इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
बिहारचा जलयोद्धा : एकलव्य प्रसाद
2005 साली एकलव्य यांनी बिहारमध्ये आपल्या कामाचा शुभारंभ केला. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहार मध्ये बाढमुक्ती अभियान सुरू झालं. आज त्यांचे कार्य अफाट गतीने सुरू आहे. त्यांच्याच कार्याचा हा लेखाजोखा…
बिहार राज्य प्रामुख्याने ओळखलं जातं ते ‘sorrow of Bihar’ या कोसी नदीसाठी. दरवर्षी कोसी नदीला येणार्या पुराच्या बातम्या आपण ऐकत असतो,वाचत असतो. तरी बिहार मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष का आहे असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. पण मुबलकतेतलं दुर्भिक्ष जे म्हणतात ते असं. कारण पावसाचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असतं अशी बिहारी लोकांची अंधश्रद्धा. त्यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष इथे जागोजागी दिसून येतं. आणि बिहार मधली हीच परिस्थिती सुधारण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत एकलव्य प्रसाद. कोसी नदीला पूर येऊ नये म्हणून नदीला बांध घालणं आणि पूर आला की मदत कार्य पूर्ण करणं यापलीकडे अन्य काही उपाय असतात हे बिहारमधील लोकांना माहितीच नव्हतं.
2005 साली एकलव्य यांनी बिहारमध्ये आपल्या कामाचा शुभारंभ केला. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहार मध्ये बाढमुक्ती अभियान सुरू झालं. सर्वात प्रथम उत्तर बिहारमधल्या सुपौल या खेडेगावाला भेट दिली. तिथली गरिबी बघून हेलावून गेलेले एकलव्य सांगतात,” कोसी नदीच्या बांधावर उघडी नागडी मुले पळताना बघून त्यावेळी गळा दाटून आला. माझ्या जन्मभूमीत,बिहारमध्ये पाहिलेली गरीबी नैराश्य आणणारी आणि भीषण होती. तिथून परतल्यावर मला हॉटेलमध्ये खाणं, महागडी खरेदी करणं अशक्य व्हायचं.पण आज माझ्या भागासाठी माझ्या लोकांसाठी मी स्वेच्छेने काम करू शकतोय ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे.” एकलव्य प्रसाद यांच्या प्रयत्नांमुळे पाणी व्यवस्थापन या विषयाबाबत तिथे चर्चा होऊ लागल्या.
खरंतर एकलव्य प्रसाद हे उच्चशिक्षित समाजातले. त्यांचा जन्म उच्चशिक्षित डॉक्टर कुटुंबात झाला. साहजिकच त्यांनीही डॉक्टर व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु,वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले आणि मग त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला.त्यानंतर दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातून समाजसेवेची पदवी मिळवली. त्याकाळात त्यांच्या लक्षात आलं की आपलं यापुढील करियर करायचं ते सामाजिक कामातच. सुरवातीला एकलव्य यांनी राजस्थानच्या उदयपुरमधल्या सेवामंदिर येथील ग्रामीण भागातल्या पाणीप्रश्नावर काम सुरू केलं. सेवामंदिरमध्ये नारायण अमेटी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. अनिल अग्रवाल यांच्यासोबत काम करताना त्यांच्या कार्याला आकार येत गेला. पाणीप्रश्नाबाबत त्यांच्या मनात रस निर्माण झाला. एकलव्य म्हणतात,” डाऊन टू अर्थ चे संपादक अनिल अग्रवाल यांनी माझ्या जगण्याला अर्थ दिला. अनेक जीवनविषयक मूल्यांशी परिचय करून दिला. त्यांनी शिकवलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये अफाट क्षमता असते. फक्त तुम्हाला त्याचा वापर करून घेता यायला हवा. माणसांमधल्या कौशल्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे त्यांनी मला शिकवलं.”
राजस्थान मध्ये काम करत असताना एकलव्य यांना मात्र ओढ होती बिहारची, आपल्या मातृभूमीची. राजस्थानपेक्षा बिहारमध्ये काम करण्याची जास्त गरज आहे, त्याशिवाय तिथला विकास होणार नाही या टोचणीने बिहारमध्ये काम करण्याची इच्छा प्रबळ होत गेली. बाहेरून येऊन एखादी नवीन संघटना सुरू करण्यापेक्षा त्यांनी उत्तर बिहार मधल्या चार स्वयंसेवी संस्था निवडल्या.सुपौलमधले ग्राम्यशील, मधुबनी जिल्ह्यातली घोघर्डीहा प्रखर प्रखंड संघ,सहरसामधली कोसी सेवासदन आणि खगडिया मधली समता या चारही संस्थेच्या लोकांसोबत मिळून-मिसळून त्यांचं काम सुरू झालं.
गुजरात आणि राजस्थानमध्ये पूर्वी केलेल्या कामाचा अनुभव त्यांना इथे उपयोगी येत होता. खरंतर उत्तर बिहारमध्ये पाण्याची दुष्काळीपरिस्थिती नव्हती पण पाऊस मुबलक असूनही लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मात्र नव्हतं.मग एकलव्य यांच्या डोक्यात तिथल्या जनतेला पिण्याचे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी कसे मिळेल याबद्दलच्या योजना सुरू झाल्या. मेघ पाईन अभियानाला जोरदार सुरवात झाली . पाईन म्हणजे मैथिली भाषेमध्ये पाऊस. पावसाचं पाणी साठवून पिण्यायोग्य बनवणं हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट होतं. स्थानिक लोकांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की पावसाचं पाणी पिण्यासाठी वापरू नये .हा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी लोकांशी आधी संवाद साधला. त्यासाठी एकलव्य अनेक गावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना पावसाचं पाणी स्वतः पिऊन दाखवत.ही समजूत कशी चुकीची आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पावसाचे पाणी साठवणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून देऊ लागले.
सुरवातीला हे पटवून देण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली पण अशीच एकदा पाणी विषयावर बैठक सुरू असताना काही गावकऱ्यांनी या अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला आणि या प्रसंगाने या मोहिमेला कलाटणी मिळाली. दरम्यान या अभियानाला मानवशास्त्रज्ञ लुईसा कोर्ट्सी यांची खूप मदत झाली. विविध माहिती जमा करणे, जमा झालेल्या माहितीच्या नोंदी करणे, मूल्यमापन करणे, देवाण-घेवाण इ. सगळ्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पावसाचं पाणी साठवताना एकलव्य यांच्या मनात दोन मुद्दे स्पष्ट होते की, ही व्यवस्था सर्वांना परवडणारी असावी आणि स्थानिक लोकांना त्यांच्या आसपास सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींतून पाण्याची साठवणूक करता यायला हवी. त्यातून मग जलकोठ्या ही संकल्पना उदयास आली.या भागात धान्य साठवण्यासाठी वेत, बांबू आणि माती पासून बनवलेलं धान्यकोठार त्यांनी पाहिल्या होत्या. त्यांच्या रचनेत थोडा बदल करून त्यांनी पावसाचं पाणी साठवण्यासाठी जलकोठया तयार केल्या. स्थानिक कुंभारांना हाताशी धरून मटका फिल्टर तयार केले.
वर्षभराचा पुरवठा म्हणून पावसाळ्यात पाणी साठवण्यासाठी ही व्यवस्था होती. पावसाळ्यानंतर जमिनीत शोषले गेलेले पाणी पिण्यासाठी वापरता आले पाहिजे यासाठी विहिरींचं पुनरुज्जीवन आणि पर्यावरण स्वच्छता मोहीमदेखील त्यानंतर हाती घेतली गेली. यादरम्यान अनेक स्थानिक उत्साही तरुण नेते एकलव्य यांच्या गटात सामील झाले. पावसाळ्यात पूरपरिस्थिती असताना पावसाचे पाणी साठवून उर्वरित वर्षभर खुल्या विहिरींचा वापर करावा हे धोरण आखण्यात आले. 2013 पासून पुण्याच्या aquadam या संस्थेसोबत पाणी संवर्धन कार्यक्रम हाती घेण्यात आला. भूजल व्यवस्थापन म्हणजे लोकांनी, लोकांसोबत आणि लोकांसाठी पार पाडण्याची जबाबदारी आहे हे लक्षात आलं की मग तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनतो. या दृष्टिकोनातून लोकसहभागाला यात विशेष महत्त्व दिलं गेलं. या मोहिमेचे प्रमुख सूत्रधार म्हणून एकलव्य काम पहात.
सध्या बिहारमध्ये पिण्याच्या पाण्यातील जास्त आर्सेनिक प्रमाणाच्या समस्येवर काम करण्यासाठी मोहीम आखण्यात येत आहेत. त्यासाठी देशपातळीवर अनेक आघाडीचे पाणीअभ्यासक काम करत आहेत. एकलव्य यांना या कामाची प्रेरणा मिळते ती त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदातून. ते म्हणतात, माझ्याकडे कॅमेरा नव्हता तर मी वेडा झालो असतो. मला आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करता आला असता. कॅमेरा म्हणजे केवळ उपकरण नव्हे, तर त्याहून खूप काही जास्त आहे. त्यांनी आजवर देशात अनेक ठिकाणी स्वतः काढलेल्या ग्रामीण भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवले आहे. बिहारमधल्या पूरग्रस्त जनतेच्या व्यथा त्याद्वारे त्यांनी जगासमोर आणल्या. येत्या काही काळात उत्तर बिहारमधल्या या अस्मानी संकटाला वर्षानुवर्ष चिवटपणे तोंड देणाऱ्या लोकांचं दर्शन या फोटोंच्या पुस्तकाद्वारे लोकांपुढे आणण्याचा त्यांचा मानस आहे.
एकलव्य यांनी त्यांच्या छंदाची आणि त्यांच्या कामाची सांगड घातली. आपल्या जन्मभूमीसाठी आपण काही देणं लागतो या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यांना बिहारच्या दुर्गम, मागासलेल्या भागातील जलयोद्धा म्हणून ओळख दिली. अशा समाजभान असणाऱ्या व्यक्ती आयुष्यभर स्वतः च्या आत्मिक समाधानासाठी जगतात. त्याचबरोबर इतरांसाठीसुद्धा त्या अनुकरणीय असतात. असे निस्वार्थी लोक तरुण पिढीसाठी दिशादर्शक म्हणून काम करतात. स्मार्टफोन, इंटरनेट, झगमगाट आणि वेगवान गाड्यांच्या विश्वात रमलेली आजची तरुणाई एकीकडे आणि आपल्या मातृभूमीची दुर्दशा केवळ बघत न रहाता तिच्या,आपल्या बांधवांच्या कल्याणासाठी धडपडणारी तरुणाई एकीकडे. आजच्या तरुणाईपुढे असे असंख्य आदर्श उभे राहिले तर अवघी मानवजात सुखी होईल.