इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री –
सुबत्तेकडून …..समाधानाकडे कातालीना आणि ब्लाँका
” पुनर्जन्म असतो की नाही हे आम्हाला ठाऊक नाही पण असला तर मागच्या जन्मी आम्ही निश्चित भारतीय असणार. त्याशिवाय का आम्हाला या देशाविषयी इतकी आपुलकी वाटते ?”असं काता आणि ब्लाँका विचारतात. भारतीय संस्कृतीला जगात तोड नाही .आपला देश निसर्गसंपन्न तर आहेच.पण त्याला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदाचा आणि योगाचा उगम आपल्या देशात झाला आहे. ऋषिमुनींपासून शास्त्रज्ञापर्यंत भारताची कीर्ती जगतमान्य आहे. आपल्याला आपण भारतीय आहोत याचा अभिमान असलाच पाहिजे.पण आपल्या भारतीय संस्कृतीविषयी, भारतीय जीवनपद्धतीविषयी तितकीच आपुलकी या दोन विदेशी तरुणींनाही वाटते.
अत्यंत उच्च स्तरावरची युरोपीय जीवनशैली जगणाऱ्या या दोघी गेली अनेक वर्ष भारतात साधेपणाने निसर्गस्नेही जीवनशैली जगत आहेत. भारतातल्या निसर्गाची ही किमयाच म्हणावी लागेल. निसर्गातील घटकांचं संवर्धन किंवा रक्षण करणे हा एक भाग पण , स्वतः निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारून निसर्गाच्या म्हणजेच पर्यायाने जीवनाच्या जास्तीतजास्त जवळ जाणारी ही मंडळी. युरोपात वाढलेल्या, युरोपीय जीवनशैली जगणाऱ्या या दोघींच्या जीवनामध्ये इतकं अमूलाग्र परिवर्तन कसं झालं ?त्यांची राहणी कशी बदलत गेली? याबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोत. काताचं पूर्ण नाव कातालीना. ती आणि ब्लांका या दोघी मूळच्या दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या देशातल्या.काताने रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच संगणक आणि तांत्रिक प्रकल्पांचा व्यवस्थापन ह्यातल्या ही पदव्या प्राप्त केल्या आहेत.त्यानंतर तिने युएस आणि फ्रान्समध्ये अनेक नामांकित उद्योगांमध्ये नोकऱ्या केल्या. युरोपात काम करत असताना दिवसाचे अनेक तास प्रकल्प समन्वयक म्हणून रोज युरोपभर प्रवास करावा लागायचा आणि त्यामुळे जीवनशैली ही उच्चस्तरीय व्यवस्थापकाची होती. कधी नाश्ता मीलानमध्ये, दुपारचं जेवण अमस्टरडॅममध्ये आणि रात्रीचे जेवण लंडनमध्ये असंही व्हायचं. पुन्हा शनिवार रविवारी घरी येऊन सुटकेस नवीन कपड्यांनी भरून घ्यायची.
भरपूर पगार मिळायचा. अफाट खर्च करायचा. उंची वस्तू खरेदी करायच्या हाच दिनक्रम असायचा. पण, कामाच्या असंख्य जबाबदाऱ्या, धावपळ, दगदगीचा अखेर मनावर आणि शरीरावर प्रचंड ताण येत असे आणि त्यामुळे साहजिकच आरोग्य खालावलं. स्थूलपणा, त्वचाविकार, श्वसनाचे आजार इत्यादी व्याधींनी ग्रासलं.प्रचंड धुम्रपान सुरू झालं. एक यशस्वी व्यवस्थापक असल्याने कितीही त्रास होत असला तरी मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. 15 वर्ष याच स्थितीत गेले. आणि मग त्यातून बाहेर पडायला मदत केली ब्लाँकाने. ब्लाँकाला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी पैसे हवेत म्हणून अनेक कामं तिने केले त्यामुळे तिला कमीत कमी पैशात जगण्याची सवय लागली होती.त्यांच्या आयुष्याला वळण लागलं ते एका आल्प्स पर्वतात असलेला रानभाज्यासंबंधीच्या कार्यशाळेने.त्या दोघी या कार्यशाळेत सहभागी झाल्या.
रानभाज्यांपासून चविष्ट भाज्या, कोशिंबिरी, चटण्या असे विविध पदार्थ कसे बनवायचे हे तिथे शिकवलं. त्या दोघींसाठी ही कार्यशाळा म्हणजे जिवनशाळाच ठरली. कमीतकमी साधनांच्या आधारे कसं जगता येतं याचा अनुभव तिथे रोज मिळत होता. नैसर्गिक साधनं वापरून जीवन जगणं हा या कार्यशाळेचा मोठा होता आणि आपल्याला असेही कोणत्याही ताण तणावाशिवाय जगता येऊ शकतं हा साक्षात्कार या दोघींना इथे झाला. सभोवती निसर्गातच अन्न आहे , ते पुरेसे आणि पौष्टिक आहे .त्यासाठी इतकं वणवण भटकायची गरज नाही हे त्यांना जाणवलं. हा पंधरा दिवसाचा अनुभव त्यांना आंतरबाह्य हेलावून टाकणारा होता. यादरम्यान त्यांना मग भाज्यांचे विविध प्रकार बनवण्याचा जणू नादच लागला.विविध प्रकारच्या रानभाज्यापासून विविध मुरंबे,कोशिंबिरी इ.अनेक प्रयोग त्यांनी केले आणि अखेर दोघींनी नोकरीला रामराम ठोकला.
फ्रान्समधील एका कला विद्यालयात प्रवेश घेऊन अनेक रानभाज्या वापरून नवनवीन रेसिपी तयार करू लागल्या. ताण तणावरहित,समाधानी आणि शांत दिनचर्येने काही महिन्यातच त्यांना त्यांच्या प्रकृती मध्ये आश्चर्यकारकरित्या सुधारणा दिसू लागली. भारतातल्या निसर्गस्नेही जीवनशैलीतबद्दल त्यांना कायम कुतूहल आणि आकर्षण होतं.इथल्या मिश्र संस्कृतीतून त्यांना बरंच काही शिकता येईल ,वेगळ काहीतरी करता येईल असं वाटणारा हा एकच एकमेव देश होता. सुरुवातीला सहा महिन्यांच्या पर्यटक व्हिसावर आलेल्या या दोघी नंतर कायमच्या भारतातल्या झाल्या. भारत त्यांना आपलासा वाटू लागला. भारतात त्या थेट लडाखमध्ये गेल्या. तिथल्या लोकांची निसर्गस्नेही जीवनशैली आणि तेथील स्थानिक महिलांकडून रानभाज्या आणि त्यांच्या पाककृती त्यांनी शिकून घेतल्या. ब्लांकाने एका वहीमध्ये हर्बेरियम केले. प्रत्येक नवीन वनस्पतीचे नमुने एका वहीत चिटकवून त्याचं स्थानिक नाव ,त्याचे शास्त्रीय नाव आणि त्यांचे औषधी उपयोग ती लिहून ठेवते. भारतात आल्यावर चार महिन्यातच त्यांना विपष्यना शिबिराबद्दल समजलं.विपश्यना शिबीराने त्यांचं आयुष्य आणखी बदललं.हळूहळू त्यांची जीवनदृष्टी बदलली. पुण्यात त्यांनी अय्यंगार योग शिकून घेतला आणि तिथे त्यांची ओळख झाली डॉक्टर निखील मेहता यांची. जे आयुर्वेदाचे उपचार करतात.
आयुर्वेद ही जीवनशैली आहे आणि त्यानुसार दिनचर्या आणि ऋतुचर्या याविषयीची मार्गदर्शक तत्व पाळल्यास आरोग्यप्राप्ती होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी आयुर्वेदाची ओळख करून देणारा एक अभ्यास वर्ग केला.लवकरच त्यांना त्यांचं स्वतःवरचे नियंत्रण वाढल्याचे लक्षात आले. विशेषतः भारतीय आहारातले अनेक संतुलित रस याबद्दल त्यांनी विशेष अभ्यास सूरु केला. दोन गाई पाळल्या. त्यांचा प्रेमाने सांभाळ केला. त्यांच्यासाठी लडाख ही निसर्गस्नेही जीवनाची पाठशाळा झाली. कारण घरात फक्त पिवळे दिवे बाहेर मिट्ट काळोख .पॅरिसमध्ये पंधरा वर्षे राहिलेल्या या दोघी याही स्थितीत आनंदात राहात होत्या. ओवन शिवाय त्या केक, ब्रेड, पिझ्झा करायला शिकल्या. फ्रिज शिवाय दूध, दही, लोणी करायला शिकल्या .मांसाहार तर बंद झाला. टॉयलेट पेपर ची जागा पाण्याच्या बाटलीच्या फवाऱ्याने घेतली. मलमूत्रपासून सोनखत बनवायला शिकल्या. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापरायला शिकल्या. जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तू आणि साधनं त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनली.
घरगुती साबण, तेल ,दात घासण्यासाठी राखुंडी इ. वस्तू त्यांच्या जीवनाचा भाग बनल्या. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर बंद झाला. निसर्गाशी एकरूप होऊन कसं जगायचं हे त्या लडाखमधल्या लोकांकडून शिकल्या.पूर्वीही लोक असं निसर्गस्नेहीच जगत असत पण,वाढत्या बाजारपेठांनी ही कौशल्य संपवली आणि आपल्याला परस्वाधीन बनवलं. पैसे कमवायचे आणि हे सगळं विकत घ्यायचं यातून आपण पैसे कमावणारे यंत्र बनलो आहोत.सुखं मिळाली पण मानसिक शांती आणि समाधान गेलं आजही त्या दोघी जिथे असतील तिथे ध्यानधारणा करतात.आयुर्वेदा लाइफस्टाइल आणि फ्युजन कुकिंग या विषयावर त्या इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेमध्ये कार्यशाळा घेतात. त्यांची स्वतःची संकेतस्थळ आहेत. आता त्यांची मतं बदलली आहेत . त्यांना अर्थार्जनासाठी जगायला फारसे पैसे लागतच नाही.कारण त्यांच्या कार्यशाळा निशुल्क असतात. कार्यशाळे नंतर तुम्ही पेटी दान टाकायचं.
ब्लाँका भाषांतर करते. त्याचे तिला पैसे मिळतात .अन्न, पाणी ,निवारा, वस्त्र या मुलभूत गरजा भागवायला किती पैसे लागतात,असं त्यांना वाटतं.पंधरा वर्षे प्रत्येक दिवशी विमानाने उभा-आडवा युरोप फिरणारी एक बाई हे बोलते हे खरं वाटत नाही. माणूस इतका कसा बदलू शकतो हे वास्तव खरोखर कल्पनेपेक्षाही अविश्वसनीय आहे. पण ,परिवर्तनाचा निर्धार असेल तर व्यक्तीमध्ये अमुलाग्र बदल घडू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे काताआणि ब्लाँका. योग्य जीवनदृष्टी मिळाली का हे परिवर्तन अवघड न राहता सुलभ होतं. जीवन समृद्ध होतं.विकसित होतं. कारण जीवनशैलीत हे परिवर्तन हे निसर्गस्नेही जीवनशैलीमुळे विनासायास मिळणार आहे पण, हे जर भारताबाहेरील लोकांना पटतंय तर आपण का बरं अजूनही विदेशी जीवनशैलीच्या मागे आहोत.याचा जरूर विचार व्हायला हवं नाहीतर असं म्हणायची वेळ येईल की,” तुज आहे तुजपाशी….…”.