आईस मॅन ऑफ इंडिया : चेवांग नोर्फेल
लडाख म्हणजे भरपूर निसर्गसौंदर्य ,निळेशार पर्वत ,हिरवागार गवताळ प्रदेश .परमेश्वराने भरभरून सौंदर्य या ठिकाणाला दिलं आहे. त्यामुळे पर्यटकांचे देखील हे पर्यटनासाठी आवडतं ठिकाण मानलं जातं .पण, तिथल्या स्थानिक लोकांच्या समस्या आपल्यासारख्या कधीतरी भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही. लडाखमधील थंड, कोरडी हवा आणि नापीक जमीन त्यांचे जीवन आपल्या कल्पनेपेक्षा जगण्यासाठी कठीण बनवते. लडाखचे सुंदर पर्वत पर्यटकांसाठी नंदनवन असू शकतात, परंतु स्थानिकांना मात्र दरवर्षी त्यांच्या मूलभूत पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चेवांग नॉरफेल या स्थापत्य अभियंत्याने आपले अभियांत्रिकी कौशल्य वापरले आणि या थंड, कोरड्या डोंगराळ प्रदेशात पाणी देण्यासाठी कृत्रिम हिमनद्या तयार केल्या. आज त्यांच्याच कार्याला आपण उजाळा देणार आहोत…

मो. 9423932203
हिमनद्या म्हणजे बर्फाच्या नद्या .1936 मध्ये जन्मलेले, नॉरफेल हे शेतीच्या पार्श्वभूमीतून आलेले. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा अडचणींवर मात करून त्यावर उपाय शोधण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते .चेवांग नोर्फेल या अभियंत्याने त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर या समस्येवर तोडगा काढला. सुरुवातीला लोकांनी त्यांची टिंगल टवाळी केली. वेडा म्हणूनही संबोधले .पण, नोर्फेल म्हणतात त्याप्रमाणे,” तुमचा दृढनिश्चय आणि समर्पण असेल तर जगात काहीही अशक्य नाही”. गोठलेल्या हिमनद्या ही लडाखची मुख्य समस्या आहे.लडाखमध्ये फार क्वचित पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी हिमनदीच्या वितळलेल्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. तिथले 80 टक्के रहिवासी हे शेतीवर अवलंबून असल्याने ते पावसासाठी जून महिन्याची वाट बघत बसतात.
एप्रिल-मेमध्ये पेरणीच्यावेळी पाण्याची कमतरता ही त्यांची सर्वात मोठी समस्या .कारण हिमनद्यांचे प्रवाह गोठलेले असतात. लडाखमध्ये हिवाळा तीव्र असल्याने हिवाळी पिके घेता येत नाही .पेरणीच्या हंगामामध्ये पाणी वाया जातं. कारण पाच हजार फूट उंचीवर आणि गावांपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नैसर्गिक हिमनद्या जून नंतरच वितळतात .हिमनद्या कधी वितळतील आणि केव्हा पाणी उपलब्ध होईल याची आतुरतेने ही मंडळी वाट बघतात .गावकऱ्यांची ही अवस्था नोर्फेल यांना बघवली नाही आणि त्यांना कृत्रिम हिमनदयांची कल्पना सुचली. कमी उंचीवर हिमनद्या असतील तर तुलनेने त्या जास्त तापमानामुळे लवकर वितळतील,हे त्यांच्या लक्षात आलं. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा आणि मनुष्यबळाचा उपयोग करून त्यांनी ऊमला येथे पहिला 500 फूट लांबीचा हिमनदी प्रकल्प पूर्ण केला.
हिवाळ्यात पाणी गोठू नये आणि नळ फुटू नये म्हणून नळ उघडे ठेवले जातात तेव्हा त्यातून टपकणाऱ्या पाण्याकडे पाहून त्यांच्या जिज्ञासू मेंदूला ही कल्पना सुचली. आता कृती करण्याची वेळ आली होती आणि त्यांनी आपले सर्व अभियांत्रिकी ज्ञान, या क्षेत्रातील अनुभव आणि आवड या कामासाठी लावली. फुकटे गावात त्यांनी पहिला प्रयोग सुरू केला. कृत्रिम हिमनद्या 18,000 फुटांवर असलेल्या मूळ हिमनद्यांच्या तुलनेत 13,000 फूट कमी उंचीवर असल्यामुळे, ते मुख्य प्रवाहापेक्षा लवकर वितळू लागतात आणि एप्रिलमध्ये गावकऱ्यांना सर्वात जास्त गरज असताना पाणी पुरवतात.
कृत्रिम हिमनदी तयार करण्यासाठी वापरलेले मुख्य तंत्र म्हणजे शक्य तितक्या पाण्याचा वेग नियंत्रित करणे. हा प्रदेश डोंगराळ आहे आणि त्यामुळेच प्रवाहांचा उतार खूपच उंच आहे. परिणामी, मुख्य प्रवाहांमध्ये पाणी सहसा गोठत नाही. हिमनदीचे पाणी सूर्यप्रकाशापासून झाकलेल्या पर्वताच्या सावलीच्या भागात वळवले जाते. ज्या ठिकाणी पाणी साठते त्या डिप्रेशनच्या काठावर अर्धा-इंच-रुंद लोखंडी पाईप्स लावले जातात.पाईपमध्ये शिरल्यानंतर पाणी गोठते. जसजसे अधिक पाणी आत जाते तसतसे ते गोठलेले ब्लॉक बाहेर ढकलते.हे चक्र चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला एक स्वच्छ, कृत्रिम हिमनदी उगवते. नॉर्फेलने आतापर्यंत 17 हिमनद्या यशस्वीपणे बांधल्या आहेत. सर्वात लहान उमला येथे 500 फूट लांब आणि मोठी हिमनदी, फुकटे येथे 2 किमी लांब आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे, त्यामुळे स्थानिकांचे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे शहरांकडे होणारे स्थलांतरही कमी झाले आहे. त्यांच्या सोप्या तंत्राने गावकऱ्यांची शेतीसाठी पाण्याची समस्या सुटली .
त्यांच्या या साध्या कल्पनेला जगभर प्रशंसा मिळाली .2010 मध्ये त्यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर, 2015 मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान ” पद्मश्री” या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच आरती श्रीवास्तव यांनी त्यांच्या या कार्यावर आधारित “white Knight” हा लघुपटदेखील दिग्दर्शित केला. हा लघुपट भारत आणि परदेशातील चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय नाविन्यपूर्ण कामगिरीतुन या असामान्य व्यक्तीने हेच सिद्ध केले आहे की, निसर्गाच्या विनाशाला माणूसच जबाबदार असेल तर तो वाचवण्याची क्षमताही त्याच्यात आहे. फक्त त्यासाठी तुमच्याकडे तशी आंतरिक तळमळ मात्र हवी.