इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
गिधाडांवर प्रेम करणारा अवलिया : प्रेमसागर मिस्त्री
गिधाडाला सफाई कामगार म्हणतात. जैवसाखळीतील तो महत्त्वाचा घटक आहे. पण, त्याच्यावर कुणी प्रेम करीत असल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. तर नक्कीच नाही. पण, प्रेमसागर मिस्त्री हा अवलिया चक्क गिधाडांवर प्रेम करतो. आज जाणून घेऊया त्याच्याविषयी आणि त्याच्या गिधाडांविषयीच्या मौलिक कार्याबद्दल….
गिधाड म्हंटलं की एखाद्या एखाद्याच्या मृत शरीराची लक्तरं तोडून खाणारा निष्ठुर असा प्राणी डोळ्यासमोर येतो. दिसायला अवाढव्य, फारसं सौंदर्य नसणारा, डौल नसणारा हा पक्षी कोणाच्या आवडत्या पक्ष्यांच्या यादीत असेल अशी शंकाही मनाला स्पर्शून जात नाही, असं हे गिधाड. रामायणामध्ये जटायू पक्षाच्यारूपाने गिधाडाशी आपली पहिली ओळख होते. सीतेला रावणापासून वाचवणारा जखमी जटायू पक्षी त्यावेळी आपल्याला फार जवळचा वाटतो. तेवढीच काय ती त्याला सहानुभूती आपल्या भारतीयांकडून आत्तापर्यंत मिळाली. इजिप्त देशात गिधाडाला मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. हा पक्षी म्हणजे प्राचीन इजिप्त मध्ये “नेख्बेत” या देवतेच्या स्वरूपात पूजला जातो.पेरूमधील नाझ्का या पठारावर अनेक गिधाड स्वरूपातील आकृत्या दिसून येतात. पण, कितीही नाकारलं तरी नेहमीच घृणेचा विषय ठरलेला दुर्लक्षित असा हा गिधाड पक्षी जैवविविधतेच्या साखळीत मात्र अव्वल स्थानावर आहे.
तरीसुद्धा, अशा या गिधाड पक्षाच्या प्रेमात कोणी पडेल का हो? पण ,नावाप्रमाणेच प्रेमसागर मिस्त्री मात्र या गिधाडांच्या प्रेमात पडला. गिधाड त्याला कायम आकर्षित करत राहिलं. प्रेमसागर लहानपणापासून आजोबांसोबत रायगडावर जात असे आणि रायगडावरच्या टकमक टोकावर बसून गिधाड पक्षाचं तासनतास निरीक्षण करत असे. त्याचे भले मोठे आणि मजबूत पंख हा त्याच्या कुतुहलाचा विषय होता. कड्यावर बसून एखाद्या गिधाडावर दगड मारायचा आणि त्याचे विशाल पंख पसरून उडताना त्याच्या मजबूत पंखांकडे बघत राहायचं हा छंदच त्याला लहानपणी लागला होता.
प्रेम सागर मिस्त्री हे मूळचे रायगड जिल्ह्यातल्या महाड इथले. लहानपणीच रूपा टिपणीस-दवणे यांच्या सान्निध्यात पक्षी निरीक्षणाचा छंद रुजू लागला आणि याच काळात “द बर्डस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेन्ट”या पुस्तकाने त्यांचा पक्षीविश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 1992 साली ठाणे महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर माधुरी पेजावर आणि डॉक्टर मिलिंद वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. त्यांचा पहिला संशोधन प्रबंध हा बगळा या पक्षावर होता. त्यानंतर 1997 साली त्यांनी रायगड येथे महाड सारख्या गावात पहिलं कोकण पक्षी मित्र संमेलन भरवलं. प्रेम सागर मिस्त्री यांनी अर्थार्जनाचे साधन म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारला होता आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना पक्षी संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील अशा ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
असं म्हणतात की, रायगड परिसरामध्ये 90 च्या दशकात जवळजवळ 4000 गिधाडं अस्तित्वात होती. त्यावेळी त्या परिसरात गुरांचा बाजार भरत असे. लांबलांबून येणारी गुरं प्रवासात पुरेसं अन्न खायला न मिळाल्याने आजारी पडून मृत्युमुखी पडत. त्यामुळे गिधाडांना इथे भरपूर भक्ष मिळत असे पण, कालांतराने तिथला गुरांचा बाजार हटवला गेला आणि गिधाडांना भक्ष मिळणे बंद झाले.गिधाडांची संख्या कमी झाली. गिधाड हा मृत जनावरांवर उपजीविका करणारा पक्षी. खरंतर ,हा निसर्गातला स्वच्छतादूत.अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा. मातीतील विषाणूंवर ताबा मिळवणारा हा एकमेव पक्षी आहे. त्याच्या विष्ठेतलं ॲसिड बुरशी घालवतं.गिधाडांची पचनशक्ती खूप मजबूत असते. सडलेलं, कुजलेलं मांस ते सहज पचवतात. त्यांना आठवडय़ातून एकदा खाद्य मिळालं तरी चालतं. काही गिधाडे मांस पोटभर न मिळाल्यास हाडंदेखील गिळतात आणि ज्या वेळी खाद्य मिळतं, त्या वेळी ती गिळलेली हाडं बाहेर टाकून देतात आणि मांस खाऊन पोट भरतात.
प्रेमसागर मिस्त्री या गिधाडांच्या संवर्धनासाठी अतोनात कष्ट घेतात .आर.एस.पी.बी.’ (रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्डस) या संस्थेनं सध्या ९८ टक्के गिधाडं नाहीशी झाली आहेत असा अहवाल जाहीर केला होता. 1999 मध्ये आलेल्या एका इंग्रजी वृत्तपत्रातील या बातमीने त्यांना अस्वस्थ केलं आणि मग निसर्गप्रेमी सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी गिधाडांचा शोध सुरू केला. मागील तीस वर्षांपासून त्यांच्या ‘सीस्केप’ (सोसायटी ऑफ इको एनन्डेंजर्ड स्पिशीज काँझव्र्हेशन अँड प्रोटेक्शन) या संस्थेमार्फत ते ‘गिधाड वाचवा’ मोहीम राबवत आहेत. गिधाडांची एक जोडी वर्षाला साधारण एक अंडं घालते. या पिल्लाला तीन महिने चोचीत भरवायला लागतं. या काळात त्यांना खाद्य मिळालं नाही, तर कुपोषणामुळे पिल्लं दगावतात. त्यातली ५० टक्केच पिल्लं मोठी होतात. त्यामुळे गिधाडांची संख्या वाढवणं हे प्रेमसागर यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. जनावरांसाठी होत असलेला डायक्लोफिनॅक औषधाचा वापर, वृक्षतोड केल्याने उंचच उंच झाडांची कमतरता, त्यामुळे गिधाडांचा हरवलेला अधिवास, पर्यावरणाचा ऱ्हास, खाद्याची कमतरता आणि मानवी हस्तक्षेप यामुळे गिधाडांचं जगणं दिवसेंदिवस आव्हानात्मक होत गेलं आणि त्यांची संख्या झपाटय़ानं कमी झाली.
प्रेमसागर मिस्त्री यांच्या ‘सिस्केप’ या संस्थेच्या अथक आणि नियोजनबद्ध प्रयत्नांनी २०१९ मध्ये अवघी दोन ते चार असलेली घरटय़ांची संख्या आजच्या घडीला ७० ते ८० झाली आहे. तसेच २२ ते २८ गिधाडांची त्या वेळची संख्या आता ३५० वर आहे. पिंजऱ्यांमध्ये ठेवून त्यांचं कृत्रिम प्रजोत्पादन करण्याच्या पद्धतीत वाढलेली गिधाडं निसर्गातल्या वातावरणात समरस होत नाहीत असं लक्षात आल्यानंतर त्यांचा नैसर्गिक अधिवास वाचवणं हे एकमेव लक्ष डोळ्यापुढे होतं. त्यासाठी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने वनदेवतेचा उत्सव साजरा केला. जेणेकरून गावकऱ्यांना भावनिक आवाहनाद्वारे जंगल वाचवण्यास भाग पाडता येईल. त्यांच्या देवराईमध्ये मुद्दामहून बेहडा, हिरडा, वनभेंडी, करंजा, अर्जुनवृक्ष, लोखंडी यासारख्या उंच वृक्षांची लागवड केली जाते तसेच त्यांच्या बियांपासून पुन्हा रोपटी बनवण्याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले जाते, जेणेकरून गिधाडांसाठी भरपूर नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देता यावा.
गिधाड हा अतिशय लाजरा पक्षी आहे. त्याच्या विणीच्या काळात त्याला माणसांच्या येण्याजाण्याने व्यत्यय येतो. त्यामुळे गावकऱ्यांनी हे पथ्य आवर्जून पाळावे असे आवाहन ते करतात. गिधाडांना त्यांचं आवश्यक ते खाद्य पुरवण्यासाठीदेखील या संस्थेच्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. याबाबतीतले त्यांचे अनुभव ऐकले तरी आपल्या अंगावर काटा येतो. गिधाडांना मेलेली ढोरं पुरवणं, त्यासाठी ती स्वतः कापून त्यांना खायला घालणे हे काम ते स्वतः करत असत. बऱ्याचदा त्यामुळे त्यांना शिक्षकाची नोकरी करताना नामुष्कीदेखील सहन करावी लागली. त्यांच्या आजूबाजूने येताजाताना लोक त्यांच्या अंगाला ढोरांचा वास येतो म्हणून नाक दाबून जात असत.
एकदा एक बैल मृत अवस्थेत सापडला परंतु, बराच वेळ गेल्याने त्याच्या पोटात गॅस जमा झाला होता. त्याचं पोट फाडल्यानंतर तो गॅस प्रेम सागर यांच्या तोंडावर उडाला. त्यांत त्यांच्या डोळे, नाकाला इजा झाली. तर कधी सहकाऱ्यांसमवेत जंगलामध्ये गिधाडांसाठी मेलेली ढोरं टाकायला गेले असताना वाघाचासुद्धा सामना करावा लागला. सिस्केप संस्थेचे लोक शेतकऱ्यांच्या तसेच गावकऱ्यांच्या संपर्कात असतात. गावात एखादं ढोर मिळालं की, ते आपणहून त्या संस्थेतील लोकांना कळवतात आणि मग संस्थेतील लोकं त्या मृत जनावराला योग्य वाहतुकीची व्यवस्था करून योग्य त्या ठिकाणी गिधाडांसाठी नेऊन टाकतात. काही वेळेला शॉक लागून मेलेले किंवा अपघातात मृत झालेले बरेच प्राणी सापडतात. अशावेळी एम. एस. इ. बी चे लोक किंवा पोलीससुद्धा सिस्केप संस्थेच्या लोकांच्या संपर्कात असतात. प्रेमसागर मिस्त्री विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून स्वतः शालेय विद्यार्थ्यांना सायकल प्रवास करून जंगल वाचन, पक्षी निरीक्षण करायला नेतात.
अनेकदा संशोधन प्रकल्प सादर करण्याच्या निमित्ताने प्रेमसागर यांना परदेशामध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी तिथल्या पक्षीनिरीक्षणाच्या सुखसोयी पाहिल्यानंतर आपल्याकडेदेखील अशाप्रकारचं सर्वसोयीयुक्त पक्षीनिरीक्षण केंद्र असावं असं त्यांचं स्वप्न आहे. त्याचा उपयोग पुढील पिढीला परदेशामध्ये अनेक संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच होईल अशी त्यांना खात्री आहे. त्यामुळे ते अजूनही आवाहन करतात की ज्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात गिधाडं दिसतील ते ठिकाण त्यांना कळवा, जेणेकरून तिथे गिधाड संशोधन केंद्र उभारता येईल. असा हा आगळावेगळा पक्षी मित्र. सध्या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने गिधाडासारख्या दुर्लक्षित परंतु जैवविविधतेतल्या अत्यंत महत्त्वाच्या पक्षाच्या संवर्धनाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या प्रेमसागर मिस्त्री यांचं काम खरोखर कौतुकास्पद आहे.
Column Nisarga Yatri Vulture Lover Prem Sagar Mistri by Smita Saindankar
Kokan Mahad