निलीमकुमार खैरे : अनाथांचा नाथ
आपल्या आजूबाजूला असे फार कमी लोक असतात की ज्यांच्या संगतीत आपल्या चित्तप्रवृत्ती शांत होतात.अशी प्रकाशाची बेटं खरं तर दुर्मिळ असतात.त्यातलेच एक शांत ,संयमी व्यक्तिमत्त्व म्हणजे नीलिमकुमार खैरे. निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे यावर विश्वास ठेवून विविध प्राण्यांना आणि सर्पांना जीवदान देणारा हा अवलिया.भारतातील तृतीय क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिलं कात्रज सर्प उद्यान आणि प्राणी अनाथालयाचे ते संस्थापक. निलीमकुमार खैरे हे सर्पजीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ आहेत.
.निलीमकुमार सांगतात ,”७२ विषारी सापांच्या संगतीत ७२ तास हा विश्वविक्रम करताना ७२ सापांसोबत काचेच्या खोलीत जात असताना मी ‘माणसांचा प्रतिनिधी ‘म्हणून गेलो आणि बहात्तर तासांनी मी ‘सापांचा प्रतिनिधी’ बनून बाहेर आलो.” सर्वसामान्यतः सापांविषयी असणाऱ्या गैरसमजुती ,अंधश्रद्धा दूर करण्याचा एक प्रयत्न म्हणून 1980 मध्ये निलीमकुमार खैरे यांनी हा विश्वविक्रम केला आणि त्यानंतर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये तेथील स्थानिक लोकांना त्यांनी सर्पमित्र बनवलं. स्थानिक माणूसच सापांना जीवदान देऊ शकतो हे जाणून सर्पमित्रांना पुण्यात बोलवून प्रशिक्षण दिलं आणि आजपर्यंत जवळपास दोन हजार विद्यार्थी यातून घडले आहेत. वनखात्याच्या मदतीने भोंदू गारुड्यांवर कारवाई केली .त्यांच्याकडचे जखमी नाग जप्त केले आणि त्यांना बरं करून परत निसर्गात सोडलं. नागपंचमीला नागाच्या मुर्त्यांची पूजा व्हावी म्हणून स्वतः दहा हजार मूर्ती बनवून घेतल्या आणि त्या विनामूल्य वाटल्या. रस्त्यावर एखादा गारुडी साप घेऊन जाताना दिसला ही नागरिक त्यांना फोन करतात आणि त्यामुळे अनेक नागांचे जीव वाचले.
1982 पर्यंत गावोगाव जनजागृतीसाठी सोबत साप ठेवून ही भटकंती चालायची मग, जनजागृतीचं काम व्यापक व्हावं यासाठी सर्पोद्यान सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि पहिलं सर्पोद्यान 1985 मध्ये कात्रज येथे सुरू झालं. शासनाने देऊ केलेल्या स्मशानभूमीच्या जागेत हे सापांचं साम्राज्य उभारलं गेलं.वर्षाला सध्या 18 ते 19 लाख लोकं या सर्प उद्यानाला भेट देत असतात.अत्यंत विचारपूर्वक अशी ही वास्तू बांधण्यात आली आहे. उद्यानात अनेक जातीचे विषारी ,बिनविषारी साप आहेत .तिथे प्राणी संरक्षण याविषयी शिक्षण आणि प्रबोधन देखील केलं जातं. लोकांनी जखमी अथवा भरकटलेले प्राणी, पक्षी येथे आणून द्यायला सुरुवात केली. आणि मग अशा अनाथ प्राण्यांसाठी अनाथालयाची संकल्पना अस्तित्वात आली. पिंजरे बांधण्यात आले, प्राण्यांचे दवाखाने सुरू झाले.प्रत्येक प्राणी आला की त्याचा अभ्यास करावा लागायचा. दर वर्षी सरासरी 800 ते 900 प्राणी या अनाथाश्रमात येतात.अनाथालय सुरू होऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. जवळपास पंधरा हजार प्राणी या ठिकाणी हाताळले जातात. त्यांची सुश्रुषा केली जाते .त्यातील दहा टक्के प्राणी दगावले असं धरलं तरी इतर बरेच प्राणी बरे होतात आणि त्यानंतर त्यांना पुन्हा निसर्गात सोडलं जातं. कोल्ड्रिंगचे रिकामे कॅन नदीत किंवा समुद्रात फेकल्यामुळे अनेक प्राणी त्यात शिरून जखमी होतात. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सामाजिक संस्थांच्यासहाय्याने त्यांनी हे कॅन गोळा केले.असे पंचवीस पोती भरून कॅन मिळाले. आणि काही दिवस ती सर्पोद्यानात ठेवून लोकांना ते दाखवून त्यांच्याद्वारे प्रबोधन केले.
आजपर्यंत त्यांनी स्नेक, चंदूकाका, साप इत्यादी पुस्तकं तसेच स्नेक गाईड नावाची सीडी तयार केली आहे.यात मुलांना हिंदी ,इंग्रजी व मराठीतून सापांची सर्वांगीण माहिती मिळते.या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे. भारतात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांना स्वतः पैसे उभारावे लागतात.परंतु निलीमकुमार खैरे यांची तळमळ पाहून त्यांच्या पैशाच्या अडचणी सुटत गेल्या. भरपूर लोक भेटत गेले पण,पैशासाठी काम कधीही थांबले नाही.. त्यांचं अद्वितीय सर्पप्रेम पाहून सध्या सापाच्या एका दुर्मिळ प्रजातीला त्यांच्या नावावरून “खैरेई” हे नाव देण्यात आले आहे आणि हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.कारण हा बहुमान भारतातील हा फार कमी लोकांच्या वाट्याला आला आहे. या अवलियाने त्याचं संपूर्ण आयुष्य प्राणी आणि सर्प यांच्यासाठी वाहून दिलं आहे. त्यांनी सापाशी संबंधित अनेक दुर्मिळ पुस्तके मिळवून जास्तीत जास्त माहिती मिळवली. अभ्यासानंतर लक्षात आलं की 85% साप बिनविषारी असतात.त्यावर यशस्वी उपचार होतात. डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफी सारख्या वाहिन्या बघून युवकांमध्ये काही वेळेला प्राण्यांबद्दल चुकीच्या कल्पना तयार होतात. पण त्यामागे अनेक कष्ट तसेच तांत्रिक करामती असतात हे लोकांच्या लक्षात येत नाही. साहस म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी काहीजण स्वतःच्या घरी साप,घोरपडी तसेच विविध पक्षी ठेवतात .पण त्यांना सांभाळायचं कसं याचं प्रशिक्षण मात्र घेतलेलं असतं आणि मग त्यात या मुक्या जीवांचे हाल होतात.युवकांनी अशा फँटसीच्या मागे न लागता त्यापेक्षा आपली राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या या जैवविविधतेवर ,त्यांच्या समस्यांवर जास्तीत जास्त संशोधन करावं. भारताला लाभलेल्या सापांच्या विविध दुर्मीळ जाती हे भारताचे धन आहे असं समजून त्यांचा सांभाळ करायला हवं, त्यांचं संरक्षण करायला हवं. कारण निसर्गाच्या साखळीत ला हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कान्हा, बंदीपूर यासारखं एकही सुंदर जंगल महाराष्ट्रात नाही ही महाराष्ट्राची खंत आहे आणि युवा पिढी ते निर्माण करू शकते. त्यासाठी निसर्गातल्या प्रत्येक घटकावर प्रेम करूया .