इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्गयात्री –
कासवांचा तारणहार : भाऊ काटदरे
श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार म्हणजे कुर्मअवतार. त्याला ‘कच्छप अवतार’ असेही म्हणतात. अमृतप्राप्तीसाठी जेव्हा देवदानवांनी क्षीरसमुद्रामध्ये समुद्रमंथन केलं, त्यावेळी भगवान विष्णूनी कुर्मावतार घेऊन मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला आणि त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्रमंथन करू शकले. कूर्म म्हणजे कासव. त्या काळातदेखील कुर्मरूपात समुद्रमंथन सहज होऊ शकलं ते या कासवाच्या मदतीने.कायम पाठीवर आपलं बिऱ्हाड घेऊन फिरणारा हा दिसायला अत्यंत साधा,गरीब, शामळू असा प्राणी. तसं पाहिलं तर त्याचं अस्तित्व किती नगण्य आहे असं वाटतं. पण तसं नाहीये बरं का. कासवाला समुद्राचा स्वच्छतादूत म्हटलं जातं. निसर्गाच्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा.मग या कासवांची संख्या जेव्हा दिवसेंदिवस कमी होऊ लागली, कासव हा प्राणी दुर्मिळ प्राण्यांच्या यादीत समाविष्ट झाला त्यावेळी निसर्गाच्या साखळीतला हा महत्त्वाचा दुवा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये निसर्गरक्षक भाऊ काटदरे यांचे योगदान फार मोलाचे आहे.
2002 सालापासून लोकसहभातून त्यांनी सागरी कासवांच्या संरक्षणाचे काम चालू केलं आणि ते 100% यशस्वी झालं आहे.कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार देण्यात आलेल्या पुस्तकात भाऊ काटदरे यांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर राबवलेली कासव संवर्धन मोहीम, समुद्र गरुड व इतर प्रजातींच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची सर्व माहिती एका धड्यात देण्यात आली आहे.
साधारणपणे आपल्या सर्वांचं लक्ष दिसायला रुबाबदार,अवाढव्य किंवा रंगबिरंगी अशा प्राण्यांवर जास्त असतं. कासवासारखा ओबडधोबड, कठीण दगडासारखा मठ्ठ दिसणारा प्राणी हा दुर्लक्षित राहतो पण, कासव तसं जरी दिसत असले तरी त्याला पर्यावरण अभियंता म्हटलं जातं. अशा या कासवांची संख्या हळूहळू इतकी कमी होत गेली की ते दुर्मिळ प्राण्यांमध्ये गणले जाऊ लागले. कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी किंवा तुरुतुरु चालणारी त्यांची पिल्ले दिसेनाशी झाली आणि मग धोक्याची घंटा वाजू लागली. भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने मात्र ही धोक्याची घंटा ओळखली आणि वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वतः सहकाऱ्यांसह या कासवांच्या अंड्यांचा शोध सुरू केला.
भाऊ म्हणजेच विश्वास काटदरे. विश्वास दत्तात्रय काटदरे यांचा जन्म गुहागरच्या शीर या खेडेगावातला. भाऊ खरंतर पट्टीचे कबड्डीपटू. वडील कोकणातले शेतकरी. लहानपणापासून नॅशनल जिओग्राफीसारखी वन्यजीवनावरची मासिकं वाचण्याची त्यांना आवड होती. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सदस्य होते आणि त्यामुळे साहजिकच निसर्गाबद्दल प्रचंड ओढ होती. जगभरात नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत कासवांचा समावेश होणे ही अतिशय दुःखद गोष्ट होती.महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी नुसार कासवांची फक्त चार घरटी शिल्लक असल्याचा दावा केला जात होता परंतु, प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्यानंतर 62 घरटी आढळली.आशेचा किरण दिसला.सुरुवातीला 2003 मध्ये जेव्हा सागरी कासव संवर्धनासाठी त्यांनी काम सुरू केलं,त्यावेळी कासवांबद्दल,त्यांच्या वर्तनाबद्दल, तिथल्या पर्यावरणाबद्दल फारशी त्यांना माहिती नव्हती.
परंतु,अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले वाळूचे खड्डे दिसायचे, तुटलेली अंडी दिसायची.स्थानिक लोकांकडे विचारपुस केली तर ते सुरुवातीला अजिबात माहिती द्यायची नाही. कारण अवैध पद्धतीने तेथे कासवांची अंडी विकली जात असत किंवा त्याचं सेवन केलं जात असे.स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन या कासवांच्या अंडींपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र त्यांचा भयंकर रोचक आहे. त्यासाठी त्यांना अनेक महिने अविरत कष्ट घ्यावे लागले. परंतु अशावेळी भाऊंच्या कबड्डीच्या प्रसिद्धीचे वलय कामाला आलं. तिथल्या सरपंचांनी केवळ प्रसिद्ध कबड्डीपटू म्हणून त्यांना ओळखलं आणि त्यांना या कार्यात मदत केली. त्यांनी एक जुना माहितगार माणूस कायम कायमस्वरूपी या कामासाठी उपलब्ध करून दिला. नोव्हेंबर ते एप्रिल हा कासवांचा वीणीचा हंगाम असतो. अशा वेळेस कासवांच्या घरट्यांचा शोध घेऊन ते किनाऱ्यावर उभारलेल्या हॅचरीमध्ये ती अंडी नेऊन ठेवत. सुरुवातीला काहीच माहित नसल्याने या सर्व बाबी त्यांना अत्यंत अवघड वाटत पण,कधी गुगल वरून तर कधी ठिकठिकाणच्या पुस्तकातून माहिती गोळा करून त्यांनी हे काम सुरू ठेवले.
वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा पहिल्यांदा कासवाची पिल्लं बाहेर आली आणि तुरुतुरु समुद्राकडे जाऊ लागली, त्यावेळी गावातील अनेक लोक हे दृश्य बघण्यासाठी कौतुकाने तिथे आले. कारण आत्तापर्यंत त्यांनी फक्त अंडी पाहिली होती परंतु, ती उगवल्यानंतर त्यातून निघणारी छोटी छोटी कासवाची पिल्लं बघण्याचा संयम त्यांनी कधी दाखवला नव्हता आणि मग त्यातून या कार्याला गावकऱ्यांकडून देखील पाठिंबा मिळत गेला. हळूहळू घरट्यांची संख्या वाढू लागली आणि अखेर 50 ते 60 दिवसानंतर वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये 70 ते 80 पिल्लं बाहेर आली. सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. कामाला दिशा मिळू लागली. सरपंचांच्या सहकाऱ्यामुळे आता गावातील लोकही सहकार्य करू लागले.
हळूहळू वर्षभरामध्ये अशी 50 कासवांची घरटी संरक्षित झाली आणि 2734 कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.पुढील वर्षी हळूहळू हा प्रकल्प इतर गावांमध्ये सुद्धा राबवला गेला. पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्राच्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीच्या परिसरात हा कासव प्रकल्प चालू झाला.नक्कीच मेहनत प्रचंड होती,पण भाऊ आणि सहकारी देखील तेवढेच चिवट होते.ऑलिव्ह रीडले ह्या कासवाला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अन्वये वाघाच्याबरोबरीने त्याला संरक्षण आहे हे कासवाचे महत्व लोकांना पटवून दिल्यानंतर आणि कासवाची अंडी चोरून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त मानधन त्यांना देऊ केल्यानंतर स्थानिक गावकरी या कामात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. खरंतर ही पिल्लं घरट्यातून बाहेर पडल्यापासून समुद्रात जाईपर्यंत तसेच, ती वयात येईपर्यंत सुमारे पंधरा वर्षे जगली तर पुढची पिढी निर्माण होते त्यामुळे कासवांच्या विणीचं यश हे फक्त एक टक्का एवढंच असतं..
वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव महोत्सव असा आगळावेगळा महोत्सव सुरू करण्याची संकल्पना भाऊंनी मांडली आणि अतिशय संयमाने ती पर्यटकांपर्यंत पोहोचवली. कासव महोत्सवामध्ये कासव संरक्षणाबद्दल फिल्म दाखवणं, प्रश्न उत्तर, शंका निरसन अशा अनेक गोष्टी त्यांनी सहभागी केल्या. जगभरात ख्याती मिळवलेला हा महोत्सव सुरुवातीला अतिशय कठीण परिस्थितीमध्ये करावा लागला.सुरुवातीला एक दोन दिवस भरणारा कासव महोत्सव, आता महिनाभर चालतो हेच त्यांच्या यशाचं फलित आहे. कल्पकदृष्टीने एखाद्या समस्येवरील उपाय शोधून त्याचा इव्हेंट करणं आणि त्याद्वारे जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे हे भाऊंना चांगलंच साधलं आहे.
भाऊ कौतुकाने सांगतात,”कौतुकाची गोष्ट म्हणजे ओरिसामध्ये आरीबाडा इथे एका आठवड्यात तीन ते पाच लाख कासव अंडी घालतात आणि त्यानंतर त्यातून कोट्यावधी कासवांची पिल्ले समुद्रात जातात. इतकी चिमुकली पिल्लं समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना किनाऱ्यावर चालणं सुद्धा कठीण होतं. कारण सर्वच कासवांची पिल्ले पाण्याकडे धाव येत असतात. अशावेळी कासव नसलेल्या ठिकाणी बघत बघत काळजीपूर्वक पाऊल ठेवणं हे फार मजेशीर असतं.” आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होणं हाच आपल्यासाठी सुखद काळ असू शकेल. ज्यावेळी कासव समुद्रकिनाऱ्यावर मुक्त भ्रमंती करतील आणि मानवाला समुद्रकिनाऱ्यावर कुठे पाय ठेवावा हा विचार करावा लागेल. या सुदिनाची वाट आपण बघूया,नाहीतर ससा आणि कासवाच्या गोष्टीतलं कासव फक्त गोष्टीतच पुढच्या पिढीला ऐकायला मिळेल. बघायला मात्र मिळणार नाही.
Column Nisarga Yatri Turtle Saver Bhau Katdare by Smita Saindankar
Tortoise Olive Ridley Sea Coast Kokan Ratnagiri