इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
सोमालियाचा आवाज : फातिमा जिब्रेल
सोमालियासारख्या अविकसित, पुरुषसत्ताक देशामध्ये एका स्त्रीने आवाज उठवून स्त्रीकल्याणासोबतच पर्यावरणक्रांती घडवून आणणं सोपं काम नाहीये पण, फातिमा जिब्रेल यांनी हिमतीने ते करून दाखवलं. सोमालियासारख्या आकाराने अतिशय लहान, दुष्काळाने पिचलेल्या युद्धग्रस्त देशामध्ये बाभुळवृक्षांची वृक्षतोड थांबवून कोळशाच्या निर्यातीवर बंदी आणण्यास सरकारला भाग पाडणारा सोमालियाचा आवाज म्हणजे फातिमा जिब्रेल.
सोमालिया हा देश डोळ्यासमोर येतो तो, तिथल्या रखरखीत, दुष्काळी वाळवंटं, कुपोषित बालकं आणि अतिशय मागास असा आफ्रिकन देश म्हणून. आफ्रिकन समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवणं ही स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय अवघड अशी गोष्ट. सोमाली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहेच शिवाय, कुटुंबव्यवस्था ही पितृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे आफ्रिकेतल्या भटक्या जमातींमध्ये किंवा आदिवासींमध्ये तिथल्या स्त्रिया कुठलाही निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. सर्व निर्णय पुरुषच घेतात पण अंमलबजावणी मात्र स्त्रिया करतात. कुठल्याही समाज व्यवस्थेचा कणा ही एक स्त्रीच असते आणि देशाचे भवितव्य हे स्त्रियांच्याच हाती आहे यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. फातिमा जिब्रेल यांच्या पुढाकाराने परिस्थिती हळूहळू बदलत गेली. स्त्रियांनादेखील त्यांचं मत मांडण्याची मुभा मिळू लागली.
फातिमा जिब्रेल म्हणतात,
” सोमालियातल्या स्त्रिया पर्यावरणाकडे ज्या दृष्टीने बघतात, त्या नजरेने जगातल्या कोणत्याही स्त्रिया बघत नाहीत. सोमालियातल्या स्त्रिया स्वतःला पर्यावरणाचा एक छोटा घटक मानतात. किंबहुना जगातल्या सर्वच गोष्टी या पर्यावरणाशी संबंधित आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे”.
फातिमा यांचा जन्म त्यावेळच्या ब्रिटिश सोमालीलँडच्या एका आदिवासी टोळीत झाला. जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचं कुटुंब वाळवंटात राहत होतं. दरवर्षी ही टोळी त्यांच्या लास कोरे या एडनच्या आखाताच्या किनाऱ्यावरील गावातून जनावरांना घेऊन स्थलांतर करत असे. त्यावेळी तिथल्या स्त्रिया किनाऱ्याजवळच्या वाळूत खड्डे खणून पाणी मिळवत असत. पाच वर्षांच्या मुलीदेखील मोठ्या स्त्रियांना या कामात मदत करत असत. फातिमाचं बालपण झरे, पर्वत, झाडी विविध प्रकारची फुलं, फुलपाखरं, पक्षी, जंगली जनावरं यांच्या सानिध्यात गेलं.आजूबाजूला वन्य प्राण्यांचा सतत वावर असे त्यामुळे जंगली प्राण्यांनी आपल्या मुलीला पळवून नेऊ नये म्हणून फातिमाची आई तिच्या कमरेला लांबलचक दोरी बांधून ठेवत असे. फातिमा यांचे वडील खलाशी होते. ते अमेरिकेत स्थायिक झाले परंतु, फातिमा आणि तिची आई मात्र तिथेच राहिल्या.
फातिमाने शिकावं म्हणून आईने प्रचंड खस्ता खाल्ल्या पण , प्राथमिक शिक्षणानंतर नाईलाजाने त्यांना फातिमाला अमेरिकेत त्यांच्या वडिलांकडे पाठवावं लागलं. तिथे पदवी मिळवल्यानंतर फातिमाला आपल्या मातृभूमीची ओढ काही स्वस्थ बसू देईना. त्या सोमालियात परत आल्या आणि सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला. पुन्हा लग्नानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या पतीसोबत अमेरिकेत गेल्या आणि पाच मुलींना जन्म दिल्यानंतर त्या जेव्हा सोमालियात परतल्या त्यावेळी सोमालियाचं रूपडं पार पालटलं होतं. सगळीकडे रखरखीत वाळवंट झालं होतं. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या या मुलीला निसर्गाचा सहवास दुरापास्त झाला होता. कारण, त्यावेळी सोमालियात भयंकर दुष्काळ पडला होता, लढाया चालू होत्या. सोमालियामध्ये वेगवेगळ्या जमाती आणि घराण्यांच्या आपसातील वादांमुळेदेखील ही भयंकर परिस्थिती उद्भवली होती. अमेरिकन राजकारणात सोमालियाला अजिबात महत्व नव्हतं. फातिमा अस्वस्थ झाल्या. जागतिकीकरणामुळे पर्यावरणाचा नाश होतोय ,त्यामुळे त्यांचा कायम जागतिकीकरणाला विरोध होता. या दुष्काळाची कारणे शोधताना त्यांच्या लक्षात आलं की, सोमालिया हा एकेकाळी बाभुळ वृक्षांनी समृद्ध असा देश होता.
बाभूळ वृक्ष म्हणजेच ‘ब्लॅक गोल्ड’. बाभूळवृक्ष तोडून, तो जाळून कोळसा निर्मिती केली जाऊ लागली. त्यासाठी जंगलंच्या जंगलं नष्ट केली जाऊ लागली. सौदी अरेबिया आणि इतर धनाढय अरब देशांमध्ये हा कोळसा निर्यात होऊ लागला. हा व्यवसाय करणारे लोक खूप श्रीमंत झाले. कोळशाची एक पिशवी सौदी अरेबियामध्ये दहा डॉलरला विकली जाते. हा कोळसा 50 ते 500 वर्षे जुन्या बाभळीच्या झाडांपासून बनवला जातो. पण त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे सोमालियातलं पर्यावरण, तिथली नैसर्गिक संसाधनं आणि तिथल्या स्थानिक लोकांचं अस्तित्व धोक्यात आलं. तिथल्या जनावरांना चरण्यासाठी देखील कुरणं शिल्लक राहिली नाहीत. सोमालियामध्ये तीव्र वंश संघर्ष आहे त्यातुन अनेकदा फातिमा जिब्रेल आणि तिच्या सहकाऱ्यांना याविरुद्ध धमक्या देण्यात आल्या. तेव्हा फातिमा यांनी या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सोमालियातील स्त्रियांची एक संघटना उभी केली.
हॉर्न रिलीफ ही संघटना स्त्रिया आणि पर्यावरणाचे प्रश्न यांची सांगड घालून काम करते. सोमालिया नजीकच्या काळात एक प्रगत देश म्हणून पुढे यावा यासाठी फातिमा खूप मोलाचे कार्य करत आहेत. बाभूळ वृक्ष 500 वर्षे जगू शकतात आणि इतक्या दीर्घायुषी वृक्षाची केवळ कोळसा बनवण्यासाठी जेव्हा वृक्षतोड केली जात होती. यावर विचार केला असता त्यांच्या लक्षात आलं की भरपूर उत्पन्न मिळवून देणारी बाभूळवृक्ष जरी अरबस्तानाला श्रीमंत करत असतील तरी एकीकडे सोमालियाला मात्र वाळवंट करत आहेत. मग त्यांनी स्त्री संघटनेच्या मदतीने कोळसाविरोधी मागणीसाठी पुडलँड प्रदेशात शांतता मोर्चा आयोजित केला आणि अखेर2000 साली फातिमा जिब्रेल त्यांच्या अथक प्रयत्नानंतर कोळशाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.
जागतिकीकरण किंवा विकास हा पर्यावरणाचा नाश करून होत असेल तर अशा जागतिकीकरणाला त्यांचा कायम विरोध आहे. फातिमा यांच्या दबावाखाली सोमालियामध्ये या वृक्षतोडीच्या विरोधात कायदा तयार झाला आणि काही प्रमाणात तरी ही वृक्षतोड थांबवण्यात त्या यशस्वी झाल्या. राजकारण, पर्यावरण आणि सामाजिक समस्यांमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फातिमा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वृक्षतोड करून होणारं कोळशावरील अवलंबित्व कमी व्हावं यासाठी त्यांनी सन फायर कुकिंग ची स्थापना केली. त्याद्वारे सोमालियामधील स्त्रियांना सोलर कुकरची ओळख झाली.लोकजागृतीसाठी कोळशाच्या संकटावर ‘चारकोल ट्रॅफिक’नावाच्या लघुपटाची निर्मिती केली. लोकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले.
हॉर्न रिलीफच्या माध्यमातून फातिमा यांनी सोमालियाच्या जंगलातल्या बाभूळ वृक्षांची जंगलं वाचवण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी फातिमा जिब्राल यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2002 मध्ये गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, 2008 मध्ये नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पुरस्कार आणि 2014 मध्ये त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा मानाचा पुरस्कार मिळाला.
जगात जिथे जिथे पर्यावरण रक्षणासाठी उठाव झाले, तिथे तिथे स्त्रियांचा सहभाग कायम लक्षणीय आहे. स्त्री मुळातच सृजनशील असते. त्यामुळे निसर्ग, पर्यावरण ह्या सृजनाच्या आविष्काराला ती जास्त जवळून समजून घेऊ शकते. स्त्रीमध्ये स्वभावतःच मातृभाव असल्याने जेव्हा स्त्रिया निसर्ग रक्षणासाठी पुढे येतात त्यावेळी निश्चितच ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी” ही उक्ती सार्थ ठरते. देश प्रगत असो की अप्रगत, तिथे स्त्रीसहभागातून झालेली पर्यावरण क्रांती ह्याचं द्योतक आहे.
स्मिता अनिल सैंदानकर
9423932203
Column Nisarga Yatri Somalia Fatima Jibrell by Smita Saindankar
Environmentalist Babul Tree Acacia Tree Coal