पर्यावरण चळवळीची जननी : राशेल कार्सन
जीवशास्त्रज्ञ राशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने पर्यावरण विश्वात खळबळ माजवली. खरंतर, पर्यावरण चळवळीचा पाया रचला असं म्हणायला हरकत नाही.

मो. 9423932203
“निसर्गाने मुक्त हस्ते सर्व काही बहाल केले आहे, असे एक नयनमनोहर गाव होते. सारे काही ठिकठाक चालले होते. अचानक घडी बिघडली. विचित्र आजाराने त्या भागाला घेरले .एकाएकी अनेक पक्षी मरून पडू लागले. कित्येक पक्षांना उडता येईना. अनेक पक्ष्यांचे कूजन थांबले. त्या वसंत ऋतुत सकाळी पक्षांचा किलबिलाट थांबला .वसंत तसाच होता. नव्हता तो केवळ पक्षांचा आवाज. स्मशान शांततेचा, वाणी हरवलेल्या केविलवाण्या पक्षांच्या सान्निध्यात. मुक, जीवघेणा वसंत!”
‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकातला हा सुरुवातीचा परिच्छेद. जीवशास्त्रज्ञ राशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने पर्यावरण विश्वात खळबळ माजवली. खरंतर, पर्यावरण चळवळीचा पाया रचला असं म्हणायला हरकत नाही. 27 सप्टेंबर 1962 रोजी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि आजवर एक कोटीहून जास्त याच्या प्रती वाचल्या गेल्या.तसेच 38 भाषांमध्ये अनुवाद झाले. पर्यावरण विनाशाचा आरंभ झाला आहे, हा इशारा देणारं हे पुस्तक पर्यावरणवादाची गीता म्हणून ओळखलं जातं. कारण या पुस्तकाने लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली. या पुस्तकाची लेखिका आहे राशेल कार्सन. राशेल कार्सन यांचा जन्म 27 मे 1907 मध्ये पेन्सील्वेनिया येथे झाला. त्या मूलतः जीवशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखिका होत्या.1932 मध्ये मेरीलँडमधील बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.1936 मध्ये त्या यूएस ब्युरो ऑफ फिशरीज मध्ये जलीय जीवशास्त्रज्ञ होत्या.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मलेरिया आणि हिवतापाने उच्छाद मांडला होता.त्यावेळी डास आणि जळवांच्या नायनाटासाठी डीडीटी वापरलं गेलं आणि ते या आजाराला नियंत्रित करण्यासाठी परिणामकारक ठरलं.पुढे पॉल म्यूलर या रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञाने असा शोध लावला की पिकांवरील किड मारण्यासाठी डीडीटी आणि कीटकनाशक परिणामकारक ठरत आहेत.त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. पण त्यानंतर इतर कोणताही विचार न करता डीडीटी आणि किटकनाशकांची अतोनात फवारणी करण्यात येऊ लागली. कीटकनाशकांच्या फवारणीचे पर्यावरणावर भयंकर परिणाम होऊ शकतात हा विचार त्यावेळी अस्तित्वातच नव्हता.
पक्षांचे थवेच्या थवे मृत्युमुखी पडू लागले.पक्ष्यांना उडता येणं कठीण होऊ लागलं, तेव्हा कार्सनने या कीटकनाशकांच्या दुष्परिणामा बद्दल जाणून घेण्यासाठी त्यावर संशोधन केले. वाचन केलं .अनेक शास्त्रज्ञांच्या विस्तृत मुलाखती घेतल्या .त्यानंतर तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, कीटकनाशकातील विषारी घटक पर्यावरणाची हानी करत आहेत. डीडीटी फवारल्यानंतर त्याचे विघटन होत नाही.धान्यावाटे क्लोरीनचे अंश आपल्या पोटात जातात .तसंच हवेमध्ये हे विषारी वायू मिसळल्याने पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकातून,” तंत्रज्ञानाच्या आणि आर्थिक प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना पर्यावरणाचा देखील नाश होत आहे” हा धोक्याचा इशारा 1962 मध्ये त्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे दिला. यानंतर त्यांना अनेक आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागले .त्या कम्युनिस्टांच्या हस्तक आहेत, विकासाच्या शत्रू आहेत, या परदेशी निधीवर चालणाऱ्या देशविघातक कार्य करत आहेत अशी दूषणे त्यांना लावण्यात आली पण, कार्सन विचलित झाल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या पुस्तकातून पर्यावरण विनाशाची पहिली धोक्याची घंटा वाजवली.आणि तेव्हापासून संपूर्ण जगाला सर्वप्रथम पर्यावरण जपण्याची जाणीव या घटनेद्वारे झाली. ही पर्यावरणवादाची पहिली लाट होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कीटकनाशकं वातावरणात जमा झाल्याने मानवाला व पर्यावरणाला धोका आहे पण, म्हणून कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे त्यांनी कधीही आवाहन केलं नाही. केवळ त्याचा वापर संयमित आणि काळजीपूर्वक केला जावा एवढंच त्यांचं म्हणणं होतं .कारण त्यांनी केलेले दावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी केलेल्या चौकशीत सिद्ध झाले आणि त्यामुळे त्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या वापरासंबंधीचे तात्काळ कडक नियम करण्यात आले .हे खरंतर सायलेंट स्प्रिंगचे यश आहे .त्यानंतर या पुस्तकामुळे डीडीटी आणि इतर कीटकनाशकांवर देशव्यापी बंदी आली आणि चळवळीला सुरुवात झाली .त्यातूनच पुढे म्हणजेच यु एस पर्यावरण संरक्षण एजन्सीची (ईपीएस) ची निर्मिती झाली.
निसर्गवादी आणि विख्यात वृत्तपत्रकार सर डेव्हिड अटनबरो म्हणतात ,”चार्ल्स डार्विन यांच्या “ओरिजिन ऑफ स्पिशिज” नंतर वैज्ञानिक बदल घडवून आणणारं पुस्तक म्हणजे राशेल कार्सन यांचं “सायलेंट स्प्रिंग”. त्यामुळे आजही राशेल कार्सन यांचं लिखाण पर्यावरण क्षेत्रात मैलाचा दगड मानलं जातं. त्यांनी पर्यावरणाशी संबंधित ‘अंडर द सि विंड’,’ द एज ऑफ द सी’ आणि ‘द सी अराउंड अस’ ही पुस्तकं लिहिली. यातील ‘द सी अराउंड अस’या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. कार्सन म्हणतात ,”ही पृथ्वी केवळ माणसांची नाही तर,ती सर्व वनस्पती आणि जीवसृष्टीची आहे .आर्थिक विकासाच्या नादात आपण हे भान ठेवलं पाहिजे .या जीवसृष्टीच्या साखळीतील प्रत्येक कडी तेवढीच महत्त्वाची आहे .कुठलीही एक कडी तुटली तर विश्वाची जैविक लय बिघडून जाईल. माणसाने निसर्गाला बाधा आणणारा विकास चालू ठेवल्यास तो विनाशाकडे जाईल.” निसर्गाची साखळी शाबूत ठेवली तरच मनुष्यजीवन सुरक्षित राहील हे कायम लक्षात ठेवून पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाचा आदर करूया.