इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
नागझिऱ्याचे किका : किरण पुरंदरे
संवाद माणसाला माणसाशी जोडतो पण, सध्या तंत्रज्ञानाच्या भाऊगर्दीत आपला एकमेकांसोबतचा संवाद हरवत चाललाय. मग त्यात निसर्गाशी संवाद ही तर खूप दूरची गोष्ट आहे. अशा या यंत्रवत धावत्या काळात किका मात्र पक्ष्यांशी गप्पा मारतात, झाडांशी संवाद साधतात, शहरांपेक्षा जंगलात रमतात. पक्षीमित्र निसर्गयात्री किरण पुरंदरे म्हणजेच आपले किका.
“हिरव्याकंच वळणवाटा आणि आजूबाजूला नसलेली मतलबी माणसं. असं वाटतं सगळं विसरून आयुष्य झोकून द्यायला निसर्गासारखं दुसरं रसायन नाही.” एक खराखुरा निसर्गप्रेमी माणूस.कविमनाचे, जंगलाविषयी अपार प्रेम असलेले, तिथल्या मातीशी एकरूप झालेले पक्षीवेडे किरण पुरंदरे,जे स्वतःला मुक्त निसर्ग शिक्षक म्हणून घेतात. किरण पुरंदरे यांचे बालपण कल्याण मध्ये गेलं. त्यानंतर भावंडांच्या शिक्षणासाठी 1972 साली संपूर्ण कुटुंब पुण्यात आलं.अभ्यासात विशेष हुशारी नसली तरी निसर्ग निरीक्षण मात्र जबरदस्त होतं. त्यावेळेला नदीत पोहायला जाणं ,भरपूर भटकणं हे चालूच होतं. ते म्हणतात ,”लहानपणी जर तळमळीचा एखादा निसर्गप्रेमी शिक्षक भेटला असता तर आयुष्य वेगळं असतं “.पण ,मग त्यांना निसर्गाची आवड कधी लागली ते कळलंच नाही आणि मग एकांतात निसर्गाच्या सोबतीने भटकंती सुरू झाली. सुदैवाने बीकॉम झाल्यानंतर वर्ल्ड वाईल्डलाइफ फेडरेशन या संस्थेमध्ये ते नोकरीला लागले. पक्ष्यांबद्दलचं कुतुहल त्यांना स्वस्थ बसू देईना. पक्षांचा अभ्यास म्हणजे संयमाची खरंतर परीक्षा असते. देशात १३ हजारांहून अधिक पक्षांच्या प्रजाती आहेत. त्यातील ५४० प्रजाती राज्यात आढळतात. कोतवाल, नीलपंखीसारखे पक्षी शेतकऱ्याचे मित्र आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. एकदा तर ते 51 तास एका ठिकाणी बसून होते. जंगलातल्या एखाद्या पाणवठ्यावर वेगवेगळे पक्षी, प्राणी कोणत्या वेळी कसे येतात याचं निरीक्षण करण्यासाठी आणि मग तेच त्यांचे निरीक्षण त्यांच्या” मुक्काम पोस्ट पाणवठा “या पुस्तकात त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. त्यांचा ” मुळाकाठचा धोबी”हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
किरण पुरंदरे यांचं वैशिष्ट्य म्हणजे. जवळपास शंभर पक्षांचे आणि 22 प्राण्यांचे आवाज ते सहज आणि हुबेहूब काढतात. त्यांच्या “रानगुंफी”या कार्यक्रमाचे अनेक प्रयोगही झाले आहेत. आणि प्रेक्षकदेखील त्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात.नागझिरा अभयारण्यात किरण पुरंदरे चारशे दिवस राहिले आणि तिथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. चारशे दिवसात पंधराशे किलोमीटर चालणं, बाराशे किलोमीटर सायकल चालवण, चार अंश ते सेहेचाळीस अंश तापमानात वावरणं, तिथल्या स्थानिक पशू पक्ष्यांच्या सारखंच जीवन जगणं, पावसाळ्यात कधीकधी अतिअल्प अन्नावर जगणं हे सर्व पुरंदरे करू शकले.ते म्हणतात ,”ती ताकत मिळते, ती माझ्या गुरूकडून म्हणजे निसर्गाकडून .निसर्ग हाच माझा गुरु आणि तेच माझे संस्कार .”या सर्व अनुभवांवर त्यांनी 744 पानांचा लिखाण केलं आणि मग पुस्तक तयार झालं “सखा नागझिरा”.शास्त्रीय माहितीची बैठक असलेलं तरीही वाचकाला खिळवून ठेवणारं ,जंगलविश्वाची प्रत्यक्ष अनुभूती देणारं हे अभयारण्यावरचं, त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसह मराठीतलं वाचनीय पुस्तक. सखा नागझिरा या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘सखा नागझिरा’ तील वास्तव्याचे, चित्तथरारक अनुभवांचे, बदलत्या ऋतूंचे, पाणवठ्यावरच्या निस्तब्ध रात्रींचे वर्णन वाचून आपण थक्क होतो. किरण पुरंदरे ह्यांचे पुस्तकं वाचताना, त्यांचं बोलणं ऐकताना, त्यांच्या सहवासात आपणही निसर्गाशी एकरूप होतो.पूरंदरे म्हणतात,” निसर्गाच्या सानिध्यात राहिलं की मन स्वच्छ होतं.शरीर कणखर होतं .सगळे विकार गळून पडतात. गरजा कमी होतात .मी फार काळ जंगलापासून दूर राहू शकत नाही. मला लवकरच निसर्गाच्या हाका ऐकू येऊ लागतात.”त्यांना जाणवलं की निसर्गाचे देणे स्वीकारायचं असेल तर आपल्यावरची खोटी पुटं काढून कृत्रिमपणाचा मुखवटा काढावा लागतो.झाडापानांशी,दगडधोंड्यांशी, मातीशी,पशुपक्ष्यांशी एकजीव व्हावं लागतं.थोडक्यात “तुम्हाला माणूस व्हावं लागतं”.निसर्ग साधना केल्यावर निसर्ग आपली गुपित मुक्तहस्ताने उधळतो आणि तो अनुभव अविस्मरणीय असतो.गोंदिया जिल्ह्यातल्या नागझीराच्या जंगलात त्यांनी चारशे दिवस काढले आणि त्यांचे आयुष्य तिथे पूर्णतः बदलले. तोपर्यंत एखादा सुंदर पक्षी किंवा निसर्गाविष्कार पाहिला तर चार-चौघांसारखं तेही भारावून जायचे. पण जंगलालाही दुःखाची झालर असते ते त्यांना जाणवलं नागझिरामध्ये. तिथे निसर्गावर होणारे आघात त्यांनी पाहिले. करंगळी एवढ्या बिडीसाठी उभ्या जंगलाला लागलेल्या भयंकर आगी पाहिल्या. कोणीतरी पाण्यात विष कालवलं त्यामुळे पाणवठ्यावर हाल हाल होऊन मरणारे प्राणी आणि पक्षी पाहिले.हिरव्याकंच रसरशीत बांबूवर सपासप वार होताना पाहिले.
बांबू चोरांच्या टोळधाड पाहिल्या. अठरा विश्व दारिद्रयामध्ये राहणारे हे आदिवासी कधी यातून बाहेर येणार असं त्यांना वाटू लागलं. सुरुवातीला ते निसर्गसौंदर्याचे मुसाफिर होते. रानावनात होणारे अत्याचार पाहिले आणि कमालीचे अस्वस्थ झाले.खाडकन जमिनीवर आले. सुरुवातीला निसर्ग निरीक्षण किंवा विविध शिबिरं याद्वारे लोकांना निसर्गाची एकच बाजू दाखवून आपला उदरनिर्वाह करण किती चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग स्वतःलाच प्रश्न विचारला की आपण नुसतं हे सगळं कोरडेपणाने बघत राहायचं का आणि तरीही स्वतःला निसर्गप्रेमी म्हणून घ्यायचं का ? आणि मग निर्णय घेतला की ह्यापुढे निसर्ग संरक्षणासाठी आपल्याला जमेल तेवढं काम करायचं .कामाची सुरुवात त्यांनी नागझिरा अभयारण्याच्या सीमेवरच्या पिटेझरी या गावापासून केली. तिथे गावात जाऊन तिथल्या लोकांबरोबर राहून या गावासाठी काय काय कामं करायची आहेत याची एक यादी बनवली.
कारण जंगलाच्या आसपास, जंगलातल्या संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना जोपर्यंत दुसरं काही उपजीविकेचं साधन उपलब्ध होणार नाही तोपर्यंत त्यांचं जंगलावरचे अवलंबित्व कमी होणार नाही.पुरंदरे यांनी नागझिरा जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या साह्याने जंगलातील पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पर्यावरणस्नेही पाणवठ्यांची निर्मिती जागोजागी करत वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ह्या काळात आदिवासी मुलांना शिकवण्याचे कामही त्यांनी केले.मग पर्यायी इंधनासाठी वृक्षारोपण ,अभ्यास गटांच्या विविध यशस्वी गावांच्या सहली, वनौषधी संवर्धन, वाहनांखाली मरणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण ,अभयारण्यात मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यास शिबीर, मशरूमची शेती,गांडूळ खत प्रकल्प,गावातल्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट अशा अनेक योजनांवर काम करायला सुरुवात केली. हे सर्व करत असताना नागझिऱ्याचे सौंदर्य,तिथले प्राणी पक्षी सोबत होतेच.
प्रत्येक निसर्गप्रेमीने नुसताच निसर्ग न पाहता, जंगलाचे मूळ रहिवासी म्हणजे तिथले आदिवासी यांच्या समस्या काय आहेत हेही कधीतरी ऐकायला हवं .आपण आपल्या कल्पना त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांचं ऐकुया. ही वाट नक्कीच अवघड आहे. किरण पुरंदरे यांनी तेच केलं आजही ते त्यांच्या पत्नीसह आनंदाने तिथे राहतात.या वाटेवरचा प्रवास लांबचा आहे पण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात होणं महत्वाचं असतं. पाया रचला गेला तरच कळस उभा राहतो.तरुणांना या क्षेत्रात कदाचित पैसे कमी मिळतील पण,आनंद मात्र अपरिमित मिळेल.
किका म्हणतात, “माझं निसर्ग चिंतन वाचून जर फुललेली झाडं, पाहिलेला नवीन पक्षी, मोरीतला बेडूक, कोनाड्यातला कोळी, घरात आलेला नवीन किडा, पहिला पाऊस,टेकडीवरचा गार वारा, पहाटेची गुलाबी थंडी, आकाशातले ढग,इंद्रधनुष्य, बरसणारा पाऊस याविषयी घराघरात जेवणाच्या टेबलावर चर्चा होऊ लागली तरच ते माझं श्रेय! मला खूप आनंद होईल.”
चला तर,मग निसर्गाशी संवाद साधुया.
निसर्गाबद्दलचा संवाद वाढवूया.
तिथल्या मूळ रहिवाशांशी संवाद साधुया …त्यांचं जगणं सुकर करूया.