आधुनिक भारताचा भगीरथ : राजेंद्रसिंह
“तुम्ही देवाचे लाडके आहात म्हणून तुमचा महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत सुदैवी आहे पण, त्याची उधळमाधळ करू नका .कारण अजून काही वर्षांनी पाण्याच्या तीव्र टंचाईला तुम्हालाही तोंड द्यावे लागेल. तसं होऊ नये म्हणून आतापासूनच उपाययोजना करा .खबरदारी घ्या. माझ्या राजस्थानातला शेतकरी थेंब थेंब पाण्याचे मोल जाणून आहे. अत्यंत गरीब माणूस तुपाचा वापर जेवढा काटकसरीने करेल तसा तो पाण्याचा वापर करतो” मनाचा ठाव घेणारी ही वाक्य आहेत हजारो शेतकऱ्यांसमोर कळकळीने भाषण करणाऱ्या ‘आधुनिक भारताचा भगीरथ राजेंद्र सिंह यांची. आज त्यांच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत…

मो. 9423932203
राजेंद्र सिंह यांनी एकेकाळी तिथल्या मृतप्राय भूमीलाच नव्हे तर तिथल्या निराश झालेल्या माणसांच्या मनालाही नवसंजीवनी दिली. दुष्काळ आणि उपासमारीच्या दुष्टचक्रातून त्यांची सुटका केली. तिथल्या साध्याभोळ्या खेडवळ लोकांच्या मनात निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण करून त्यांना पाणी ,जमीन, जंगलं, जनावरं यांचं संरक्षण करण्यास उद्युक्त केलं. एक-दोन नव्हे तर राजस्थानातल्या सतरा-अठरा जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक गावात त्यांनी विकासाची, सुबत्तेची आणि पर्यायाने आत्मसन्मानाची ही गंगा पुनर्जीवित केली.
राजेंद्रसिंह खरे तर एका जमीनदार घराण्यातले , वैद्यकीय शिक्षण घेतलेले तरुण. सरकारी सेवेत प्रकल्प अधिकारी म्हणून नोकरी करत असताना दुष्काळाने गांजलेल्या राजस्थानातील एका ओसाड गावात जेव्हा त्यांनी लोकांची थेंब थेंब पाण्यासाठीची वणवण पाहिली तेव्हा ,सुखवस्तू घरदार आणि सर्व भौतिक सुखं सोडून हा कर्मयोगी समाजकल्याणाच्या हेतूने निघाला. राजस्थानातील गावागावांवर निसर्गाची अवकृपा, कोरड्याखट्ट नद्या, विहिरी, नजर पोहोचेल तिथवर दिसणारी ओसाड,भेसूर जमीन ,पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आसुसलेली माती आणि माणसं हे दृश्य राजेन्द्र सिंह यांना अस्वस्थ करत होतं. आपल्यासारख्याच हाडामासाच्या माणसांचे हाल त्यांना बघवत नव्हते .आपण निष्क्रियपणे, अलिप्त राहून हे सगळं बघत राहिलो तर आपली सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला माफ करू शकेल का हा प्रश्न त्यांना सतत भेडसावत राहिला.
राजेंद्रसिंहांवर गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न आणि जयप्रकाशजींची ध्येययनिष्ठता यांचा प्रचंड पगडा होता. 2ऑक्टोबर 1985 या गांधी जयंतीच्या दिवशी त्यांच्या मनातलं ग्रामविकासाचे स्वप्न साकार करायला त्यांनी सुरुवात केली. अलवार जिल्ह्यातील किशोरी या गावात ते दाखल झाले .तिथल्या लोकांची पाण्यासाठीची वणवण पाहिल्यावर थोडा तिथल्या परिसराचा अंदाज घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की खरं तर राजस्थानात पूर्वी पावसाचं पाणी अडवण्याच्या आणि साठवण्याच्या उत्कृष्ट आणि उपयुक्त अशा पारंपारिक पद्धती होत्या .त्यामुळे पाऊस कमी पडत असला तरी इथले जीवनचक्र सुरळीत चालू होते. हा बदल घडविण्याची शक्ती होती ‘जोहड’ मध्ये. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब वाचवण्याचं काम ‘जोह्ड’ करतं. ते पाणी जमिनीत मुरते त्यामुळे विहिरींना कायम पाणी राहतं. जमिनीत ओलावा टिकून राहतो. या छोट्या बांधामुळे तलावासारखं पाणी साठतं आणि उन्हाळ्यातही पाण्याचा साठा उपलब्ध होतो आणि त्यामुळे वर्षभर सर्वांना पाणी मिळतं .कालांतराने लोकांच्या उदासीनतेमुळे या जोहडमध्ये गाळमाती साचली. डोंगरावर झाडे नव्हती त्यामुळे पावसाबरोबर दगड-गोटे वाहत येऊन त्यांत जमा झाले .त्यामुळे तळी, ओढे आटले आणि दुष्काळाची छाया संपूर्ण राजस्थानावर पसरली.
राजेंद्र सिंह यांनी सर्वप्रथम पाच-सहाशे वर्षांपासून प्रचलित असलेल्या जोहड बांधाच्या परंपरेचे महत्व गावकऱ्यांकडून समजावून घेतलं. पुन्हा एकदा जोहड तलाव बांधण्यासाठी गावकऱ्यांना आवाहन केलं पण सुरुवातीला त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवेना. शहरातला हा तरुण अतिरेकी असेल का ?मुलं पळविणाऱ्या टोळीतला असेल का? हा गावात कशासाठी आला आहे ?असे नाना संशय लोकांनी घेतले पण, त्या वेळेला स्वतः हातात कुदळ घेऊन उन्हातान्हात ,थंडीवाऱ्यात प्रसंगी उपाशी राहून ते एकटेच जोहड खणू लागले. काही महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि मग सुरू झाली श्रमप्रतिष्ठेची जीवनदायिनी परंपरा .त्यानंतर राजेंद्रसिंह यांनी जोहड बांधाच्या मदतीने गावंच्या गावं पाणीटंचाईपासून मुक्त केली.
“बिना नारी के हर बदलाव अधुरा हैं” या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या मताशी ते पूर्ण सहमत आहेत.राजस्थानातील महिलांच्या आयुष्यात राजेंद्रसिंह यांनी घडवून आणलेली सर्वात गरजेची आणि आनंदाची घटना म्हणजे रोजची पाण्यासाठी तासन तास करावी लागणारी वणवण आणि त्रास नाहीसा झाला. पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोनशे फूट खोल गेलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी या बायकांना रोज आपल्या घरातून अडीचशे फूट लांबीचा दोर दोघी तिघी मिळून फरपटत बरेच मैल अंतरावर एखाद्या मृत जनावरासारखा ओढत न्यावा लागे.या बायका मुलींचे रोजचे तीन-चार तास केवळ दोन-चार घागरी पाणी मिळवण्यासाठी जात असत. म्हणूनच जोहड तलाव आले आणि या स्त्रियांचं आयुष्य बदललं.
असे हे राजेंद्रसिंह अखंड उर्जा आणि कार्यक्षमतेने भरलेलं व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याचा खरा सन्मान झाला जेव्हा त्यांना 2001 मध्ये इतर सहा आशियाई व्यक्तींबरोबर जागतिक कीर्तीचा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार मिळाला. मृत जमीन आणि नद्यांना संजीवनी देण्यासाठी हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. ज्यावेळी मॅगसेसे अवॉर्ड फिलिपिन्समध्ये मनिला येथे अध्यक्ष ग्लोरिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी आपल्या भाषणात अध्यक्ष ग्लोरिया राजेंद्र सिंह यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलल्या तसेच आपल्या देशातल्या मृत नदीच्या पुनर्जन्मासाठी त्यांनी राजेंद्रसिंह यांच्याकडून मार्गदर्शनही मागितले. याशिवाय त्यांना कित्येक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . जोधपूरच्या महाराजांनी हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढून दरबारात महावस्त्र देऊन ” माझ्या मारवाडात पाणी आणल्याबद्दल हा बहुमान राजेन्द्र सिंह यांना आम्ही अर्पण करत आहोत” या शब्दात त्यांना मानपत्र प्रदान केले.
त्यांचा ‘लावा का बास’ हा प्रकल्प ही ऐतिहासिक ठरला. ह्या तलावामुळे ज्या भागात पूर्वी प्यायलाही पाणी नव्हते तिथे आता हजारो एकर जमिनीत नेहमीपेक्षा चौपट आणि वर्षातून दोनदा पीक घेता येते. हा जोहड बांध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि गावकऱ्यांच्या श्रमशक्तीने त्यांनी निर्माण केला होता. जवळ जवळ पाच हजार जोहड तलाव त्यांनी निर्माण करून थेंब थेंब पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या लोकांना ज्यांनी जगण्याची उर्मी दिली अशा या आधुनिक भगीरथाच्या कार्याला सलाम.