इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
रेडिओ बुंदेलखंडचा बुलंद आवाज : वर्षा राईकवार
मध्यप्रदेशातल्या रेडिओ बुंदेलखंड ची एकमेव महिला रेडिओ जॉकी वर्षा राईकवार हिने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी रेडिओ प्रभावी माध्यम आहे हे ओळखलं आणि त्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला. ही 27 वर्षीय तरुणी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील शेकडो गावांना हवामान बदल आणि पर्यावरणसंवर्धनासाठी शिक्षित करत असते. तिच्या ‘शुभ कल’ या रेडिओ शोचे पाच लाखाहून अधिक श्रोते आहेत. कसं आहे तिचं अनोखं कार्य? जाणून घेऊ या.

मो. 9423932203
आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात रेडिओवरच्या सुप्रभात श्रोतेहो!!! या वाक्याने होत असते. फार पूर्वीपासून श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं, जनसामान्यांचं लाडकं असं हे प्रभावी माध्यम. रेडिओ जॉकीने उत्साहात केलेलं गुssssss ड मॉर्निंग ऐकून आपल्या दिवसाची सुरुवातदेखील उत्साहात होते. तुमच्या आवाजावर, तुमच्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल. तुमच्यामध्ये लोकांचं मनोरंजन करण्याची कला असेल,हसत हसवत सामाजिक प्रश्नांना जनतेपर्यंत मांडण्याचं कसब असेल तर एक यशस्वी रेडिओ जॉकी नावारूपाला येऊ शकतो. रेडिओ जॉकी या व्यवसायाचा परिप्रेक्ष पूर्वीसारखा मनोरंजनापुरताच मर्यादित राहिलेला नाही. कारण हे सर्वदूर सहजासहजी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचणारं सोपं माध्यम.
मध्यप्रदेशातल्या रेडिओ बुंदेलखंड ची एकमेव महिला रेडिओ जॉकी वर्षा राईकवार हिने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी हेच प्रभावी माध्यम आहे हे ओळखलं आणि त्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला. ही 25 वर्षीय तरुणी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील शेकडो गावांना हवामान बदल आणि पर्यावरणसंवर्धनासाठी शिक्षित करत असते. तिच्या ‘शुभ कल’ या रेडिओ शोचे पाच लाखाहून अधिक श्रोते आहेत. तिच्या दैनंदिन शुभ कल शो मध्ये ती हवामानबदलाच्या परिणामाबद्दलचे प्रथमदर्शनी अहवाल ऐकवत असते आणि ग्राउंड लेव्हल काम करण्यासाठी सामान्य माणसाला काय करता येऊ शकतं याबद्दल मार्गदर्शन करत असते.
मध्यप्रदेशातल्या ओरछा या छोट्याशा गावात वर्षा लहानाची मोठी झाली. वडील शेतकरी असल्याने लहानपणापासून हवामानाचा शेतीवर आणि पर्यायाने शेतकऱ्यांवर होणारा परिणाम ती लहानपणापासून बघत होती. दुष्काळ व अनियमित पाणीपुरवठा यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षानुवर्ष कमी कमी होत गेलं. तिच्या वडिलांशी जेव्हा या विषयावर ती बोलत असे तेव्हा वडील म्हणत की ही देवाची इच्छा आहे म्हणून असं होतं.पण या उत्तराने तिच्या मनाचं काही समाधान होईना. असं कसं होऊ शकतं?? वर्षाने तिच्या उत्तरांचा शोध चालूच ठेवला. 2017 मध्ये तिला रेडिओ बुंदेलखंड 90.4 एफएम मध्ये पहिली असाइन्मेंट मिळाली आणि ती होती हवामान बदलावर एक शो तयार करणे.
सुरुवातीला हवामान बदलाबद्दल तिला फारशी माहिती नव्हती. परंतु वर्षानुवर्ष पर्यावरण विषयावर वार्तांकन करणाऱ्या रेडिओ पत्रकारांनी तिला या प्रवासात मदत केली.तिने गावकर्यांची भेट घेऊन त्यांची आव्हानं, समस्या समजून घेऊन संवाद साधायला सुरुवात केली.
वर्षाचं तिच्या आवाजावर खूप प्रेम.तिला गायन आणि सादरीकरणाची लहानपणापासूनच आवड होती. शाळेत असताना एका मैत्रिणीकडून रेडिओ जॉकी बद्दल तिने ऐकलं. आपल्याला रेडिओवर बोलता आलं पाहिजे हे तिचं स्वप्न होतं. आणि जबरदस्त इच्छाशक्तीने कालांतराने ती बुंदेलखंड रेडिओवर रेडिओजॉकी म्हणून रुजू झाली. नोकरीसाठी जुन्या विचारांच्या तिच्या कुटुंबाचा तिच्या नोकरीला पाठिंबा नव्हता. इतर मुलींप्रमाणे लग्न करून संसार थाटावा ही त्यांची इच्छा होती. पण वर्षाला ती परंपरा मोडायची होती. काहीतरी वेगळं करायचं होतं. कामावर ये-जा करताना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागायचा. पण तिने जिद्द सोडली नाही आणि वर्षाचा बुलंद आवाज गावागावात घुमू लागला.
बदलत्या वातावरणाचा शेतीवर कसा परिणाम होतो? जंगल, नद्या ,सभोवतालची नैसर्गिक परिसंस्था यांचं हवामान बदलात काय महत्त्व आहे? या सर्व गोष्टींवर तज्ञांच्यामार्फत ती चर्चा घडवून आणू लागली. पर्यावरण आणि शेती यातील संबंधाबाबत अजूनही जागरूकता नाही हे तिला जाणवलं आणि ही दरी भरून काढण्यासाठी रेडिओ हे उत्तम साधन असल्याचे तिच्या लक्षात आलं. अखिल मानवजातीला भेडसावत असलेले विविध पर्यावरण प्रश्न गावातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचवण्यासाठी रेडिओ हेच योग्य माध्यम असू शकतं. तिने श्रोत्यांसाठी आकर्षक अशा पर्यावरण कथा बनवून अनेक पर्यावरण समस्या जास्तीत जास्त रसपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. तिच्या रेडिओवरील ग्रामीण रियालिटी लाईव्ह शोला उत्तम प्रतिसाद मिळतो.
‘कोण बनेगा शुभ कल लीडर’ हा तिचा रियालिटी शो.वर्षा तिचा शो त्यांच्या स्थानिक बुंदेली भाषेमध्ये मजेदार पद्धतीने सादर करते. त्यामध्ये विविध पात्रांच्या सहाय्याने संभाषण घडवून बोलीभाषेमध्ये लोकांच्या मनातल्या भावना, अडचणी आणि त्यावरचे उपाय यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करत असते.. पथनाट्याचे आयोजन करून, विविध कलाप्रकारांचा वापर करून पर्यावरण विषयावर स्पर्धा आयोजित करते. या सगळ्यांचा प्रभाव गावातल्या लोकांमध्ये प्रखरतेने जाणवू लागला. आता ही देवाची इच्छा आहे असं ते म्हणत नाहीत.पर्यावरणाशी छेडछाड करत नाहीत. जैवविविधतेवर मानवाने आक्रमण केल्याने पर्यावरण आपला बदला घेतो हे त्यांना आता हळूहळू मान्य होत आहे.
जागतिक बँकेनेदेखील तिच्या रियालिटी शोची दखल घेऊन त्यासाठी निधी दिला आहे. वर्षा म्हणते,”मी लोकांना त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल घडवून शाश्वत जीवनाकडे जात यावं यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी शिक्षित करते. पावसाचे पाणी साठवणे, सेंद्रिय शेती, प्लास्टिक टाकून देणे, स्वयंपाकघरातील बाग लावणे ,इ.इ.. श्रोत्यांनी काही नवीन उपक्रम केले तर श्रोत्यांना ते कळवण्यास सांगितले. किचन गार्डन ,रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ठेवलेल्या स्पर्धेत 100 गावं या सहभागी झाली होती. या माध्यमातून अनेक लोकांमध्ये हवामान बदलाबद्दल जागृकता आली.
सुरवातीला सर्वसाधारण लोकांची वृत्ती अशी होती की, मी का हवामान बदलाबद्दल काळजी करावी ?त्यात मला काय फायदा होणार आहे? हे काय माझं काम आहे. पण हळूहळू लोकांना त्याचं महत्त्व आता समजायला लागलं. श्रोते स्वतःहुन रेडिओ स्टेशनला कॉल करतात. त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांबद्दल बोलतात. नॅशनल जिओग्राफिकच्या वन फॉर चेंज या मोहिमेत वर्षा राईकवार हिची दखल एक चेंजमेकर म्हणून घेण्यात आली. वर्षाचं काम सध्या स्टुडिओ पुरताच मर्यादित नाही. ती आठवड्यातून चार वेळा शेजारच्या गावांमध्ये फिरते. तिथल्या गावकऱ्यांशी पर्यावरण संवर्धनाबद्दल बोलते.लोक आता तिला तिच्या आवाजाने ओळखतात. ती एक सेलिब्रिटी झालेली आहे. या कामामुळे एका सामाजिक चळवळीला चालना मिळालीच पण त्या भागातील मुलींनाही प्रेरणा मिळाली.
अन्न ,वस्त्र ,निवारा, पैसा हे जरी महत्वाचे असले तरी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा,पिण्यासाठी ताजं पाणी हे देखील त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.निसर्गातली अचानक येणारी अनाकलनीय संकट टाळायची असतील तर लवकरात लवकर पावले उचलली गेली पाहिजेत. स्त्री ही नेहमीच कुटुंबाची सक्षम पालनपोषणकर्ती आहे.त्यामुळे ह्या नैसर्गिक परिसंस्थेत पर्यावरणाचे संरक्षण आणि पालन-पोषण यात महिलांची भूमिका खूप मोठी ठरू शकते.स्त्रियांनी ,मुलींनी या मोहिमेला ‘वसुधैव कुटुंबकम” समजून ही जबाबदारी उचलून धरण्याची आता प्रकर्षाने गरज आहे. म्हंटलच आहे ना की “एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं”. तसंच आता प्रत्येक स्त्रीने तिचं कुटुंब पर्यावरण साक्षर करण्याची गरज आहे.
Column Nisarga Yatri RJ Varsha Raikwar by Smita Saindankar Radio Bundelkhand Save Environment