इंडिया दर्पण विशेष – निसर्ग यात्री
रानवेडा ते संशोधक : कृष्णमेघ कुंटे
चाकोरीतल्या अपयशाने खचून न जाता, आजूबाजूच्या लोकांची कोणतीही भीडभाड न ठेवता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणाऱ्या लोकांबद्दल कायमच मनात एक कुतूहल असतं.त्यातलेच एक कृष्णमेघ कुंटे म्हणजे निसर्ग प्रेमाचा आगळा वेगळा अविष्कारच. आज याच अनोख्या अवलियाविषयी आपण जाणून घेणार आहोत…
कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे यांचा जन्म 1973 सालचा. नर्मदा परिक्रमांमुळे प्रसिद्धीस आलेले जगन्नाथ कुंटे हे कृष्णमेघ यांचे वडील.त्यांना लहानपणापासून निसर्गाची ओढ आणि वेड होतं .हे निसर्गाचे वेड एका टप्प्यावर इतकं हाताबाहेर गेलं की त्यांना अभ्यास करण्यात अजिबात रस वाटेना मग, कुठेतरी फुलपाखरू शोधत फिर, रात्री सिंहगडावर जाऊन साप-सरडे कोळी शोधत बस. असे उद्योग ते करत असत. आणि मग शेवटी महाविद्यालयात असताना परीक्षेत रसायनशास्त्र विषयात अनुत्तीर्ण झाले. त्यांच्या सुदैवाने ते वाया गेलेलं वर्ष त्यांना मधुमलाईच्या जंगलात प्राणी निरीक्षणासाठी घालवण्याची सुवर्णसंधी मिळाली. तसं जंगलप्रेम त्यांच्या मनात लहानपणापासून दडलेलं होतं. आणि मग आयतीच संधी मिळाल्यावर तर ते चांगलंच उफाळून आलं.
एक संपूर्ण ऋतूचक्र जंगलात काढायचं असं कृष्णमेघ यांचं लहानपणापासूनचं स्वप्न . त्यांना वाटायचं, उन्हाळ्यात सतत घाम गाळावा, पक्ष्यांची भरपूर घरटी शोधावी, जंगलाचं करूण, कठोर ,भकास रूप प्राण्यांच्या भूमिकेत शिरून अनुभवावं,पावसाळ्यात भरपूर चिंब भिजावं. हिवाळ्यात अहोरात्र हिंडावं, जग विसरून तारे बघावे, शिकारी पक्षी, रानकुत्री यांचे संसार बघावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी काही दिवसांसाठी जाऊन नवीन गोष्टी बघण्याचा प्रयत्न करावा. कृष्णमेघ यांना जंगल मनसोक्त अनुभवायचं होतं.शहरी संस्कृतीने लागलेले नीतिनियम, चौकटी ,वाईट सवयी सर्व झुगारून स्वच्छंदी जगायचं होतं. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण झाल्या. मिळालेलं संपूर्ण फावलं वर्ष ते जंगलात राहिले .फक्त निरीक्षकाच्या भूमिकेतच नाही तर एखाद्या स्थानिक रहिवाशासारखे. त्यांनी जंगलातले हत्ती, रानगवे, रानअस्वलं इत्यादी प्राण्यांचं मनसोक्त जीवन प्रत्यक्ष एखाद्या जंगलवासी याच्या भूमिकेतून पारखलं.त्याला कृष्णमेघ मधुमलाईच्या जंगलातली शोधयात्रा असं म्हणत. माझ्यामते कृष्णमेघ कुंटे हे खरे निसर्ग यात्री आहेत कारण निसर्गातले सुंदर, थरारक, तेवढेच रोमांचक अनुभव त्यांनी स्वतः त्यांच्या तरुण वयात मधुमलाई च्या जंगलात अनुभवले आणि त्यांच्या “एका रानवेड्याची शोधयात्रा” या पुस्तकाद्वारे इतर निसर्गप्रेमींच्या जंगल जाणीवा प्रगल्भ केल्या.
मधुमलाईच्या जंगलात जाताना तिथे गेल्यावर नक्की काय करायचं आहे हे त्यांना माहित नव्हतं पण इतर संशोधकांच्या सान्निध्यात त्यांना त्यांच्या निसर्गवेडाला करिअरची दिशा मिळाली. गोष्टी नुसत्याच बघत न राहता त्यावर विचार करून ,संशोधनाच्या दृष्टीने कसा अभ्यास करता येईल या दृष्टीने मग त्यांची वाटचाल सुरू झाली. मधुमलाईच्या जंगलातून परत असल्यावर मग त्यांनी देहरडूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेत एम एससी केलं आणि त्यात बऱ्यापैकी संशोधनाचा पाया पक्का झाला .त्यानंतर अन्नमलाई जंगलात फुलपाखरांवर त्यांनी संशोधन केलं. डॉक्टर माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं फुलपाखरांवर संशोधन सुरू झालं आणि मग पहिलं पुस्तक प्रकाशित झालं बटरफ्लाईज इन पेनिंसुलार इंडिया. त्यानंतर त्यांनी टेक्सास युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रिया येथे फुलपाखरांमधील उत्क्रांती वादावर पीएचडी केली. त्यांत त्यांनी प्रामुख्याने मादी फुलपाखरांमधील उत्क्रांतीचा अभ्यास केला. जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या सान्निध्यात निसर्ग अभ्यास करताना जग विस्तारत गेलं.
दृष्टी व्यापक होत गेली आणि एकेकाळचं जंगलवेड करियरमध्ये रूपांतरित झालं. आता ते त्यांच्यासारख्याच निसर्ग अभ्यासकांना संशोधनासाठी मार्गदर्शन करतात. अमेरिकन सोसायटी ऑफ नॅचरलिस्ट्स (ASN) ने भारतातील बंगलोर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञांना 2018 चा प्रतिष्ठित राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला.हा पुरस्कार मिळवणारे कृष्णमेघ कुंटे हे पहिले आशियाई संशोधक आहेत. एखाद्याच्या छंदाचे रूपांतर भविष्यात करियर मध्ये कसं होऊ शकतं याचं कृष्णमेघ म्हणजे आगळं वेगळं उदाहरण आहे .त्यामुळे ते म्हणतात आपला छंद शोधा ,आपलं वेड शोधा आणि त्याचा पाठपुरावा करा .याचं श्रेय काहीअंशी त्यांच्या आईवडिलांना ही दिले पाहिजे कारण कृष्णमेघच्या पालकांनी लहानपणीपासून त्याच्या या निसर्गवेडाला फुलवलं. त्यामुळेच कृष्णमेघ म्हणतात”ज्यावेळी घर आणि निसर्ग हे वेगळे न राहता एकरूप होतील त्यावेळेसचं जग बघायला मला नक्की आवडेल”.