इंडिया दर्पण विशेष लेखमाला
निसर्गयात्री
या संगीतकारामुळे साकारलं खासगी अभ्यारण्य
लहानपणापासून केवळ संगीत आणि निसर्ग यांचं वेड असणारा सुप्रसिद्ध संगीतकार, पार्श्वगायक, वाद्य संयोजक, निर्माता अभिषेक रे याच्या वन्यजीव प्रेमातून ‘सीताबनी वन्यजीव अभयारण्य’ उभं राहिलं. भारतातलं हे पहिलं खाजगी अभयारण्य आहे. अभिषेकचा हा दुहेरी प्रवास जाणून घेऊया आपण आजच्या या लेखातून.
निसर्गामध्ये स्वतःचं असं एक संगीत असतं, निसर्गाची स्वतः ची वेगळी धून असते. विविध प्राणी, पक्षांचे आवाज ,पानांची सळसळ, मोरांची केकावली, किड्यांचा किर्रर्र आवाज, मधूनच वाहणाऱ्या एखाद्या पाण्याच्या ओहोळाचा मंद आवाज तर कुठे धबधब्याच्या पाण्याचा काळजाचा ठोका चुकवणारा भीषण ध्वनी ,तर कधी पापड मोडल्यावर व्हावा तसा, खाली पडणाऱ्या शुष्क पानांवर पाय ठेवल्यावर झालेला आवाज असे अनेक ध्वनी जंगलात तुम्हाला ऐकायला येतात. हे नैसर्गिक संगीत ऐकण्यासाठी फक्त तुमचे कान मात्र तयार असावे लागतात. तुमचं मन संवेदनशील असावं लागतं. तरच हे संगीत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतं.
अशाच एका संवेदनशील सुप्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार, पार्श्वगायक आणि निर्माता अभिषेक रे या तरुण कलाकाराने त्याच्या निसर्ग प्रेमापोटी स्वतःचं खाजगी ‘सीताबनी वन्यजीव अभयारण्य’ उभं केलं. बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना मिळालेल्या प्रसिद्धीत न रमता त्याच्या कमाईतून वन्यजीव संवर्धनासाठी तो काम करतो.अभिषेक म्हणतो,”जर मला जर निसर्गाचे वेड नसते तर मी कदाचित संगीतकार होऊ शकलो नसतो. बऱ्याचदा बॉलीवूडमधील कामांमध्ये व्यस्त असताना मन मात्र निसर्गाच्या ओढीने तळमळत असतं.”
अभिषेकला लहानपणापासूनच संगीत आणि वन्यजीवन याचं प्रचंड वेड होतं. पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथे त्याचा जन्म झाला.हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात रमलेल्या कुटुंबातून आलेल्या अभिषेकने चार वर्षाचा असल्यापासून हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, पाश्चात्य शास्त्रीय संगीत तसेच वाद्यवादन या गोष्टींमध्ये स्वतःला पारंगत केलं. त्यानंतर तो दिल्लीला स्थलांतरित झाला. स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ काढला. अनेक जाहिरात, चित्रपट, माहिती ,टेलिव्हिजन, टायटल ट्रॅक आणि सर्व आघाडीच्या चैनल साठी त्यांनी संगीत दिलं .पानसिंग तोमर,वेलकम बॅक ,साहेब बीबी आणि गॅंगस्टर, वेडिंग एनिवर्सरी,आय अँम कलाम,चार दिन की चांदनी यासारख्या लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त बॉलीवूड चित्रपटांसाठी त्याने संगीत दिलं आणि पार्श्वगायनदेखील केलं.
कवी, गीतकार गुलजार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत अनेक संगीत अल्बम तयार केले. गायक सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्यासोबत पार्श्वगायन केलं. 2006 चा सर्वोत्कृष्ट संगीताचा इंडियन टेली पुरस्कार त्याला मिळाला आहे. संगीत क्षेत्रामध्ये इतकी यशस्वी कारकीर्द असतानादेखील अभिषेकला निसर्ग मात्र नेहमीच खुणावत राहिला. अभिषेकच्या आयुष्यात दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. एक म्हणजे संगीत आणि दुसरे वन्यजीवन. पण, पिंजऱ्यातले बंद प्राणी पाहून त्याचं मन दुखी व्हायचं. अभिषेक म्हणतो,” TOLERANCE FOR ALL FORMS OF LIFE” हा आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. पृथ्वीवरती सर्व जीवांना समान न्याय मिळाला पाहिजे. परंतु माणसाला मात्र सर्वात जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत.
जंगलांवर अतिक्रमण करून माणसाने काँक्रीटचे जंगल उभारले.त्यामुळे जंगलातल्या शेकडो प्रजाती नष्ट झाल्या आणि अजूनही होत आहेत. स्वतः च्या स्वार्थासाठी माणसाने प्राण्यांना पिंजऱ्यात टाकलं आणि त्यांना वन्यजीव, धोकादायक प्राणी असे लेबल लावून मोकळा झाला. खरंतर ‘वन्यजीव’ ही खूप दिशाभूल करणारी व्याख्या आहे. वन्यजीव ही संकल्पना म्हणजे स्वार्थी मानवाचं षडयंत्र आहे.”
अभिषेकने बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत कमावलेली सर्व रक्कम गुंतवून जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्यालगतची एक ओसाड टेकडी विकत घेतली आणि सात वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तिथे ‘ सीताबनी वन्यजीव अभयारण्य’ उभं केलं. या भागात सीताबनी नावाचे एक मंदिर आहे आणि स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की रामाने सीतेला सोडल्यानंतर सीतेने काही वर्ष तिची मुले लव आणि कुश यांचे संगोपन करण्यासाठी येथे घालवली होती. या अभ्यारण्याचं नाव या कथेला अनुसरून ठेवलं गेलं. ह्या अभयारण्याच्या उभारणीपूर्वी अभिषेकने रणथंबोर नॅशनल पार्कच्या डॉक्टर जी. व्ही. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य प्राण्यांचा विशेष अभ्यास केला. प्राण्यांचे आवाज,त्यांच्या हालचाली कशा वाचायच्या, कशा ओळखायच्या याचा अभ्यास केला. प्राण्यांना उत्कृष्ट प्रतीचं गवत मिळावं म्हणून बियाणं पेरलं. जमीन तणमुक्त केली.जमिनीची मशागत करावी लागली.
जमिनीचा एक भाग मोकळ्या गवताळ प्रदेशात विकसित करण्यात आला.असंख्य विविध प्रकारची झाडं लावण्यात आली. वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी त्यांना दीर्घकाळ पाण्याचा पुरवठा होईल असे कृत्रिम पाणवठे आणि जलकुंभ तयार केले गेले. इथली वनसंपदा मानवाच्या विनाशकारी स्पर्शापासून मुक्त आहे. इथल्या अभयारण्यात वाघ,बिबट्या आणि काळीअस्वलं हे प्रमुख आकर्षण आहेत. अभिषेकने वन्यजीवांच्या सुखसोयीसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते सर्व करण्याचे प्रयत्न केला. इथे येणाऱ्या लोकांना जंगलाशी जुळवून घ्यावं लागतं. कोणत्याही प्रकारचे मोठ्या प्रकाशाचे दिवे किंवा जंगलाची शांतीभंग करणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या कृत्रिम आवाजांना इथे परवानगी नाही. सध्या या अभयारण्यामध्ये वाघ, बिबट्या,हरीण आणि सहाशे विविध प्रकारच्या इतर प्रजाती राहत आहेत.
प्राण्यांच्या अधिवासाला कोणताही धोका पोहोचू नये, त्यांच्या अधिवासामध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून तिथले पर्यटन देखील अभिषेकने नियंत्रित ठेवले आहे. अभिषेक म्हणतो की,” जसजसं तुम्ही जंगलाचा अभ्यास करायला लागता तसतसं ते तुमच्यापुढे एखाद्या पुस्तकांसारखं उलगडत जातं.त्याची भाषा तुम्हाला समजायला लागते. ते तुम्हाला निर्णय देऊ लागतं,संकेत देऊ लागतं आणि मग त्यांच्या गुढ, गुप्त जीवनशैलीची झलक आपल्यापुढे साक्षात उभी राहू लागते.”
व्याघ्र संवर्धनावरील भारताच्या राष्ट्रगीताचा अभिषेक संगीतकार आणि गायक आहे.तसेच तो एक अधिकृत वन्यजीव ट्रॅकरदेखील आहे.वन्यजीव ट्रॅकर होण्यासाठी तुम्हाला प्रचंड उत्कटता ,संवेदनक्षमता ,संयम आणि सहनशीलता असावी लागते. अभिषेक त्याच्या सीताबनी वन्यजीव अभयारण्यातला एक अनुभव आपल्याला सांगतो की,” एकदा या अभयारण्यातून फिरत असताना चंद्राच्या प्रकाशामध्ये गवतावर निवांत पडलेली एक वाघीण मी पाहिली. मी जवळ येताच आधी तिने माझ्याकडे संशयाने पाहिलं पण, नंतर ती पुन्हा गवतात निवांत खाली पडली आणि त्यावेळी अनेक दुर्मिळ अशी छायाचित्र काढण्याची संधी मिळाली.
अर्धा तास गेल्यानंतर तिने सहज पुन्हा मागे वळून पाहिलं आणि पुन्हा एकदा ती माझ्याकडे पाठ करून निघून गेली. यावेळी असं जाणवलं की कोणताही वन्य प्राणी खरंतर रात्रीच्या वेळी इतकं सहज माणसाला सोडू शकत नाही किंवा पाठ फिरवणार नाही पण जोपर्यंत त्या प्राण्याचा माणसावर पूर्ण विश्वास असेल तोपर्यंतच हे शक्य आहे.माणसाने त्यांच्यावर विश्वास ठेवला तर प्राण्यांचाही आपल्यावर पूर्ण विश्वास असतो आणि त्या क्षणी सिताबनीची निर्मिती केल्याबद्दल अतिशय आनंद झाला आणि विश्वास मिळाला की आपण घेतलेला निर्णय सार्थ आहे.”
खरंतर बॉलीवूडमध्ये संगीतकार म्हणून इतकं नाव कमावल्यानंतर आपली यशस्वी कारकीर्द पुढे सुरू ठेवण्यासाठी अभिषेक सर्व शक्तीनिशी त्या क्षेत्रात काम करू शकला असता पण, एखाद्या संवेदनशील कलाकाराचे हेच वैशिष्ट्य असतं.त्याचं मन रमलं ते निसर्गातल्या संगीतामध्ये, शाश्वततेमध्ये. अभिषेक महिन्याचे काही दिवस संगीतकार असतो तर काही दिवस निसर्गसंवर्धक. निसर्ग आणि संगीत याशिवाय अभिषेक जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. जेव्हा एखादा संगीतकार बॉलीवूडच्या राजकारणामध्ये निराश होतो, तेव्हा निसर्ग त्याला मनःशांती देतो आणि मग तो या शुद्ध, पवित्र अशा निसर्गाकडे वळतो.
काही दिवसांपूर्वी नामिबियामधून पाच मादी आणि तीन नर चित्त्यांची भारतामध्ये आयात करण्यात आली. भारतात 1952 पासून चित्ता हा प्राणी नामशेष झाला. मुघल बादशहा अकबराच्या दरबारात त्याकाळी इतर प्राण्यांची शिकार करण्यासाठी एक हजार चित्ते होते. छत्रपती शाहू महाराजांकडेदेखील शिकारीसाठी 35 हून अधिक चित्ते होते. चित्त्यांचं मुख्य वस्तीस्थान हे गवताळ प्रदेशात असतं परंतु मोठ्या प्रमाणातल्या मानवी हस्तक्षेपामुळे चित्त्याचं नैसर्गिक वसतीस्थान नष्ट झालं. खरंतर ही खूप दुर्दैवी घटना आहे.कालांतराने अशा अनेक प्रजाती नष्ट होतील आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्याला हे प्राणी चित्रांमध्ये किंवा केवळ प्राणी संग्रहालयामध्ये दाखवता येतील अशी वेळ येऊ नये. वन्यजीव ही आपल्या देशाच्या अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे. या परिसंस्थेचे रक्षण केलं तरच आपल्याला ताजं पाणी, शुद्ध हवा, सुपीक माती आणि पाऊस मिळू शकेल.जर आज वन्यजीव वाचवले तरच आपण उद्याचा भारत वाचवू शकतो.
Column Nisarga Yatri Composer Abhishek Ray by Smita Saindankar
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD