इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
वाईल्डलाईफ फोटोग्राफर : निशा पुरुषोत्तम
नुकताच आठ मार्चला महिला दिन साजरा झाला. त्यामुळे आज आपण ओळख करून घेणार आहोत,एका भन्नाट स्त्री निसर्गयात्रीची, निशा पुरुषोत्तमची. निशा ह्या वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहेत. वन्यजीव छायाचित्रकार निशा पुरुषोत्तम, ज्यांचे छायाचित्र BBC वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर, 2014 साठी निवडले गेले होते.सोपं नाहीये बरं का? जंगलात दिवसेंदिवस, तासनतास, उन्हातान्हात एका क्लिकसाठी भटकंती करणं.पण, म्हणतात ना ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ पण, निशा म्हणतात,” फोटोग्राफी हा माझा छंदच नाही तर ते माझं प्रेम आहे कारण छायाचित्रांमध्ये दृष्टिकोन आणि धारणा बदलण्याची क्षमता आहे आणि त्यातूनच बदल घडून येऊ शकतात.” महिला वन्यजीव छायाचित्रकार ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.काहींच्या मते ही व्यवसायाची अपारंपारीक निवड आहे. पण,भारतात अशा काही धाडसी स्त्री वन्यजीव छायाचित्रकार आहेत त्यांच्यापैकीच एक निशा पुरुषोत्तम. एखाद फोटो शॉट घेण्यासाठी झाडावर चढून जाण्यासारखी आव्हानं पार करावी लागतात. दहा किलो वजनाची उपकरणे सोबत घेऊन जंगलात मैलोन्मैल चालावं लागतं. त्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असावे लागतात. पण केवळ एक स्त्री आहे म्हणून आतापर्यंत कोणत्याही अडचणींचा सामना त्यांना करावा लागला नाही.
निशा पुरुषोत्तम यांचा जन्म केरळमधील परवुल(कोल्लम) येथे झाला.घराजवळ लहानसे जंगल, शेजारी सापाचं मंदिर, दोन दिवसाआड पाहुणे म्हणून भेटायला येणारे अनेक नाग, घरामागच्या अंगणात अनेक प्रकारचे विविध पक्षी, आजूबाजूला नदी आणि भात शेती अशा निसर्गरम्य वातावरणात त्यांचं बालपण गेलं आणि साहजिकच तेव्हापासूनच निसर्गाचं वेड त्यांच्या अंगात भिनलं. त्रिवेंद्रमच्या ललित कला महाविद्यालयात अप्लाइड आर्ट्स मध्ये पदवीधर झाल्यानंतर वेबसाईट, ग्राफिक डिझायनिंग,इव्हेंट फोटोग्राफीसारख्या नोकऱ्यांमध्ये त्यांचं मन लागेना आणि मग फोटोग्राफीच्या सीमा ओलांडून त्यांनी भारतातील अनेक बॅकवॉटर,पर्जन्यवनं,मध्यपूर्वेतील वाळवंट, मसाईमाराच्या गवताची मैदान पालथी घातली. तिथले पक्षी, वन्यजीव यांच्यामागे फोटोग्राफीसाठी दिवस-रात्र झपाटल्यासारख्या धावू लागल्या. त्यांचा चांगला मित्र आणि कॉलेजमधले सीनियर साबु जीवन हे त्यांचे पहिले गुरू.ज्यांनी त्यांना फोटोग्राफीची कला अवगत करून दिली. त्यांना प्रवास करायला आवडते त्यामुळे जिथे जाईल तिथे कॅमेरा घेऊन. दुबईमध्ये त्यांची अरफान या तीस वर्षाचा तगडा अनुभव असणाऱ्या फोटोग्राफरची ओळख झाली आणि मग या काळात फोटोग्राफीचे व्यसनच जडले.या आवडीमुळे दुबईमध्ये त्यांनी तीन मित्रांसह ‘YNot Escapades’ ही फोटो टूर कंपनी स्थापन केली. ‘शेड्स ऑफ लाईफ’ या संवर्धन प्रकल्पातही त्यांचा सहभाग आहे. त्यांचा एक वाइल्ड लाईफ फोटो BBC वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयरसाठी निवडण्यात आला होता, तो 89 देशांतील 80,000 हून छायाचित्रांमधून निवडला गेला होता ; तसेच त्यांच्या छायाचित्रांची नॅशनल जिओग्राफिमध्ये वन्यपक्षी छायाचित्रण विभागात सहावेळा निवड करण्यात आली होती.
निशा यांच्याकडे जंगलातले अनेक चित्तथरारक अनुभव आहेत. सर्वच अनुभव अप्रतिम आणि अवर्णनीय असे आहेत. त्या म्हणतात, “जंगलात असताना फिरत्या छावण्यांमध्ये, ज्यांना इलेक्ट्रिक कुंपण नाही, अशा ठिकाणी तुम्हाला काही मीटर अंतरावरुन सिंहांची गर्जना ऐकू येते, जिथे तुम्ही झोपेत असताना तुमच्या तंबूभोवती फिरताना हायना ऐकू शकता. रोज सकाळी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या हाकेने उठणे, पहाटेचं दृश्य पाहणे, जेव्हा तुमच्या तंबूच्या शेजारील झुडूपातून उंच, सुंदर जिराफ चरतात किंवा झेब्राचा कळप फेरफटका मारत असतो… मी कितीही प्रयत्न केला तरी मी नाही. मला वाटत नाही की मी माझ्या भावना किंवा अनुभव शब्दात स्पष्ट करू शकेन. ती भावना समजून घेण्यासाठी त्याचा अनुभव घ्यावा लागतो. मला शक्य तितक्या जंगलांचा प्रवास करून अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव इतर जगाशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल.कारण जंगलातील प्रत्येक क्षण रोमांचक असतो.” त्यांच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर पोलाचिरा नावाचे 1,500 हेक्टर ओली जमीन आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हजारो स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. गेली चार वर्षे या काळात त्या एक आठवडा इथे घालवतात. जेव्हा एखादा वाईल्डलाईफ फोटोग्राफर प्राण्यांच्या अधिवासात जाऊन त्यांना त्यांच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या प्राण्यांचं वर्तन कसं असू शकेल, त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील याचा अभ्यास त्याला असावा लागतो.
खरोखर वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणजे आपल्या डोळ्यातून आपण जगाला जंगलातलं जीवन दाखवत असतो. ते आपण कसं पाहतो आणि कसं लोकांपुढे सादर करतो हे महत्त्वाचं.आपल्या कॅमेऱ्याद्वारे आपल्याला या चमत्कारिक निसर्गाची किमया दाखवण्याची ही संधी असते. निसर्ग छायाचित्रकार हा खरं तर चांगला पर्यावरण रक्षक होऊ शकतो. कारण त्याच्या कौशल्याचा वापर करून त्यावर आधारित उत्तम चित्रपट, माहितीपट बनू शकतात. कारण जाडजूड संदर्भ पुस्तकं किंवा शेकडो दस्तऐवज जे काम करू शकत नाही ते काम एक माहितीपट करू शकतो. त्यामुळे ,अशाच धाडसी, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या आपल्या स्त्रीशक्तीला यानिमित्ताने पुन्हा एकदा सलाम.