इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
अतुल धामणकर : जंगलाची चालती बोलती डायरीच
ज्या वयात विद्यार्थी विविध करिअरचे पर्याय शोधत असतात त्या वयात कुटुंबाच्या विरोधात जाऊन अतुल धामणकर यांनी माझं करिअर जंगलच असेल असं मनाशी पक्कं ठरवून टाकलं. आणि मग ह्या अवलियाने कित्येक वर्ष भारतातली वन्यजीव संपन्न जंगलं पालथी घातली.
जंगलातलं जीवन कसं असतं? प्राणीविश्व कसं असतं? पक्षांचा दैनंदिन कार्यक्रम काय असतो? जंगल म्हणजे नक्की काय ,जंगल खरंच का अनुभवायचं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर अतुल धामणकर या वन्यजीव अभ्यासकाच्या डायरीत नक्की डोकावून पाहावे लागेल. वर्षानुवर्ष भारतातल्या विविध अभयारण्यांमधून केलेली भ्रमंती, पशुपक्ष्यांच्या आगळ्यावेगळ्या विश्वाचं केलेलं निरीक्षण, अरण्यवास यातून मिळालेले विविध रोमांचक, चित्तथरारक तर काही आनंददायी आणि शिकवून जाणारे असे अनुभव या निसर्ग यात्रीने वेळोवेळी टिपून ठेवले.
रोजची 25 ते 30 किलोमीटरची पायी भटकंती.कधीकधी दिवसभर उपवास व्हायचा.फक्त पाण्यावरच गुजराण होत असे आणि मग संध्याकाळी एखाद्या वनविश्रामगृहात किंवा एखाद्या आदिवासीच्या झोपडीमध्ये दिवसभराचा शीण घालवण्यासाठी निवांत निसर्गाच्या सानिध्यात पाठ टेकावीआणि दिवसभर झालेल्या चित्तथरारक अनुभवांची उजळणी करावी असा हा धामणकरांचा दिनक्रम ठरून गेला होता.
अतुल धामणकर हे मूळचे चंद्रपूरचे.शाळेत असताना चंद्रपूरजवळील जुनोनाच्या जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी जात असत.अतुल धामणकर हे खरंतर वन्यजीवांचा अभ्यास करणारे प्रकाशचित्रकार.तासनतास मचान,लपनगृह किंवा एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून वन्य प्राण्यांचे निरीक्षण करणं, त्याचा सखोल अभ्यास करणे आणि त्या निरीक्षण नोंदी आपल्या नोंदवहीत वेळोवेळी नोंदवून ठेवणे हा त्यांचा छंद. भारतातल्या विविध अभयारण्यात, व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये धामणकरांनी अविरत भटकंती केली. पक्षी अभ्यासासाठी विविध तलाव, सरोवरे,नद्या, धरणे यांना भेटी दिल्या.
धामणकर म्हणतात,” अगदी सुरुवातीपासूनच माझी भ्रमंती नेहमीच डोळस होती. कुठेही नुसतं समोर दिसेल ते पहावं असं मी करत नाही. मी नेहमी मनात काहीतरी ठरवून जंगलात जातो.काही वेळा विचार केल्याप्रमाणे सगळं नीट घडतं तर काहीवेळा काहीच घडत नाही. काही वेळा अख्खा दिवस रानात फिरून आल्यावरसुद्धा साध्या चितळाचेही दर्शन होत नाही पण तरी जंगल मला आनंददायी वाटतं. एखादा वन्यजीव दिसणे, त्याचं नीट निरीक्षण करता येणे म्हणजे माझ्यासाठी हा एकप्रकारचा बोनसच असतो.”काळाच्या ओघात या पाहिलेल्या,अनुभवलेल्या सगळ्याच गोष्टींचं आपल्याला विस्मरण होत जातं त्यामुळे वेळोवेळी नोंदी करून ठेवलेला हा रोमहर्षक अनुभवांचा खजिना त्यांनी जंगल डायरीच्या स्वरूपामध्ये प्रकाशित केला..
अतुल धामणकर यांनी भारतातील सर्व प्रमुख जंगले पिंजून काढली आहेत. पायपीट हा त्यांच्या जीवनक्रमाचा भाग झाला. पण ते तेवढ्यावर थांबत नाही. निसर्गभ्रमण, प्रबोधन आणि लेखन असा त्यांचा त्रिवेणी प्रवास आहे. गळ्यात कॅमेरा आणि सोबत असलीच तर त्या जंगलातील एखादी परिचित असामी एवढ्याच त्यांच्या मुलभूत गरजा. त्यांच्या भ्रमंतीला बोलके व अधिक परिणामकारक करण्यासाठी विद्यालयीन-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक निसर्ग शिबिरे त्यांनी घेतली. ‘भ्रमणगाथा जंगलाची’ नावाचा कार्यक्रम सुरू केला, त्यात भौगोलिक परिस्थिती व जैविक विविधता बघण्यासोबत अनुभवण्याची संकल्पना गृहीत आहे. त्यांनी ती संकल्पना नवेगाव बांध, ताडोबा, नागझिरा अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने येथे शिबिरांचे सतत आयोजन करून राबवली.
जंगलजीवनाबाबतची ओढ, निसर्गरक्षणाचं महत्त्व नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा अखंड प्रयत्न स्लाइड शो,व्याख्याने व निसर्ग अभ्यासशिबिरे या विविध माध्यमातून करत असतात. वाघांचं महत्व अधोरेखित करताना ते म्हणतात,” औष्णिक वीज केंद्रासाठी इरई डॅमचे पाणी वापरले जाते. ते पाणी त्या जंगलातील झर्यांचे आहे. वाघ आहे म्हणून ते जंगल आहे, जंगल आहे म्हणून झरा आहे, झरा आहे म्हणून इरई डॅमचे पाणी आहे! आणि ते पाणी आहे म्हणून औष्णिक वीज केंद्र आहे. अशा चक्रामुळे वाघ आहे… आणि म्हणून मुंबईची वीज आहे असा संबंध जोडता येतो!” या शिबिरांतून ऋतुपरत्वे बदलणारे वनवैभव, पशुपक्षी यांचे विलोभनीय विश्व तसेच ,निसर्गाचे नाना रंग उलगडून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते म्हणतात, “जंगल केवळ डोळ्यांनी पाहण्यापेक्षा पंचेद्रिये एकवटून त्याचा अनुभव घ्यावा.”
त्यांची,’‘मृगकथा’, ‘वाघ’, ‘अरण्यवाचन’, ‘नवरंगाचं घरटं’ आणि ‘अरण्याचं अंतरंग’ ही पुस्तके जंगलाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडवत असतात. त्यासोबत त्यांनी ‘ताडोबा : वाघाचं जंगल’, ‘महाराष्ट्रातील वन्य जीवन’ व ‘मॅमल्स अँड बर्ड्स’ ही फिल्ड गाइड्स वाचकांपुढे ठेवली आहेत. .अतुल धामणकर हे उत्तम प्रकाश चित्रकार असल्याने त्यांच्या पुस्तकांमधील निसर्गचित्र अत्यंत देखणी आहेत .त्यांची फोटोग्राफी , इतर छायाचित्रकारांना हेवा वाटावी अशी आहे.
World Wide या संस्थेच्या कॅलेंडरसाठी अतुलने टिपलेले वाघांचे तब्बल बारा फोटो निवडले गेले.त्यांची पन्नास हजारांपेक्षा जास्त छायाचित्र त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित झालेली आहेत. अनेक छायाचित्र बीबीसी अर्काइव्ह,डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया,सेंचुरी एशिया या नामवंत मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत.पुण्यातील ‘पुलोत्सवा’मध्ये सहभागासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण काम करणा-या व्यक्तींची मतदानाने निवड केली होती. त्यात जनतेने प्रभावी निसर्गलेखक म्हणून अतुल धामणकर यांची विशेषत्वाने निवड केली.
असा हा मनमर्जीने जगणारा अवलिया. कायम निसर्ग जगला आणि तो इतरांपर्यंत पोहोचवत राहिला. जंगल भ्रमंती करायची तर सोबत हत्यारांची गरज नाही .गरज आहे ती अनुभवांची आणि अभ्यासाची.अतुल धामणकर यांच्यासारखे निसर्गयात्री जर निसर्गाच्या सानिध्यात राहून तिथल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवू शकले नसते तर शहरी माणसाला या अज्ञात विश्वातल्या घडामोडी कधीच कळल्या नसत्या. आपल्याला ही दृष्टीआडची सृष्टी कधीच समजली नसती.. निसर्गाची उत्तुंगता, भव्यता आणि निसर्गाचं असीम रूप आपल्याला कधीच समजलं नसतं. हिमालय पर्वत चढून जाताना, लडाखचं शीत वाळवंट तुडवताना, घनदाट जंगलात एकाकी शिरताना आपण निसर्गापुढे किती नगण्य आहोत याची वेळोवेळी जाणीव होते. निसर्गाच्या अधिराज्यापुढे मानवी सुखदुःख किती शूद्र आहेत याचा प्रत्यय येत राहतो. ही दृष्टिआडची सृष्टी आपल्याला दाखवणाऱ्या अशा लोकांचे खरं तर आपण ऋणी आहोत.