इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री – मातीतला माणूस : डॉ. रतन लाल
‘जसे पेराल तसे उगवेल’ या उक्तीप्रमाणे ‘ आज माती वाचवा , उद्या माती तुम्हाला वाचवेल.’ मातीसारख्या दुर्लक्षित विषयाचे महत्त्व जगाला पटवून देणारे जागतिक कीर्तीचे मृदा शास्त्रज्ञ, पद्म पुरस्कारप्राप्त डॉ. रतनलाल यांच्याबद्दल जाणून घेऊया आजच्या या लेखात…..
“मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती ,मेरे देश की धरती “आपल्या धरती मातेचं कौतुक सांगणारं हे गीत एकेकाळी खरोखर सार्थ होतं. शेतात सगळीकडे टवटवीत मोत्याचेदाणे डुलत आहेत असं चित्र पटकन डोळ्यापुढे दिसायचं.कारण 40-50 वर्षांपूर्वी शेतीतून पोषण मूल्याने भरपूर असं अन्नधान्य पिकायचं. लोक काटक होते, प्रतिकारशक्ती दांडगी होती. सहसा आजारी पडत नसत. कारण या अन्नधान्यातून मानवाच्या शरीराच्या सर्व विटामिन्स, मिनरल्स इ.पोषणतत्वांची गरज पूर्ण व्हायची.कोणत्याही आजाराचा सामना करताना ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम ,त्यांचाच निभाव लागू शकतो आणि ही प्रतिकारशक्ती मिळते पोषक अन्नातून. परंतु आत्ता जे अन्न आपण खातो त्यातुन पुरेशी पोषणमूल्य माणसाला मिळत नाहीत. कदाचित या पुढील काळात पुढच्या पिढ्यांना नगण्य पोषणमूल्य मिळेल आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यावर होतील.
मृदाशास्त्रज्ञ डॉ. रतनलाल यांच्या मते याचं मूळ कारण आहे बदललेली माती, मातीची धूप, आणि मातीचा पोत.जागतिक हवामान बदलाचा परिणाम मातीवर देखील दिवसेंदिवस दिसून येत आहे आणि लवकरच जर मानवाने माती वाचवा या अभियानाअंतर्गत मातीची दखल घेतली नाही तर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ शकते. माती या विषयावर संशोधन करणारे जागतिक कीर्तीचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. रतनलाल हे जगातील सर्वात महत्वाच्या शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. मातीच जागतिक वातावरणबदलाच्या परिणामांना रोखू शकते हा विचार त्यांनी जगाला दिला. पद्म पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रतनलाल यांनी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.मृदा संवर्धनाच्या माध्यमातून वातावरण बदल, अन्नसुरक्षा, पाण्याची गुणवत्ता, पाण्याची उपलब्धता अशा वैश्विक समस्यांवर उपाय शोधणे यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ. रतनलाल यांचा जन्म अत्यंत सुपीक अशा पंजाब प्रांतातल्या एका खेडेगावात झाला. लहानपणापासूनच शेती आणि माती या विषयात त्यांना विशेष रस होता. एखादी गोष्ट आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तिचं महत्त्व माणसाला कळत नाही त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणारी माती हा विषय कायम दुर्लक्षित राहिला आहे. पंजाब कृषी विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेत जाऊन ओहिओ स्टेट विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉ. रतन लाल ओहिओ स्टेट विद्यापीठात पर्यावरण आणि मृदाशास्त्र या विषयाचे लाडके शिक्षक म्हणून ओळखले जात असत.
कालांतराने ते कार्बन व्यवस्थापन या संस्थेचे संचालक आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स या संस्थेचे अध्यक्ष झाले. खरंतर मृदाशास्त्र हा विषय नेहमी दुर्लक्षित राहिला. मृदाशास्त्राचं महत्व लोकांना आणि शासनकर्त्याना पटवून देण्यासाठी डॉ. रतन लाल यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांचं मृदाविज्ञान विषयातील संशोधन तसेच त्यांचे पर्यावरणसंवर्धनासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन डॉ. रतन लाल यांना ‘ वर्ल्ड फूड प्राइज 2020 ‘आणि ‘जपान- प्राईझ 2019’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मातीमध्ये असंख्य जीवजंतू जिवंत असतात ,त्यामुळे माती जिवंत रहाते.मातीचा कस घालवला की हे जीवजंतू मरण पावतात. नैसर्गिक प्रक्रिया थांबते आणि माती निकृष्ठ दर्जाची व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत मातीमध्ये जीवजंतू असतात तोपर्यंत त्या मातीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते.मातीत ओलावा राहतो पण संयुक्त राष्ट्र FAO च्या अनुमानानुसार मानवाच्या मातीप्रती असलेल्या अज्ञानामुळे दरवर्षी मातीतील 27000 प्रजाती नष्ट होत आहेत. हळूहळू ओलावा कमी झाला की माती शुष्क बनते आणि मग कालांतराने तिचे वाळवंट बनायला वेळ लागत नाही.जसं आपलं राजस्थानचे वाळवंट, कलहारी वाळवंट.फार वर्षांपूर्वी इथली जमीन शेतीसाठी सुपीक मानली जात होती. तिथे घनदाट जंगल होतं पण आज तिथे जे रखरखीत वाळवंट झालंय त्याचं कारण आपण निसर्गाची हाक वेळीच ऐकली नाही.
डॉ. रतन लाल यांच्या संशोधनानुसार ,”जागतिक हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असतो. मातीची धूप होते, मातीचा पोत बदलतो पण मातीच या वातावरण बदलाला रोखू शकते.पर्यावरणाचा समतोल ढळला तर पृथ्वीवरचं बहुतांश जीवन नामशेष होईल.जलचर तर आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.” औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन हवेत मोठ्या प्रमाणावर विसर्जित झाला. जीवनशैलीमध्ये कार्बन फूटप्रिंट वाढत गेले आणि हेच हवामान बदलासाठी कारण ठरलं, असं जगभरातील तज्ञांचे मत आहे. त्यावर डॉ. रतन लाल यांनी प्रभावी उपाय दिला की मातीमध्ये हजारो बिलियन टन कार्बन साठवला जाऊ शकतो. तो जर हवेत उत्सर्जित होत राहिला तर तापमान वाढ अटळ आहे.
परंतु जर तो मातीत साठवला तर आपल्याला या हवामानबदलावर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी शेतकरी आणि पुढच्या पिढीला मातीचे महत्व आणि माती संवर्धनाच्या विविध पद्धती माहीत करून देणे अत्यंत आवश्यक आहे. तरच मातीचा पोत सुधारेल आणि आपल्याला पुढील पिढ्यांना उत्तम पीक घेता येईल,मुबलक अन्नधान्य उपलब्ध होईल. गरज आहे ‘माती वाचवा’ यासारख्या अभियानात प्रत्येकाने सामील होण्याची. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी प्रत्यक्षरित्या आणि ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या समाजाला,पुढील पिढ्यांना या मातीचं महत्व समजावून दिले पाहिजे. कारण म्हणतात ना ‘पेरावे तसे उगवते’ हाच निसर्गाचा नियम आहे.
शेती वैज्ञानिकांच्या अनुमानानुसार जर ही परिस्थिती कायम राहिली तर 2050 पर्यंत 40% अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ शकते. अन्नधान्याचा दुष्काळ पडेल. अन्नाच्या तुटवड्यामुळे गुन्हेगारी वाढेल. ज्याची आपण आता कल्पनाही करू शकत नाही, अशा अनेक नवनवीन समस्या उभ्या राहतील.शेवटी माणसाचा सगळा संघर्ष हा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजाभोवतीच फिरत असतो. परिस्थिती लगेच बदलणार नाही पण सुरुवात मात्र करावी लागेल. कारण अजून 40 वर्षांनी हा प्रयत्न केला तर मात्र पूर्वीचे सोन्याचे दिवस पहायला पुढची 150 ते 200 वर्ष नक्कीच वाट पहावी लागेल आणि हे जग पूर्ण वाळवंटात रूपांतरित व्हायला काही वेळ लागणार नाही. तेव्हा चला ‘माती वाचवू या’….
Column Nisarga Yatri Soil Expert Dr Ratan Lal by Smita Saindankar