इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
आगळं वेगळं सहजीवन : मार्क आणि डेलिया ओवेन्स
‘क्राय ऑफ कलहारी’ किंवा ‘रोमान्स इन कलहारी’ ही पुस्तकं एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या अमेरिकन तरुणांच्या जंगलातील आगळावेगळ्या सहजीवनाची खरीखुरी ,वास्तववादी, चित्तथरारक आत्मकथा.
‘क्राय ऑफ कलहरी’ हे पुस्तक मार्क आणि डेलिया ओवेन्स या जोडप्याची खरी तळमळ, त्यांचा संघर्ष, बोत्सवाना भागातील कलहारी वाळवंटातील डिसेप्शन व्हॅली नावाच्या विस्तीर्ण अशा भूभागावर वास्तव्याचे तंतोतंत चित्रण आपल्या डोळ्यापुढे उभं करतं.
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जॉर्जिया विद्यापीठात जीवशास्त्राचे हे दोन समान आवडीनिवडी असलेले अमेरिकन विद्यार्थी एकमेकांच्या प्रेमात पडतात. जॉर्जियाच्या एक्झिक्युटीव्हची 24 वर्षांची डेलीया आणि ओहायोच्या पश्चिमेकडील एका शेतात वाढलेला 29 वर्षाचा मार्क. लग्नानंतर हनिमूनला न जाता स्वतः जवळ असेल नसेल ते सर्व विकून त्यातून एक चांगल्या प्रतीचा कॅमेरा, कॅम्पिंगचं साहित्य आणि थोडेफार प्रवासापूरता पैसे जवळ ठेऊन निघाले त्यांच्या जंगल वास्तव्याला. मनुष्य प्राणी ज्याठिकाणी कधी पोहोचलाच नाही अशा निर्जन ठिकाणी जाऊन वास्तव्य करून प्राण्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतात. जेणेकरून, आपण तिथे जाऊ तेव्हा प्राण्यांना आपली भीती वाटता कामा नये, प्राण्यांना आपण त्यांचे शत्रू आहोत असं वाटू नये आणि प्राण्यांचा अगदी जवळून अभ्यास, निरीक्षण करता यावं. मग त्यासाठी ते बोत्सवाना भागातील कलहारी वाळवंटातील डिसेप्शन व्हॅली नावाच्या विस्तीर्ण अशा भूभागाची ते निवड करतात. जिथे 16000 वर्षांपूर्वी कदाचित एखादी नदी वाहत असावी परंतु, आता मात्र सगळं कोरडं ठाक. प्यायला पाणी नाही, राहायला निवारा नाही, तापमान कायम 40 ते 50° च्या वरच, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही वाहन नाही अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे तरुण जोडपं सात वर्ष तिथल्या सिंहांचा आणि ब्राऊन हायनांचा अभ्यास करतात.
यादरम्यान यांच्या सहजीवनाचा थरार सुरू होतो. कलाहारीमधील सात वर्षाच्या वास्तव्यातील भयानक आणि चित्तथरारक अनुभवांचे वर्णन करताना ते म्हणतात,” आम्ही दर आठवड्याला सात गॅलन पाणी आंघोळ, स्वयंपाक आणि पिण्यासाठी साठवून ठेवायचो, साठवलेलं पाणी चहाच्या चवीसारखं होतं. कधी कधी ते पिण्यासाठी थंड करून ठेवावं म्हणून टीनच्या ताटात भरून झाडाच्या सावलीत ठेवत असू आणि थोड्या वेळाने पाहिलं तर त्या पाण्याच्या अवतीभोवती मधमाशा, मुंग्या जमा झालेल्या असत. बऱ्याचदा आम्ही भांडी धुतल्यानंतर उरलेल्या पाण्याने अंघोळ केली आहे.” परंतु,ह्या प्रतिकुलतेतही आनंदाची गोष्ट म्हणजे काही दिवसांनी हे प्राणी त्यांच्या इतके जवळचे झाले की कधीतरी तुम्हाला झोपेतून अचानक जाग यावी आणि तुमच्या पाठीला टेकून एखादा गबरू सिंह बसलेला असावा.सिंह सिंहीन आणि त्यांचे बछडे डेलियाच्या अवतीभोवती खेळताना दिसतात. पक्षांचे थवे डेलीयाच्या अंगावर खांद्यावर खेळताना दिसतात. तिच्या स्वयंपाक घरात सगळीकडे थुईथुई नाचतात असे चित्र कल्पनेतही किती सुंदर वाटतं तर प्रत्यक्षात किती आनंददायी असेल. परंतु तेवढं सोडलं तर त्यांचं तिथलं वास्तव्य मात्र इतकं आनंददायी नव्हतं. पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट त्यांना करावी लागत असे. सलग तीन वर्ष तिथे पाऊस न पडल्यामुळे प्राण्यांचे पाण्यासाठी होणारे हाल, त्याबद्दलची त्यांची निरीक्षणे खरंच हृदय मिळवून टाकणारी आहेत.
त्यांनी जेन गुदाल, डायन फॉसी, जिम कॉर्बेट, जॉर्ज शेलार यांसारख्या संशोधकांच्या आधीच्या संशोधनांचा तपशील तपासला. कलाहारीतील वन्यजीवांचं हवाई निरीक्षण करण्यासाठी एक छोटसं विमान बनवलं आणि त्या विमानाद्वारे या ब्राऊन हायनाच्या दैनंदिन क्रियांचं जवळून निरीक्षण केलं. त्यांच्या ‘कलहारीतील रोमान्स’या पुस्तकात ते म्हणतात, “आम्ही आकाशाखाली उघड्यावर झोपतो. आपण कुठे आहोत हे पृथ्वीवर कोणालाच माहीत नाही किंवा आपण कधीही कोणाला सापडू शकत नाही. सध्याच्या या विश्वात आम्ही फक्त दोनच मनुष्य प्राणी आहोत याचं मात्र आम्हाला कौतुक वाटत असे.” बऱ्याचदा त्यांच्या या वास्तव्यात त्यांनी त्यांच्या दुर्बिणीतून शिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केलेली प्राण्यांची कत्तल पाहिली. त्यातून बरीच अस्वस्थता येत असे. त्यानंतर या दोघांनी तिथल्या दक्षिण आफ्रिकेतील मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी विनंती केली परंतु, त्यांची याचिका फेटाळण्यात आली. कारण तिथे गुरं हा त्यांच्यासाठी पैसे कमवण्यासाठी मोठा उद्योग होता. देशातील कोणीही त्यांच्या शिफारसी ऐकत नसल्यामुळे मग त्यांनी या समस्येची जगभरात प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेतला. देशाबाहेरील लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा वाढता विरोध आणि त्याला मिळणारा पाठिंबा पाहून सरळ त्यांची बोत्सवानामधून हकालपट्टी करण्यात आली. बोत्सवाना हा युरोपला गोमांस निर्यात करणारा प्रमुख देश होता. ओव्हेन्सच्या मोहिमेमुळे त्यांच्या या उद्योगात अडथळा निर्माण होऊ लागला. या सर्व कालावधीत मार्क ओवेंस यांनी पीएचडी प्राप्त केली होती.
1986 मध्ये उत्तर लुआंगवामध्ये एका अत्यंत अविकसित, असुरक्षित असं राष्ट्रीय उद्यानात त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथपर्यंत रस्तादेखील जात नव्हता. त्यामुळे वाहनांनी जायचं कसं ही एक मोठी अडचण होती. मग अनेक खाड्या, नद्या, नाल्यांचा सामना करत अखेर हे दोघे तिथपर्यंत पोहोचले. 1992 मध्ये ‘द आय ऑफ द एलिफंट’ या प्रकाशित झालेल्या ओवेंसच्या पुस्तकात त्यांनी तिथल्या वास्तव्याचे अनुभव सांगितले आहेत. ते म्हणतात की,”आम्ही तिथे प्रवेश केल्यानंतर आम्हाला आठ दिवसात एकही जिवंत हत्ती दिसला नाही. दिसली ती फक्त हत्तींच्या कवट्या, पांढरी हाडं, त्यांचे अनेक अवशेष. काही दिवसांनी त्यांना नदीकाठी हत्तीचं एक छोटंसं कुटुंब दिसलं पण चेहऱ्यावरूनच अत्यंत हतबल झालेलं, माणसांना घाबरलेलं. त्या क्षणी आम्ही एकमेकांना वचन दिलं की जोपर्यंत हत्ती निर्भीडपणे नदीवर पाणी पिण्यास येत नाही तोपर्यंत आपण उत्तर लुआंगवामध्ये राहायचं.”
सुरुवातीला आफ्रिकेत दहा लाख हत्ती होते. दहा वर्षानंतर त्यांची संख्या निम्मी कमी झाली. शिकारीमुळे झामबीया हा देश त्रस्त झाला होता. ठिकठिकाणी भ्रष्ट सरकार होतं. शिकार करणाऱ्यांसाठी उत्तर लुआंगवाचं हे जंगल आवडतं ठिकाण झालं होतं. शिकारी सहज कोणत्याही कारणासाठी प्राणी मारू लागले होते. कधी हौस म्हणून, कधी खाण्यासाठी म्हणून, कधी पैसे कमवण्यासाठी. कुठलाही धरबंद नव्हता. ओवेन्सने या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला असता त्याच्या लक्षात आलं की या हत्या थांबवण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना इतर रोजगार शोधणे आवश्यक आहे म्हणजे ते शिकाऱ्यांना पैशासाठी मदत करणार नाही. मार्क आणि डेलिया तिथल्या स्थानिकांना आर्थिक मदत देऊ लागले आणि बदल्यात शिकाऱ्यांना मदत न करण्याचे वचन घेऊ लागले. विविध ठिकाणाहून निधी उभारून अनेक स्वयंरोजगार उभारले.
शिकारी ए के 47 सारखे शस्त्र घेऊन येत असत. त्यामुळे तिथले पोलीस वनरक्षक घाबरलेले असत. या वनरक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्कने एक बक्षीस कार्यक्रम तयार केला. ज्यामध्ये जो कमीत कमी पाच शिकारी पकडून देईल, त्या सदस्यांना अतिरिक्त पगार मिळेल. श्रीमंत अमेरिकन देणगीदारांच्या मदतीने मार्कने त्यांना हे अतिरिक्त वेतन नियमितपणे देऊ केले. अनेकांना प्रशिक्षित केले. खायला अन्न दिले, कपडे दिले, सशस्त्र केलं,रोजगार दिला,वैद्यकीय सेवा पुरवल्या. कालांतराने ओव्हेन्सने दवाखाने बांधले आणि 1989 मध्ये ‘युनायटेड नेशन्स कन्वेंशन इंटरनॅशनल ट्रेंड इन डेंजरस स्पीशिज’ मध्ये आफ्रिकन हत्तींच्या अवयवविक्रीवर बंदी घालण्यासाठी मतदान केले. त्यानंतर उत्तर लुआंगवामध्ये हत्तींची शिकार लक्षणीयरीत्या कमी झाली.एका वर्षात शिकार झालेल्या हत्तींची संख्या 1000 पासून केवळ बारा हत्तीवर आली.एबीसी या राष्ट्रीय वहिनीने 1994 मध्ये उत्तर लुआंगवामध्ये त्यांची एक टीम रवाना केली. त्यामुळे इथल्या भीषण परिस्थितीचं चित्रण ‘डेडली गेम द मार्क अँड डेलिया स्टोरी’ या नावाने राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालं.
मार्क आणि डेलिया ओवेन्स, एक आदर्शवादी,अमेरिकन प्रेमी जोडपं. पण त्यांच्या सहजीवनात त्यांनी बराचसा विचित्र काळ त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणारा ठरला. तीन वर्षापेक्षा जास्त काळ ओवेन्स सरकारी मदतीसाठी अक्षरशः भीक मागत होता परंतु अखेर निराश होऊन त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर काम करण्याचा निर्णय घेतला. शिकाऱ्यांशी झालेल्या संघर्षामुळे अनेकदा प्रचंड त्रास झाला.बऱ्याचदा शिकाऱ्यांनी त्यांना मारण्याचे प्रयत्न केले. रात्री अपरात्री विमानातून निरीक्षणासाठी उड्डाण करणं, चित्रीकरण करणं, शिकाऱ्यांचा सामना करणं आणि हे असं रात्रंदिवस करत राहणं कोणत्याही मदतीशिवाय, कोणत्याही सैन्याशिवाय खरंतर त्यांचं वैवाहिक जीवन सहज उध्वस्त करणारं होतं.
भारतीय साहित्यात, काव्यात निसर्गाकडे शास्त्रीय दृष्टीने नव्हे तर नेहमी अध्यात्मिक किंवा कलात्मक दृष्टीने पाहिलं गेलं.
अनेक प्रतिभावंतांनी निसर्गाचं अमूर्त रूप कल्पनेत चितारून त्याची वर्णन केली. पण युरोपमध्ये रेनेसन मुळे निसर्गाविषयीची चौकस बुद्धी निर्माण झाली. इंग्लंडमध्ये गिल्बर्ट व्हाईट यांनी अत्यंत बारकाईने, रसिकतेने निसर्ग पाहिला,अनुभवलाआणि शास्त्रीय प्रतिभेची उंची गाठली. तसं मराठी साहित्यात फार क्वचित झालं. प्रत्यक्ष निरीक्षण आणि चिकित्सक दृष्टीने केलेलं शास्त्रीय संशोधनावरील लिखाणसुद्धा अतिशय मनवेधक होऊ शकतं हे जिम कॉर्बेट,जॉर्ज शालर, जेन गुडाल या इंग्रजी लेखकांनी दाखवून दिलं. आपल्याकडे माळगूळकरांच्या सत्तांतर आणि नागझिरा पुस्तकात देखील त्यांनी केलेल्या निरीक्षणाची माहिती अतिशय मनोरंजकरीत्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनाचा सहज ठाव घेते. अभयारण्यात ठाण मांडून अभ्यास करणारे संशोधक महाराष्ट्रात फार विरळ दिसतात. खरं तर महाराष्ट्रात उत्कृष्ट अभयारण्य आहेत पण, त्याला तसं प्रोत्साहन सरकार दरबारी मिळत नाही. पण जर सर्वसामान्य वाचक किंवा लेखक मंडळी निसर्गसृष्टीकडे लेखनाच्या दृष्टीने दुर्लक्ष करत असतील तर ते मात्र एका अत्यंत रोचक थरारक अनुभवाला मुक्त आहे असं म्हणावं लागेल.
Column Nisargayatri Mark and Delia Owens Couple by Smita Saindankar