इंडिया दर्पण विशेष – निसर्गयात्री
लढवय्यी पर्यावरण पत्रकार बहार दत्त
आधुनिक काळात एखाद्या समस्येला वाचा फोडण्यासाठी, एखाद्या समस्येचे महत्त्व जाणवून देण्यासाठी, एखाद्याच दुर्लक्षित घटकाला प्रकाशात आणण्यासाठी प्रसारमाध्यमांची काय ताकत असते हे वेगळं सांगायला नको. परंतु, ही पत्रकारिता पर्यावरणासाठी,मुक्या पशुपक्ष्यांसाठी करणारे पत्रकार तसे विरळच. आज अशाच व्यक्तीमत्वाविषयी आपण जाणून घेणार आहोत..
पर्यावरण पत्रकारिता खरंतर पत्रकारितेचा एक दुर्लक्षित प्रकार परंतु पर्यावरण पत्रकारितेच्या कक्षा ज्यांच्या अहवालामुळे रुंदावल्या, ज्यांच्यामुळे एका बाजूला पडलेल्या आणि कमी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक बातम्यांना रोजच्या संध्याकाळच्या मुख्य आणि ठळक बातम्या मध्ये स्थान मिळालं अशा लढवय्या पर्यावरण पत्रकार, निसर्गरक्षक, जीवशास्त्रज्ञ बहार दत्त यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ज्यांच्या रक्तातच पत्रकारिता भिनलेली आहे अशा कुटुंबात बहार दत्त यांचा जन्म झाला. एअर इंडियाचे अधिकारी एस.पी. दत्त आणि हिंदुस्थान टाईम्सच्या धाडसी पत्रकार प्रभा दत्त यांचे हे दुसरे अपत्य.
बहार दत्त यांची आई भारत-पाकिस्तान युद्धाच्या बातम्या प्रत्यक्ष सीमेवर जाऊन कव्हर करणाऱ्या पहिल्या फळीतल्या धाडसी पत्रकारांपैकी एक होती. त्यांच्या निर्भय पत्रकारितेसाठी त्याकाळी त्या प्रसिद्ध होत्या. बहिण बरखा दत्त हीदेखील लोकप्रिय पत्रकार आहे. लहानपणापासूनच त्यांना त्यांचं करिअर प्राण्यांशी संबंधीत असावं असं वाटायचं. जगातल्या प्राण्यांना वाचवायचा सगळा भार जणू त्यांच्यावरच आहे असं त्यांना वाटायचं.
त्या स्वतःला प्राण्यांची मदर तेरेसा म्हणून घेत असत. सुरुवातीला कुटुंबातील पत्रकारितेमुळे कुटुंबाची होणारी फरफट बघितल्यानंतर त्यांनी पत्रकारितेपासून लांबच राहायचं ठरवलं होतं पण प्रसारमाध्यमांच्या शक्तीवर विश्वास आणि निसर्गाची ओढ असल्याने पत्रकारितेतलीच वेगळी शाखा म्हणजे पर्यावरण पत्रकारिता करण्याचं त्यांनी ठरवलं. सुरवातीला त्यांनी टेलिव्हिजन पत्रकारितेपासून लांब राहायचं असं कितीही ठरवलं असलं तरी एक नवीन न्यूज चॅनल चालू होणार आहे असे कळल्यानंतर त्यांनी तिथल्या संपादकांशी बोलून पर्यावरण विषयावर मुख्य बातमीपत्र करायचं नक्की केलं. पर्यावरण म्हणजे जंगलाचे, प्राण्यांचे फक्त आकर्षक फॅन्सी फोटो न दाखवता बेकायदेशीरपणे जंगलं कशी विकली जातात यासंबंधीचे रिपोर्ट प्रसारित व्हायला हवेत अशी खूणगाठ बांधली.
पत्रकारिता क्षेत्रात त्यांना आई आणि बहिणी पेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं.पुढे त्यांनी समाजकार्य या विषयात मास्टर्स पूर्ण केलं. पण म्हणतात ना, आयुष्याचे धडे पुस्तकातून शिकता येत नाहीत ते अनुभवानी शिकावे लागतात. ज्या वयात मित्र परिवारातले अनेक जण नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकी करत होते. मोठमोठ्या कॉर्पोरेट फर्म्स मध्ये भरभक्कम पगार घेत होते. त्यावेळेला बहार मात्र सापांना हातात धरायला शिकत होत्या. त्यांना अनुभवायला शिकत होत्या. गारूड्यांच्या पारंपरिक जमातीमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहून वन्यप्राण्यांसंबंधित कायदे न मोडता,गारुडयांना पर्यायी रोजगार कसा मिळेल यासाठी अभ्यास करत होत्या. त्यांच्या पर्यावरण पत्रकारितेची सुरुवात झाली त्यांच्या सारस पक्ष्यांच्या अस्तित्वावरील वास्तवदर्शी स्टोरीने.
हळूहळू कालांतराने ही पत्रकारिता फक्त एखाद्या वन्य प्राण्याशी किंवा तिथल्या वातावरणाशीच संबंधित न ठेवता जंगलं, नद्या,समुद्र, तिथे राहणारे जीव या सगळ्यांशी संबंधित असावी असा त्यांच्या पत्रकारितेचा कटाक्ष पाळू लागल्या. एकदा अचानक सुसर या प्राण्याची 100 हून अधिक मृत शरीरं नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळली आणि एकच खळबळ उडाली. तेव्हा या शोकांतिकेची छाननी करून,अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन इत्थंभूत अहवाल सादर केला. अहवालानुसार यमुना नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने यमुना आणि चंबळ संगम जिथे होता, तिथे या सूसरींचे पोट फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. पावसाळ्यामध्ये चंबळ नदीतून सुसरी यमुनेच्या पाण्यात स्थलांतर करतात आणि त्यावेळी त्यांच्या पोटात विषारी पदार्थ गेल्याने या सुसरींचा मृत्यू झाला होता.
यासारख्या अनेक बातमीपत्रांमुळे, अनेक अहवालांमुळे पर्यावरणात होणाऱ्या गैरप्रकारांना बहार दत्त यांनी उघडकीला आणले.त्यांच्या बातमीपत्रामुळे यमुना नदीकाठचा बेकायदेशीर शॉपिंग मॉल आणि गोव्यातल्या बेकायदा खाणींचं काम थांबू शकलं. सारस पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी सुपीक सखल जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या विमानतळाच्या धावपट्टीचे बेकायदेशीर काम थांबावं म्हणून त्यांनी लढा दिला आणि त्याबद्दल त्यांना सन्मानाचा वाईल्डस्क्रीन ऑस्कर पुरस्कार मिळाला. बहार दत्त जखमी माकडांसाठी प्राणी रुग्णवाहिका चालवतात. त्यांनी अफ्रिकेतल्या कोलोबस माकडासाठी दोरखंडांचे पूल बांधले. तसंच युके मधल्या जगप्रसिद्ध जर्सी प्राणिसंग्रहालयात राहून त्यांनी अमेझॉनमधील माकडांच्या कळपांचा अभ्यास केला.
पर्यावरणवाद हा शब्द जरी उच्चारला तरी लोकांमध्ये वादग्रस्त प्रतिक्रिया येतात. पर्यावरणवाद विकास थांबवतो हा सर्वदूर समज आहे. विकास ही जगाची पहिली गरज आहे आणि पर्यावरण संरक्षण हे त्यानंतर येते. पहिल्यांदा आपण विकास साधू आणि नंतर आपल्या नद्या स्वच्छ करायला, जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करायला, सगळं काही हिरवागार करायला भरपूर आर्थिक पाठबळ मिळेल असा शासनाचं म्हणणं असतं पण,विकसित देशांच्या अनुभवावरून हे वाटतं तेवढं सोपं नाही. जगातल्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी चीनच्या विकासाचा कितीही जयजयकार केला तरी तेथील मोठ्या प्रमाणातील प्रदूषण, पशुपक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातींचा होणारा नाश, सुकलेल्या नद्या,श्वासोच्छ्वासाच्या आजारांची वाढ याचा तिथे कधीही उल्लेखही केला जात नाही.
पर्यावरण पत्रकारितेत विकास आणि पर्यावरण यातला संघर्ष टाळून निसर्ग संवर्धन असं करता येईल हा बहार दत्त यांच्या प्रत्येक अहवालाचा गाभा असतो. कठोर संशोधन वृत्तीने आणि अनुभवी प्रगल्भतेने त्या प्रत्येक प्रश्नाला भिडतात. अरुणाचल प्रदेश ते उत्तर ध्रुव , गोवा ते गंगोत्री, बेकायदा खाणीपासून हवामानबदलाच्या धोक्यापर्यंत असा प्रत्येक हरित युद्धाचा प्रवास त्यांनी निर्भयपणे केला आहे. त्यांच्या या प्रवासाची वास्तवदर्शी हकीगत यांच्या हरित युद्ध या पुस्तकात त्यांनी मांडली आहे. त्यांना पर्यावरण पत्रकारिता या क्षेत्रात दहा पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले गेले आहे.बहार दत्त म्हणतात,” हरित भूमी,निळे आकाश, स्वच्छ नितळ पाणी आणि हवा यांची स्वप्न रेखाटणार्या सामान्य माणसापर्यंत माझं लेखन पोचलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये काही साधेसुधे बदल करून धोरण आखणार्यांवर दबाव आणून या ग्रहावर आपली पाऊलखूण उमटवणे त्यामुळे सोपं होईल.” वेगळ्या वाटेवरची पत्रकारिता ही काळाची गरज आहे. पर्यावरण समतोल राखून विकासाची कास धरली तर ही पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. निसर्गाच्या या मूक परंतु अविभाज्य घटकांसाठी पत्रकारिता करणाऱ्या ,त्यांचा आवाज बनून लोकांपर्यंत, शासनापर्यंत त्यांच्या व्यथा मांडणाऱ्या बहार दत्त यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.