इंडिया दर्पण विशेष लेखमाला
निसर्ग यात्री
फॅशन क्षेत्रातली इको फ्रेंडली डिझायनर : रिबेका अर्ली
कुठलीही फॅशन एखाद्या ठराविक काळापुरती मर्यादित असते. काही वेळेस जुने झालेले फॅशन ट्रेंड्स पुन्हा नव्याने बाजारात दिसू लागतात. बाजारातल्या फॅशन ट्रेंड्सवर चित्रपटसृष्टीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. जुन्या काळातल्या चित्रपटांमधील कपड्यांच्या फॅशन कालांतराने पुन्हा नवीन स्वरूपामध्ये बाजारात बघायला मिळतात आणि तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत बनतात.फॅशन विश्वामध्ये एक ट्रेंड पर्यावरणस्नेही फॅशनचाही असू शकतो, अशी आपल्याला पुसटशीदेखील शंका येत नाही. परंतु, रिबेका अर्ली ही तरुण फॅशन डिझायनर जेव्हा या क्षेत्रात आली त्यावेळी ह्या क्षेत्रात आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटत होतं. कारण कुठलीही फॅशन जास्तीत जास्त सहा महिने टिकते पण, या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पाय रोवून उभं राहायचं असेल तर मात्र आपला वेगळा ब्रँड असला पाहिजे, जास्तीत जास्त काळ टिकणारे कपडे निर्माण करता आले पाहिजेत हा विचार तिच्या मनात पक्का झाला.
फॅशन डिझायनिंग म्हणजे खरंतर सर्जनशीलता, कलात्मकता.परंतु, त्या सर्जनशीलतेला पर्यावरणस्नेही विचारांची जोड देऊन रिबेकाने फॅशनविश्वात पर्यावरणस्नेही कपड्यांचा स्वतः चा वेगळा ब्रँड बनवला. पर्यावरण विषययक प्रश्नांकडे जेव्हा सर्व जग आता कळीचा मुद्दा म्हणून बघत आहे त्यावेळी, प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाकडे सजगतेने बघण्याची वेळ आलेली आहे.आपल्याला आश्चर्य वाटेल पण, रिबेका अर्ली ही सुती कपड्याची विरोधक आहे. सुती कपड्याच्या निर्मितीचा आणि त्यानंतर सुती कपडा वापरताना घ्यायच्या काळजीचा अभ्यास केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, कापसाच्या पिकासाठी भरपूर पाणी, भरपूर ऊर्जा आणि विषारी रसायनांचा वापर केला जातो. जगात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या 10% कीटकनाशक केवळ कापसाच्या उत्पादनात वापरले जातात. तर, 20 टक्के रसायन कापसाच्या शेतीत वापरले जातात.
दरवर्षी 20 ते 40 हजार शेतकरी या कापसावर फवारलेल्या कृमीनाशकांना बळी पडतात. शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या डब्यावर लिहिलेल्या बारीक अक्षरातल्या सूचना नीट वाचता येत नाहीत. त्यामुळे कीटकनाशके फवारताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचा ते गांभीर्याने विचार करत नाहीत आणि मग त्यांना भविष्यात श्वसनाचे आजार, चर्मरोग, अंधत्व यासारखे आजार होतात.त्यासाठी रिबेका सेंद्रिय शेतीचा देखील प्रसार करतात. रिबेका यांच्यामते,खरंतर कापसाच्या शेतीला जसं भरपूर पाणी लागतं तसंच कापसाचं कापडात रूपांतर करतानादेखील भरपूर पाणी खर्च होतं आणि बऱ्याचदा सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजासाठी लागणारे पाणी या वस्त्र उद्योगाकडे वळवलं जातं. याशिवाय सुती कपडे स्वच्छ करायचे म्हणजे त्यासाठी गरम पाणी तसेच वाळवण्यासाठी ऊर्जा लागते. ते धुवून त्याला इस्त्री करावे लागतात.त्यासाठी वेगळी ऊर्जा लागते. शीत प्रदेशांमध्ये तर अशा कपड्यांना वाळवणे महाकठीण काम होतं. एवढं करून त्यांच्या किमतीसुद्धा काही कमी नसतात. त्यामुळे रिबेका हर्ली या सुती कपड्यांच्या कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून त्या पॉलिस्टर धाग्याच्या कपड्यांच्या फॅशनला जास्त पसंती देतात.
त्या म्हणतात, पॉलिस्टरचे कपडे हे सुती कापडापेक्षा जास्त टिकतात. त्याचं पुनरचक्रीकरण होऊ शकतं. प्लास्टिकच्या बाटल्या किंवा पिशव्या वितळवून त्यापासून पॉलिस्टरचा धागा बनवता येतो. ज्यापासून नवीन फॅशनेबल कपडे तयार होऊ शकतात. त्या कपड्यांचा वापर संपला की पुन्हा वितळवून त्यांचा धागा होऊ शकतो. अशाप्रकारे कुठलीही अवास्तव ऊर्जा किंवा पाणी न वापरता त्याच वस्तूंचं पुनरचक्रीकरण करून कमीत कमी खर्चात, कमीत कमी पर्यावरणाची हानी करून आपण पॉलिस्टर कपडे वापरू शकतो.शिवाय त्यांनी पॉलिस्टर कपड्यांचे पुनरचक्रीकरणाद्वारे मणी बनवण्याचे तंत्रदेखील शोधून काढले आहे. याशिवाय रिबेका अर्लीच्या ‘हिट फोटोग्राम’ या विशेष छपाई तंत्राला पर्यावरण क्षेत्रामध्ये बरीच पारितोषिक मिळाली. या वैशिष्ट्यपूर्ण छपाई तंत्रामूळे कापडावरील छपाईमध्ये पाण्याची नासधुस तर होत नाहीच शिवाय, त्यामध्ये कमीत कमी रसायनांचा वापर केला जातो आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण टाळता येतं. अशाप्रकारे रिबेका अर्ली यांचं फॅशन विश्वातलं पर्यावरण स्नेही कपड्याच्या मागचं लॉजिक नक्कीच विचार करण्यासारखं आहे.
रिबेका ‘टेक्स्टाईल फ्युचर्स रिसर्च ग्रुपची’ सहसंचालिका आहे. लंडनमधील चेल्सी येथील ‘कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन’ मध्ये या विषयावरील संशोधकांचा एक गट कार्यरत आहे. त्याठिकाणी ती आणि तिचे सहाध्यायी पर्यावरणस्नेही कपड्याची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करतात. पर्यावरणावर कमीत कमी ताण पडून पर्यावरण स्नेही कपड्याची निर्मिती कशी करता येईल यावर त्यांचा नेहमी भर असतो. रिबेका तिच्या विद्यार्थ्यांना कोणतंही नवीन वस्त्र निर्माण करताना पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडते. एखादा नवीन कपडा तयार करण्यापूर्वी तो कपडा जास्तीत जास्त टिकण्यासाठी काय केलं पाहिजे, तो कपडा स्वच्छ करताना पर्यावरणावर त्याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना याचा विचार केला पाहिजे, ही मूल्य ती विद्यार्थ्यांमध्ये बिंबवत असते.
रिबेका कपडा तयार करताना काही विशिष्ट रंग वापरणे टाळतात कारण त्या रंगाने बनवलेल्या कपड्यांवर सूर्यप्रकाश पडला की,अनेक घातक रसायन त्यातून बाहेर पडतात .जी पुढे जाऊन हवेमध्ये विषारी पदार्थ सोडतात. इतका बारीक विचार करून बनवलेले कपडे म्हणजे नक्कीच रिबेकाचा आगळा वेगळा ब्रँड आहे. परंतू,पर्यावरण स्नेही अत्याधुनिक कपडे अजूनही वाजवी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही ही तिची खंत आहे. रिबेका अर्ली यांना लंडनच्या आर्ट ऑफ ह्युमॅनिटी सोसायटीचं प्रतिष्ठेचं मानलं जाणारं पर्यावरण पारितोषिक मिळाल्यानंतर पर्यावरण क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला. फॅशन उद्योगातही त्यांना बरीच पारितोषिक मिळाली पण, पर्यावरणविषयक मिळालेले पुरस्कार त्यांना जास्त जवळचे वाटतात.
हळूहळू फॅशन विश्वातल्या इतर मंडळींनादेखील आता पर्यावरणस्नेही कपड्यांची भुरळ पडू लागली आहे.पर्यावरणस्नेही फॅशन कालांतराने जगभर प्रसिद्ध झाल्या तर आता नवल वाटायला नको.कारण ती काळाची गरज आहे. शेवटी फॅशन म्हणजे ज्याला प्रचंड मागणी आहे असे कपडे. अशा वस्तूंचे महत्व एकदा का तरुणाईला पटले तर अशाप्रकारचा फॅशन ट्रेंड बदलायला नक्कीच वेळ लागणार नाही. सध्या सर्व क्षेत्रांमध्ये पर्यावरणस्नेही उत्पादनं त्यांचं वेगळं स्थान निर्माण करत आहेत. प्रत्येक जण आपापल्यापरीने आपल्या क्षेत्रामध्ये निसर्गसंवर्धन साधून आपल्या उत्पादनाचं वेगळेपण कसं ठेवता येईल याचा विचार करत आहे. अशावेळी रिबेका अर्ली या फॅशन डिझायनरने फॅशन डिझायनिंगसारख्या क्षेत्रामध्ये केलेला हा फॅशन विश्वातला आगळावेळाबद्दल बदल नक्कीच वाखाणण्यासारखा आहे.