इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
पाणीबाबा: विलासराव साळुंखे
सध्या तीव्र उन्हाळा चालू आहे. सूर्य आग ओकतोय. अंगाची नुसती लाहीलाही होते. प्रत्येकजण जास्तीतजास्त वेळ घरात थांबणं सोयीस्कर समजतंय पण, अशावेळेला या रणरणत्या उन्हात काही ठिकाणी मात्र स्त्रियापुरुष, आबालवृद्ध हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत आहेत असं दृश्य जेव्हा बघितलं जातं तेव्हा, खरंच एखाद्या संवेदनशील माणसाचं हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही. प्रश्न पडतो काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही ठिकाणी थेंबभर पाण्यासाठी ही वणवण असं का???

मो. 9423932203
पाणी प्रश्न हा खरंच राष्ट्रीय प्रश्न आहे.तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. त्यातले सत्य स्वीकारलं पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाशी प्रत्येकाने इमान राखलंच पाहिजे.पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला नाही तर नजीकच्या भविष्यामध्ये पाणी मोजूनच द्यावं लागेल. पाण्याच्या थेंबाथेंबाशी इमान असणारा पाण्याच्या थेंबासारखा नितळ माणूस म्हणजे विलासराव साळुंखे.पाणी पंचायतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे. पाणी ही देशापुढील गंभीर समस्या आहे याची जाणीव विलासरावांना बऱ्याच वर्षांपूर्वी झाली होती आणि त्यांनी तसं नुसतच ठणकावून सांगितले नव्हते तर त्याच्याशी सामना करण्यासाठी नियोजनबद्ध कृती करणाऱ्यांपैकी एक म्हणजे विलासराव साळुंखे होते.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला किमान पाण्याची सुरक्षितता मिळावी. कारण जलसंपत्ती ही समाजाची सामूहिक संपत्ती आहे आणि तिचं वाटप समान न्यायाने झालं पाहिजे यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत झगडत होते. समान पाणी वाटप आणि पाणी व्यवस्थापनाचा नवीन विचार मांडून पाणी चळवळीला दिशा देणारे विलासराव साळुंखे हे भारतातील प्रथम कार्यकर्ते आहेत. आपल्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी ही चळवळ चालवली.कुठलाही आदर्श विचार व्यवहारात उतरवणं खरं तर कठीण असतं पण विलासरावांनी ओळखलं की ‘आहे’कडून ‘असावं’ कडे जातो तो विकास. तेव्हा आहे आणि असावे यात नेहमीच संघर्ष असतो आणि या संघर्षात विलासराव निर्धाराने न्यायाची बाजू लढत राहिले.
विलासराव यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील रांजणी या गावचा. 20 फेब्रुवारी 1934 या दिवशी जन्मलेलं नानासाहेब साळुंखे यांचं हे पहिलं अपत्य. नानासाहेबांना वाटत असे की विलासरावांनी लष्करात जावे, चांगली मानाची, हुद्याची नोकरी करावी पण विलासरावांनी मात्र हट्टाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विलासरावांनी बळवंत इंजीनियरिंग नावाची कंपनी सुरू केली . कालांतराने या कंपनीचं नाव ऍक्युरेट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं झालं. विलासरावांची सचोटी, प्रामाणिक व्यवहार, मेहनती स्वभाव तसेच पैशाच्या व्यवहाराबद्दल अत्यंत चोख वागणे यामुळे लवकरच विलासरावांच्या कंपनीने चांगलाच जोर धरला. विलासरावांचा आणि त्यांच्या उत्पादनांचा लौकिक वाढत होता.
अप टू डेट पोशाखात हा कारखानदार प्रत्येक विभागात रोज फेरी मारत असे पण दुपारच्या सुट्टीत कामगारांसोबत आपला डबा खाताना दिसे. त्या काळात त्यांनी विदेश दौरा करून औद्योगिक क्षेत्रात बाहेरच्या जगात काय चाललंय याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी,अंदाज घेण्यासाठी विदेश दौरा करायचं ठरवलं. परदेश दौऱ्यावर असताना मात्र परदेशात औद्योगिक प्रगतीने घडून आलेली स्थित्यंतरं, विज्ञानाची चाललेली घोडदौड आणि भोगवादी संस्कृतीची जोपासना पाहून विलासराव विचारात पडत. भारतातली आणि परदेशातली आर्थिक, सामाजिक दरी त्याला बेचैन करत असे.ते स्वतः ग्रामीण भागातून आलेले असल्याने तिथल्या दरिद्री लोकांचा विकास कसा करता येईल याचं ते नेहमी चिंतन करू लागले. त्यांच्यावरती स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता.परदेश प्रवासातही ते नेहमी स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ सोबत ठेवत.
परदेशातून परतल्यानंतर मात्र त्यांच्या बदललेल्या विचारसरणीचा परिणाम त्यांच्या राहणीमानावरही दिसू लागला. पाश्चात्त्य पोशाखाची जागा खादीच्या कपड्यांनी आणि बुटांची जागा चपलांनी घेतली. मांसाहाराची जागा शुद्ध शाकाहारी जेवणाने घेतली. वैयक्तिक जीवनामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देशी वस्तूंना मिळू लागले. या अत्यंत हुशार, सामाजिक जाण असणाऱ्या, सुसंवादी उद्योजकाचा उपयोग करून घ्यावा यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी विलासराव साळुंखे यांना स्टेट बँक ऑफ इंडिया चे चेअरमन पदी नेमण्याचे ठरवलं परंतु महाराष्ट्रात नुकताच बहरू पाहत असलेला हा तरुण उद्योजक महाराष्ट्रातून उचलून एकदम राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत नेला तर हे महाराष्ट्राचं आणि इथल्या उद्योग विश्वाचे नुकसान आहे हे कालांतराने त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांची नियुक्ती वेस्टन महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी केली. यात अभिमानास्पद गोष्ट अशी होती या संस्थेचे पहिले चेअरमन रतन टाटा होते आणि दुसरे विलासराव.
1972 साली लागोपाठ दोन वर्षे पाऊस पडला नाही. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. सातत्याने दोन वर्षे पाऊस न पडल्याने तडे गेलेल्या भग्न जमिनी, ओसाड रानं, पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष दिसू लागलं. काही ठिकाणी लोकांना जेमतेम पिण्याकरता पाणी टँकर मधून पुरवला जायचं. शेतीला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. विलक्षण उष्णता अशा या भयानक उग्र वातावरणाची भीषणता पाहून विलासराव अस्वस्थ झाले.हे चित्र बदलता येणार नाही का असा विचार करू लागले.ठीकठिकाणी पाझर तलाव, नाले, बंधारे बांधणं याबद्दलची पूर्वतयारी सुरू झाली. गावात फक्त पाण्याचा साठा करून किंवा पाणी उपलब्ध करून देऊन दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी पाझर तलावाचे काम पूर्ण करताना या तलावाचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. पाण्याचे साठे निर्माण करण्याबरोबरच पाणीवाटपात समानता आली पाहिजे हे पाणी पंचायतीचे प्रमुख सूत्र झालं.
2ऑक्टोबर1979 साली पाणी पंचायतीचा जन्म झाला. पाण्याचा हक्क सामुदायिक असेल, फक्त जमीनधारकांनाच तो हक्क नाही त्यामुळे सिंचनाचे पाणी मिळणारी जमीन विकली तरी त्याच्यावरचा पाण्याचा हक्क विकला जाणार नाही . हे पाणी पंचायतीचे प्रमुख तत्व आहे. भूमीहिनानाही पाण्याचा समान हक्क राहील. पाणी पंचायतीच्या या तत्त्वावर त्यांनी नायगाव प्रकल्प यशस्वी करून दाखवला. विलासरावांचा पाणी या विषयावर गाढा अभ्यास होता. पाणी या विषयांवर ते भरभरून बोलत असत. नवनवीन कल्पना मांडत, माहिती देत. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी तलाव बांधून पाण्याची साठवणूक करणे आणि या साठ्याचा वर्षभर सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर करणे हे महाराष्ट्रात खरं तर अनेक ठिकाणी प्राचीन काळापासून आढळतं.
पाराशर ऋषींनी आपल्या कृषी-पराशर या ग्रंथात सिंचनावर अवलंबून असणाऱ्या जमिनीची देखभाल करण्यावर विशेष भर दिला आहे. धरणासाठी पाणीबंधन हा शब्दप्रयोग त्यांनी रूढ केला. तसंच कौटिल्य म्हणतो,”जे राज्य आपल्या कृषी उत्पादनासाठी पावसावर अवलंबून न राहता अधिकाधिक सिंचनावर अवलंबून असतं, ते राज्य अधिक समृद्ध असतं” म्हणजेच प्राचीन काळातही भारतीय समाजमनाला सिंचन आणि सिंचन विषयक कल्पना स्पष्ट होत्या. लहरी पावसापेक्षा खात्रीच्या सिंचन व्यवस्थेने राज्य समृद्ध होतं हे त्यांनाही अनुभवाने पटलेलं होतं. खानदेशातली फड पद्धत, विदर्भातली मालगुजारी तलाव, मराठवाड्यातील खजाना विहिरी,बारवी विहिरी ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली सिंचन व्यवस्थेची उदाहरण आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे सिंचनाची आणि त्यात लोकसहभागाची प्रदीर्घ परंपरा होती.
अत्यंत पारदर्शी असं व्यक्तिमत्व, बोलण्यातला प्रांजळपणा, स्वच्छ चारित्र्य यामुळे कोणाशी संवाद साधताना ते प्रभावीपणे छाप पाडत.त्यांचा संवाद सुसूत्र, शास्त्रशुद्ध, अतिशय शांत स्वरात असे.ते खालच्या आवाजात आपले मुद्दे पटवून देत. विलासराव शेतकऱ्यांशीसुद्धा अतिशय प्रेमाने, नम्रतेने आणि समान भावनेने वागत. त्यांच्या प्रबोधनासाठी, एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी ते चिकाटीने सर्व प्रकारे प्रयत्न करत.एकदा पिसर्वे गावच्या पाझर तलावासाठी एका शेतकर्याच्या जमीनीचा तुकडा मिळणं गरजेचं होतं. तो काही तसं करायला तयार नव्हता.त्याचं मन वळवण्यासाठी विलासरावांनी आणि ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले पण शेतकरी तयार होईना .शेवटी एक दिवस विलासराव ग्रामस्थांसोबत त्याच्या दारात ठाण मांडून भजन करू लागले.
विलासरावांची आर्त विनवणी ऐकून शेतकऱ्याचेही हृदय विरघळले आणि शेवटी त्याने ती जमीन दिली. त्यांच्या व्यक्तिगत गरजा अत्यंत मर्यादित होत्या. सुरुवातीला उच्च राहणीमान असणारे विलासराव हळूहळू अत्यंत साधे होत गेले. सामान्य शेतकऱ्याला महागडी औषधे परवडत नाही म्हणून ते स्वतः देखील वनौषधींद्वारे उपचार घेत. खरंतर स्वतःच्या पैशाने जगभरात कुठेही विमानाने जाण्याची ऐपत असणारे विलासराव सामान्य शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून स्वतः देखील एसटीने किंवा रेल्वेने प्रवास करत पेट्रोल महाग झालं तेव्हा सायकल वापरू लागले.
बालपणापासून खरंतर गोड-धोड खाणारे, जिभेचे चोचले पुरवणारे विलासराव कालांतराने भात आणि उसाला खूप भरमसाठ पाणी लागतं म्हणून फक्त चटणी आणि ज्वारीची भाकरी खाऊ लागले. ज्वारी शेतकऱ्याला परवडते आणि शेतकऱ्याला जगवते. गहू भातासारख्या पिकांना खूप पाणी लागतं, औषध फवारणी करावी लागते, रासायनिक खत वापरावे लागतात त्यामुळे ज्वारी हे त्यांचे लोकप्रिय खाद्य होतं. 2000साली त्यांनी पाणी परिषदेत ज्वारीच्या भाकरीला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी परिषदेमध्ये ज्वारीच्या भाकरीचे सँडविचेस हीच न्याहारी ठेवली होती. विलासरावांकडे लहान-थोर, श्रीमंत-गरीब असा भेदभाव नव्हता. संत तुकारामांची गाथा विलासरावांच्या नेहमी सोबत असे. शेवटच्या काळात प्रकृती ठीक नसतानाही देखील चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्पासाठी विलासरावांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
शेवटच्या काही दिवसात छाती दुखत असताना त्यांचे हितचिंतक त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आग्रह धरत होते परंतु त्यावर ते उत्तर देत,”समाजाला आपली गरज नसते.आपल्याला समाजाची गरज असते. कृत्रिम उपचारांनी मी आयुष्य कशाला वाढवायचे. ईश्वराला एवढेच काम कदाचित माझ्याकडून करून घ्यायचं असेल. आता मी कधीही जायला तयार आहे.” आणि अखेर 23 एप्रिल 2002 रोजी विलासरावांची प्राणज्योत मालवली. पाणी बाबा अनंतात विलीन झाले.