इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
नाशिकचे व्हीसलमॅन : चंद्रकिशोर पाटील
नुकताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव केला. त्यांच्या नदी प्रदूषणविरोधी कार्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले आणि चंद्र किशोरजी यांचं नाव क्षणात देशभरात पसरलं. पर्यायाने आपल्या नाशिकचंदेखील. नाशिककरांसाठी ही खरोखर अभिमानाची गोष्ट ठरली.
प्रत्येक नागरिकाची अत्यंत छोटीशी कृती पण किती मोलाची ठरू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रकिशोरजी. ज्यामुळे नाशिकला धार्मिक क्षेत्राचा मान मिळाला आहे अशी आपली गोदावरी.अनेक पर्यटक नाशिकला भेट देत असतात.धार्मिक विधी असो ,ऐतिहासिक पर्यटन असो किंवा आताच्या काळात कमी प्रदूषण असणारं थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकला ओळखलं जातं.
नदी म्हणजे नाद करणारी ती. नदी म्हणजे वाहणं, नदी म्हणजे प्रवाही.पण ,दिवसेंदिवस नागरिकांमध्ये आलेली उदासीनता आणि निष्काळजीपणा आता शहराचं सौंदर्य कमी करत आहे.आता वेळ आली आहे की आपला हा पारंपारिक, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पावलं उचलण्याची. कारण प्रदूषित नद्या,प्रदूषित ऐतिहासिक ठिकाणे,अस्वच्छता पाहून आपल्याला तरी अशा ठिकाणी भेट द्यावीशी वाटते का हो.
पण, एक सजग नागरिक म्हणून चंद्रकिशोर पाटील यांना नागरिकांचं निष्काळजीपणाने वागणं पाहवलं नाही आणि त्यांनी कोणाचीही वाट न बघता ,स्वतःच या कार्यात पुढाकार घ्यायचं ठरवलं. सणासुदीच्या काळात जमा झालेले निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून अनेक लोक नदीमध्ये फेकतात.हा विचार करत नाही की पुढे या कचऱ्याचं काय होत असेल?प्लास्टिकच्या पिशव्या नदीच्या पाण्यात विघटित होत नाहीत.त्या नदीवर तरंगत राहतात. नदीतल्या सुक्ष्म जीवांच्या जीविताला धोका निर्माण करतात. पण चंद्र किशोर पाटील सकाळपासून ते रात्रीपर्यंत नदीच्या काठावर पहारा ठेवून नदीत कचरा टाकणाऱ्या लोकांना अडवतात.लोकांकडून निर्माल्य असो वा इतर कचरासदृश्य गोष्टी जमा करून घेतात.आणि नंतर महानगरपालिकेच्या लोकांच्या सुपूर्द करतात.
ज्या लोकांनी ऐकलं नाही त्यांना शिट्ट्या मारून थांबवतात आणि तेव्हापासून त्यांना व्हीसलमॅन असं नाव पडलं. तीच त्यांची ओळख बनली. एवढे करूनही जे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते त्यांच्यासाठी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी बाटलीत भरून आणलेल्या प्रदूषित नदीच्या पाण्याचा एक घोट तरी पिऊन दाखवा असा आग्रह करतात की जेणेकरून लोकांना त्यांच्या या कार्याचा उद्देश कळावा. त्याशिवाय, ते लोकांना तीव्र प्रदूषणाच्या परिणामांची जाणीव करून देतात आणि अशा गोष्टी करू नये अशी विनंती करतात. IFS अधिकारी श्वेता बोड्डू यांनी चंद्रकिशोर यांच्या निस्वार्थ भावनेने केलेली ही कृती लक्षात आली आणि 31 ऑक्टोबरला ही गोष्ट त्यांनी त्यांच्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या पिशव्यांशेजारी उभे असलेल्या चंद्रशेखरजींच्या फोटोसह पोस्ट केली.पाटील यांच्या प्रयत्नांचे नेटीजन्सकडून प्रचंड कौतुक झाले.एखाद्या माणसाची छोटीशी कृती आपल्या नद्यांचं किती मोठा नुकसान टळू शकतो याचे उदाहरण म्हणजे चंद्रकिशोर पाटील.अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व. चंद्रकिशोरजी संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजा विरोधी जनजागृतीदेखील करतात. मी ,माझं शहर अशी आत्मीयता प्रत्येकात असली पाहिजे. त्यांचे कार्य खरोखर तरुणांसाठी किंवा सर्वच नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील नद्यांच्या अवस्थेची 2009 आणि 2015 साली पाहणी केली होती. त्यामध्ये प्रदूषित नद्यांची संख्या 150 वरून 279 पर्यंत देण्यात आपण यशस्वी झालो आहोत .त्यामध्ये सर्वाधिक 49 गलिच्छ नद्या या महाराष्ट्रातील आहेत .महाराष्ट्रातील सध्या एकही नदी निर्धोक राहिलेली नाही. सर्व जलस्त्रोत सुद्धा प्रदूषित झाले आहेत. पिण्यासाठी खात्रीचं असं स्वच्छ पाणी मिळणे कठीण झाले आहे आणि त्यामुळे लोकांना घराघरात एक्वागार्ड सारखे शुद्धीकरण उपकरण किंवा बाहेर पडल्यानंतर बाटलीबंद पाणी घेणं गरजेचं वाटू लागलं. आपल्या पुढच्या पिढ्यांना स्वच्छ पाणी मिळू नये याची आपण काटेकोर अंमलबजावणी करत आहोत.प्रदूषणाला कुठलीही जात नसते. धर्म नसतो. हा आपण निर्माण केलेला भस्मासुर आहे जो लवकरच आपल्या मुळावर उठेल. आपली भारतीय शहरं ही कचऱ्याने भरून जात असताना पाश्चात्त्य राष्ट्रांतली हजारो शहरं कचरामुक्तिकडे जात आहेत.
अनेक देशांमध्ये त्यांची शहरं सुंदर करण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत.या शहरांना पर्यटनासाठी जगभरातून पसंती वाढत आहे .आपण परदेशात पर्यटनासाठी जाऊन आलो की तिकडची स्वच्छता, तिथली स्वच्छ पर्यटनस्थळ, स्वच्छ नद्या पाहून आल्यानंतर आपल्या देशात आपण त्याचं कौतुक करतो परंतु, आपली शहरं मात्र सुधारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर थोडाही आपण प्रयत्न करत नाही .आपल्या देशातल्या बहुतेक तलाव, नद्या या असंख्य आजार बहाल करणारे पाणी देत आहेत. कारण कोणत्याही प्रकारच्या कठोर शिक्षेची तरतूद या प्रदूषणकर्त्यांना नाही.सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना मजबूत शिक्षा आहेत परंतु, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणे, नद्या प्रदूषित करणे यासारख्या वाईट प्रवृत्तींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाहीत, जोपर्यंत शासन-प्रशासन, प्रसार माध्यम यांच्या अग्रक्रमामध्ये पर्यावरण विषय येत नाही तोपर्यंत आपल्या देशात कदाचित प्रदूषणमुक्त पर्यावरणाला महत्त्व लोकांना कळणार नाही.प्रत्येक नागरिकाने अशा छोट्या छोट्या कृतीतून आपलं शहर, या शहराला मिळालेला ऐतिहासिक वारसा, आपली धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. फक्त शासनाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा चंद्रकिशोरजीप्रमाणे या देशाचे नागरिक म्हणून, या शहराचे नागरिक म्हणून आपलंही काही कर्तव्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तरच भारतातील प्रत्येक शहर हे सुंदर शहर म्हणून नावारूपाला येईल