इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
जंगल निर्माता: दुशर्ला सत्यनारायण
आपल्याला झाडांची आवड असेल तर आपण कुंडीमध्ये झाडं लावतो. टेरेस गार्डन तयार करतो.अगदी भरपूर मोठी जागा असेल तर आजूबाजूच्या परिसरामध्ये एक छोटी बाग तयार करतो आणि आपल्या वृक्षप्रेमाची हौस भागवतो.पण, एखादा वृक्षप्रेमी आपल्या निसर्गप्रेमापोटी पूर्ण जंगल उभा करु शकतो खरंतर यावर विश्वास ठेवणं आपल्या सामान्य बुद्धीला कठीण आहे. पण तेलंगणामधील दुशर्ला सत्यनारायण यांनी हा चमत्कार करून दाखवलाय.सत्यनारायण यांनी आपलं संपूर्ण जीवन हे फक्त जंगल उभं करण्यासाठीच नव्हे तर त्याचं संगोपन,रक्षण करण्यासाठी समर्पित केलं आहे.

मो. 9423932203
तेलंगणातील सूर्यपेठ जिल्ह्यातील राघवपुरम गावात एका जमीनदाराच्या कुटुंबात सत्यनारायण यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते निसर्गाशी जोडलेले होते. हैदराबाद येथील कृषी विद्यापीठात त्यांनी कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बँक अधिकाऱ्यांची नोकरी पत्करली. सुरुवातीला बँकेची नोकरी काही काळ केली पण, या निसर्गयात्रीला त्याचं वृक्षप्रेम काही स्वस्थ बसू देईना.नोकरीत त्यांचं मन रमेना. मग त्यांनी नोकरी सोडून वयाच्या 27व्या वर्षापासून पूर्ण वेळ त्यांचं जीवन त्यांच्या वृक्ष प्रेमाला समर्पित केलं. वडिलोपार्जित 70 एकर जमीन त्यांच्याकडे होती. या जमिनीवरच नंदनवन उभं करायचं या भावनेने मागील पाच दशकं ते अविरत झटत आहेत. सत्यनारायण फक्त सात वर्षांचे असताना त्यांच्या जमिनीवर एकजण आपली गुरं चरायला घेऊन आले. त्या माणसाने सहजपणे एका झाडाची फांदी तोडली आणि गुरांना ती खाण्यासाठी दिली. अत्यंत साधी कृती पण, झाडाची फांदी तोडल्याचं पाहून संतापलेल्या सत्यनारायणने रागाने त्या माणसाकडे धाव घेतली. नंतर हे प्रकरण त्यांच्या पालकांपर्यंत गेले पण, त्यांच्या पालकांनीदेखील तक्रार करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं की, “हे बघा माझ्या मुलाला निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला अजिबात आवडत नाही. हा माझ्या मुलाचा स्वभाव आहे, तुम्हीदेखील यापुढे असं काही करू नका”.
सध्या सत्यनारायण 67 वर्षांचे आहेत. सत्यनारायण यांनी सुरवातीला दुर्मिळ प्रजातींच्या बिया आणि रोपं गोळा केली. आणि त्यांच्या जमिनीवर त्याची लागवड केली.सुरुवातीला वीस एकराच्या जागेत त्यांनी विविध पिके लावली परंतु शेतात काम करणारे लोक पीकं खाऊन जाणाऱ्या पक्षांमुळे हैराण झाले होते.काहीतरी उपाययोजना करायला हवी म्हणजे ते पक्षी उडून जातील असं त्यांना वाटत होतं. परंतु सत्यनारायण यांनी जेव्हा शेतातील पिकं खाणारे आनंदी पक्षी पाहिले तेव्हा त्यांनी ते पूर्ण शेतच पक्षांसाठी अन्न म्हणून देऊन टाकलं. ते म्हणतात,” निसर्गातल्या प्रत्येक जीवाला त्याचं पोट भरताना मिळणारा आनंद बघणं यासारखं समाधान नाही”. टेकडीवरून येणारे पावसाचे पाणी या झाडांना मिळावं यासाठी त्यांनी सुरवातीला एकट्याने कालवा खोदला. त्यानंतर मात्र ते थांबले नाहीत. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी सात तलाव खोदले. या तलावातलं पाणी कधी आटणार नाही याची खात्री करण्यासाठी एक बोरवेल बसवला. सध्या हे तलाव विविध प्रजातींच्या कमळांनी व्यापलेलं आहे. कमळतलाव म्हणून हे तलाव पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत. असे दहा तलाव बांधण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात मासे, कासव,बेडूक इ.जलचर प्राणी मुबलक प्रमाणात राहतात.त्यांच्या जंगलात भारतीय चिंच, पेरू, आंब्याच्या अनेक जाती,जांभुळ, तेलबिया, कडूनिंब,खजूर यासारखी अनेक देशी झाडं आहेतच परंतु त्याशिवाय अनेक विदेशी जातींची झाडं देखील आहेत. हे जंगल अनेक औषधी वनस्पतींनी समृद्ध आहे.जंगलाची स्वतःची अशी तयार केलेली एक नैसर्गिक इकोसिस्टीम आहे. इथे जरी एखाद्या झाडाच्या फांद्या गळून पडल्या तरीसुद्धा झाड तोडणं पाप आहे.
जंगलातील पक्षी, प्राणी यांच्या साह्याने आपोआप या झाडांचे पुनरुत्थान होत राहील यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या जंगलात विविध पक्षांच्या, प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. तिथे जंगलातल्या झाडांवरील फळांची काढणी होत नाही. तीच फळं पुढे जंगलाच्या पुनर्निर्माणासाठी कार्य करतात. वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. निसर्गाची पंचमहाभूतंच या जंगलाची काळजी घेतात. सत्यनारायण म्हणतात,”मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितले आहे की,या मालमत्तेत त्यांचा कुठलाही वाटा नाही.कारण ही जंगलं,ही झाडं या पक्ष्यांची आणि प्राण्यांची आहेत. या जंगलावर पूर्ण अधिकार त्यांचा आहे.” खरंतर एका पिढीकडून दुसर्या पिढीला वडीलोपार्जित जाणारा ही जमीन आहे.त्यांना बऱ्याच आकर्षक किमतीमध्ये ही जमीन विकण्यासाठी ऑफर येत असतात.पण, ते म्हणतात,”जंगल पैशाने विकत घेता येत नाही,ती उभी करायला प्रचंड मेहनत, ध्यास लागतो. त्यामुळे या जंगलाच्या जमिनीचा इतकासा तुकडासुद्धा विकण्याचा मी विचार करू शकत नाही.” सत्यनारायण यांच्या जंगलात विनाकारण पर्यटनासाठी आलेल्या हौशी लोकांना प्रवेश नाही. ज्यांना खरोखर जंगलाबद्दल आस्था आहे अशाच लोकांनी या जंगलाला भेट द्यावी असं त्यांना वाटतं.
पक्षी निरीक्षकांनी येथील जंगलात बत्तीस प्रकारच्या विविध पक्षांच्या प्रजाती असल्याची पुष्टी दिली आहे. या जंगलात अंदाजे पाच कोटी वृक्ष आहेत. त्याची फळे वर्षभर तेथील पक्षी, प्राणी यांना अन्न म्हणून मिळत असतात.अनेक पर्यावरणतज्ञ,निसर्ग रक्षक सत्यनारायण यांच्या कामाचा आवाका पाहून आश्चर्यचकित होतात. अत्यंत निस्वार्थी भावनेने ते या जंगलाची काळजी घेतात. त्यांचा असा दावा आहे की या नंदनवनात वाढणाऱ्या सर्व वनस्पती आणि पशुपक्षी हे खरे या जमिनीचे मालक आहेत, आम्ही फक्त सेवक आहोत. अत्यंत निस्वार्थ भावनेने ते या जंगलाची काळजी घेतात. ८० च्या दशकात त्यांना नालगोंडा जिल्ह्यातील पाणीटंचाई त्यांना बघवत नसे,त्यामुळे त्यांनी जलसाधना समितीची स्थापना केली. येथील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी चळवळ चालवली. गावातील फ्लोराईडग्रस्त पाण्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आता ते ऑल-इन-वन प्रोग्राम चालवतात. शाळांमध्ये मुलांना पर्यावरण संवर्धन विषयांवर जागृती करतात.सत्यनारायण यांच्या उदाहरणावरून हे तर नक्कीच लक्षात येतं की मानवाने या निसर्गातील पंचमहाभूतांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं तर ह्या पृथ्वीचं पुन्हा एकदा नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.
पर्यावरणदिनी वृक्षारोपण करा हे सांगावं लागतं.जेमतेम एक तरी वृक्ष लावा अशी विनंती करावी लागते. पण जर एक व्यक्ती 70 एकर जागेत संपूर्ण जंगल उभं करू शकते तर हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या देशाची कोट्यवधी लोकसंख्या असलेला देश किती मोठा चमत्कार घडवू शकतो. दरवर्षी पृथ्वीचं वाढणारं तापमान, असह्य होणारा उन्हाळा, ग्लोबल वॉर्मिंग सारखं संकट,ऑक्सिजन ची कमतरता यासारख्या समस्या उभ्या राहिल्या की आपल्याला वृक्षारोपणाची आठवण येते. पण, कोणाचीही वाट न बघता जंगलनिर्माण करणारे सत्यनारायण यांनी मात्र आपल्यापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. चला, पर्यावरण दिनाची वाट न बघता वृक्षारोपण करू या आणि झाडं जगवू या.