महाराष्ट्र भूमी अनेक गड किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाने समृद्ध अशी भूमी.गड, किल्ले म्हणजे इतिहासातल्या संघर्षाची प्रतीकं . तोफांचे धडधडाट आणि तलवारीचे खणखणाट याचे सूर तिथे एकेकाळी घुमलेले असतात. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या अनेक शूरवीरांच्या रक्ताने पवित्र झालेली ही भूमी असते.हे गड, किल्ले कसे पाहावेत? का पाहावे?कधी पहावे? याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारे प्रा. प्र. के. घाणेकर म्हणजे गड किल्ल्यांचं चालतं बोलतं गुगल…. आज त्यांच्याविषयीच आज आपण जाणून घेऊ…

मो. 9423932203
प्रा. प्र. के. घाणेकर हे खरंतर पुरावनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. महाराष्ट्रातल्या विविध वनस्पतींचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने अनेक जंगलांमध्ये, डोंगर माथ्यांवर,गडकिल्ल्यांवर वनस्पती संशोधनासाठी घाणेकर जात असत आणि हे संशोधन करता करता गडकिल्ल्यांच्या सानिध्यात इतिहासाची गोडी कधी लागली कळलंच नाही. गड, किल्ले पुन्हा पुन्हा खुणावू लागले आणि बघता बघता त्यांनी 300 किल्ले पालथे घातले. कधी तिथला निसर्ग पाहायला तर कधी निसर्गप्रेमींना दाखवायला, कधी तिथल्या ऐतिहासिक गोष्टींचा परिचय करून द्यायला तर कधी तिथल्या कड्यांवरती गिर्यारोहण तंत्रातील क्लुप्त्या जाणून घ्यायला.प्राध्यापक प्र. के. घाणेकर हे निसर्गमित्र तर आहेतच पण ,त्याशिवाय ते विज्ञाननिष्ठ दुर्गअभ्यासकदेखील आहेत.
प्रा. प्र. के.घाणेकर यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातल्या आवास या गावातला. शालेय जीवनात सर्वसामान्य असणारा हा विद्यार्थी. महाविद्यालयात उत्तम आणि तळमळीचे शिक्षक मिळत गेले आणि निसर्गाच्या बिनभिंतीच्या उघड्या शाळेत जाण्याची ओढ या शिक्षकांनी दिली आणि मग आपसूकच वनस्पती,निसर्ग, पर्यावरण या विषयांबद्दलची त्यांना गोडी लागली. पुरावनस्पतीशास्त्र म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि भूशास्त्र यांची मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारा हा विषय. त्यामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे ते गिर्यारोहणविषयक शिक्षण घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातल्या वेस्टर्न हिमाचल प्रदेशात गेले. भटकंतीला आवश्यक असणारी छायाचित्रणकलादेखील अवगत केली. दरवर्षींच्या अभ्यास सहलींमधून पर्यावरण विषयक अभ्यासक्रमाबद्दल जास्त गोडी वाटू लागली.
अनेक पर्यावरणविषयक उपक्रम, निसर्ग परिचय सहली आणि निसर्ग शिबिरांमध्ये अनुभवी अभ्यासक म्हणून त्यांनी काम केलं.त्यानिमित्ताने अनेक अभयारण्यांना भेटी दिल्या. प्रा. प्र. के. घाणेकर म्हणतात,” निसर्ग भ्रमंती करता करता समुद्र, सह्याद्री आणि हिमालयाकडून खूप काही शिकायला मिळालं. राजस्थानचा वाळवंट, लेह लडाख, लाहोल स्पितीचं बर्फाळ वाळवंट समरसून पाहता आलं. अंदमान बेटावर निसर्ग मनसोक्त अनुभवता आला. त्यामुळे निसर्गाने मला काय दिलं हा प्रश्न अनाठायी ठरतो. सारं काही त्या समृद्ध निसर्गानेच मला दिलं आहे. मी त्याबद्दल निसर्गाचा ऋणी आहे .समाधानी आहे. आनंदी आहे.”
प्रा. प्र. के . घाणेकरांनी प्रामुख्याने निसर्गपर्यटन ,महाराष्ट्रातले किल्ले आणि त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर लेखन केले. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात पुरावनस्पतीशास्त्र विभागात 38 वर्ष त्यांनी सेवा केली. घाणेकर हे जीवशास्त्राचे अभ्यासक आहेत परंतु चार भिंतींच्याआड जीवशास्त्र शिकता येत नाही, या भावनेतून त्यांनी भटकंती सुरू केली. पर्यटन या मासिकातून किल्ले आणि लेण्यांमधली झाडं, वनस्पती, फुलं बघता बघता किल्ल्यांच्या अनवट वाटांवरती त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली आणि मग त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’. ज्या गडांवरती शिवरायांचा गौरवशाली पराक्रम घडला त्या सर्व शिवकालीन किल्ल्यांना घाणेकरांनी त्यांच्या लिखाणातून प्रकाशात आणलं.
‘जो किल्ला पाहिला नाही त्याबद्दल लिहायचं नाही’ असं ठरवून इतिहासाच्या अंगाने जाणार ललित लेखन त्यांनी केलं. किल्ल्यांवर का जायचं? कसं जायचं? कधी जायचं? जाताना कोणती पथ्य पाळायची? तिथे गेल्यानंतर पर्यावरण रक्षणसाठी किल्ल्यांची जपणूक कशी करायची? तिथली शिल्प, तिथला नैसर्गिक परिसर, तिथली नैसर्गिक संपत्ती याबद्दलची इत्थंभूत माहिती त्यांच्या लिखाणातून मिळत गेल्याने ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.किल्ले-हिमालय-निसर्ग-गिर्यारोहण-विज्ञान-भटकंती-पर्यटन या विषयांवर ८००हून अधिक लेख व ५००हून अधिक व्याख्याने घाणेकरांनी दिली आहेत. विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन या साहित्यप्रकाराला स्वतंत्र स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे.
महाराष्ट्रात अनेक सागरी किल्ले आणि डोंगरी किल्ले आहेत. शास्त्रीय पद्धतीने बांधलेले हे दुर्ग म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचे अद्भुत नमुने आहेत. अपूरे आर्थिक पाठबळ, अभियांत्रिकी किंवा स्थापत्याच्या कोणत्याही पद्धतशीर शिक्षणाची उणीव, राजकीय दृष्ट्या अस्थैर्य, सीमित मनुष्यबळ या सर्व प्रतिकूल परिस्थितीतदेखील शिवाजी महाराजांनी केलेले दुर्गबांधणीचे प्रयोग सर्वसामान्याला विस्मयचकित करतात. दगडावर दगड ठेवून कोणीही तटबंदीयुक्त किल्ले उभारू शकतो पण, दूरदृष्टीने विज्ञानाचा वापर करून दुर्ग उभारणी करणारे शिवाजी महाराज म्हणूनच विज्ञाननिष्ठ शिवराय होते.
निसर्गाच्या सानिध्यात उभारलेले अनेक दुर्ग म्हणजेच पशुपक्षी तसेच वनस्पतींचं नैसर्गिक आगार.कोणताही किल्ला बघायला जायचा किंवा एखाद्या ट्रेकिंगसाठी जायचं म्हणजे तिथली दगडी वास्तू बघून येणं हा उद्देश न ठेवता तिथल्या इतिहासाला साक्षी होऊन येता आलं पाहिजे. या ऐतिहासिक अनमोल वारशांचं पावित्र्य अबाधित राखता आलं पाहिजे. भ्रमंती आणि भटकंतीला विज्ञानाची आणि इतिहासाची बैठक मिळाली की हिंडण्याफिरण्याची मजा काही वेगळीच असते. “पृथ्वीमध्ये बहुलोक,परिभ्रमणेकळे कौतुक” या समर्थ वचनाची प्रचिती नेहमी निसर्ग सहलींमध्ये येते.आपण ज्या दृष्टिकोनातून निसर्ग पाहत जातो तसतसा तो आपल्याला दिसत जातो. निसर्गसहली आपल्याला अनुभव श्रीमंत करतात. ही श्रीमंती चिरकाल समाधान देणारी असते.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Column Nisargayatri P K Ghanekar by Smita Saindankar