इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
निसर्गस्नेही जीवनशैली जगणारे राष्ट्रपिता : महात्मा गांधी
गांधीजी म्हणजे अहिंसा. गांधीजी म्हणजे सत्याग्रह. गांधीजी म्हणजे स्वदेशी. पण,आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी म्हणून वेगळे योगदान आहे. तसे कसे हेच आपण आज जाणून घेणार आहोत….
कोणत्याही पुस्तकांमध्ये महात्मा गांधींना निसर्गवादी अशी उपाधी देण्यात आलेली नाही परंतु, महात्मा गांधींची शिकवण, त्यांचा जीवनपट, त्यांचे विचार उलगडून पाहिले तर क्षणोक्षणी महात्मा गांधी हे किती निसर्गवादी किंवा पर्यावरणवादी होते हे जाणवते. मी निसर्ग वाचवतोय, मी पर्यावरणसंवर्धन करतोय असा कुठलाही घोषा न लावता आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून, या पंचमहाभूतांचा आदर करायला शिकवणारे आणि शाश्वत जीवनशैलीचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी . मानवाच्या अस्तित्वासाठी शाश्वत जीवनशैली किती आवश्यक आहे हे महात्मा गांधींना शंभर वर्षांपूर्वीच जाणवलं होतं, हे त्यांचं आत्मचरित्र, त्यांची पुस्तकं, त्यांचे विचार वाचताना आपल्याला पदोपदी जाणवत राहतं.
स्वतःची सर्व कामे स्वतः करणे, स्वच्छतेचे महत्व, कमीत कमी गरजा, स्वावलंबन, स्वनियंत्रण यासारख्या गुणांमुळे महात्मा गांधी निसर्गस्नेही शाश्वत जीवनशैली जगत होते हे लक्षात येतं. जेव्हा आज जगापुढे अति हव्यास, स्वैराचार, संचयवृत्ती, विदेशी अनुकरण आणि त्यामुळे नैसर्गिक संसाधनांवर पडणारा अतिभार हे प्रश्न आ वासून उभे आहेत ,त्यावेळी महात्मा गांधींची शिकवण आणि त्यांनी केलेले जीवनप्रयोग हेच मानव जातीला तारू शकतात. महात्मा गांधी म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.
महात्मा गांधी म्हणतात, “पृथ्वी, हवा, जमीन आणि पाणी हे आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला वारसा असून तो आपल्या मुलांच्या ताब्यात जसाच्या तसा सोपवला पाहिजे. माणसाच्या गरजेसाठी जगात पुरेसं आहे पण माणसाच्या लोभासाठी नाही.”
“The world has enough for everyone’s need, but not enough for everyone’s greed”. ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकाने साधी राहणी अंगिकारली तर, पृथ्वीवरील बरीच नैसर्गिक संसाधने वाचू शकतात.
मानवाची ‘गरज’ आणि ‘इच्छा’ यातली सीमारेषा माणसाने वेळीच ओळखली पाहिजे हे त्यांनी त्यांच्या आचरणातून तर कधी लिखाणातून वेळोवेळी दाखवून दिलं. महात्मा गांधी हे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं. मानवाला मानसिक शांती मिळवण्यासाठी, त्याच्या भौतिक गरजा, लोभ, इच्छा यावर नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांचा विश्वास होता. अनेक साध्या आणि शाश्वत जीवनशैलीच्या प्रयोगांमुळे त्यांनी स्वतःची आध्यात्मिक प्रगती केली. निरोगी शरीर आणि मन यासाठी वेळोवेळी विविध प्रयोग करून स्वतःला आजमावून पाहिलं.
1911 मध्ये, गांधींनी ‘इकॉनॉमी ऑफ नेचर’ हा वाक्प्रचार सर्वप्रथम वापरला. ते नेहमीच पाश्चिमात्य देशांनी स्वीकारलेल्या विनाशकारी विकास मॉडेलच्या विरोधात होते , ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल आणि इतर बऱ्याच समस्या उभ्या राहू शकतात हे त्याकाळी ह्या द्रष्ट्या नेत्याला समजले होते. त्यामुळे पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे भारताने कधीही औद्योगिकीकरणाकडे वळू नये. असं त्यांना कळकळीने वाटत असे. त्यामुळे महात्मा गांधी नेहमी म्हणत,” जो देश शाश्वत जीवनशैली अंगीकारून प्रगती करत राहील तोच देश प्रगतशील म्हणवला जाईल आणि जगाच्या अंतापर्यंत तोच देश टिकू शकेल. विकासाच्या कोणत्याही योजनेत माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे. गरिबीच्या महासागरात समृद्धीची बेटे उभारणे हा विकासाचा उद्देश नसावा.”गांधी हे जनसामान्यांचे अर्थतज्ञ होतेच. पण, जरी त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचे कुठलंही संरचित असं मॉडेल दिले नसलं तरी, त्यांचे सर्व विचार एकमेकांना जोडले की आपल्याला त्यांचे स्वतःचे असे पर्यावरणीय शाश्वत विकासाचे मॉडेल मिळते.
बापूंचं पर्यावरणप्रेम छोट्या छोट्या गोष्टीतूनही दिसून येतं जसं, एकदा त्यांच्या आश्रमातील एका सेवेकऱ्याने दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची एक काडी न तोडता पूर्ण फांदीच तोडली. बापूंना अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी सर्वांसमक्ष त्या झाडाची माफी मागितली. किती ही संवेदनशीलता. तसेच दांडीयात्रेदरम्यान एकदा बापूंसाठी मोटारसायकलवरून कोणीतरी संत्री आणली होती. बापूंनी ती संत्री नाकारली, कारण जर तुम्ही चालू शकत असाल तर इंधन वाया घालवू नये असं त्यांना वाटत असे. शहरात वस्तू उत्पादन करून ग्रामीण भागात आणताना होणारा इंधनाचा वापर टाळता यावा म्हणून प्रत्येक गाव स्वावलंबी असावं यावर त्यांचा भर होता. गुजरातमधील काठियावाड भागात स्वातंत्र्यलढ्यादरम्यान दुष्काळ पडला होता. त्यावेळी 1947 मध्ये दिल्ली येथे झालेल्या प्रार्थना सभेत त्यांनी जनतेला आवाहन केलं की, दुष्काळ आणि अन्नाची कमतरता टाळण्यासाठी सिंचनाच्या उद्देशाने पाणी साठवण्याचा सराव केला पाहिजे आणि मोठया प्रमाणात वनीकरण केलं पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2006 मध्ये एम.एस. स्वामीनाथन समितीनेही हेच उपायसुचवले होते. याचाच अर्थ गांधी त्यांच्या काळाच्याही खूप पुढे होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतही वेळोवेळी गांधी विचाराला महत्त्व देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेच निश्चित केलेल्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल्स’चा आधारही गांधी विचारावर आधारीत आहे. “की टू हेल्थ” (आरोग्य की) या त्यांच्या एका लेखात त्यांनी स्वच्छ हवेची गरज अधोरेखित केली आहे. त्यात स्वच्छ हवेचा एक वेगळा अध्याय आहे.प्रोफेसर हर्बर्ट गिरार्डे यांनी संपादित केलेल्या “सर्व्हायव्हिंग द सेंच्युरी: फेसिंग क्लाउड कॅओस” या पुस्तकातदेखील ही पृथ्वी वाचवण्यासाठी गांधीजींनी दिलेल्या तत्वांना अंगिकारणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. थोडक्यात, हळूहळू संपूर्ण जग गांधीजी आणि त्यांची शाश्वततत्त्वे स्वीकारत आहे. टाइम्ससारख्या मासिकानेदेखील 9 एप्रिल 2007 च्या अंकात जागतिक तापमानवाढीपासून जगाला वाचवण्याचे 51 मार्ग प्रकाशित केले. त्यातदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे धोके थांबवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर, जास्तीत जास्त शेअरिंग आणि साधी राहणी हा गांधीजींचा मार्ग स्वीकारण्यास सांगितला गेला आहे. या सर्व वस्तुस्थितीवरून लक्षात येतं की शाश्वत विकासासाठी गांधीजींची विचारमूल्य नव्याने समजून घेणे किती अत्यावश्यक आहे.
गांधीजी एकदा म्हणाले होते, “मी तुला एक तावीज देईन. जेव्हा जेव्हा तुम्हाला शंका येईल की मी अतिरेक करत आहे का, तेव्हा खालील चाचणी घ्या. सर्वात गरीब आणि दुर्बल माणसाचा चेहरा आठवा, ज्याला तुम्ही पाहिले आहे किंवा भेटला आहात. तुम्ही विचार करत असलेल्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंचा त्याला काही उपयोग होणार आहे का? याद्वारे तो काही मिळवू शकेल का? त्याद्वारे त्याला स्वतःच्या गरिबीवर आणि नशिबावर नियंत्रण मिळवता येईल का? मग तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल.” महात्माजींचे हे शब्द खरंतर आपल्यातल्या प्रत्येकाला प्रत्येक क्षणी आठवले पाहिजे.