इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
अमेरिकेतील अभयारण्याचा जनक : जॉन म्यूर
“ही सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे असे मानणे म्हणजे वेडेपणा. माणूस नसेल तर हे विश्व जेवढे अपूर्ण आहे तेवढेच एखादा कीटक नसेल तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना ईश्वराने सर्वांसाठी केली आहे तेव्हा, तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या हीच या विश्वाची संकल्पना आहे. या अफाट पृथ्वीवर अनेक घनदाट जंगलं आहेत. विविध पशुपक्षी आहेत.डोंगर-दऱ्या आहेत. कोसळणारे धबधबे आहेत.परमेश्वराने दिलेली ही निसर्गसंपन्न अशी पृथ्वी आणि नैसर्गिकसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे.”ही तळमळ आहे अमेरिकन निसर्ग मित्र जॉन म्यूर याची.
अमेरिकेतील समृद्ध जंगलसंपत्ती नष्ट होऊ नये म्हणून निसर्गवेड्या जॉन म्यूर यांनी आयुष्यभर अथक कष्ट केले आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे अमेरिकेत जागोजागी नॅशनल पार्क्सची निर्मिती झाली. जॉन म्यूर हे एक शेतकरी,मेंढपाळ, निसर्गवादी, संशोधक, लेखक आणि निसर्गसंवर्धक होते. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1838 रोजी डनबार, स्कॉटलंड येथे झाला. डॅनियल आणि आणि एनी म्यूर यांच्या सात अपत्यांपैकी हा एक. लहानपणी आजोबांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर जावं,शंख शिंपले गोळा करावे, हिरव्यागार रानातून भटकत पक्षी पहावे, पक्ष्यांची गाणी ऐकावी, फुलपाखरु पकडावे हा छंद त्याला लागला आणि तेव्हापासूनच मग निसर्ग निरीक्षणाची आणि भटकंतीची आवड लागली.त्यांचं प्राथमिक शिक्षण एका छोट्याशा गावातील शाळेत झालं.
म्युरचे वडील अत्यंत कठोर शिस्तीचे होते. जॉन आणि त्यांच्या भावंडांना पहाटपासून संध्याकाळ पर्यंत शेतात कष्ट करावे लागत असत. यातून सुटका व्हावी असं त्यांना फार वाटत असे. नवनवीन गोष्टी शिकाव्यात, ज्ञान मिळवावं, संशोधन करावं असं त्याला सारखं वाटत असे. दोन वेळच्या जेवणासाठी इतके कष्ट का उपसायचे हा प्रश्न त्यांच्या मनात राहून राहून येत असे. मग आपल्यात आणि जनावरांमध्ये काय फरक आहे? आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे या सततच्या विचारांनी जॉन भंडावून जात असे. वडिलांच्या कडक शिस्तीत आणि रोजच्या कष्टमय जीवनात त्यांची सगळी कल्पनाशक्ती, त्यांच्या इच्छा-आकांक्षा लहानपणीच मारल्या जात होत्या. पण जॉनची निरीक्षण शक्ती अफाट होती.लहानपणी च त्यांनी अनेक उपकरणे स्वतः बनवली जसे स्वयंचलित गिरणी, थर्मामीटर, बॅरोमीटर,गजराचं घड्याळ इत्यादी.
जॉनने आपले शोध मेडिसन इथल्या एका मेळाव्यात नेले आणि तिथे अनेक बक्षिसं जिंकली.पण,दुर्दैवाने एका गॅरेजमध्ये काम करत असताना जॉनच्या डोळ्याला दुखापत झाली आणि त्याचं आयुष्य तिथून बदललं. त्यानंतर त्यांनी भटकंती सुरू केली. जॉन इंडियनपोलपासून मेक्सिकोच्या आखातापर्यंत 1000 मैल चालत सुटला. तिथून तो क्युबाला गेला. तिथून इस्थमस आणि नंतर वेस्ट कोस्टवरुन सॅन फ्रान्सिस्कोला गेला. आणि असं करत तो जगभर फिरला. फिरता फिरता निसर्गाचे अद्भुत चमत्कार पहात होता. या भटकंतीत पाहिलेल्या ठिकाणांची वर्णन लिहून ठेवण्याची त्याला सवय होती. निरनिराळे प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे स्वभाव, जंगलं, प्राणी-पक्षी सगळ्यांची टिपणं त्यांच्या डायरीत असत.त्यात सगळ्यात सुंदर भासली ती योसेमिटी व्हॅली आणि तीच पुढे त्यांची कर्मभूमी बनली. जॉन सियारा पर्वतरांगांमधून दिसणाऱ्या हिमनद्यांचे अभ्यासपूर्वक निरीक्षण करत असत.
हिमनद्यांची निर्मिती कशी होते याबाबत त्यांनी सखोल संशोधन केलं आणि मग सिद्धांत मांडला की हिमनद्या या कधीच स्थिर नसतात. त्या अतिमंद गतीने सरकत असतात. हिमनद्यांच्या लाखो वर्षांच्या घर्षणाने जमीन कापली जाऊन नंतर त्यातून नद्या, तळी, सरोवरे,दऱ्या आणि सागर निर्माण होतात. जसजसं पृथ्वीचं तापमान वाढलं तसतशा हिमनद्या वितळल्या आणि नाहीशा झाल्या. अत्यंत थंड प्रदेशात त्यांचे अस्तित्व अजूनही टिकून आहे. आणि मग त्यांच्या’स्टडीज इन द सिएरा’ नावाच्या लेखमालेने त्यांनी एक यशस्वी लेखक म्हणून कारकीर्द सुरू केली. हिमनद्यांनंतर सिकोया वृक्षांच्या अभ्यासासाठी जॉन पुढील भटकंतीला निघाला .त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की रोजच्यारोज अनेक वृक्ष लाकडाच्या ओंडक्यांसाठी कापले जात आहेत.
निसर्गाला ,नैसर्गिक संपत्तीला ओरबाडलं जातंय हे पाहून त्यांचं मन विषणणं झालं. पण फक्त लेख लिहून किंवा भाषणं देऊन प्रश्न सुटणार नव्हता. या लुटमारीला आळा घालण्यासाठी कायद्याचा बडगाच हवा हे त्यांना जाणवलं. आणि मग ही जंगलं अभयारण्य म्हणजेच नॅशनल पार्क्स बनायला हवीत या विचाराने त्यांना झपाटलं.सेंचुरी मासिकातून योमेसिटीचं वैभव, तसेच योमेसिटी नॅशनल पार्क योजना हा विस्तृत लेख प्रकाशीत केला.लोकांना लेख आवडले आणि नॅशनल पार्क च्या बाजूने जनमत तयार झाले.आणि लवकरच योमेसिटी नॅशनल पार्क आणि सिकोया नॅशनल पार्क ची कायद्याने स्थापना झाली. आपण निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने भरीव कामगिरी करू शकतो हा आत्मविश्वास आल्यानंतर इतर निसर्गप्रेमींना सोबत घेऊन सिएरा कलबची स्थापना झाली. त्यांच्या कामाने प्रभावीत होऊन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनीदेखील जॉनसोबत एकांतात चार दिवस योमेसिटीत भटकंती केली. निसर्गाची अनुभूती घेतली. आणि नंतर जॉनच्या मतांशी सहमत होऊन कित्येक एकर जंगलं अभयारण्यात समाविष्ट केली.
दरम्यान त्यांचं My first summer in the Sierra हे अद्भुत आणि रोमांचकारी प्रवासावरील पुस्तक प्रकाशित झालं. सिएरा क्लब आजही अस्तित्वात आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व त्यांनी अमेरिकन जनतेला आयुष्यभर पटवून देण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव अमेरिकन सरकारने आणि जनतेने अनेक प्रकारे केला. अनेक निसर्ग स्थळांना त्यांचं नाव दिलं गेलं आहे जसे म्यूर माउंटन, म्यूर ट्रेल, म्यूर लेक,म्यूर रेडवूड फॉरेस्ट,म्यूर ग्लेशियर.या निसर्गस्थानांच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राखल्या आहेत. त्यांच्या नावाचं पोस्टाचे तिकीट काढले आहे. जॉन म्यूर यांच्या मनात पदवी शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत कायम होती. परंतु पुढील आयुष्यात त्यांच्या कार्याचा आणि लेखनाचा गौरव अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या देऊन केला. हार्वर्ड विद्यापीठाने, विस्कॉन्सिन विद्यापीठाने आणि येल विद्यापीठाने त्यांचा यथोचित सन्मान केला.
जपानचा रोझो अझुमा हा जॉन म्युर यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्याप्रमाणेच जपान मध्ये पर्यावरण आणि निसर्गासाठी भरीव कामगिरी करत आहे. त्याला जपानचा जॉन म्यूर या नावानेच ओळखलं जातं.21 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस जॉन म्यूर दिवस म्हणून कॅलिफोर्निया राज्यात साजरा केला जातो. हेचिहेची हे धरण होऊ नये म्हणून जॉनने खूप प्रयत्न केले परंतु, अखेर सरकारने ते धरण बांधण्यास परवानगी दिली. या निर्णयाचा त्यांना जबर धक्का बसला आणि लवकरच 24 डिसेंबर1914 ला त्यांचं निधन झालं. योमेसिटी व्हॅलीतील पाना फुलातून, खळाळणाऱ्या अवखळ झऱ्यातून, कोसळत्या धबधब्यातून,बर्फाच्छादित गिरीशिखरांवरुन जॉन म्यूरचा आत्मा आजही नक्कीच विहरत असेल.
जॉनच्या म्हणण्यानुसार निसर्गाचं हे परमपवित्र मंदिर ज्या स्वरूपात मागील पिढ्यांनी तुम्हाला दिलं आहे तशाच स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत ते पोचवणं तुमचं कर्तव्य आहे. माणसाची हाव अमर्याद आहे. तात्पुरत्या लाभावर नजर ठेवून माणूस स्वतःचंच खूप नुकसान करून घेतो. मित्रांनो,खरं समाधान, सुख आणि खरा आनंद निसर्गाच्या सानिध्यात असतो. रानावनात जा. तुमचं खरं विश्रांतिस्थान तिथे आहे. तुम्ही निसर्गाजवळ याल तर निसर्ग तुम्हाला शांती देईल. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश पानापानातून झिरपत झिरपत झाडांना संजीवनी देतो, त्याप्रमाणे तुमच्यात निसर्गातील शांती आणि तृप्ती तुमच्यात झिरपत जाईल. झुळझुळणारे वाहणारे झरे, गाणारे पक्षी तुमच्या जीवनात संगीत निर्माण करतील. कुरणावर, गवतात फुललेली चिमुकली फुलं तुमचं आयुष्य सुगंधित करतील. परमेश्वराने आपल्याला अत्यंत उदार हाताने अपार वनसंपत्ती दिली आहे. तिचा हा निसर्गठेवा विश्वस्त म्हणून जतन करूया आणि पुढच्या पिढ्यांच्या हाती सोपवू या.