इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
सारस पक्ष्यांची हाक……
चॅम्पियन ऑफ द अर्थ : डॉ.पूर्णिमा देवी बर्मन
नुकतीच काही दिवसांपूर्वी बातमी वाचनात आली, भारताच्या डॉ.पूर्णिमा देवी बर्मन यांना युनायटेड नेशन्सच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि उत्सुकता जागृत झाली, कोण आहेत या डॉ. पूर्णिमा देवी बर्मन? काय कार्य आहे त्यांचं, की ज्यामुळे त्यांना इतका मोठा सर्वोच्च पर्यावरण सन्मान मिळाला. आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांची 2022 साठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च पर्यावरण सन्मानासाठी झालेली निवड ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. कारण यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे; यावरून या पुरस्काराचे मोल लक्षात येते.
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा यु एन इ पी कडून दिला जाणारा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार नैसर्गिक जगाचे रक्षण करणाऱ्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांनी आसाममधील ‘ग्रेटर अडज्यूटंट स्टोर्क’ या क्रौंच प्रजातीतील सारस पक्षांचे संवर्धन करण्यासाठी महिलांची ‘हरगीला आर्मी’ स्थापन केली.आसामी भाषेत हरगीला म्हणजे हाड गिळणारा पक्षी.आसाममधल्या लोककथांमध्ये, सणउत्सवांमध्ये, स्थानिक लोककलांमध्ये देखील या पक्षाचा संदर्भ वेळोवेळी दिसून येतो. ज्यावेळी या पक्षांची संख्या 250 वरून घसरून एकदम 28 वर आली. त्यावेळी युएनइपी तर्फे सारस पक्षी संवर्धन कार्यक्रमाची प्रकर्षाने गरज जाणवू लागली.
पुष्कळदा पक्ष्यांच्या जीवनातला परमआनंदाचा क्षण म्हणजे त्यांच्या पिलाचा जन्म असतो. पिल्लाला जन्म देण्यासाठी पक्षी आणि पक्षीण एकत्र येतात. पिलाच्या संगोपनाची जबाबदारी संपली की दूर जातात पण, ही जबाबदारी पार पडताना वाटेल ते कष्ट ते आनंदाने सहन करतात. पर्यावरणतज्ञ लेखक प्रकाश गोळे त्यांचा सारस प्रजातीतल्या क्रौंच पक्षांबद्दलचा अनुभव खूप बोलका आहे. ते म्हणतात की,” लडाखमधल्या वाळवंटातून नदी वळण घेत वाहते. अशा एका प्रवाहात जलवनस्पतींचा ढिगारा करून क्रौंच आणि क्रौंचीने घरटे बांधले होते. ते आळीपाळीने आपली अंडी उबवत होते. एक दिवस हवा अचानक बिघडली. हिमवृष्टी सुरू झाली. क्रौंचीन घरट्यात बसून होती. रात्रभर हिमवृष्टी चालू होती. नदी गोठून गेली. क्रौंचिनीच्या पिसावर बर्फ जमा झाला की तो क्रौंच नर येऊन झटकून टाकत असे. रात्रभर ती मादी अंड्यांवरून हलली नाही. दिवस उजाडल्यावर ती उठली. आखडलेलं अंगं तिने मोकळं केलं आणि बाजूच्या निसरड्या बर्फावर आपला तोल सांभाळत अन्न शोधण्यासाठी दूर गेली. तितका वेळ तिच्या शेजारी घरट्याचे संरक्षण करत असलेला नर आता घरट्यामध्ये गेला आणि अंडी उबवायला लागला. म्हणजेच अंडी उबवण्याचे काम फक्त पक्षीणच करते असं नाही तर पक्षीही ही जबाबदारी स्वतःवर घेत असतो.”
वयाच्या केवळ पाचव्या वर्षी पौर्णिमा यांना आई-वडील आणि भावंडांपासून दूर असं ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असणाऱ्या गावात तिच्या आजीसोबत राहायला पाठवलं गेलं.ही छोटी मुलगी बिचारी खूप अस्वस्थ झाली. तिच्या आई-वडिलांच्या, भावंडांच्या वियोगात तिचं कशात लक्ष लागेना. पौर्णिमाची आजी शेतकरी होती. ती तिला तिचं मन रमवण्यासाठी जवळच्या शेतांमध्ये घेऊन जायची, जंगलात घेऊन जायची. तिथले विविधरंगी पक्षी दाखवायची. त्या पक्षांची गाणी शिकवायची. सतत पक्षांच्या सानिध्यात राहून तिचं मन खरोखर पक्षांमध्येच रमायला लागलं. अनेक सारस पक्षी, त्यांच्या अनेक प्रजाती त्या काळात तिने पाहिल्या आणि ती त्या पक्षांच्या प्रेमात पडली. प्राणी शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर पौर्णिमा देवी बर्मन यांनी सारस पक्षांवर पीएचडीसाठी संशोधन सुरू केलं. पण, त्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत ते पक्षीच आता उरले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जेवढ्या प्रजाती सध्या जिवंत आहेत त्यांचं संवर्धन करण्यावर आधी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्यांचा पीएचडीचा प्रबंध बाजूला ठेवून 2007 मध्ये सारस पक्षांच्या संरक्षणाची मोहीम मोठ्या उत्साहात सुरू केली.
सारस पक्ष्यांची दुर्गंधी युक्तविष्ठा आणि एक अपशकुनी पक्षी असा गैरसमज करून गावातील लोकांनी सारस पक्ष्यांची सर्व घरटी उध्वस्त केली होती. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की, हाच आपला आवडता सारस पक्षी जगातल्या सध्या दुसऱ्या क्रमांकाच्या दुर्मिळ पक्षांमध्ये गणला गेला आहे, त्यावेळी त्या खूप अस्वस्थ झाल्या. आणि मग लुप्तप्राय होणाऱ्या ह्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी ‘ हरगीला आर्मी’ ची स्थापना झाली.सध्या या ‘हरगिला आर्मी ‘ मध्ये दहा हजार पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. त्या घरट्यांचं संरक्षण करतात. घरट्यांमधून खाली घसरून पडलेल्या जखमी सारस पक्षांचे पुनर्वसन करतात.त्यांच्या नवजात पिल्लांचं आगमन साजरं करतात. त्या नवजात पिल्लांचं संगोपन करतात. स्त्रीमध्ये जन्मजातच मातृत्वभाव असतो. त्यामुळे अशा पक्षांचं, त्यांच्या पिल्लांचे संवर्धन करताना हरगीला आर्मीतल्या स्त्रिया या पक्षांच्या माता बनल्या आणि संवर्धन करण्यात यशस्वी झाल्या. 2017 मध्ये अमृतादेवींनी या पक्षांना त्यांची अंडी उबवण्यासाठी उंच बांबूची घरटी बांधायला सुरुवात केली आणि मग प्रायोगिक तत्त्वावर या सारस पक्षांची पिल्ले त्यात उबवण्यात आली. हरगिला आर्मीतल्या स्त्रिया सारस पक्षांसारखे मुखवटे बनवतात आणि ते विकतात. यामार्गाने त्या सारस पक्षांच्या संवर्धनाची त्या जाहिरात करतात. त्यातून त्यांना आर्थिक प्राप्ती देखील होते परंतु, एकीकडे या लुप्त होणाऱ्या प्रजातीबद्दलची जनजागृती या माध्यमातून त्या करतात.
या मोहिमेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना जोडणं त्यांच्यासाठी सोपं काम नव्हतं. मग विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे, पथनाट्य बसवणे, सामुदायिक नृत्य बसवणं अशा प्रकारे विविध उपक्रम करून अमृता देवींनी हरगिला आर्मीचा विस्तार केला. आज या मोहिमेमध्ये दहा हजारहुन अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. सारस पक्षी नष्ट होण्याची कारणे शोधताना त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या पाणथळ प्रदेशात सारस वाढतात ते पाणथळ प्रदेश प्रदूषित आणि निकृष्ट झाले आहेत. त्याची जागा इमारती, रस्ते, मोबाईल टॉवर्स यांनी घेतली. वेगाने शहरीकरण झाले. त्यामुळे ज्या पाणथळ प्रदेशातील जीवांवर सारस पक्षांचे पालन पोषण होत होते, तेच नाहीसे झाले. पण, हरगिला आर्मीच्या संवर्धन कार्यक्रमापासून सारस पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या 28 वरून 250 पर्यंत आली. ज्यामुळे जगातील सारस पक्षांची सर्वात मोठी वसाहत या गावांमध्ये तयार होऊ लागली. त्यासाठी हरगिला आर्मीने सारस पक्ष्यांना घरटी बांधता यावी म्हणून 45 हजार रोपे पाणथळ भागात लावली. या स्त्रिया पाण्यातलं निरूपयोगी प्लास्टिक काढून टाकतात आणि नद्यांच्या काठावर ,ओल्या जमिनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून सारस पक्ष्यांच्या रहिवासासाठी सुयोग्य वातावरण तयार करतात.
डॉ. अमृता देवी बर्मन म्हणतात की,” पुरुषप्रधान समाजामध्ये एखाद्या पक्षाच्या संवर्धनासाठी इतक्या मोठ्या संख्येने महिला आव्हान स्वीकारत आहेत आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवत आहेत, ही हरगीला आर्मीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जिथे स्त्रिया असतील तिथे सर्व काही शक्य आहे.” 2017 साली अमृता देवी बरमन यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच नारी शक्ती पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. तसेच युनायटेड किंग्डमचा ग्रीन अवॉर्ड देखील मिळाला आहे. अशा प्रकारे पर्यावरण क्षेत्रातील त्यांना असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ.अमृता देवी बर्मन यांच्या या कार्यासाठी चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार खरोखर सार्थ ठरतो. कारण या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक जीव हा निसर्गाचा समतोल साधण्यासाठी जन्माला आला आहे.
पक्ष्यांच्या हालचालींचा, वर्तणुकीचा अभ्यास करताना तज्ञांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत जाते की, निसर्गानेच या नर ,मादी पक्ष्यांना एकत्र आणण्यास, एकमेकांवर प्रेम करण्यास प्रवृत्त केलेलं असतं. क्रौंच, सारस , हंस, गरुड हे पक्षी जन्मभर आपल्या जोडीदाराला सच्चेपणाने साथ देतात. बदक, मोर, कोंबडे हे पक्षी अंडी उबवण्याची आणि पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी पूर्णपणे पक्षिणीवर टाकतात तर, काही प्रजातीत ही कामगिरी पूर्णपणे नरपक्षी सांभाळतो. अंडी घालून मादी घर सोडून जाते पण, नर मात्र जबाबदारीने न रागवता संगोपनाची जबाबदारी स्वतःवर घेतो. किती समजूतदार वृत्ती असते, कोणताही स्वार्थाचा इथे लवलेश नसतो. एका अदृश्य बंधनांनी हे जखडलेले असतात.त्यांच्या प्रत्येक कृतीला, वर्तनाला अर्थ असतो. निस्वार्थ पारलौकिक वृत्तीने हे जीव एकमेकांशी बांधलेले असतात. निसर्गाची रचनाच तशी असते. पण,मानव स्वतः च्या स्वार्थापोटी ही रचना बदलवायचा आटोकाट प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो.पण, पक्ष्यांच्या या सहजीवनाकडे पाहिलं की जाणवतं, की निसर्ग नियमानुसार राहिलात तरच सुखी, समाधानी जीवन जगाल.
स्मिता अनिल सैंदानकर
9423932203
Column Nisarga Yatri Dr Pournima Devi Burman by Smita Saindankar
Great Indian Bustanrd Environmentalist UNEP United Nation
Champions of The Earth