इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
केनियन ग्रीन बेल्ट चळवळीची प्रणेती : वंगारी मथाई
केनियासारख्या अत्यंत गरीब देशात वृक्ष चळवळ निर्माण करणाऱ्या आणि नोबल पुरस्कार प्राप्त वांगारी मथाई यांच्या जीवनाची कहाणी अतिशय खडतर आणि अनेकांना प्रेरणा देणारीच आहे.
केनिया आफ्रिकेतला अविकसित देश. एकेकाळी यादवीने उद्धवस्त झालेला देश. ब्रिटिशांच्या अंमलातून 1963 मध्ये केनिया स्वतंत्र झाला. त्या काळात संपूर्ण आफ्रिकेतील जनतेच्या मूलभूत अन्न, वस्त्र,निवारा या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. विकसित राष्ट्रांनी चालवलेलं शोषण, स्थानिक जमातींमधली भांडणं, लढाया, स्वार्थी संकुचित बुद्धीचे सत्ताधीश यामुळे संपूर्णअफ्रिका खंड भरडून निघाला होता. अन्नधान्याचा तुटवडा, पाण्याची टंचाई, केवळ पाणी आणि सरपण आणण्यासाठी लागणारे अतोनात कष्ट, उपोषण अशा अनेक समस्या तिथल्या स्त्रियांना भेडसावत होत्या. पण यातील बऱ्याच समस्यांचे मूळ हे बेछूटपणे केलेली वृक्षतोड आहे हे वंगारी मथाई यांच्या लक्षात आलं. प्रचंड प्रमाणात यशस्वीरित्या केलेलं वृक्षारोपण म्हंटलं की नोबेल पारितोषिक विजेत्या वंगारी मथाई यांचं नाव पहिले डोळ्यासमोर येतं.
वंगारीचा जन्म 1940 मध्ये किकुयु या जमातीत झाला. लहानपणापासूनच त्या अतिशय बुद्धिमान होत्या. किकुयू जमातीच्या श्रद्धा, परंपरा आणि लोककथा यांची त्यांच्या मनावर संस्कारक्षम वयात रुजवणूक झाली होती. या जमातीत मुलींना शिकविणे फारसे प्रचलित नसतानाही वंगारीच्या आईने मात्र त्यांना उत्तम शिक्षण दिले.1960 मध्ये बीएससी केल्यावर त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याद्वारे त्यांनी अमेरिकेत जीवशास्त्र विषयात एम एससी केलं. त्यानंतर 1971 मध्ये जर्मन विद्यापीठातून phd झाल्या. कदाचित एवढ्या उच्च शिक्षित त्या पहिल्याच आफ्रिकन महिला होत्या. शिवाय केनियाच्या विद्यापीठात प्राध्यापक झालेल्याही त्या पहिल्याच महिला होत्या. शिक्षण संपवून वंगारी केनियाला परतल्या तेव्हा केनियाचा बराचसा भूभाग वाळवंट झाला होता. जमिनी नापीक झाल्या होत्या. कुपोषणग्रस्त देश अशी लाजीरवाणी ओळख केनियाची निर्माण झाली होती. काम करायची तयारी होती, पण शेतीच नसल्यामुळे लोकांना काम नव्हते.
डॉ. वंगारी मुळातच बुद्धिमान, उच्च शिक्षण आणि परदेशी वास्तव्य यामुळे त्यांना आपल्या देशातली हलाखीची परिस्थिती अस्वस्थ करत असे. त्यांनी चिकित्सकपणे समस्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.तेव्हा असं लक्षात आलं की पारंपरिक शेती आणि जंगले यांची जागा विदेशी, नगदी पिकांनी घेतली होती. त्यामुळे जमिनीचे अतोनात नुकसान झाले होते. वंगारीने १९७७ मध्ये सुरू केलेल्या ग्रीन बेल्ट मूव्हमेंटने केनियामध्ये हरीत क्रांतीला सुरुवात झाली.त्यांनी एनवायरो नावाची संस्था स्थापन केली. सरकारी मदत आणि महिला गटांचा सक्रिय सहभाग याच्या सहाय्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात वनीकरणाचा कार्यक्रम आखला. या कार्यक्रमाचा गाभा होता,महिला गटांतर्फे चालवल्या जाणाऱ्या रोपवाटिका. डॉ.वंगारी यांच्या प्रभावी योजनेमुळे हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र म्हणजे युनो च्या नजरेत भरला आणि त्यानंतर त्यांना यूएनडीपी या विकास संस्थेतर्फे भरीव आर्थिक मदत मिळाली.
हळूहळू पूर्ण केनियामध्ये महिला गटांचं जाळं उभारलं गेलं. महिलांना रोपवाटिकांचं प्रशिक्षण दिलं गेलं. तयार झालेली रोपं या गटांनी योग्य ठिकाणी लावायची आणि त्याचं संगोपन करायचं ही यामागची संकल्पना होती. यातील जगणाऱ्या प्रत्येक झाडामागे ठराविक रक्कम युनोतर्फे या महिला गटांना मदत दिली जात असे. वंगारी यांची संवेदनक्षमता नेतृत्व यामुळे केनियामध्ये ही योजना सक्षमपणे राबवले गेली. त्यांच्या ग्रीन बेल्ट या संघटनेने सुमारे चार हजार महिला गट उभे केले आणि या गटांनी दोन कोटींहून जास्त झाडं वाढवली. हे वनीकरण म्हणजे वंगारी यांच्या कामाची फक्त सुरुवात होती.
ग्रीन बेल्ट चळवळीमुळे महिला कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली. ग्रामीण गरीब स्त्रिया संघटित आणि जागरूक झाल्या. वनीकरणाच्या कार्यक्रमातून मिळालेल्या तुटपुंज्या पैशांमधून महिला बचत करू लागल्या. त्यातून मधमाशीपालन, शेळीपालन यासारखे स्वयंरोजगार उभे राहिले. मोठ्या प्रमाणात झालेल्या वनीकरणामुळे मातीची धूप थांबली. झाडे वाढली तशी झाडांची मूळे माती धरून ठेवू लागली. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला. महिलांचे पाणी आणायचे कष्ट संपले. पुन्हा शेती सुरू झाली. केनिया पर्वताला किकुयू लोक देव मानत, तर अंजीराच्या झाडांना दैवी वृक्ष मानत असत. जमिनीची धूप थांबवणे आणि स्वच्छ पाण्याचे खळाळते प्रवाह पुन्हा मिळविण्यासाठी अंजिरासारखी झाडे लावल्यावर त्यांचा भर होता. त्यांच्या प्रयत्नांना पुढील दोन दशकांमध्ये यश आले.
1974 ते 1988 या काळात त्यांना कौटुंबिक आणि राजकीय क्षेत्रात विविध पातळ्यांवर लढा द्यावा लागला. त्याच काळात केनियात अनेकदा सत्तांतर झाले. त्यावेळी स्त्रियांच्याबाबतीत केनियन लोकांचे विचार अतिशय मागासलेले होते. स्त्रियांना कायम अडचणीत आणून मानसिक दृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केलं जात असे. वंगारी यांना खासदारकीची उमेदवारी नाकारण्यात आली. विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली परंतु, सगळ्यांना तोंड देत त्यांनी आपलं काम खंबीरपणे चालू ठेवलं. 1990 नंतर युरोप-अमेरिकेत त्यांचं काम माहीत झालं आणि त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि तेव्हा सत्ताधारी पक्षांकडून त्यांना होणारा त्रास कमी झाला.पु
रूषी म्हणून समजली जाणारी अनेक बुरुजे धडाधड पाडत त्यांनी पुन्हा संसदेमध्येदेखील प्रवेश मिळविला. या शतकातील अत्यंत प्रभावशाली महिला म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्या केनियाच्या लोकसभेवर निवडून आल्या आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी महिला सबलीकरण आणि वनीकरण या कामात उत्तुंग भरारी घेतली. आफ्रिकेमध्ये अनेक प्रकल्प ग्रीन बेल्ट चळवळी मार्फत सुरू झाले. 2004 मध्ये शांततेसाठी नोबेल मिळवणाऱ्या वंगारी या पहिल्या अफ्रिकन महिला ठरल्या. केनियामध्ये लोकशाहीची स्थापना स्थापना, महिला सबलीकरण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल त्यांना हे मानाचे पारितोषिक देण्यात आले.महिलांनी वंगारी यांनी पर्यावरण आणि महिलांचे प्रश्न या बाबतीत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं अनबोउड हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
पर्यावरण, वनीकरण आणि महिला सबलीकरण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला वंगारी मथाई यांच्या नावाचा पुरस्कार आणि वीस हजार डॉलर्स दिले जातात. 2011 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. केनियासारख्या अप्रगत, मागास देशात एका स्त्रीने घेतलेली ही भरारी खरोखरच स्तुत्य आहे.