इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
इ – कचऱ्याचा शिल्पकार : हरीबाबू नातेसन
हरिबाबु नातेसन यासारख्या सृजनशील कलाकारांना कचऱ्यामध्येसुद्धा त्यांची कला दिसते. इ कचऱ्याचा वापर करून देशभरात विविध ठिकाणी उत्कृष्ट कलाकृती हा कलाकार सादर करत असतो, प्रदर्शन भरवत असतो.खरंच विचार केला तर पर्यावरण रक्षणाचे किती विविध पैलू असू शकतात फक्त त्यासाठी तुमची इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती मात्र तेवढीच दांडगी असावी लागते.
‘कागद वाचवा, वृक्षतोड थांबवा’ अशा घोषणा देत आपण कधी डिजिटल युगात पोचलो आपल्याला कळलंच नाही. कोविडच्या संकटामुळे मागील दोन वर्षतर सर्वजण सक्तीने घरी असल्यामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, इ पेमेंट ,इ ट्रांजेक्शन ,ई साहित्य अशा सर्व इ प्रकारांना आपण सर्वसामान्य ज्ञात झालो. डिजिटल इंडिया हा नारा देशभर घुमू लागला आणि सगळीकडे सर्व व्यवहार डिजिटल माध्यमातून होऊ लागले. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत असताना डिजिटलायझेशनला आगळेवेगळे महत्त्व आलं.
प्रत्येकाच्या हातात मोबाईल,लॅपटॉप,कम्प्युटर यासारखी साधना दिसू लागली. व्यक्ती सुशिक्षित असो वा अशिक्षित प्रत्येकाला आपला वेळ आणि शक्ती वाचावी यासाठी हे माध्यम खूप सोयीस्कर पडलं पण,ही डिजिटल माध्यम निरुपयोगी झाल्यानंतर जो ई कचरा तयार होत असतो त्याचं पुढे काय होतं हा प्रश्न कधी आपल्याला पडला का?? इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्रीचं पुढे काय होतं??
पण आज आपला जो कलाकार निसर्गयात्री आहे तो मात्र हा सगळा विचार नक्कीच करतो. विज्ञान, पर्यावरण आणि कला यांचा त्रिवेणी संगम साधून उत्तमोत्तम शिल्प कलाकृती तयार करणारे हरिबाबू नातेसन. जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध मुंबईस्थित शिल्पकार.ते एक अप्रतिम जगतमान्य शिल्पकार असले तरी त्यांच्या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व शिल्प इ-कचऱ्या पासून बनवलेली असतात.
काही वर्षांपूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी मुंबईला भेट दिली होती त्यांच्या उद्योगपती रतन टाटा ,मुकेश अंबानी यांच्यासोबतच्या अत्यंत व्यस्त भेटीमध्ये त्यांनी हरी बाबूंच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यावेळी प्रिन्स चार्ल्स त्यांच्या या कामाने इतके प्रभावित झाले की त्यांनी जवळजवळ चाळीस मिनिटं त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कामाची माहिती करून घेतली.ते म्हणतात ,” त्यावेळी चार्ल्स यांना मी कचऱ्यापासून केलेल्या शिल्पांचा प्रत्येक पैलू जाणून घ्यायचा होता. मला या कल्पना कशा सुचतात, नंतर मी त्यांना रंग कसा देतो, कामात वापरले जाणारे वेगवेगळे भाग सोल्डर कसे करतो, त्यासाठी लागणारा ई-कचरा सर्वात जास्त कुठे उपलब्ध असतो, माझे ग्राहक कोण आहेत ,ही सर्व चौकशी त्यांनी उत्सुकतेपोटी केली. मला विश्वास बसत नव्हता की माझ्यासाठी एखादी इतकी मोठी परदेशी व्यक्ती इतका वेळ देऊ शकते.”
आपल्याला आश्चर्य वाटेल पण हरिबाबु यांची डंपयार्डमधून आणलेल्या कचऱ्यापासून बनवलेलं प्रत्येक शिल्प तयार करताना त्यांना एक लाख ते 20 लाख रुपये खर्च येतो. परंतु त्यांचं प्रत्येक शिल्प त्यातल्या वेगळेपणामुळे लाखो रुपयाला विकली देखील जातात. त्यांची आतापर्यंत तयार केलेली सर्वात मोठी कलाकृती म्हणजे जलीय संग्रहालयासाठी त्यांनी 56 फूट बाय 19 फूट आकाराचा व्हेल फिश आणि त्याच्या भिंतीवरील एक फूट बाय सहा फूट आकाराची भिंतीवरची वॉल हैंगिंग आहेत. हरिबाबूना लहानपणापासूनच हा छंद होता.स्वयंपाक घरातली आईने टाकून दिलेली, तुटलेली भांडी, चमचे ,गॅस लाइटर या सगळ्या फेकून दिलेल्या वस्तू जमा करायच्या आणि त्या सगळ्या वस्तूपासून एखादी कलाकृती बनवून आईवडिलांना आश्चर्यचकित करायचं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद इथे शिकत असताना त्यांनी ॲनिमेशन फिल्ड डिझाईन मध्ये भंगारमध्ये गोळा केलेल्या वस्तूंपासून अनेक कोळी आणि खेकडे बनवले आणि त्यावेळी त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं.तिथूनच मग प्रेरणा मिळत गेली आणि विविध कल्पना आकाराला येत गेल्या. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये असलेला त्यांचा स्टुडिओ म्हणजे एखादा भंगारखानाच वाटतो.कारण तिथे तुम्हाला दिसेल,टाकून दिलेले पाईप्स, प्रिंटर्स ,स्पीडल्स,हेअर क्लिप, मदरबोर्ड आणि अजून बराच ई कचरा. सामान्य माणूस ह्या टाकून दिलेल्या भंगार वस्तूंकडे ढुंकूनही बघणार नाही. पण हरिबाबू म्हणतात,” तुम्ही टाकून दिलेल्या कचऱ्याला मी आकार देतो, रंग देतो.कोणताही पदार्थ किंवा ऊर्जा यांची निर्मिती किंवा नाश होत नाही. ते फक्त रूप बदलत असतं.
कोणत्याही वस्तूला जास्त वापर झाला म्हणून टाकून न देता तिला नवीन जन्म देता आला पाहिजे. तिला नवीन रूप देता आलं पाहिजे.” दिल्ली आणि मुंबई येथे झालेल्या आर्ट फेस्टमध्ये तर लोकांनी टाकून दिलेल्या वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह,जुने संगीत व्हिडीओ कॅसेट, कीबोर्ड ,मदरबोर्ड यातून उभ्या राहिलेल्या उत्कृष्ट कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीची शीर्षकंदेखील अतिशय लक्षवेधी असतात. ‘ रिमेंबरन्स’ यामध्ये जुन्या संगीत कॅसेटस, फ्लॉपी डिस्क, मेटल कवर ,सिडीज,वॉशिंग मशीन टरबाइन यांचा वापर करून संगीत विषयावर तयार केलेल्या अप्रतिम कलाकृती बघायला मिळाल्या. तर ‘ट्रीनिटी’ या शीर्षकाखाली संगणकाच्या विविध भागांपासून तयार झालेला इ कचरा वापरून उत्कृष्ट कलाकृती मांडण्यात आली होती.
ग्लोबल सर्वेक्षणानुसार 53.5 दशलक्ष टन किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याच्या स्वरूपात टाकून दिले जाते. ई-कचरा तयार करणारा भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि हा तयार होतो मुख्यतः मोबाईल आणि संगणकामुळे. एका मोबाईल किंवा लॅपटॉपच्या एका सामान्य सर्किट बोर्डमध्ये अंदाजे 16 भिन्न प्रकारचे धातू असतात.आपण टाकून दिलेले बॅटरी,ट्यूबलाइट ,सीएफएल बल्प जर मातीमध्ये मिसळले तर आजूबाजूची माती नापीक होते.
ई कचरा हा कोणत्याही प्रकारच्या मातीला खूपच घातक आहे.मातीचा कस जातो. नंतर त्यामध्ये साधं गवतही उगवू शकत नाही.तसंच जेव्हा ई कचरा मोठ्या प्रमाणात आपल्या समुद्रामध्ये जातो तेव्हा ते पाणी दूषित करतात आणि सर्व जलसृष्टी धोक्यात येऊ लागते. ई कचरा जाळल्यावर हवेमध्ये अनेक दूषित वायु पसरतात.खरंतर इ कचरा कायदा असलेला भारत हा दक्षिण आशियातल्या एकमेव देश आहे. जागतिक स्तरावर हरिबाबू नातेसन यांच्यासारखे अनेक कलाकार कचऱ्याच्या ढिगातुन विविध कला प्रदर्शित करीत असतात.
पर्यावरण रक्षणासाठी इ कचरा पुनर्वापर किती गरजेचं आहे या विषयीची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या कलाकृती मधून देत असतात. हे आधुनिक काळातलं संकट असून सामान्य माणसाच्या सहजासहजी अजून लक्षात आलेलं नाहीये. ही सृजनशील मंडळी जाता जाता एक धोक्याची घंटा संपूर्ण मानवजातीसाठी वाजवून जातात . विज्ञान युगामध्ये विज्ञानाला कलेची जोड दिली तर हा कलासंगम सृष्टीला भविष्यात येणाऱ्या अनपेक्षित धोक्यापासून वाचवू शकतो. इलेक्ट्रॉनिक कचरा ही कालांतराने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी होऊ शकते. तेव्हा ही धोक्याची घंटा लवकर ऐकू या.